आर्य चाणक्य हा मौर्य साम्राज्याचा गुरुवर्य. एक वैदिक ब्राह्मण. तो काळ छोट्या गणराज्यांचा. परकीय आक्रमणाचे कायम भय. सर्व गणराज्यांना एकत्र करून एकसंघ स्वराज्य ही संकल्पना या गुरुवर्यांची होती. तो ध्यासच त्यांनी घेतला. उत्तरेकडे अगदी काबूलपासून ते दक्षिणेकडे सिंधू नदीच्या खोर्यापर्यंत एकछत्री भारतवर्ष करण्यासाठी संकल्प केला. चंद्रगुप्त मौर्याला हाताशी धरून मौर्य साम्राज्य भारतवर्षावर साकार करणारा हा पडद्यामागला सूत्रधारच! बलवान, एकसंध, स्वराज्य उभारणीसाठी काहींच्या हिताचा बळी गेला तरी बेहत्तर, हे तत्त्वज्ञान मांडून चाणक्याने इतिहास रचला! एकसंध अखंड भारतवर्षाची निर्मिती ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारा हा ध्यासवेडा शिक्षक!
तक्षशिला विद्यापीठातला कुलगुरू; अर्थतज्ज्ञ; राजनीती, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, रत्नपरीक्षा, रसायन विद्या, आयुर्वेद आणि युद्धनीती यांच्यातला ज्ञानी गुरुवर्यच! सामान्यजनांचे हित, पददलितांचा उत्कर्ष, परकीय आक्रमणापासून संरक्षण आणि अखंड भारताची निर्मिती, यासाठीचा त्यांचा प्रवास विलक्षणच नाट्यपूर्ण. संघर्षमय. आर्य चाणक्य म्हटलं की ‘नंदाचा पाडाव केल्याशिवाय शेंडीला गाठ मारणार नाही!’ अशी भीष्मप्रतिज्ञा करणारा पुराणातला नायक, इतपतच ओळख नव्या पिढीला आहे. काळाच्या ओघात तो काळ अंधारात जात आहे. पण त्याही पलीकडे आर्य चाणक्याची महत्त्वाची ओळख असून ती दुर्लक्षित करून चालणार नाही. हिंदी रंगभूमीवरले नाटककार मिहिर भुता यांचे ‘चाणक्य’ हे नाटक रंगभूमीवर आले. त्याचा हा शैलेश दातार यांनी केलेला आविष्कार चाणक्यकाळातल्या एका विजयी उत्कर्षबिंदूपर्यंत घेऊन जातो. त्याचा वेगवान प्रवास काही प्रसंगात बंदिस्त केलाय. तो आजही राज्यकर्त्यांना खुणावतो आहे. तो कालबाह्य झालेला नाही.
पडदा उघडतो आणि पहाटेचे प्रसन्न वातावरण दिसते. आश्रमातील एक झावळ्यांनी सावरलेली पर्णकुटी. शिष्य गोपाळक आणि आर्य चाणक्य यांच्या संवादाने नाट्य सुरू होते. तक्षशिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा चाणक्यांनी त्याग केलाय. सत्ताधार्यांना त्याने नवा विचार देण्याचा प्रयत्न केलाय. सार्या संस्थानांना एका सूत्रात आणण्याची त्यांची प्रतिज्ञा आहे. त्या वाटेवर स्वकीयांकडूनच दुर्दैवाने विरोध होतोय. त्यावेळी ‘राष्ट्र’ किंवा ‘सुराज्य’ ही संकल्पनाही अस्तित्वात नव्हती. त्यामुळे ती पचनी पडणे महाकठीण. पाटलीपुत्र नगरीला भारतवर्षाची राजधानी बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे. यावरून धनानंद आणि चाणक्य वादविवाद वाढतात. टोकाचा वैचारिक संघर्ष होतो. अखेर चाणक्याला मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात येते. त्यावर येत्या दोन वर्षांत सत्तांतर करण्याची प्रतिज्ञा चाणक्य करतो. त्यानंतर युद्ध, आक्रमण होते. राजकीय-प्रशासकीय डावपेच रंगतात. शेवटी चाणक्याला अभिप्रेत असलेले एकछत्री शासन, ज्याचा सम्राट चंद्रगुप्त मौर्य आहे, ते स्थापन होते. आणि चाणक्याने सोडलेली शेंडीची गाठ बांधली जाते. यावर बेतलेले हे नाट्य.
विषय तसा ऐसपैस विखुरलेला, कथा-उपकथांनी भरलेला. तरीही त्यातील काही संदर्भ जमा करून ते निवडक प्रसंगात बसविण्याचा प्रयत्न नाटककारांनी केलाय.आजच्या राजकीय परिस्थितीत यातील चाणक्याचे काही संवाद हे फिट्ट शोभून दिसतात. एके ठिकाणी तो म्हणतो, ‘राजा होणं म्हणजे कदापि सुखी होण्याचा मार्ग नव्हे!’ तर चाणक्याच्या मते निष्ठेची संक्षिप्त, गोंधळलेली आणि गुळगुळीत व्याख्या करण्यात येते. जी अपेक्षित नाही. नाव, वंश, गोत्र या नाशवंत गोष्टी आहेत. त्या निष्ठेला पात्र नसतात. जनसमुदायाचे सुख, व्यवस्थेचा धर्म सांभाळणे म्हणजे निष्ठा!’
‘पुरु’ला चाणक्य ठासून सांगतो की ‘भारतवर्ष जर स्वतंत्र राहिला तरच धर्माची पुनर्स्थापना संभव होईल. हा प्रश्न समाजाच्या अस्तित्वाचा असेल आणि त्या अस्तित्वासाठी धर्मांतर बाधक ठरत असेल तर मात्र तो धर्मही त्याज्य आहे! बुद्धिवान-बलाढ्य शत्रूचा सामना करायचा असेल, तर भारतवर्षातील सर्वच राजांचे मजबूत संघटन असणे आवश्यक आहे!’
दिग्दर्शक प्रणव जोशी यांनी या वैचारिक मंथनाकडे पुरेपूर लक्ष दिलंय. चाणक्यचे काहीसे लांबलेले संवाद कुठेही रेंगाळणार नाहीत याची दक्षता घेतली आहे. एका प्रसंगातून दुसरा प्रसंग सहजतेने पकड घेतो. नाट्य गतिमान ठेवण्याकडे दिग्दर्शकाचा कल आहे. रंगमंचावरील डझनभर कलाकार आणि तेवढेच पडद्यामागील तंत्रज्ञ यांची सांगड उत्तम राखली आहे. शुभारंभी प्रयोग असूनही कुठेही अडथळा नव्हता. चांगल्या तालमी झाल्याचा प्रत्यय येत होता. काळ, विषय, आशय आणि सादरीकरण याचा तोल चांगलाच सांभाळाला गेलाय. विषय-आशयाची निवड हा कलाकृतीचा प्राण असतो. तो आजही राजकारण-प्रशासन यांना दिशादर्शक निश्चितच ठरेल. चाणक्यनीती कळणं महाकठीण आहे असं म्हणणार्यांना या नाट्याने ‘नीती’कडे थोड्या प्रमाणात जरी आकृष्ट केले तरी ते या निर्मितीचे यश ठरेल.
या नाटकाची संहिता ही तत्कालीन भाषेमुळे नजरेत भरणारी आहे. याची मूळ संहिता मिहीर भुता यांची असून हिंदीत नाटकाचे काही प्रयोग झालेत. मराठी अनुवाद व रूपांतर अभिनेते शैलेश दातार यांनी केलंय. त्यावर गेली दोनचार वर्षे प्रोसेस सुरू होती. संशोधन व अभ्यासही शैलेश दातार यांनी पुरेपूर केला. हिंदी नाटकात त्यांनी एक भूमिकाही केली होती. त्यामुळे ‘चाणक्य’ या नाटकाशी, त्याच्या भूमिकेशी त्यांची जवळीक झालेली. नेमके प्रसंग, बंदिस्त मांडणी आणि निवेदनामुळे घटनांची पार्श्वभूमी प्रकाशात येते. त्यामागली कुशलता दिसून येत आहे. ‘एका अभिनेत्याने शब्दांकन केलेले नाटक!’ हे वेगळेपण याच्या निर्मितीमागे आहे.
शैलेश दातार यांचे प्रदीर्घ कालावधीनंतर ‘चाणक्य’रूपातले पदार्पण सुखावणारे आहे. यापूर्वी त्यांची जयवंत दळवी यांच्या ‘बॅरिस्टर’ नाटकातील भूमिका गाजली होती. विक्रम गोखले यांच्यानंतर त्यांनी ही भूमिका पेलली. नाटकापेक्षा दूरदर्शन, मालिका आणि चित्रपटात हा रंगकर्मी बिझी आहे. ‘चार दिवस सासूचे’, ‘असंभव’, ‘उंच माझा झोका’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ अशा अनेक मालिकांतून ते घराघरात पोहोचले. ‘देवों का देव’ या हिंदी मालिकेतला त्यांचा नारदमुनीही चर्चेत होता. नाटक, मालिका, चित्रपट, जाहिराती यातली त्यांची वाटचाल लक्षवेधी म्हणावी लागेल. ‘चाणक्य’च्या यातील मध्यवर्ती भूमिकेत त्यांच्या अभिनयाचा अक्षरश: कस लागला आहे. ‘चाणक्य’ची देहबोली शोभून दिसते. संवादातली पकड तसेच स्वगतांतील विलक्षण झेप आणि अभिनयातील ताकद नाटकभर भारावून सोडते. काही संवादाला आणि हालचालींना रसिकांची उत्स्फूर्त दादही मिळते.
आर्य चाणक्यांसोबत डझनभर रंगकर्मींची टीम आहे. त्यांचं ट्युनिंग चांगलं जुळलेलं दिसलं. चाणक्यचा शिष्य गोपाळक आणि धनपालच्या भूमिकेत हरिहर म्हैसकर शोभून दिसले. शिरच्छेद करण्याचा आदेश देणारा राजा धनानंद रवींद्र कुलकर्णी यांनी ताकदीने उभा केलाय. भारतावर आलेलं संकट दूर करून सम्राटपदापर्यंत पोहचलेला चंद्रगुप्ताच्या करारी देहबोलीत चैतन्य सरदेशपांडे याने भूमिका चांगली रंगविली आहे. राक्षसाचार्य बनलेले ज्ञानेश वाडेकर देखील रुबाबदार दिसतात. अन्य भूमिकेत ऋषिकेश शिंदे (सेनानायक), नील केळकर (राक्षस), प्रसाद माळी (धर्मज), संजना पाटील (कटिका), विक्रांत कोळपे (पर्वतक), जितेंद्र आगरकर (वक्रनास, मंत्री) हे सारे उत्तम साथसोबत करतात. भाषा, शब्द त्याचे उच्चार हे परिणामकारक ठरतात. आर्य चाणक्यचा मानसिक संघर्ष सारेजण कळसापर्यंत पोहचविण्यात यशस्वी झालेत.
नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी या अडीच हजार वर्षांपूर्वीच्या विषयाच्या नाटकासाठी फिट्ट जुळणारे नेपथ्य उभं केलय. एक आव्हान म्हणून त्यांनी याचे नेपथ्य स्वीकारले असावे. काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचा ध्यास यापूर्वीही ‘सफरचंद’सह अनेक नाटकांत दिसून आलाय. यातही नेपथ्यरचनाही नजरेत भरते. एकूण आठ ‘स्थळं’ दाखविण्यात आलीयेत. पहिल्या अंकात तीन तर दुसर्या अंकात पाच लोकेशन्स दिसतात. आश्रमातील पर्णकुटी, धनानंदाचा कक्ष हे पुरणकाळात घेऊन जातात. दुसर्या अंकातील काठमांडूचा काष्टमंडप राजवाडा आणि पाटलीपुत्राच्या दुर्गातील तटाचा भाग नेपथ्यरचनेचा कमालच! गडकिल्ल्यांचा आभास भुरळ पाडतो. नेपथ्यरचनेतील सहजता व कल्पकता नोंद घेण्याजोगी. पुराणकाळातला नेमका आकृतीबंध मनात उमटतो.राहुल जोगळेकर यांची प्रकाशयोजना आणि निनाद म्हैसाळकरांचे पार्श्वसंगीत प्रत्येक प्रसंगात उठाव आणणारी आहे. आजकाल नाटकात साहसदृश्ये, लढाईचे प्रसंग दिसत नाहीत. यातील अशा थरार प्रसंगांना सिद्धांत घरत यांने न्याय दिलाय. वेशभूषा व रंगभूषा ही कमलेश बिचे आणि नीरजा यांनी अभ्यासपूर्ण केलीय.
यापूर्वी मराठी रंगभूमीवर ‘आर्य चाणक्य’ ताकदीने पेश करण्यात आलाय; पण एका पिढीने तो अनुभवला. १९८९च्या सुमारास डॉ. श्रीराम लागू यांनी गो. पु. देशपांडे यांची संहिता हाती घेतली आणि त्यांच्याच ‘रूपवेध’ संस्थेतर्फे प्रयोगही केलेत. आज त्याला ३५ वर्षे उलटली. त्या ‘चाणक्य विष्णुगुप्त’ या नाटकात नजरेत भरणारी एक गोष्ट आहे स्वत: डॉक्टरांचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका होती. त्यांनी नाटकात चाणक्याची शेंडी सोडून, विजयानंतर ती बांधल्याची घटना ठेवली नव्हती. विवेकी चाणक्य हा डोक्यात असा राग घालून असे विचित्र वर्तन करणार नाही, यावर डॉक्टर ठाम होते. त्यांना बालिश वाटणारी ही घटना त्यांनी वगळून नाट्य समर्थपणे उभे केले होते. डॉक्टरांना एक वैचारिक चौकट होती आणि ही वगळलेली घटनाही त्यावेळी नाटककार तसेच रसिकांनीही मान्य केली. एका मध्यंतरानंतर शैलेश दातार यांचा नवा चाणक्य बघतांना तो अस्सल वाटतो. ती सोंगबाजी वाटत नाही.
आजच्या मराठी व्यावसायिक नाटकाला मनोरंजनाच्या महाजत्रेतून बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न या निर्मितीमागे दिसतोय. नाटक म्हणजे, विवाहबाह्य संबंधांचे ‘हॉट’ विषय किंवा करमणुकीसाठीचे टाईमपास नाट्य कधी नव्हते आणि नाही. तर ते वैचारिक आनंद देणारीही कलाकृती असू शकते. हे आज ठासून सांगण्याची वेळ आलीय. हे नाट्य रसिकांना अस्वस्थ करून विचार करायला लावते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण कुठे, कसे आहोत, याचा शोध-बोध घ्यायलाही भाग पाडते. हेच ‘चाणक्य’ या नाट्यकृतीचे गमक म्हणावे लागेल. एका गुरुवर्यांचा चैतन्यदायी देशाभिमान जागविणारा सत्तांतरासाठी संघर्षमय प्रयोग बघितल्याचे समाधान नाटकातून मिळते. सुजाण रसिकांनी अनुभविण्यास हवा!
चाणक्य
मूळ लेखक : मिहिर भुता
रूपांतर : शैलेश दातार
दिग्दर्शन : प्रणव जोशी
नेपथ्य : संदेश बेंद्रे
प्रकाश : राहुल जोगळेकर
संगीत : निनाद म्हैसाळकर
सूत्रधार : दीपक गोडबोले
निर्माते : सुहास दातार, हरिहर म्हैसकर, प्रसाद व्यवहारे
निर्मिती : अभिजात क्रिएशन्स / मिलाप थिएटर्स