कोणत्याही लहान मुलाचे पहिले हिरो त्याचे वडील असतात. जगातील कोणताही प्रॉब्लेम आपला बाबा चुटकीसरशी सोडवू शकतो, हा त्याचा विश्वास असतो. पण शाळकरी वय संपून तरूण वयात पदार्पण करताना मुलाला त्याच्या हिरोच्या अनेक गोष्टी अँटीहीरो भासायला लागतात. कालपर्यंत बहुमोलाचा वाटणारा सल्ला आता लेक्चर वाटायला लागतो. यात वडिलांच्या जुन्या विचारांचाही (जनरेशन गॅप) वाटा असतो. वडिलांनी त्यांचे निर्णय आपल्यावर न लादता आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याला द्यायला हवं ही भावना तरूण पिढीत असते. तरूण मुलगा स्वत: बाप बनतो तेव्हा त्याला आपले वडील आपल्या भल्यासाठीच बोलत होते हा साक्षात्कार होतो. जर हे उशिराचे शहाणपण जरा लवकर सुचलं तर घरातील भांडणं मिटून प्रेमाने जगता येईल, हा विषयावर ‘बाप ल्योक’ हा चित्रपट भाष्य करतो.
तात्या, आई, त्यांचा मुलगा सागर यांचं गावात राहणार सुखी कुटुंब. सागर मिळणारी पुण्याहून नोकरी सोडून शेती करायला गावी आला आहे. तात्यांचा म्हणणं आहे की शेतीत काही राम नाही. तू शहरात नोकरी कर. तात्या सागरच्या नोकरीसाठी शेतीचा तुकडा विकायला देखील तयार आहेत. पण सागरला शहरात कामधंद्यासाठी न जाता गावातच काहीतरी करायच आहे. वडील मुलाचे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडत असतात. त्यामुळे सागर इतर वयात येणार्या मुलांप्रमाणे तात्यांना टाळण्याचा प्रयत्न करतो. याच काळात सागरच लग्न जमतं. गावातील लग्नपत्रिका वाटून होतात, पण नातेवाईकांना पत्रिका वाटायला कोण जाणार हा प्रश्न उभा राहतो. तात्यांना बाईक चालवता येत नाही म्हणून सागर मित्रांना गळ घालतो, पण तात्यांच्या शीघ्रकोपी स्वभावाला घाबरून कोणीही मित्र त्यांना घेऊन जायला तयार नाही. शेवटी सागरलाच तात्यांना सोबत घेऊन पत्रिका वाटायला जावं लागतं. रस्त्यावरील प्रवासाच्या जोडीला सुरू होतो वडील आणि मुलातील नात्याचा प्रवास… भांडणे, रोष, प्रेम… गत आठवणी, कडू गोड अनुभव घेत हा प्रवास संपतो. पत्रिका परिक्रमेतून वडील मुलाचे नातेसंबंध दृढ होतात की त्यात अधिक कटुता निर्माण होते, हे जाणून घ्यायला हा चित्रपट पाहायला हवा.
लेखक विठ्ठल काळे अत्यंत साध्या सरळ पद्धतीने ही कथा मांडतात. एका प्रसंगात सागर मित्राला फोन करून पत्रिका पोहोचवायला सांगतो, तेव्हा मित्र म्हणतो, बाजूच्या गावात लग्नाची मुलगी आहे. मी गुपचूप बघायला जातोय पण तू कोणाला सांगू नको. नाहीतर दुसरा मुलगा जाऊन लग्न जमवून येईल. तुझं लग्न जमलंय म्हणून तुला सांगतोय. शेतकरी मुलांची लग्न जमत नाहीत, मुलाला शहरात नोकरी लावण्यासाठी वडील शेतजमीन विकायला तयार आहेत. ग्रामीण जीवनातील तरुणांचे वास्तव दाखवताना लेखक विनोदी अंगाने तिरकस शैलीत व्यक्त होतो.
वडील आणि मुलगा या विविध भावनांचं पदर असलेल्या नात्याच्या कथेची पटकथा बांधताना कोणत्याही अतिरंजित नाट्याची जोड देण्याचा मोह दिग्दर्शक मकरंद माने यांनी टाळला आहे. शहरी भागात लग्नाआधी मुलामुलींनी एकत्र भेटणं स्वाभाविक मानलं जातं तसं ते ग्रामीण भागात असेलच असं नाही. घरच्यांच्या नकळत भेटताना सागर आणि त्याच्या होणार्या बायकोचा पाहिला रोमान्स, रुमालाच्या पप्पीवरून सुरू होतो आणि लहान मुलाला दिलेल्या गोड पप्पीवर संपतो, हा प्रसंग उत्तम जमून आला आहे. मुलगा वडिलांना मागे बसवून बाईक चालवत असतो, बाईक बंद पडल्यावर ती एका ट्रॅक्टरवर टाकून दोघे समान पातळीवर येऊन गप्पा मारायला सुरुवात करतात, तेव्हा मुलगा मनातील भावना वडिलांजवळ व्यक्त करतो. गाठ सुटायला सुरुवात होते. वडील लहान मुलाला सायकल शिकवतात आणि मुलगा मोठा झाल्यावर म्हातार्या झालेल्या वडिलांना बाईक शिकवतोय अशा प्रसंगातून दिग्दर्शक दिसतो.
गावातील निसर्गसौंदर्य, वळणदार रस्ते, वडील आणि मुलाच्या भावभावनांचा कल्लोळ दाखवणार्या सिनेमाचा प्रवास पाहताना प्रेक्षक या सिनेमाच्या कथेचा भाग होऊन त्यात गुंतत जातो, याचे श्रेय सिनेमाचे छायालेखक योगेश कोळी आणि संकलक आयश गाताडे यांना देखील जातं. ‘घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप रं, लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रं…’ गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं, विजय गावंडे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अजय गोगावले यांनी गायलेले हे गाणं आपल्या डोळ्याच्या कडा पाणावत वडिलांची आठवण करून देतं.
शशांक शेंडे यांच्यासाठीच ही भूमिका लिहिली गेली आहे असं वाटावं इतक्या सहजपणे यांनी तात्यांच्या भूमिकेत विविध रंग भरले आहेत. सुरुवातीला शिवराळ राकट वाटणार्या तात्याचे, हळव्या मनाचा, दुसर्यांचा विचार करणारा असे अंतरंग ते हळूहळू उलगडून दाखवतात. विठ्ठल काळे यांनी सागरचे तात्यांसोबतचे खटके, राग, वैताग ते कुटुंबाविषयीची तगमग, वडिलांविषयी वाटणारं प्रेम उत्तम दर्शवलं आहे. नवरा आणि मुलगा याच्यात मधल्यामध्ये अडकलेली, नेहमी पडती बाजू घेऊन पेल्यातील वादळ मोठे न होऊ देण्याची खबरदारी घेणारी तसेच वेळ पडल्यास नवर्याला आणि मुलाला चार गोष्टी ऐकवून चूक दाखवून देणारी खंबीर आई नीता शेंडे यांनी समर्थपणे साकारली आहे. नववधू मयुरीच्या भूमिकेतून पदार्पण करताना लक्ष वेधून घेण्यात पायल जाधव यशस्वी झाल्या आहेत.
वडील आणि मुलगा यांच्यातील प्रेमाची व्याख्या उलगडून दाखवणारा उत्तम सिनेमा क्वचितच पाहायला मिळेल. म्हणूनच हा सिनेमा नक्कीच पाहायला हवा.