तसं पाहिलं तर मॉरिशस हा इवलासा देश. जगाच्या नकाशावरचं ठिपक्यासारखं बेट. हिंदू वस्ती, त्यातल्या त्यात मराठी माणसं भरपूर असलेलं बेट. पण इथली वारी खूपच रंगतदार झाली. कारणही तसंच होतं. आमचे मित्र विराज कर्णिक सहकुटुंब तिथं राहत होते. जेव्हा तुमच्या ओळखीचं कुणीतरी त्या देशातलं स्थानिक असतं, तेव्हा तुम्हाला तो प्रवास खूपच सुकर जातो. आमच्या बाबतीत देखील तसंच झालं. त्यामुळे बरीच वर्ष होऊनही हा देश मनावर कोरला गेला आहे.
आधीच म्हटल्याप्रमाणे देश तसा लहानच. गाडीने दोनेक तासांत एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोचता येईल असा. पण निसर्गानं याला भरभरून दिलंय आणि ते नजरेत साठवताना आपण तितकेच आनंदी होतो.
साधा समुद्र घ्या. इवल्याशा बेटाला चारी बाजूंनी वेढता वेढता तो आपली कितीतरी रूपं दाखवतो. ग्रीग्रीचा खवळलेला, उसळणारा, अंगावर येणारा, आमच्यापैकी एकाची टोपी उडवणारा तुफान वारा असलेला समुद्र; तर एकदम शांत पहुडलेला, गुडघादेखील न भिजवता कित्येक मीटर पाण्यातून चालत जाता येईल, असा ब्ल्यू बे… अक्षरश: निळ्या शाईची ट्रेनभर आकाराची दौत उपडी करावी असा निळाशार रंग. इतकी विविधता क्वचितच कुठं अनुभवता येऊ शकते. पण मॉरीशसमध्ये ती आहे.
पुढं जाण्याआधी या देशाबद्दल थोडंसं अधिक जाणून घेऊ या. इथं इतके मराठी आणि हिंदू कसे हे समजून घेऊ या. प्रथम हा देश म्हणजे हिंद महासागरामधलं मानवी वस्ती नसलेलं एक बेट होतं. अरबी लोकांच्या ते सर्वात पहिल्यांदा दृष्टीस पडलं. पण त्यांनी त्यावर वस्ती केली नाही. नंतर एकामागोमाग एक युरोपियन देशांनी यावर धाड टाकली आणि वस्ती केली. प्रथम पोर्तुगीज आले. इथून काही फारसं उत्पन्न मिळत नाही म्हटल्यावर निघून गेले. पण त्यांनी आणलेल्या माकडांनी डच खलाशांना वस्ती करण्यात अडथळा केला. बिचार्यांनी या बेटावर सर्वात आधी तंबाखू आणि ऊस लावला होता. त्यांनी आपल्या देशात फर्निचर बनवण्यासाठी इथल्या एबोनी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली. खरं तर की डच या बेटातून पुरेशी संपत्ती मिळवण्यात अपयशी ठरले. डच राजपुत्र मॉरिस याच्यापासूनच या बेटाचं नाव मॉरीशस पडलं.
मग त्यांच्यानंतर आलेल्या फ्रेंचांनी जवळच्या भागातून गुलाम आयात करून इथली आर्थिक परिस्थिती सुधारली. आजही या देशावर फ्रेंच वसाहतीचा बराच पगडा आहे. अनेकानेक शहरांची नावं फ्रेंच आहेत. त्यामुळे ती उच्चारताना आपल्याला कठीण पडतं. फ्रेंच आणि डच दोघांनी आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका येथून गुलाम आयात केले होते. त्यामुळे इथं क्रेऑल भाषा रुजली. अर्थात ही भाषा मूळ आफ्रिकेतल्या भाषेपेक्षा थोडी निराळी आहे. तिला मॉरिस क्रेऑल म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर या देशात मूळचे असे लोकच नाहीत. सगळा आयात मामला आहे.
हा लांबलचक इतिहास ऐकताना एक प्रश्न तुमच्या मनात उठला असणार. इथं भारतीय लोकांची वस्ती कशी? त्या काळात पुडुचेरी भागात फ्रेंच वसाहत होती. तिथून काही माणसांना मजूर म्हणून नेण्यात फ्रेंचांनी हातभार लावला. पण बहुसंख्य भारतीय नंतरच्या काळात इथं पोचले. कारण फ्रेंचांनंतर इथं इंग्रजांचं राज्य आलं. त्यांनी वाढत चाललेल्या उसाच्या शेतीसाठी भारतीय मजूर मोठ्या प्रमाणात नेले. अनेक मराठी कुटुंबं तिथं स्थायिक झाली. आज हा देश हिंदू संस्कृतीशी नातं सांगतो तो या मजुरांमुळे.
इथं लोकांची नावं पाहिली की या इतिहासाची आठवण येते. अनिरुद्ध जगन्नाथ, शीलाबाई बापू ही नावं काही काळापूर्वी आपल्या कानावर पडली आहेतच. कारण इंग्रजांना संपूर्ण नावं लिहिण्याचा कंटाळा होता. शिवाय आपल्या नावांची स्पेलिंग लिहिताना त्यांच्या नाकी नऊ यायचे. मग ते पहिलं नाव आणि वडिलांचं नाव यावर भागवून घ्यायचे. असाच पायंडा त्यांनी भारतातही पडला होता. इथल्या कापड गिरण्यांमध्ये तशीच नावं लिहिली जात. अनिरुद्ध जगन्नाथ, शीलाबाई बापू ही नावं कशी पडली याचा उलगडा आता व्हायला हरकत नाही.
मॉरिशसचा विमानतळ देशाच्या दक्षिण भागात आहे आणि आमचा स्थानिक यजमान देशाच्या मध्यभागी राहणारा. विराज आम्हाला घ्यायला विमानतळावर सहकुटुंब आला होता. पण आमच्यासमोर विमानतळाबाहेर पडण्यापूर्वी एक समस्या होती. आम्ही इथून पापलेटसारखे मासे आणि आंबे नेले होते. कुठल्याही देशात तिथली नैसर्गिक विविधता जपण्यासाठी एक कडक नियम असतो. इतर देशांतून खाद्यपदार्थ नेण्यावर बंदी असते. त्यांच्या देशात रुजतील अशा बिया किंवा लागवड होतील असे पदार्थ देण्यास मनाई असते. बाहेरच्या देशांमधून येणार्या वेगळ्या जीवजंतूमुळे आपल्या देशात जंतूसंसर्ग होऊ नये, म्हणून घेतलेली ही खबरदारी असते. न्यूझीलंडसारख्या देशामध्ये तर बुटांना लागलेली मातीसुद्धा चालत नाही. आपल्या एका क्रिकेटपटूला त्याचे बूट धुवायला लावले होते. आणि आम्ही तर भेटीदाखल पापलेट आणि आंबे नेले होते. आता आमच्या भेटवस्तू समोर ठेवलेल्या कचर्याच्या डब्यात टाकून द्याव्या लागणार या विचारानं धास्तावलो होतो. सुदैवानं असं काही घडलं नाही. बहुतेक तो कस्टम अधिकारी दयाळू असावा किंवा आमचे चेहेरे त्याला सभ्य वाटले असावेत. त्याने ग्रीन चॅनेलमधून सर्व सामानासह सुखरूप जाऊ दिले.
देश तसा लहानच. यावरून एक गम्मत घडली. विराज कर्णिकमुळे तिथल्या काही मराठी कुटुंबांशी संबंध आला. ही मंडळी, विशेषत: त्यांच्यापैकी वयानं मोठी असलेली मंडळी आपलं महाराष्ट्राशी असलेलं नातं जपून आहेत. मोडकं तोडकं का होईना, मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका मॉरिशसच्या मराठी कुटुंबानं आम्हाला जेवायला बोलावलं. तिथं गेल्यावर पहिला सुखद धक्का बसला. त्यांच्या घरातल्या अगदी तरुण असलेल्या मुलांची नावं ‘किशन’ वगैरे होती आणि आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा ही अठरा वीस वर्षांची मुलं कीर्तनाला गेली होती!
खरी गम्मत त्यानंतर झाली. जेवणानंतर महाराष्ट्राचा विषय निघाला. घरातल्या आजीबाईंना त्यांच्यासोबतच्या मराठी ज्येष्ठ नागरिकांसोबत महाराष्ट्र दर्शन करायला यायचं होतं. त्यांनी आमच्यापाशी चौकशी करायला सुरुवात केली. त्यांचा प्रश्न होता ‘समजा आम्ही सकाळी घरून निघालो तर सिद्धीविनायक, मुंबादेवी, अष्टविनायक आणि शिर्डी करून संध्याकाळी किती वाजता परत येऊ?’
त्यांच्या या भाबड्या प्रश्नाचं आम्हाला हसू न येणं शक्यच नव्हतं. त्यांनी फक्त मॉरिशस पाहिलेला. एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत जायला दोन तास पुरतील इतकाच हा देश. त्यांची त्यांच्याच नजरेतून भारताचं आकारमान ठरवलेलं. आमचं हसू पाहून त्यांना आपलं काय चुकलं हा प्रश्न पडला असावा. आजीबाई नर्व्हस झाल्या. मग आम्ही त्यांना सगळं रीतसर समजावून सांगितलं. नुसती मुंबईतली दोन देवळं व्यवस्थित देवदर्शन करून तुम्ही एका दिवसात परत आलात तरी खूप झालं हे त्यांना समजावयाचा प्रयत्न केला. आम्हाला तरी त्यांचं समाधान झाल्यासारखं वाटलं नाही. कारण त्यांच्या चेहेर्यावरचं प्रश्नचिन्ह कायम होतं. जेव्हा कधी त्या भारतात येतील आणि इथली गर्दी आणि एकूण अंतरं प्रत्यक्ष अनुभवतील, तेव्हाच त्यांना आमचं म्हणणं कळेल याची आम्हाला खात्री होती. त्यांचं नक्कीच चुकत नव्हतं. त्यांनी मॉरिशसच्या बाहेरचं जग मुळात पाहिलंच नव्हतं. त्यामुळे जगातले यच्चयावत देश मॉरिशसएवढेच असतील असं त्यांना वाटणं साहजिक होतं.
तिथली मराठी माणसं आपलं हिंदुत्व किती जपतात याच्या काही गोष्टी विराजने आम्हाला सांगितल्या. तिथं एखाद्या माणसानं घर भाड्यानं घेतलं तर घरमालक स्वखर्चानं भाडेकरूला भाडेकरूच्या इच्छेनुसार त्याच्या आराध्य दैवताचं देऊळ बांधून देतो. त्याप्रमाणं विराजच्या घराशेजारी तुळशीवृंदावनासारखं गणपतीचं छोटेखानी देऊळ बांधलेलं आम्ही पाहिलं.
विराजने सांगितलेला आणखी एक किस्सा लक्षात आहे.
मॉरिशसमध्ये मॉरिसेश्वर नावाचं शंकराचं देऊळ आहे. भारताबाहेरचं, म्हणजे तेरावं ज्योतिर्लिंग म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाशिवरात्री हा या देशातला मोठा सण मनाला जातो. संपूर्ण मॉरिशसला त्या दिवशी सुट्टी असते. देश खूप लहान. त्यामुळं संपूर्ण देशातून पायी चालत लोक या देवळात येतात आणि रस्त्यात भूक लागली तर दिसेल त्या घरात शिरतात आणि त्या घरातले लोक, मग ते कुठलाही धर्म का मानत असेनात, त्यांना आनंदाने खायला घालतात. सगळंच तुम्हाआम्हाला अतर्क्य.