कथा कोणतीही असो- विनोदी, गंभीर, अनाकलनीय वा रहस्यमय- त्या कथेला अनुरूप इलस्ट्रेशन असेल, तर कथा बरेचदा वाचली जाते, कवितेचा भावार्थ समजायला सोपे पडते. अनेक धार्मिक पोथ्यांमध्ये पूर्वीपासून देवाधर्माची चित्रे असतात, त्यामुळे सामान्य माणसांना राम कसा, सीता कशी, जटायू कसा, कृष्ण कसा, शनि महाराज कसे हे समजू शकले. आमच्या लहानपणापासून गोरखपूरवरून कल्याण मासिक निघायचे, ते अद्यापही बहुदा चालू असावे. त्यात अंकभर अत्यंत सुंदर रेखाटलेली पूर्ण पान इलस्ट्रेशन्स असायची. तसेच चांदोबा हाही आमच्या लहानपणापासूनचा मित्र… त्यावर अनेक पिढ्या व हजारो मुले संस्कारित झाली. चित्रा आणि शंकर या चित्रकारांनी अत्यंत तन्मयतेने कंटाळा न करता हजारो चित्रे रेखाटली आहेत. पाच पंचवीस वर्षांपूर्वी कटिंग पेस्टिंग हा प्रकारच नव्हता… ते दक्षिणात्य असल्यामुळे चित्रांतील पात्रे दक्षिणी असत. कथाचित्रातील स्त्रिया अत्यंत सुंदर असायच्या.
मध्यंतरी मला अठराव्या शतकातील शेक्सपियरच्या नाटकाची पुस्तके मिळाली होती. त्यातही पानाआड पूर्ण पान रेषांनी रेखाटलेली इलस्ट्रेशन्स आहेत. ‘हॅम्लेट’, ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’, ‘ऑथेल्लो’, ‘रोमिओ अँड ज्युलिएट’, ‘क्लिओपात्रा’ आदी सर्वच नाटके उत्कृष्ट रेखाटनांनी सजलेली आहेत. कॉमिक्सना तर चित्रकथा म्हणूनच ओळखले जाते. त्यात वॉल्ट डिस्नेंचा मोठा वाटा आहे.
महाराष्ट्रात इलस्ट्रेशन्सची चांगली परंपरा आहे. ‘किर्लोस्कर’ व ‘स्त्री’ मासिकांचे बसवंत महामुनी, ग. ना. जाधव, प्रभा काटे आणि चौफेर मुलुखगिरी करणारे दीनानाथ दलाल, ज्यांची अनेक चित्रे बालभारतीपासून दीपावलीच्या दिवाळी अंकापर्यंत आमची एक पिढी लहानपणापासून पाहत आलो आहोतच. ब. मो. पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’ तीन चारशे पानांचे आहे. त्यातही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दलालांची शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटनांवर पान पानभर इलस्ट्रेशन्स आहेत. मुळगावकर ‘रत्नदीप’ या त्यांच्या चांगल्या मासिकासाठी इलस्ट्रेशन करत. परंतु गजानन महाराजांची पोथी आहे. त्यातही हाफटोनमधील पानपानभर सुंदर चित्रे आहेत.
वरील सर्व चित्रकारांचा कल हा रिअलिस्टिक चित्रांकडे असे. नंतर अॅबस्ट्रॅक्ट कथा चित्रांचा जमाना आला. सुभाष अवचट, दत्ता पाडेकर आणि नवीन कितीतरी मंडळी आहेत. अॅबस्ट्रॅक्ट चित्रांचे जग थोडंसं गूढरम्य, बरेचदा अनाकलनीय परंतु रिअलिस्टीक चित्रे पाहून आगळेवेगळे काम पाहायला मजा वाटते.
आम्हा व्यंगचित्रकारांची इलस्ट्रेशन्स विनोदी असावी लागतात. मी गेली ५० वर्षे कथांची, पुस्तकांची व दिवाळी अंकांची इलस्ट्रेशन्स केलेली आहेत. चांगला हात असलेले चित्रकार प्रभाशंकर कवडी. चंद्रशेखर पत्की, मारिओ मिरांडा, रवी परांजपे यांची नावे घेता येतील. ज्याची त्याची रेष हीच खरी त्या चित्रकाराची ओळख, त्यातच त्यांची प्रगल्भता कंपोझिशन सौंदर्य त्यात अंतर्भूत आहे. यानिमित्ताने ‘इलस्ट्रेशन्स’ या विषयावर वर वर का होईना पण थोडं फार लिहिता आलं इतकंच!