फीसाठी दीड रुपया कमी पडला म्हणून मॅट्रिकची परीक्षा देता आली नाही, हे दुःख प्रबोधनकारांना आयुष्यभर टोचत राहिलं. त्यामुळे गरीबांच्या शिक्षणासाठी धडपडणार्या कर्मवीरभाऊराव पाटील यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. त्यांच्या बोर्डिंगमधल्या मुलांना दोन वेळ नियमित जेवता यावं, यासाठी त्यांनी सातार्यात भीकही मागितली.
– – –
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाहू बोर्डिंगला सरकारी ग्रांट आणि मदत मिळावी, यासाठी प्रबोधनकारांचे प्रयत्न सुरूच होते. प्रबोधनकारांचा कर्मवीरांवर प्रचंड विश्वास होता आणि त्यांच्या कार्यावर प्रचंड जीव होता. त्यांच्याच एका शब्दावर प्रबोधनकार सातार्याला आले होते आणि त्यांच्या मैत्रीला जागूनच त्यांनी कफल्लक होऊन सातारा सोडलं होतं. त्यानंतर पुण्याला आल्यावरही प्रबोधनकार कर्मवीरांच्या शाहू बोर्डिंगसाठी झटत होतेच. कारण सातार्याला जाण्याआधीच हे दोघे मित्र दादरला प्रबोधनच्या कचेरीत बसून बहुजनांच्या शिक्षणाच्या योजना बनवत होते. त्यामुळे प्रबोधनकारांना कर्मवीरांचं काम आपलंच वाटत असावं. त्याच आपुलकीने त्यांनी प्रबोधनमध्ये कर्मवीर अण्णांचा परिचय करून देणारा सविस्तर चरित्रलेख लिहिला. तसंच साप्ताहिक लोकहितवादीमध्ये शाहू बोर्डिंगची माहिती देणारा दोन पानी इंग्रजी लेख लिहिला. इतकंच नाही, तर गवर्नर एक्झिक्युटिव काऊन्सिलमधले मंत्री सर चुनीलाल मेहता यांच्याकडून सरकारी निधी मिळवण्यासाठी ते सातारा-कोरेगावलाही धावत गेले होते. त्यामुळे कर्मवीर अण्णांना अडचणीत मन मोकळं करण्याचं ठिकाण हे प्रबोधनकारांचं पुण्यातलं बिर्हाडच होतं.
प्रबोधनकारांनी आत्मचरित्रात असाच एक प्रसंग लिहिला आहे. एक दिवस भाऊराव पुण्याला आला नि डोळ्यांत पाणी आणून सांगू लागला की बस्स, आता कहर झाला. बोर्डिंगातल्या पोरांची उपासमार टाळण्यासाठी बायकोने मंगळसूत्रातलं सोनं विकून प्रसंग निपटला. कर्मवीरांनी सांगितलेला हा प्रसंग त्यांच्या चरित्रातल्या महत्त्वाच्या वळणांपैकी एक आहे. कर्मवीरांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचं रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीतलं योगदान कर्मवीरांइतकंच महत्त्वाचं आहे. त्यांच्या त्यागाच्या पायावर आज ही आशियातली सर्वात मोठी शिक्षणसंस्था उभी आहे. शाहू बोर्डिंगच्या मुलांना त्या पोटच्या मुलांसारखंच मानत. सामाजिक कामांसाठी आणि निधी उभारण्यासाठी कर्मवीर अनेकदा सातार्याबाहेरच असत. तेव्हा लक्ष्मीबाईच बोर्डिंग सांभाळत. त्यांनी माहेराहून आणलेलं साठ किंवा नव्वद तोळे सोनं कर्मवीरांच्या बोर्डिंगसाठी खर्च केलं. १९२९च्या दिवाळीत बोर्डिंगमधल्या मुलांना खाण्यासाठी पैसे नव्हते. आधीची उधारी असल्यामुळे वाणी धान्य देत नव्हता. त्यामुळे लक्ष्मीबाईंनी गळ्यातलं मंगळसूत्रही विद्यार्थ्यांना काढून दिलं. ते गहाण ठेवून आलेल्या पैशातून मुलं जेवली. पुढे तर ते विकूनच टाकावं लागलं.
प्रबोधनकारांना कर्मवीरांनी बोर्डिंगविषयी इतरही माहिती दिलीय. ती प्रबोधनकारांनी नोंदवलेली दिसते. शाहू बोर्डिंग आता धननीच्या बागेत हलवण्यात आलंय, असं कर्मवीरांनी सांगितलंय. काले गावातून ते कर्मवीरांच्या सातार्यातल्या राहत्या घरीच आलं होतं. तिथेच सर्व जातींचे विद्यार्थी एकत्र राहात. १९२७ साली धननीच्या बागेत हलल्यावर बोर्डिंगला प्रशस्त जागा मिळाली. धननीची बाग म्हणजे मालकीणीची बाग. सातारच्या राजांनी ही जागा कर्मवीर अण्णांना खंडाने दिली होती. तिथे राणीसाहेबांचा वाडा होता म्हणून या जागेला धननीची बाग म्हणत. पण तो तेव्हा ओस पडला होता. जागेचं माळरान झालं होतं. तिथे कर्मवीरांनी शिक्षण आणि स्वाभिमानाचा वटवृक्ष रोवला. आज या जागेत रयत शिक्षण संस्थेने या जागेवरच छत्रपती शाहू बोर्डिंगची शाखा क्र. १ उभारली आहे. तिथे महाराष्ट्रभरातल्या कर्जबळी शेतकर्यांच्या आत्महत्येमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. तिथे त्यांना पाचवीपासून पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत आहेच. पण वसतिगृहात आदर्श दिनक्रम आहे. त्यांना फक्त शिक्षणच नाही, तर जगण्यासाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा पुरवल्या जातात.
पण आजपासून जवळपास शंभर वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. कर्मवीर अण्णांनी दिलेली जी माहिती प्रबोधनकारांनी नोंदवली आहे, त्यानुसार तेव्हा बोर्डिंगमध्ये तेव्हा ७५पेक्षा जास्त विद्यार्थी होते. दरमहिना ३५ रुपये वेतन देऊन स्वयंपाकासाठी एक बाई नोकरीला ठेवल्या होत्या. तिथे एक युरोपियन माणूस संन्याशाच्या वेषात झोपडी बांधून राहात होता. तो मुलांच्या बरोबर शेती आणि बागायतीचं काम करत असे. या युरोपियन माणसाचे फारच त्रोटक संदर्भ कर्मवीरांच्या चरित्रात सापडतात. प्रबोधनकारांनीच त्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. हा माणूस आयरिश होता, इतकंच इतर संदर्भांवरून लक्षात येतं.
अशी सगळी माहिती देऊन कर्मवीर अण्णा प्रबोधनकारांना काहीतरी मार्ग काढण्यासाठी थेट सातार्यालाच घेऊन आले. सातार्यात आले की प्रबोधनकारांचा मुक्काम सराफ नारायणराव वाळवेकर यांच्या सदाशिव पेठेतल्या घरी असायचा. तेव्हा त्यांनी धननीच्या बागेला भेट दिली. युरोपियन साधूला भेटले. तिथल्या वटवृक्षाखाली बसून आत्मोद्धाराविषयी व्याख्यानही दिलं. पण त्याने प्रश्न सुटणार नव्हता. कारण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था आजूबाजूच्या शाळांमधून झाली होती. प्रश्न मुलांच्या दोन वेळ नियमित जेवणाचा होता. प्रबोधनकार आणि कर्मवीरांनी एक रात्र वाळवेकरांबरोबर चर्चा केली. त्यातून एक उपाय समोर आला. लोकांकडून पैसे मिळवणं, ही कठीण गोष्ट होती. पण धान्य मागितलं तर शक्यतो कुणी नकार देत नाही. मूठभर किंवा सूपभर कसंही धान्य झोळीत टाकतातच. सगळ्यांनी मिळून झोळीयोजना तयार केली. कर्मवीरांनी ५-६ व्यापार्यांकडून २५-३० रिकामी पोती आणली. बोर्डिंगमधल्या मुलांची एक बैठक वडाच्या झाडाखाली बोलावली. प्रबोधनकारांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत या योजनेचं महत्त्व आणि आवश्यकता मुलांना समजावून सांगितली. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, मी आणि भाऊराव– तुमचे अण्णा – ही गोणती घेऊन गावात धान्यासाठी भीक मागायला बाहेर पडणार आहोत. आमच्याबरोबर कोण कोण येणार? प्रबोधनकारांच्या या प्रश्नावर मुलं थोडा वेळ काहीच बोलली नाहीत. काय उत्तर द्यावं ते त्यांना कळलं नसावं. या मौन प्रतिसादानंतर प्रबोधनकारांनी मुलांना सुनावलं. ते तडक म्हणाले, काय रे. बोर्डिंगात येण्यापूर्वी रोज आयत्या तयार ताटावरच दुपारचे बारा साजरे करीत होतात काय रे? भाकरीच्या सुक्या ओल्या तुकड्यासाठी भीक मागताना जन्म गेला आणि आत्ताच आला काय रे पांढरपेश्या मिजासीचा वेताळ तुमच्या अंगात? याचा अपेक्षित परिणाम दिसलाच. हे ऐकताच सगळे उत्साहाने उभे राहिले आणि म्हणाले, हो, हो, येतो सारे तुमच्या बरोबर. जिकडे आमचे आन्ना, तिकडे आम्ही.
मुलांच्या हातात पोती घेऊन सगळेजण प्रत्येक मोहल्ल्यात गेले. प्रबोधनकार आणि कर्मवीर जोरात आरोळी देऊ लागले, शाहू बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांना धान्य दान करा. घराघरातून अनेक महिला सुपात तांदूळ, डाळ, गहू, ज्वारी घेऊन भराभर बाहेर आल्या. मुलांनी पुढे जाऊन धान्य गोळा केलं. धान्याच्या व्यापार्यांनी तर पोतं–अर्धं पोतंही मुलांच्या हवाली केलं. दीड दोन तासांत बोर्डिंगला दोन महिने पुरेल इतकं धान्य गोळा झालं. प्रबोधनकारांची योजना यशस्वी झाली. या विषयी प्रबोधनकार लिहितात, गावभर या योजनेची चर्चा चिकित्सा चालू झाली. कोणत्याही कार्यासाठी फंड जमा करणारे एका अर्थी भीकच मागतात ना? मग द्रव्याऐवजी धान्य मागितले तर त्यात चुकले काय? फंडवाले आरोळ्या मारीत नाहीत. धान्यवाले आरोळ्या मारून लोकांना जाग आणतात, इतकाच काय तो फरक. बाकी कार्य एकरंगी एकशिंगी. यातले फंडवाले म्हणजे आजच्या भाषेत वर्गणीवाले. वेगवेगळ्या सार्वजनिक कामांसाठी, कार्यक्रमांसाठी आणि उत्सवांसाठी वर्गणी काढून फंड उभारण्याची त्या काळात पुण्यासारख्या शहरात टूम निघाली होती.
एकीकडे प्रबोधनकार सातार्यात गरीब मुलांच्या शिक्षणासाठी भीक मागत होते, त्याचवेळेस पुण्यात त्यांच्यासमोर प्रबोधन कचेरीच्या माडीवर फर्ग्युसन कॉलेजचे तीन चार प्राध्यापक नवीन कॉलेज सुरू करण्याच्या योजना आखत होते. अण्णासाहेब खाड्ये, केशवराव कानिटकर, येवलेकर हे रोज संध्याकाळी येत. भेळभत्ता खात रात्री उशिरापर्यंत चर्चा करत. योजना तयार झाल्यानंतर त्यांच्यापैकी काही जण मुंबईला गेले आणि वाडियांकडून कॉलेजसाठी काही लाखांची देणगी घेऊन आले. त्यामुळे प्रबोधनकारांना प्रश्न पडला, मला अजून नवल वाटते आहे की हे गोखलेपंथीय लोक एखाद्या कोट्याधीशाकडे बिनचूक जातात कसे आणि अवघ्या २४-४८ तासांत लक्षावधी रुपयांचा फंड आणतात कसे?
प्रबोधनकारांना याचं उत्तर खूप नंतर सापडलं. तेही त्यांनी नोंदवून ठेवलंय. नाशिकमध्ये हंसराज प्रागजी कॉलेज उभारणार्यांपैकी एक आणि गोपाळ कृष्ण गोखलेंचे अनुयायी टी.ए. कुलकर्णी यांनी नाशिक स्टेशनवर याचं उत्तर प्रबोधनकारांना दिलं. ते असं, अहो, ते काय मोठे ट्रेड सिक्रेट नाही. दान मागणाराविषयी दात्याला संपूर्ण विश्वास हवा की हा चोख नि निर्मळ वर्तनाचा आहे. याने काही डोळ्यांत भरतील अशी विधायक कार्ये केलेली आहेत. त्या कार्यांचा जनतेला ठळक फायदेशीर उपयोग होत आहे. दान मागणाराचे सहकारीही तितक्याच कर्तबगारीचे नि दानतीचे आहेत. यांना पैसा दिला तर एका कवडीचीही उधळमाधळ न होता पै न पै नियोजित सत्कार्यालाच खर्ची पडेल. एवढ्या लौकिकाच्या पायावरच आजवर आम्ही असली मोठमोठी कार्ये पार पाडीत आलो आहोत. आम्हाला ऑन. गोखल्यांचे नाव सांगावयाचे असते. त्या श्रेष्ठ परंपरेला यत्किंचितही कुठे कधी आम्ही कलंक लागू दिलेला नाही. म्हणून शब्द टाकताच आमची झोळी एकाच दारवंठ्यावर भरते. आपला हात आधी स्वच्छ निष्कलंक असला म्हणजे समोरचा माणूस तेव्हाच शेखैंडला सरसावतो. हे आहे सारे आमचे गुपित.
वाडिया कॉलेजच्या उभारणीमुळे पुण्याच्या पूर्व भागातल्या उच्च शिक्षणाची गैरसोय दूर झाली. कॉलेजसाठी अनेक विद्वान प्राध्यापक मंडळींचा संच उभा राहिला. विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद उत्तम होता. ग्रंथसंग्रहालयही उभं राहिलं. प्रिन्सिपल अण्णासाहेब खाड्ये हे प्रबोधनकारांचे शेजारी. दोघांच्या घरामध्ये फक्त एक रस्ता होता. नेहमीप्रमाणे वाडिया कॉलेजच्या संस्थापक मंडळींची प्रबोधन कचेरीच्या माडीवर बैठक भरली असताना खाड्येंनी प्रबोधनकारांना गमतीने विचारलं, काय दादा, वाडिया कॉलेजला तुमची देणगी किती? सगळ्यांनाच प्रबोधनकारांची बेताची आर्थिक परिस्थिती माहीत होती. त्यामुळे ही थट्टा आहे, हे खाड्येंसह सगळ्यांनीच लगेच स्पष्ट केलं. त्यावर प्रबोधनकार म्हणाले, हे पहा, थट्टा सहज पचविण्याइतका मीही अव्वल थट्टेखोर आहे, हे तुम्ही जाणताच. पण जेव्हा मी आपली देणगी जाहीर करेन, तेव्हा सारे आ वासून पहातच रहाल.
या घटनेनंतर ३-४ महिन्यांनी प्रबोधनकारांनी जवळपास साडेतीन हजार पुस्तकांचा संग्रह वाडिया कॉलेजला भेट दिला. प्रबोधनकारांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा खाड्येंना ते खरंच वाटलं नाही. त्यांची प्रतिक्रिया होती, आय बिलिव नॉट, के. एस. ठाकरे वेळी जान देईल पण ग्रंथ देणार नाही. ग्रंथ त्याचा प्राण. अहो, ग्रंथ आहेत म्हणूनच हा जगतो. प्रबोधनकारांच्या ग्रंथप्रेमाचं कौतुक करणारी ही प्रतिक्रिया होती. पण केवळ नव्या अभ्यासकांना ग्रंथांचा आस्वाद घेता यावा, म्हणून त्यांनी आपला दुर्मीळ ग्रंथसंग्रह कॉलेजला दान दिला होता. त्यानंतर पुढे त्यांनी त्यापेक्षाही मोठा ग्रंथसंग्रह उभा केला. तोही त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संशोधन विभागाला भेट दिला.
प्रबोधनकारांनी आपला प्राणांपेक्षा प्रिय ग्रंथसंग्रह वाडिया कॉलेजला भेट दिला होता, हे आज या कॉलेजात कुणाला तरी माहीत असेल का?योजना तयार केली. कर्मवीरांनी ५-६ व्यापार्यांकडून २५-३० रिकामी पोती आणली. बोर्डिंगमधल्या मुलांची एक बैठक वडाच्या झाडाखाली बोलावली. प्रबोधनकारांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत या योजनेचं महत्त्व आणि आवश्यकता मुलांना समजावून सांगितली. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, मी आणि भाऊराव– तुमचे अण्णा – ही गोणती घेऊन गावात धान्यासाठी भीक मागायला बाहेर पडणार आहोत. आमच्याबरोबर कोण कोण येणार? प्रबोधनकारांच्या या प्रश्नावर मुलं थोडा वेळ काहीच बोलली नाहीत. काय उत्तर द्यावं ते त्यांना कळलं नसावं. या मौन प्रतिसादानंतर प्रबोधनकारांनी मुलांना सुनावलं. ते तडक म्हणाले, काय रे. बोर्डिंगात येण्यापूर्वी रोज आयत्या तयार ताटावरच दुपारचे बारा साजरे करीत होतात काय रे? भाकरीच्या सुक्या ओल्या तुकड्यासाठी भीक मागताना जन्म गेला आणि आत्ताच आला काय रे पांढरपेश्या मिजासीचा वेताळ तुमच्या अंगात? याचा अपेक्षित परिणाम दिसलाच. हे ऐकताच सगळे उत्साहाने उभे राहिले आणि म्हणाले, हो, हो, येतो सारे तुमच्या बरोबर. जिकडे आमचे आन्ना, तिकडे आम्ही.
मुलांच्या हातात पोती घेऊन सगळेजण प्रत्येक मोहल्ल्यात गेले. प्रबोधनकार आणि कर्मवीर जोरात आरोळी देऊ लागले, शाहू बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांना धान्य दान करा. घराघरातून अनेक महिला सुपात तांदूळ, डाळ, गहू, ज्वारी घेऊन भराभर बाहेर आल्या. मुलांनी पुढे जाऊन धान्य गोळा केलं. धान्याच्या व्यापार्यांनी तर पोतं–अर्धं पोतंही मुलांच्या हवाली केलं. दीड दोन तासांत बोर्डिंगला दोन महिने पुरेल इतकं धान्य गोळा झालं. प्रबोधनकारांची योजना यशस्वी झाली. या विषयी प्रबोधनकार लिहितात, गावभर या योजनेची चर्चा चिकित्सा चालू झाली. कोणत्याही कार्यासाठी फंड जमा करणारे एका अर्थी भीकच मागतात ना? मग द्रव्याऐवजी धान्य मागितले तर त्यात चुकले काय? फंडवाले आरोळ्या मारीत नाहीत. धान्यवाले आरोळ्या मारून लोकांना जाग आणतात, इतकाच काय तो फरक. बाकी कार्य एकरंगी एकशिंगी. यातले फंडवाले म्हणजे आजच्या भाषेत वर्गणीवाले. वेगवेगळ्या सार्वजनिक कामांसाठी, कार्यक्रमांसाठी आणि उत्सवांसाठी वर्गणी काढून फंड उभारण्याची त्या काळात पुण्यासारख्या शहरात टूम निघाली होती.
एकीकडे प्रबोधनकार सातार्यात गरीब मुलांच्या शिक्षणासाठी भीक मागत होते, त्याचवेळेस पुण्यात त्यांच्यासमोर प्रबोधन कचेरीच्या माडीवर फर्ग्युसन कॉलेजचे तीन चार प्राध्यापक नवीन कॉलेज सुरू करण्याच्या योजना आखत होते. अण्णासाहेब खाड्ये, केशवराव कानिटकर, येवलेकर हे रोज संध्याकाळी येत. भेळभत्ता खात रात्री उशिरापर्यंत चर्चा करत. योजना तयार झाल्यानंतर त्यांच्यापैकी काही जण मुंबईला गेले आणि वाडियांकडून कॉलेजसाठी काही लाखांची देणगी घेऊन आले. त्यामुळे प्रबोधनकारांना प्रश्न पडला, मला अजून नवल वाटते आहे की हे गोखलेपंथीय लोक एखाद्या कोट्याधीशाकडे बिनचूक जातात कसे आणि अवघ्या २४-४८ तासांत लक्षावधी रुपयांचा फंड आणतात कसे?
प्रबोधनकारांना याचं उत्तर खूप नंतर सापडलं. तेही त्यांनी नोंदवून ठेवलंय. नाशिकमध्ये हंसराज प्रागजी कॉलेज उभारणार्यांपैकी एक आणि गोपाळ कृष्ण गोखलेंचे अनुयायी टी.ए. कुलकर्णी यांनी नाशिक स्टेशनवर याचं उत्तर प्रबोधनकारांना दिलं. ते असं, अहो, ते काय मोठे ट्रेड सिक्रेट नाही. दान मागणाराविषयी दात्याला संपूर्ण विश्वास हवा की हा चोख नि निर्मळ वर्तनाचा आहे. याने काही डोळ्यांत भरतील अशी विधायक कार्ये केलेली आहेत. त्या कार्यांचा जनतेला ठळक फायदेशीर उपयोग होत आहे. दान मागणाराचे सहकारीही तितक्याच कर्तबगारीचे नि दानतीचे आहेत. यांना पैसा दिला तर एका कवडीचीही उधळमाधळ न होता पै न पै नियोजित सत्कार्यालाच खर्ची पडेल. एवढ्या लौकिकाच्या पायावरच आजवर आम्ही असली मोठमोठी कार्ये पार पाडीत आलो आहोत. आम्हाला ऑन. गोखल्यांचे नाव सांगावयाचे असते. त्या श्रेष्ठ परंपरेला यत्किंचितही कुठे कधी आम्ही कलंक लागू दिलेला नाही. म्हणून शब्द टाकताच आमची झोळी एकाच दारवंठ्यावर भरते. आपला हात आधी स्वच्छ निष्कलंक असला म्हणजे समोरचा माणूस तेव्हाच शेखैंडला सरसावतो. हे आहे सारे आमचे गुपित.
वाडिया कॉलेजच्या उभारणीमुळे पुण्याच्या पूर्व भागातल्या उच्च शिक्षणाची गैरसोय दूर झाली. कॉलेजसाठी अनेक विद्वान प्राध्यापक मंडळींचा संच उभा राहिला. विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद उत्तम होता. ग्रंथसंग्रहालयही उभं राहिलं. प्रिन्सिपल अण्णासाहेब खाड्ये हे प्रबोधनकारांचे शेजारी. दोघांच्या घरामध्ये फक्त एक रस्ता होता. नेहमीप्रमाणे वाडिया कॉलेजच्या संस्थापक मंडळींची प्रबोधन कचेरीच्या माडीवर बैठक भरली असताना खाड्येंनी प्रबोधनकारांना गमतीने विचारलं, काय दादा, वाडिया कॉलेजला तुमची देणगी किती? सगळ्यांनाच प्रबोधनकारांची बेताची आर्थिक परिस्थिती माहीत होती. त्यामुळे ही थट्टा आहे, हे खाड्येंसह सगळ्यांनीच लगेच स्पष्ट केलं. त्यावर प्रबोधनकार म्हणाले, हे पहा, थट्टा सहज पचविण्याइतका मीही अव्वल थट्टेखोर आहे, हे तुम्ही जाणताच. पण जेव्हा मी आपली देणगी जाहीर करेन, तेव्हा सारे आ वासून पहातच रहाल.
या घटनेनंतर ३-४ महिन्यांनी प्रबोधनकारांनी जवळपास साडेतीन हजार पुस्तकांचा संग्रह वाडिया कॉलेजला भेट दिला. प्रबोधनकारांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा खाड्येंना ते खरंच वाटलं नाही. त्यांची प्रतिक्रिया होती, आय बिलिव नॉट, के. एस. ठाकरे वेळी जान देईल पण ग्रंथ देणार नाही. ग्रंथ त्याचा प्राण. अहो, ग्रंथ आहेत म्हणूनच हा जगतो. प्रबोधनकारांच्या ग्रंथप्रेमाचं कौतुक करणारी ही प्रतिक्रिया होती. पण केवळ नव्या अभ्यासकांना ग्रंथांचा आस्वाद घेता यावा, म्हणून त्यांनी आपला दुर्मीळ ग्रंथसंग्रह कॉलेजला दान दिला होता. त्यानंतर पुढे त्यांनी त्यापेक्षाही मोठा ग्रंथसंग्रह उभा केला. तोही त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संशोधन विभागाला भेट दिला.
प्रबोधनकारांनी आपला प्राणांपेक्षा प्रिय ग्रंथसंग्रह वाडिया कॉलेजला भेट दिला होता, हे आज या कॉलेजात कुणाला तरी माहीत असेल का?