ग्रहस्थिती : शुक्र, हर्षल वृषभेत, मंगळ, केतू सिंह राशीत, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन, मीन राशीत, गुरु मिथुनेत, रवि, बुध कर्क राशीत, प्लुटो मकरेत. दिनविशेष : ९ ऑगस्ट रक्षाबंधन, १२ ऑगस्ट अंगारक संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९.१३ वा., १४ ऑगस्ट पतेती, १५ ऑगस्ट श्रीकृष्ण जयंती, पारशी नूतनवर्ष, स्वातंत्र्यदिन.
– – –
मेष : नोकरीत अपमान होईल. व्यवसायात यश मिळेल, पत प्रतिष्ठा वाढेल, आर्थिक बाजू भक्कम राहील. भागीदारीत काळजी घ्या. मित्रांना समजून घ्या. मालमत्तेचे व्यवहार पुढे सरकतील. आरोग्याचे प्रश्न डोकेदुखी वाढवतील. तरुणांनी नव्या संधी विचारपूर्वक घ्या. नियोजनाने फायदा होईल. विमा सल्लागार, मार्केटिंगमध्ये यशदायी काळ. लेखक, प्रकाशकांना सुखद बातमी कळेल. नव्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.
वृषभ : व्यवसायात यश मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. कामाचे खबरदारीने नियोजन करा. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. सावधपणे नवी गुंतवणूक करा. नोकरीत वरिष्ठ खूष होतील, त्यांची मदत मिळेल. कुठेही जपून व्यक्त व्हा. तरुणांना नव्या कामातून मनासारखी आमदनी मिळेल. उत्साह, आनंद आणि सकारात्मकता वाढीस लागेल. मनासारखी नोकरी मिळेल. घरातील वातावरण चांगले राहील. व्यवसायात सबुरीनेच घ्या. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. सार्वजनिक जीवनात बेताल बोलू नका. उच्च शिक्षण घेणार्यांच्या मनासारख्या घटना घडतील.
मिथुन : मनासारखे न झाल्याने नाराज होऊ नका. व्यवसायात स्पर्धेकडे दुर्लक्ष करून काम सुरू ठेवा. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरीत अधिक कष्ट घ्यावे लागतील. ज्येष्ठांचा सल्ला ऐका. मित्रांसोबत मौजमजेत वेळ जाईल. मनातल्या गोष्टी प्रत्यक्षात आणताना संयम बाळगा. दांपत्यजीवनात सुख अनुभवाल. विवाहेच्छुकांना चांगला काळ. थकीत येणे वसूल होईल. मौजमजेवर खर्च टाळा. पावसाळी पर्यटनात काळजी घ्या. भावा-बहिणीशी जपून बोला. मित्रांना आर्थिक मदत करावी लागेल.
कर्क : कुटुंबाशी जपून बोला. आर्थिक व्यवहारात खबरदारी घ्या. व्यवसायात आमदनी आणि खर्चाचा मेळ बसेल. तरुणांना मेहनत घ्यावी लागेल. नोकरीत विनयशीलता कामी येईल. नवीन व्यवसाय सुरू करताना काळजी घ्या. कुणाला आर्थिक मदत करताना विचार करा. कोणत्याही कामात शॉर्टकट टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. किरकोळ अपघात घडू शकतात. कामाचे वेळापत्रक आखून घ्या. आठवड्याच्या अखेरीस खर्च वाढतील. ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह : व्यवसायात आर्थिक गणित बिघडू शकते. नोकरीत क्षमता दाखवण्याची संधी येईल. कामाचा ताण वाढेल. सामाजिक क्षेत्रात गौरव होईल. शिक्षक, संशोधकांना नव्या संधी येतील. तरुणांच्या मनासारखी कामे होतील, उत्साह आणि हुरूप वाढेल. घरातील कामाकडे लक्ष द्या. ब्रोकर, दलालांना लाभ मिळेल. सरकारी कामांत सहकार्य मिळेल. नवी नोकरी मिळेल. काही गोष्टी मनातच ठेवा. घरात काही झाले तरी प्रतिक्रिया देणे टाळा. छंदाची गोडी अर्थार्जनाचे मार्ग खुले करून देईल. महिलांसाठी यशदायी काळ.
कन्या : घरात मतभेद टाळा. मुलांकडे लक्ष द्या. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. वाहनदुरुस्तीसाठी खर्च होऊ शकतो. घरातल्यांच्या सल्ल्याखेरीज महत्वाचा निर्णय घेऊ नका. नोकरीत तुमच्या शब्दाला किंमत राहील. व्यवसायात नवीन संकल्पनांमधून चांगला लाभ मिळेल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. लॉटरी, सट्टा, शेअरच्या फंदात पडू नका. मानसिक स्वास्थ्य सांभाळा. सकारात्मक विचार करा, योगा, ध्यानात वेळ खर्च करा. आठवड्याच्या मध्यास एखादी सुखावणारी बातमी येईल.
तूळ : नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. व्यवसायात यश मिळेल. नातेवाईकांशी वाद होतील. प्रेमप्रकरणात मिठाचा खडा पडू शकतो, संयम ठेवा. महिलांना नव्या कामात यश मिळेल. तरुणांच्या मनाची शांती भंग होईल. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्या. मुलांकडे लक्ष ठेवा. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. हृदयरोगी, मधुमेहींनी काळजी घ्यावी. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. नातेवाईकांशी सबुरीने घ्या. संततीकडे लक्ष द्या. पती-पत्नीमध्ये वाद टाळा.
वृश्चिक : आरोग्याकडे लक्ष द्या. डॉक्टरी सल्ला घ्या. श्रावणात धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. व्यवसायात कामाचे गणित बिघडेल. पत्रकार, लेखकांना सन्मान मिळेल. जनसंपर्क क्षेत्रात चांगल्या संधी येतील. सार्वजनिक ठिकाणी बेकायदा वर्तन टाळा. मौजमजेपासून दूर राहा. शेअरमधून लाभ मिळाले तरी त्याच्या आहारी जाऊ नका. तरुणांना नवी नोकरी मिळेल. नोकरीत बदल स्वीकारा. अति आत्मविश्वास नको. भागीदारीत वाद होतील. ज्येष्ठांच्या मताचा आदर ठेवा.
धनु : कुटुंबासोबत आनंददायी काळ व्यतीत होईल. नोकरीत सबुरीने घ्या. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात मनासारखी स्थिती राहील. मुलांची शिक्षणात प्रगती होईल. तरुणांचे उच्च शिक्षणाचे प्रयत्न यशस्वी होतील. आध्यात्मातून समाधान मिळून हुरूप वाढेल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठेचा सन्मान मिळेल. नोकरीत नवी जबाबदारी करियरला आकार देईल. घरात जुन्या विषयांवर चर्चा टाळा, डोकेदुखी वाढेल. संगीतकार, कलाकारांना नवी कामे मिळतील. खेळाडूंना यश मिळेल.
मकर : मुलांशी मतभेद होतील. आर्थिक ब्ााजू चांगली राहील, पण जपून खर्च करा. नोकरीत वाद घालू नका. भागीदारीत मोठे वाद होतील. मित्रांसोबत मौजमजा कराल. नवीन कामात यश मिळेल. नवीन गुंतवणुकीत फसगत होऊ शकते. ब्रोकरांनी आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी. मनासारखी कामे होणार नाहीत. ध्यानधारणेत मन रमवा. घरात वाद टाळा. व्यवसायात नव्या संधी टिपताना काळजीपूर्वक पुढे जा. पावसाळी पर्यटन कराल. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ : घरात आनंदाची बातमी येईल. छोटेखानी कार्यक्रम होईल. खेळाडूंना यश मिळेल. मित्रांशी मतभेद मिटतील. कामानिमित्ताने अधिक प्रवास कराल. वरिष्ठांच्या शब्दाबाहेर जाऊ नका. अडकलेली कामे पुढे सरकतील. नवीन ओळखी तापदायक ठरतील. मित्रांशी बोलताना काळजी घ्या. ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. भाऊ व मामा-मावशींकडून चांगले सहकार्य मिळेल. भूमिका पटवून देताना उतावळेपणा करू नका. सामाजिक क्षेत्रात नवी संधी येईल. तरुणांना यशदायी काळ. महिलांना कष्ट घ्यावे लागतील.
मीन : कामाचे वेळापत्रक बिघडून गडबड होईल. घरासाठी अचानक खर्च केल्याने आर्थिक गणित विस्कळीत होईल. तरुणांना स्पर्धापरीक्षेत यश मिळेल. मुलांच्या शिक्षणाचा आलेख उंचावेल. व्यवसायात वाद टाळा. एखादे काम झाले नाही तरी मनस्वास्थ्य सांभाळा. नोकरदारांच्या मनासारखी कामे होतील. प्रवासात वेळ जाईल. अडकून राहिलेले काम पत्नीच्या प्रयत्नामुळे मार्गी लागेल. श्रावणात तीर्थाटन होईल. खेळाडू, कलाकार, संगीतकार, लेखकांना उत्साहवर्धक बातमी मिळेल, जोश वाढेल.