अशी आहे ग्रहस्थिती : राहू-मंगळ-हर्षल मेषेत, शुक्र- वृषभेत, बुध-रवी मिथुनेत, केतू- तुळेत, शनि (वक्री)कुंभेत, गुरु-नेपच्युन मीनेत, प्लूटो मकरेत, १४ जुलै रोजी शुक्र मिथुनेत, चंद्र तुळेत, त्यानंतर वृश्चिक, धनु आणि मकरेत.
दिनविशेष – १० जुलै देवशयनी आषाढी एकादशी, १३ जुलै गुरुपौर्णिमा, १६ जुलै संकष्टी चतुर्थी.
मेष – आठवडा दगदगीचा आणि धावपळीचा राहील. छोट्या-मोठ्या कुरबुरी होतील. काहींच्या मनासारख्या घटना घडतील, त्यामुळे मनोबल वाढेल. कामे सुरळीत पार पडतील. कुटुंब आणि व्यवसायासंदर्भातील निर्णय लाभदायक ठरतील. विद्यार्थीवर्गाला चांगले यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या संधी उपलब्ध होतील. ९ ते ११ या कालावधीत मरगळ जाणवेल. विवाहेच्छुक मंडळींसाठी चांगला काळ आहे. उंची वस्त्रालंकारांची खरेदी होईल. काम धडाडीने पूर्ण कराल.
वृषभ – शॉर्टटर्म गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळाल्याने आनंदी राहाल. व्ययातील मंगळामुळे शत्रूवर सहज विजय मिळवाल. परदेश प्रवासासाठी पैशाची तजवीज करावी लागेल, जपून खर्च करा. शुक्र लग्नी, गुरु लाभात, पाच ग्रह स्वराशीत, त्यामुळे विस्कटलेली उद्योग व्यवसायाची घडी पूर्वपदावर येईल. वक्री शनीमुळे कामे झटपट मार्गी लागतील. पंचमेश बुधामुळे संततीच्या माध्यमातून मान-सन्मान मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींना चांगले यश मिळेल. धनप्राप्तीचे योग आहेत.
मिथुन – शुभघटनांचा अनुभव येईल. बुध-गुरु-मंगळ-शुक्राच्या उत्तम स्थितीमुळे मनातील कामे मार्गी लागतील. लग्नातील रवि बुधादित्य योग, दशमातील गुरु यामुळे कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभकार्ये पार पडतील. सरकारी क्षेत्रातील कामात यश मिळेल. व्ययस्थानातील शुक्रामुळे करमणूक, परदेश प्रवास असे योग जुळून येतील. आर्थिक लाभ मनासारखे होतील. षष्ठ स्थानावर मंगळाची दृष्टी आजाराला निमंत्रण देऊ शकते. सावध राहा.
कर्क – मन संवेदनशील आणि उदास राहील. ९ ते ११ या तीन दिवसांमध्ये विशेष काळजी घ्या. मनस्वास्थ्य बिघडू देऊ नका. अध्यात्म, तत्वज्ञानातील मंडळींना विशेष लाभ होतील. नव्या विचारांमुळे पुढे जाण्याचा मार्ग सुकर होईल. काही जण गोंधळात सापडतील. दशमातील मंगळ-राहू जिद्दी, निर्भय आणि पराक्रमी बनवतील. मोठे काम पार पडेल. कट-कारस्थानाला बळी पडू नका. मैदानी खेळ खेळणार्या खेळाडूंना घवघवीत यश मिळेल.
सिंह – धनाधिपती बुध लाभात बुधादित्य योगात. सरकारी कर्मचार्यांची पत वाढेल. राजकारण्यांसाठी अनुकूल काळ आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीतून लाभ मिळतील. भाग्यस्थानातील मंगळ-राहूमुळे कठीण काम पूर्ण होईल. सप्तमातील वक्री शनीमुळे दाम्पत्यजीवनात असमाधानकारक स्थिती होईल. कायदे-कानून पाळा. नकारात्मक लोकांपासून लांब राहा. अचानक काही जबाबदार्या वाढल्याने तणाव वाढेल.
कन्या – बुद्धिवादी, कल्पनाशक्तीत रमणार्यांसाठी चांगला काळ आहे. दशमस्थानातील बुधादित्ययोगामुळे व्यवसायात चांगली सफलता मिळेल. नवकल्पनेतून आकाराला आलेल्या व्यवसायाला चांगले यश मिळेल. नव्या वास्तूचे योग जुळून येतील. कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर पडतील. बंधूंसोबत ताळमेळ जमणार नाही. वाहन चालवतान काळजी घ्या. प्रवासात तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. गुरूच्या आशीर्वादातून यश मिळेल. नोकरीत यश मिळेल. परदेशप्रवासाचे योग आहेत.
तूळ – वक्री शनीमुळे कामाला विलंब होईल.व्यावसायिक प्रतिस्पर्धी, भागीदारांसोबत हेवेदावे वाढतील. स्पष्टवक्तेपणा ठेवा. छोट्याशा चुकीमुळे मन:स्ताप होईल. सुरवातीचे तीन दिवस क्लेशदायक जातील. परदेशप्रवासाचे योग आहेत. शनि-बुध नवपंचम योगामुळे जबाबदारीची कामे पार पडतील. षष्ठातील गुरुमुळे महत्वाची भूमिका बजावाल. सहकार्यांची मदत मिळेल.
वृश्चिक – आरोग्याची काळजी घ्या. आगीपासून दोन हात दूर राहा. विद्यार्थी चांगली कामगिरी करतील. डॉक्टरांना चांगला आठवडा आहे. शत्रू शिरजोर होतील. नोकरावर महत्वाची जबाबदारी टाकू नका. चुकीचे काम बडतर्फी आणेल. वंशपरंपरागत इस्टेटीमध्ये अडचणी निर्माण होतील. बंधूंशी वैरभाव वाढू शकतो. नाती सांभाळा. जुन्या गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील.
धनु – पंचमातील मेषेचा मंगळ, राहू, हर्षल यामुळे महिलांसाठी विशेष काळजीचा काळ आहे. संततीस इजा, अपघात होऊ शकतो. लहान मुलांकडे विशेष लक्ष द्या. शिक्षण क्षेत्र, उद्योग, व्यवसायात संमिश्र अनुभव येतील. नोकरीत आर्थिक लाभ होतील. कलावंतांना आठवडा चांगला जाईल. पत्नीपासून चांगले लाभ होतील. गुरु सुखस्थानात असल्यामुळे आप्तांकडून सहकार्य मिळेल.
मकर – कौटुंबिक वादात भाष्य केले तर वादंग वाढेल, त्यामुळे सबुरीने घ्या. शनीचे वक्री भ्रमण धनभावातून, सुखस्थानात मंगळ राहू हर्षल त्यामुळे अतिउत्साह टाळा. शेअर बाजार, कमिशनच्या व्यवसायात जोखीम घेऊन काम करा. खिशातील पैसे गुंतवून काम करू नका. भाग्येश बुध षष्ठम भावात असल्याने आठवडा संघर्षमय राहील. मुलांच्या उच्चशिक्षणाचा निर्णय लांबणीवर पडेल.
कुंभ – अनपेक्षित खर्चात वाढ होईल. १० आणि ११ या तारखांना आरोग्यसमस्या जाणवतील. व्यय भावातील शनी आणि पराक्रम भावातील मंगळ-राहू यांच्यामुळे धावपळ वाढेल. थकवा येईल, आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. साडेसाती सुरु आहे, कोणतेही काम अति उत्साहाने करू नका. सुखस्थानातील शुक्र आणि द्वितीयेतील गुरु कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक बाजू सांभाळतील. प्रेमीयुगुलांसाठी अनुकूल आठवडा राहणार आहे.
मीन – द्वितीयेतील मंगळ-राहू अंगारक योग होत आहे, त्यामुळे बोलण्यावरचे नियंत्रण सोडू नका. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ आहे. घरात शुभकार्ये पार पडतील. संततीबाबत शुभवार्ता समजतील. आजोळकडून लाभ मिळेल. व्यवसायातील रक्कम अन्यत्र गुंतवण्याआधी परिस्थितीचा अंदाज घ्या. डोळ्यांचे दुखणे उद्भवू शकते, काळजी घ्या.