आचार्य विनोबा भावे हे महात्मा गांधीजींचे पट्टशिष्य. त्यांनी महात्माजींचे सेवाकार्याचे आणि सर्वोदयाचे व्रत आयुष्यभर जपले. देशभरात भूदान चळवळीचे मोठे कार्य त्यांनी उभे केले आणि गीताईसारख्या अजरामर रचनेचे लेणे त्यांनी मायमराठीला बहाल केले. मात्र, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अचानक लादलेल्या आणीबाणीला त्यांनी समर्थन दिले, हे ‘अनुशासन पर्व’ आहे असे म्हटले आणि त्यांच्यावर ‘सरकारी संत’ असल्याचा ठपका लागला तो कायमचाच. विनोबांच्या आधीच्या कार्याने प्रभावित झालेल्या अनेकांनी या एका गोष्टीसाठी त्यांना कधीही माफ केले नाही. विनोबांपुढे उभे राहण्याची पात्रता नसलेल्या अनेकांनी त्यांच्यावर अर्वाच्च्य भाषेत तोंडसुख घेतले.
विनोबांच्या नखाचीही सर येणार नाही आणि चपलेशीही उभे राहायची ज्यांची लायकी नाही, असे काही सरकारी संत आधुनिक भारतातही आहेत. यातल्या एका संतांचा मुक्काम एका मंदिरात असतो. त्यांच्या संपूर्णपणे निष्फळ ठरलेल्या आंदोलनातून आताचे केंद्र सरकार प्रस्थापित झाले आणि संत महोदय मौनात गेले. ते दिल्लीच्या चावीने चालतात आणि दिल्लीच्या सोयीनेच बोलतात. अधूनमधून त्यांना काही फुटकळ विषयांवरून उपोषण करण्याची उबळ येते, इथल्या इथे ती हौस ते भागवून घेतात; कारण आता दिल्लीत ‘जंतर मंतर’ करता येणार नाही, हे ते पुरते ओळखून आहेत. आधीच्या उपोषणाच्या वेळी धनदांडग्यांचे आणि पेड चॅनेलांचे पाठबळ होते, समोर प्रतिपक्षाचे ऐकून घेण्याची, चर्चा करण्याची दानत असलेले सरकार होते. आता आपण उपाशी मेलो तरी कोणालाही फरक पडणार नाही, याची त्यांना कल्पना आहे.
त्या आंदोलनात ऐनवेळी तंतरून सलवार नेसून उडी टाकण्याचा पराक्रम ज्यांच्या नावावर आहे, अशी नामचीन हस्ती म्हणजे बाबा रामदेव. टीव्हीवरून सामुदायिक योगशिक्षण देण्याच्या मिषाने हे उपद्व्यापी बाबा प्रकाशात आले आणि एकदम शड्डू ठोकून भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात उतरले… त्यांनी देशातल्या बदलत्या हवेचा अचूक अंदाज घेऊन ती आपल्या शिडात भरून घेतली. आपल्या पतंजलि या ब्रँडची उत्पादने खरेदी करणे म्हणजेच देशभक्ती आणि देशातल्या उज्वल हिंदू परंपरांचे पालन अशी ग्राहकांची समजूत करून देण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी विराजमान झाले की काय काय चमत्कार होतील, याची वर्णने करताना ज्यांची तोंडे थकत नव्हती, त्यांतले एक बोळके या बाबांचे होते. मोदी आले की स्वस्ताई येणार, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, अशा एकाहून एक गांजेकस आवया या बाबांनी उडवून दिल्या. ना ते अच्छे दिन आले, ना ती स्वस्ताई आली, ना पेट्रोल डिझेल स्वस्त झाले. सत्ताधार्यांचे ‘मालक’ अशी ज्यांची ओळख आहे ते ठरावीक उद्योगपती गबर झाले आणि रामदेव बाबांसारखे कुडमुडे उद्योगी लोक उद्योजक बनून बसले. हे आयुर्वेदात क्रांतीच घडवत आहेत, अशा आविर्भावात त्यांच्यासाठी भाजपशासित राज्यांमध्ये लाल गालिचे अंथरले गेले, कवडीमोल भावाने जमिनी दिल्या गेल्या, त्यांच्या उत्पादनांबद्दलच्या तक्रारींकडे काणा डोळा केला गेला. या काळात बाबांचे असे प्रस्थ बोकाळले होते की मॅगीसारख्या प्रचंड लोकप्रिय ब्रँडबद्दल शंका निर्माण केल्या गेल्या, तेव्हा लोकांनी उपहासाने विचारले की पतंजलीच्या शेवया बाजारात येणार आहेत का?… तो अंदाज चक्क खरा निघाला. यांची कंपनी आता बिस्किटं, शेवया आणि अशा प्रकारची, आयुर्वेदाशी सुतराम संबंध नसलेली उत्पादने उत्पादित करते आणि ती विकत घेणे हे काहीजण राष्ट्रकार्य समजतात.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात खाद्यतेलाचे भाव कडाडत असताना पतंजली समूहाने रुची सोया ही खाद्यतेल उत्पादक कंपनी ताब्यात घेतली आणि तिला कर्जमुक्त करण्यासाठी बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओही आणला. मात्र, या शेअर्सबद्दल पतंजलीच्या वापरकर्त्यांची दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे शेअर्ससाठी अर्ज केलेल्यांना ते मागे घेण्याची मुभा देण्यात आली आणि त्यातून साडे तीन पटींनी आलेली मागणी अडीच पटींवर येऊन थांबली. सरकारी बाबांना शेअर बाजार नियंत्रक सेबीने दिलेला हा ‘करारा झटका’ होता.
बाबा या झटक्याने बेचैन होते की काय कोण जाणे- पण, हरयाणातल्या कर्नालमध्ये एका पत्रकाराने एक साधा प्रश्न विचारताच त्यांचा बनावट संतत्त्वाचा मुखवटा निघाला आणि भेसूर चेहरा उघडा पडला. मोदींचे राज्य आले की पेट्रोल ४० रुपये लिटर होईल आणि गॅस सिलिंडर ३०० रुपयांना मिळेल, असे तुम्ही म्हणाला होतात, त्याचे काय झाले, या प्रश्नावर बाबा एकदम हमरीतुमरीवर येऊन ‘काय उखडशील माझे? तुझ्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा ठेका घेतलाय का मी?’ असे गुरकावले आणि ‘यापुढे काही विचारशील तर त्याचे परिणाम ठीक होणार नाहीत,’ अशी धमकीही त्यांनी या पत्रकाराला दिली. त्यानंतर बाबांनी पोट भात्यासारखे हलवणार्या श्वासोच्छ्वासाचे आसन करून मनावर नियंत्रण मिळवले की नाही, याची कल्पना नाही.
केंद्र सरकारची मेहेरनजर असली की फुटकळातली फुटकळ माणसेही कशी उन्मत्त आणि उद्दाम बनतात, याचे दर्शन बाबांच्या या ऊग्ररूपदर्शनातून घडले. अशा अनेक भाडोत्री प्रचारकांची जळजळ आणि वळवळ सध्या वाढत चालली आहे. जनतेच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला तर यांचे हातपाय एकमेकांत गुंतवून कायमचे गुंताडासनात अडकवून टाकतील लोक!