महाराष्ट्र भगवा जाणतो तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भगवा आणि त्यानंतर शिवसेनेने विधिमंडळावर फडकवलेला भगवा… बाकी इतर भगवेधारी भोंदूंना महाराष्ट्राने फारसा थारा दिलेला नाही. अलीकडच्या काळात राष्ट्रीय पातळीवर बोकाळलेल्या भगव्यातल्या भोंदूंपैकी एकाला नुकतीच सर्वोच्च चपराक बसली. योगविद्या आणि आयुर्वेदाचे व्यापारी रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादनांच्या बाबतीतले अव्वाच्या सव्वा दावे आणि ते करताना अन्य उपचारपद्धतींच्या बाबतीत (विशेषत: अॅलोपथी) पसरवले जाणारे नकारात्मक गैरसमज, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने या बाबांचे कान उपटले आणि दिशाभूल करणार्या त्यांच्या जाहिरातींवर बंदी घातली.
एखाद्या व्यापक कारस्थानाप्रमाणे जुळवून आणल्या गेलेल्या अण्णा हजारे यांच्या तथाकथित लोकपाल आंदोलनातून जे हुच्च लोक देशात राष्ट्रीय स्तरावर प्रकट झाले त्यांच्यातलं हे एक पात्र. इथे प्रकटण्याआधी हे बाबा जी व्यक्तिगत पातळीवर करायची असते, ती योगसाधना सामुदायिक पातळीवर करून घ्यायला लागले होते टीव्हीवरून. छातीचा भाता भरभर आतबाहेर करण्यासारखे योगशास्त्राचा स्तर घसरवणारे उथळ प्रयोग करून मिठ्ठास वाणीने त्यांनी जनमानसावर मोहिनी घातली होती. अण्णा आंदोलनाच्या शिडात हवा भरलेली पाहून या बाबांनी त्या नौकेत उडी घेतली, मात्र, पोलीस पकडून नेतील या भयाने सलवार नेसून मंचावरून उडी टाकून पसार होण्याची वेळ त्यांच्यावर आली… इतक्या प्रदीर्घ योगसाधनेतून त्यांच्यात ना आत्मिक धैर्य निर्माण झालं ना पोलिसांशी दोन हात करण्याची शारीरिक ताकद!
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएचे सरकार येणार अशी चिन्हे दिसताच या बाबांनी मोदीचालिसा गायला सुरुवात केली. मोदी सत्तेत आले की इन्कम टॅक्स बंद होणार, पेट्रोल ४० रुपये लिटर मिळणार वगैरे पुड्या सोडणार्यांत हे आघाडीवर होते. या चाटुगिरीच्या फलस्वरूप मोदीकाळात यांना जणू राष्ट्रीय बाबा असल्यासारखा सन्मान मिळू लागला. देशात कोणत्याही भागात स्वस्तात जमीन मिळू लागली आणि सवलतींचा वर्षाव होऊ लागला. पतंजली या त्यांच्या ब्रँडची लोकप्रियता वाढू लागली. इतरांच्या पाकिटातलं तूप काढून आपल्या पाकिटांत घालून विकण्याचे, हाडांची भुकटी वापरल्याचे आरोप असलेल्या या कंपनीने आयुर्वेदाशी संबंध नसलेली उत्पादनंही बाजारात आणायला सुरुवात केली. त्यातही गंमत अशी की मॅगीच्या नूडल्सविरुद्ध बोंबाबोंब होणार, मॅगी खाणं हा जणू देशद्रोहच आहे, असा कांगावा होणार, अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाया होणार आणि मग पतंजलीच्या नूडल्स बाजारात येणार, अशा स्क्रिप्टेड पद्धतीने हा व्यापार वाढत गेला. आधुनिक अन्नपदार्थांना नावं ठेवणार्या या बाबांनी बिस्कीटंही काढली. आता फक्त यांचा आयुर्वेदिक पिझा आणि पास्ता लाँच व्हायचा राहिलेला आहे.
आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा आव आणून हा बाबा आणि त्यांचे अभिन्नजीव सहकारी बाळकृष्ण यांनी मिळून आयुर्वेदाची अप्रतिष्ठाच करून ठेवली. आयुर्वेदाच्या मर्यादा ओळखून काम करणार्या प्रामाणिक वैद्यांकडेही लोक ते वैदू असावेत अशा नजरेने पाहू लागले. आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र आहे आणि त्यातील अनेक उपचार आजही प्राथमिक स्तरावर उपयुक्त ठरतात. आयुर्वेदाचा सर्वाधिक उपयोग निरोगी राहण्यासाठी होऊ शकतो. मात्र, आमच्याकडे प्राचीन काळापासूनच सगळं ज्ञान उपलब्ध आहे, अशा अनैतिहासिक वल्गना करणारी छद्मविज्ञान प्रसारक टोळीच केंद्रस्थानी बसल्यावर रामदेव बाबांचे फावले. आयुर्वेदिक औषधांची गुणवत्ता आधुनिक वैद्यकाच्या शास्त्रकाट्याच्या कसोटीवर तपासून घ्यायला हवी, याबद्दल खुद्द पतंजली ऋषी आणि चरक, सुश्रुत हेही आग्रही राहिले असते आजच्या काळात. पण, आयुर्वेदाची एकांगी भलामण करणार्यांनी मात्र आयुर्वेदात सगळं काही स्वयंसिद्ध आहे, असं मानून उत्पादनं बाजारात आणण्याचा धडाका लावला. कोरोनाकाळात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोनील नावाचा भंपक काढा हा जणू कोरोनावरचा जालीम उपाय आहे, अशा थाटात लोकांसमोर आणला होता.
आयुर्वेदाचं नाव घेतलं की श्रद्धेने औषधं घेणार्या आणि आधुनिक उपचारांना नाकं मुरडणार्या लोकांनी कधीच हे लक्षात घेतलं नाही की कुठल्या तरी चैतन्यचूर्णाचा ओव्हरडोस होऊन बाळकृष्ण बुवा गंभीर आजारी झाले तेव्हा त्यांना बाबांनी पतंजलीचा काढा पाजला नाही, गुटिका दिल्या नाहीत, मात्रा चाटवल्या नाहीत, त्यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत हलवण्यात आलं आणि अॅलोपथीचे उपचार केले गेले. खुद्द बाबांच्या पायाच्या आजारावर त्यांनी सुश्रुत किंवा चरक संहितेच्या आधारे आपल्या आश्रमात उपचार घेतले नाहीत, त्यासाठी ते अमेरिकेत शस्त्रक्रिया करून घ्यायला गेले.
या भोंदूंच्या तथाकथित संशोधन केंद्राचं उद्घाटन साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यामुळे तर या बाबांनी सर्व ताळतंत्र सोडून अलीकडच्या काळातल्या जाहिरातींमध्ये अचाट दावे करायला सुरुवात केली होती. आपलं प्रत्येक उत्पादन संशोधनाने सिद्ध झालं आहे, असं सांगून संशोधनाच्या लिंक्स देण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. हे करताना अॅलोपथीसारख्या शास्त्रात ज्यावर उपाय नाहीत त्यावर आपण उपाय शोधले आहोत, अशी थापेबाजीही केली गेली होती.
सर्वोच्च न्यायालयाने या थापेबाजीला सध्या तरी चाप लावला आहे. मात्र, प्रत्येक भगवाधारी साधू नसतो, भगव्यातल्या भोंदूंच्या भजनी लागणे जिवावर बेतू शकते, हा धडा आपला आपणच शिकायला हवा.