‘झिम्मा’ने यशाची चाहूल दिली…. ‘बाईपण भारी देवा’ने बायकांचा सिनेमा धावू शकतो याची खात्री करून दिली आणि नुकत्याच आलेल्या ‘झिम्मा-२’ने आता हेच चालणार, यावर शिक्कामोर्तब केलं. यापुढे काही वर्षं मराठीत महिलाप्रधान सिनेमांची रांग लागणार यात शंकाच नाही. मराठीतच नव्हे, तर कोणत्याही भाषेत अमुक एक प्रकारचा सिनेमा हमखास चालेल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही; पण प्रेक्षकांचा कल काय आहे, हे पाहून निर्माते कशा प्रकारच्या सिनेमाची निर्मिती करायची याचे आडाखे बांधत असतात. कथाबीज साधारण एकाच प्रकारचं, फक्त हाताळणी वेगळी करून एकाच धाटणीचे चित्रपट काढले जातात, तेव्हा त्या साच्यातील चित्रपटांची लाट आली, असं म्हटलं जातं. २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा-२’ या सिनेमाने अगदी कमी दिवसात काही कोटी रुपयांचा गल्ला जमवला. केवळ पाच महिन्याच्या अंतरात हिंदी फिल्म इंडस्ट्रीशी स्पर्धा करून ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘झिम्मा-२’ या दोन मराठी महिलापटांनी घवघवीत यश संपादन केल्यावर यापुढे मागणी तसा पुरवठा करायला आपले निर्माते सज्ज झाले आहेत.
या लाटेची सुरुवात १९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ सिनेमाने तिकीटबारीवर १५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला तेव्हा झाली. कोविडकाळात सिनेमागृहं बंद होती आणि नंतर कोविड निर्बंधांमुळे पन्नास टक्के आसनक्षमता ठेवून सिनेमागृहं सुरू झाली तेव्हा अनेक निर्मात्यांनी प्रेक्षक येण्याची खात्री नसल्याने चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले. या कोविडमध्ये ठप्प पडलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला आधी ‘झिम्मा’च्या यशानं धीर दिला. हा चित्रपट फक्त मुंबई, पुण्यातच नाही तर ग्रामीण भागांत देखील चालला, इथे मराठी सिनेसृष्टीला महिलापटांची चाहूल लागली. पाठोपाठ ‘वाय’, ‘अनन्या’, ‘फुलराणी’, ‘बटरफ्लाय’ अशा महिलाप्रधान सिनेमांची रांग लागली. या सिनेमांना प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला. त्यानंतर यावर्षी ऐन पावसाळ्यात प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’वर सिनेरसिकांनी (९०.५ कोटी रु.) पैशांचा पाऊस पाडला आणि आता ‘झिम्मा-२’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी फुगडी खेळतोय.
मराठीत महिलाप्रधान सिनेमांची मोठी परंपरा आहे. इथे फार पूर्वीपासून म्हणजे अगदी ‘कुंकू’, ‘माणूस’ या प्रभातपटांच्या काळापासून स्त्री व्यक्तिरेखा अतिशय सशक्त राहिल्या आहेत. ‘मानिनी’, ‘मोलकरीण’, ‘सासुरवाशीण’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘थोरातांची कमळा’, ‘जखमी वाघीण’, ‘सांगते ऐका’, ‘एकटी’, ‘पाहुणी’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ अशी सिनेमांची नावंच पाहा. ती नायिकांभोवतीच फिरणारी आहेत. मधल्या काळात एन. एस. वैद्य यांचा ‘लेक चालली सासरला’ आणि विजय कोंडके यांचा ‘माहेरची साडी’ हे मराठीतले दोन ब्लॉकबस्टर सिनेमे महिलाप्रधानच होते. १८ सप्टेंबर १९९१ रोजी प्रदर्शित झालेला ‘माहेरची साडी’ हा चित्रपट रौप्यमहोत्सवाच्या पलीकडे पोहोचला होता. मराठी सिनेमांचा मानबिंदू असलेल्या पुण्यातल्या प्रभात टॉकीजला सलग दोन वर्षं हा सिनेमा तळ ठोकून होता. घराघरातील महिलांना या सिनेमाने अक्षरश: रडवले. त्याला इतकी अलोट गर्दी लोटायची की नेहमीच्या खेळांसोबतच सकाळी नऊ वाजताही या सिनेमाचे खेळ लावावे लागले होते. ‘माहेरची साडी’ने रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत १२ कोटीची कमाई केली होती… त्या काळातल्या चलनात. आज ३१ वर्षांनी रुपया साफ कोसळलेला असतानाही अनेक बिग बजेट मराठी सिनेमांना या आकड्यापर्यंत पोहोचेपर्यंत धाप लागते. अलका कुबल यांना महिलापटांची अघोषित सम्राज्ञी बनवून टाकणारा हा सिनेमा होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तिकीट खिडकीवर बसून स्वत: प्रेक्षकांना तिकिटे विकणे, वेगवेगळ्या सिनेमागृहांना भेट देणे आणि जत्रेत मार्वेâटिंग करणे असे सिनेमा हिट करण्याचे अनेक पायंडे अलका कुबल यांनी पाडले.
या कौटुंबिक रडारडपटांच्या लाटेला १९९९मध्ये आलेल्या ‘बिनधास्त’ या चित्रपटाने कॉलेज युवतींच्या आयुष्यात घडलेल्या गूढ घटनेची वेगळीच कलाटणी दिली. दोन मुलींना प्रमुख भूमिकांमध्ये झळकवणारा चंद्रकांत कुलकर्णी यांचा हा सिनेमा मराठी सिनेमाच्या तेव्हाच्या भाषेत टिपिकल महिलापट नव्हता.
मराठी सिनेमात आजवर अनेक जॉनरची भरती-ओहोटी आली, पण अलीकडच्या काळात विनोदी चित्रपटांची (यांना अशोक-लक्ष्यापटही म्हटलं गेलं) लाट दीर्घकाळ चालू राहिली. एकाच वेळी मराठी प्रेक्षक हुंदके देणारे चित्रपट आणि हसून पोट दुखावणारे चित्रपट उचलून घेत होता. ज्यांनी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले अशा विनोदवीरांची यादी दामुअण्णा मालवणकर, राजा गोसावी, दादा कोंडके, अशोक सराफ यांच्यापासून भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांच्यापर्यंत फार मोठी आहे. लक्ष्मीकांत बेर्डे हा या लाटेचा सुपरस्टार. १९८५ साली आलेल्या ‘धुमधडाका’ सिनेमापासून त्याने सुपरहिट चित्रपटांचा धडाका लावला. त्यांच्या चित्रपटाची लाट इतकी मोठी होती की १९९० या एका वर्षात त्यांचे १३पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्या काळात प्रत्येक निर्मात्याला ‘लक्ष्या’ आपल्या सिनेमात हवा असायचा. आज टीव्हीवर प्रत्येक वाहिनीवर एक तरी विनोदी कार्यक्रम असल्याने विनोदी लाट मोठ्या पडद्यावरून सरकून लहान पडद्यावर आली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे शिवकाळ इतिहासातला मराठीजनांना सर्वाधिक परिचयाचा आणि त्यामुळे प्रेरणादायी काळ आहे. शिवकालीन इतिहास पडद्यावर नेहमीच बाजी मारतो. एकेकाळी भालजी पेंढारकरांनी त्यांच्या पद्धतीने, तेव्हाच्या ऐतिहासिक मांडणीच्या आधारे शिवरायांचे आख्यान प्रत्येक सिनेमातून गायले होते. आताच्या काळात हर हर महादेव म्हणत ही ऐतिहासिक चित्रपटांची लाट दिग्पाल लांजेकर यांच्या २०१८ साली ‘फर्जंद’ सिनेमाने (१० कोटी) आणली. ‘हंबीरराव’ (१८.२० कोटी), ‘शेर शिवराज’ (१० कोटी) ‘हर हर महादेव’ (२५ कोटी) अशी घसघशीत कमाई शिवकालपटांनी केली. २०२२मध्ये दिग्पाल लांजेकर यांच्या ‘पावनखिंड’ सिनेमाने ४३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. अर्थात, ऐतिहासिक सिनेमे सरसकट यशस्वी होतात असेही नाही. याच लाटेत आलेले ‘बलोच’, ‘रावरंभा’ आणि ‘सुभेदार’ हे सिनेमे अपेक्षित यश मिळवू न शकल्याने ऐतिहासिक चित्रपटांची लाट ओसरू लागल्याची चिन्ह दिसू लागली. ऐतिहासिक सिनेमांचे मोठे बजेट, त्याचबरोबर इतिहासाची अतिरंजित, अवास्तव, एकांगी, पोषाखी मांडणी हे या प्रकारच्या सिनेमा निर्मितीमधील अडथळे असतात. उथळ हाताळणीमुळे अनेकदा सिनेमे हास्यास्पदही बनतात. येत्या वर्षात दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’मधील ‘शिवरायांचा छावा’ हे पाचवे पुष्प, महेश मांजरेकरांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ आणि नागराज मंजुळे यांचा ‘छत्रपती शिवाजी’ हे बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट येणार आहेत. त्यांच्या यशाने ही लाट पुन्हा मोठी होईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
ऐतिहासिक चित्रपटांशी साधर्म्य सांगणारी आणखी एक लाट म्हणजे बायोपिकचं पीक. समाजात नाव असलेल्या, प्रेक्षकांना माहिती असलेल्या व्यक्तींवर चित्रपट काढणे व्यावसायिकदृष्ट्या कमी रिस्की आहे. महात्मा फुले यांच्यावरील आचार्य अत्रे यांचा चरित्रपट, गाडगेबाबांवरील ‘देवकीनंदन गोपाला’ असे काही बायोपिक जुन्या काळात येऊन गेले आहेत. पण २०१० सालापासून वर्षाला एखाददुसरा बायोपिक येतच असतो. ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘बालगंधर्व’, ‘…आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘तुकाराम’, ‘भाई – भाग १ आणि २’, ‘मी वसंतराव’ यांसारखे सिनेमे निघत राहिले आहेत. बघता बघता हा बायोपिकचा फॉर्म्युला हिट झाला. इतर जॉनरचे अनेक चित्रपट करूनही चरित्रपट जास्त चालल्याने सुबोध भावे यांना बायोपिक सुपरस्टार असं कौतुकाने संबोधलं जातं. येत्या वर्षात ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’, ‘ललिता शिवाजी बाबर’, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्यावर आधारित ‘विठा’, कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर ‘खाशाबा’, समर्थ रामदास स्वामी यांचं जीवनचरित्र मांडणारा ‘रघुवीर’, महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावरील ‘सत्यशोधक’ असे बायोपिक आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
महाराष्ट्रीय संस्कृतीचा भाग असलेले वग, तमाशा, लावणी आधी गावोगावी फिरून फडावर सादर व्हायचे. सिनेमाच्या पडद्यावर त्यांची लाट ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाने आणली. तो एकाच ठिकाणी तब्बल १३० आठवडे चालला. नंतर मराठी सिनेमा अनेक दशकं, बाई, वाडा, पाटील, लावणी, ग्रामीण राजकारण अशा चक्रात फिरत राहिला. जयश्री गडकर, उषा चव्हाण, उषा नाईक, कामिनी भाटिया, लीला गांधी अशा अनेक कलावतींनी अस्सल लावणीपट गाजवले.
मराठी सिनेमांचे जाणते निर्माते दिग्दर्शक अगदी सुरुवातीपासून हे ओळखून होते की मराठी सिनेमा तेव्हाच हिट होतो, जेव्हा घराघरातल्या आयाबाया उठून थिएटरला येऊन सिनेमा पाहतात. याआधी कौटुंबिक रडारडपटांचीच लाट असायची. थिएटरात मुसमुसणे, हुंदके, आवंढे आणि डोळ्यांना पदर किंवा रूमाल असा खेळ होता. आता काळ बदलला, स्त्री बदलली, महिलाप्रधान मराठी सिनेमाही बदलला.
रडारडीची जागा आता कोपरखळ्या, हशा, टाळ्या, शिट्ट्या यांनी घेतली आहे. कारण बाई बदलली आहे. मराठी घरांमध्ये टीव्हीचा रिमोट (क्रिकेटच्या मॅचेस नसतील तेव्हा) महिलांच्याच हातात असतो. ३० ते ६० या वयोगटातल्या गृहिणी टीव्हीवर मराठी कार्यक्रम पाहतात आणि मालिकांची दुकानं सुपरहिट करतात किंवा बंद पाडतात. त्यांनाही मोठा पडदा खुणावत असतो. पण नवर्याची आणि मुलांची बदलणारी आवड आणि व्यग्र दिनक्रम यामुळे सहकुटुंब सिनेमाला जाणं शक्य होत नाही आणि एकटीने चित्रपटाला जाणे आवडत नाही. अशावेळी महिलांचे आजचे विषय मांडणारा, त्यांच्याशी रिलेट करणारा सिनेमा आला, तर ऑफिसमधल्या किंवा शेजारच्या मैत्रिणी, भिशी ग्रूप, सोसायटी, किटी पार्टी ग्रूप यांच्यातल्या महिला एकत्र येऊन सिनेमा पाहायला जातात. सामाजिक संदेश किंवा उपदेशाचे डोस, विनोदाचे शुगरकोटिंग करून हसत खेळत सांगितले जावेत अशी आजच्या स्त्री प्रेक्षकांची प्रमुख मागणी दिसते. आजची स्त्री ‘अरेला का रे’ करणारी आहे, मूग गिळून अन्याय सहन करणारी नाही, म्हणूनच ‘माहेरची साडी’सारखा चित्रपट आज चालेल याची खात्री नाही. त्याउलट गेट टुगेदर, रियुनियन, लग्न, खेळ, मंगळागौर यासाठी एकत्र येऊन सिनेमात केलेली धमाल पाहायला आणि त्यातील कॅरेक्टर्समध्ये स्वत:ला पाहायला महिलांना आवडतंय, असं दिसतं. ज्याला जसं जगायचं आहे तसं त्याने जगावं, जजमेंटल होणारे आपण कोण हे मत रूढ होताना दिसतय. अगदी मध्यमवयीन, वयस्कर महिलांनी दारू पिणे हेदेखील महिला प्रेक्षकांच्या पचनी पडू लागलं आहे.
महिलापट करणं किंचित सोपं आहे. गेल्या काही वर्षांत सिनेमा सुरू असताना सिनेमागृहात जाऊन प्रेक्षकांना भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणे, चाहत्यांसोबत सेल्फी काढणं हे मार्केटिंगचे नवे फंडे अस्तित्वात आले आहेत. पण नामांकित पुरुष कलाकार प्रमोशनसाठी फार वेळ देत नाहीत. त्या तुलनेत स्त्री कलाकार सिनेमा रिलीज झाल्यावर गावोगावी जाऊन प्रमोशन करताना दिसतात. पुरुषांच्या तुलनेत इंस्टाग्राम, फेसबुक या समाजमाध्यमांवर महिला कलाकारांची क्रेझ जास्त दिसून येते आणि याचा फायदा सिनेमा प्रमोशनलाही होतो. ‘झिम्मा-२’च्या काही रील्सना १० लाखांपेक्षा जास्त लाइक मिळाल्याचे दिसून येतंय. या सार्याचा परिपाक म्हणून सिनेमाची हवा कायम राहते आणि प्रेक्षक सिनेमा पाहायला गर्दी करतात.
समुद्रात वार्याच्या प्रभावाने लाटांची संख्या आणि आकारमान वाढतं. सिनेमाच्या धंद्यातही बॉक्स ऑफिस कलेक्शनचा वारा किती वेगाने वाहतो, यावर एकाच धाटणीचे चित्रपट किती काढले जाऊ शकतात हे ठरतं. ‘झिम्मा-२’च्या यशामुळे येत्या काही महिन्यात महिलापटांची लाट येईलच. पण नावीन्य राखलं नाही, तर प्रेक्षक कंटाळतील आणि मग अतिसंख्येने फुगलेली लाट बॉक्स ऑफिसच्या बंदरावर पोहोचण्याऐवजी फ्लॉपच्या खडकावर आदळून फुटेल… मग नव्या विषयावरच्या नव्या लाटेची वाट पाहावी लागेल.
फिल्म रिलीज गप्पा
२४ नोव्हेंबरला आलेल्या ‘झिम्मा-२’ची बॉक्स ऑफिस मजल चांगली सुरू आहे. त्या सोबत लागलेला हिंदी चित्रपट ‘फर्रे’ फेफरे येऊन पडला आहे आणि ‘खिचडी-२’ शिजलाच नाही. मराठी सिनेमाला हिंदीची स्पर्धा असते. मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ सिनेमाच्या लाटेत इतर सगळे चित्रपट झाकोळले गेले. पण विकी कौशलचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ आणि मराठी ‘झिम्मा-२’ बॉक्स ऑफिसवर टिकण्यासाठी लढा देत आहेत.
नवीन काय…
प्रसाद खांडेकर दिग्दर्शित मराठीतील मल्टीस्टारर ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट उद्या ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित यांच्या सोबत ‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे ओंकार भोजने, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, वनिता खरात असे नामवंत कलाकार या चित्रपटात आहेत. यासोबतच लंडनमधे चित्रित झालेला ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भरत जाधव आणि गौरव मोरे यांची विनोदाची जुगलबंदी इथे पहायला मिळेल. ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार हेही या सिनेमात आहेत. ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त करणारा विनोद कांबळे दिग्दर्शित मराठमोळा हिंदी भाषिक चित्रपट ‘कस्तुरी’ उद्या प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप हे प्रस्तुत करत आहेत. पण इतकी मोठी नावं पाठीशी असतानाही चित्रपटाची म्हणावी तशी पूर्व प्रसिद्धी झाली नसल्याने या कस्तुरीचा सुगंध प्रेक्षकांपर्यंत पोहचवायला सिनेमाच्या संबंधित लोकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. यांना सोबत करणार आहेत पंकज त्रिपाठी यांचा ‘कडक सिंग’ आणि मनोज वाजपेयी यांचा जोराम.