राज्यात, देशात सध्या जे प्रदूषण पसरलं आहे, त्यावर तुमच्याकडे काही उपाय आहे काय?
– चंद्रकांत सुर्वे, कुंभार्डे, महाड
उपाय तर बरेच आहेत… पण ते वाचल्यानंतर देशभक्त आणि संस्कृतीरक्षक दुखावले तर? त्यावर काही उपाय आहे का तुमच्याकडे ते आधी सांगा? बिचारे एवढा देशाचा आणि संस्कृतीचा विचार करतात त्यांना दुखावणं बरं नाही…)
आपलं नाटक फ्लॉप झालं तर रंगपटात भेटून कोणीतरी बळेबळे छातीशी ओढून प्रोत्साहन देईल, या भयाने तुम्ही सुपरहिट नाटकंच करता अशी चर्चा आहे, त्यात कितपत तथ्य आहे?
– मंदार लेले, प्रभादेवी
काही नाही हो… महागाई, बेकारी, आरक्षण अशा विषयावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ही चर्चा मुद्दाम केली जाते… (आम्हाला पण फेकता येतं. तुम्हाला काय वाटलं होतं, तुम्हालाच फेकायला येतं?)
डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीण म्हणतात, तसे नर्सच्या नवर्याला काय म्हणायचे?
– अशोक परशुराम परब, सावरकर नगर, ठाणे
नर्सच्या नवर्याचा हेवा वाटत असेल, तर त्याला नरसाळ्या म्हणा… नरसोबा म्हणा… आणि नर्सला सिस्टर म्हणत असाल तर तिच्या नवर्याला भावोजी म्हणा.
परीक्षेतील गुण, टक्केवारी ही यशाने मोजमाप करणारी यंत्रणा आहे की गुणवत्तेची?
– विनीत पाबळे, सातारा
ज्याच्याशी आपला संबंध नाही त्याबद्दल कधी काही विचारू नये. (म्हणूनच त्याचं मीही उत्तर सांगत नाही… हे आपल्यातच ठेवा प्लीज!)
माणसाने आनंदी राहण्यासाठी काय करावे?
– मेहबूब सय्यद, अकोला
कसलेही प्रश्न पडू देऊ नयेत… आणि पडलेच तर कोणाला विचारू नये… (अज्ञानातच सुख आणि आनंद असतो, असं वाडवडील सांगून गेलेत… म्हणून मी सांगितलं.)
मनुष्य आपल्या शरीरातली साखर चेक करतो, तसा जिभेचा कडवटपणा का चेक करत नाही?
– मोहन फणसे, कांदिवली
कोण म्हणाले चेक करत नाही? करतात… आणि अंगाशी आलं की सत्य आहे म्हणून कडू वाटलं असं म्हणून मोकळे होतात.
संतोषराव, पेट्रोलही स्फोटक असतं आणि मुलीही स्फोटक असतात… त्यांच्यात फरक काय?
– निलेश सिंदमकर, कल्याण
पेट्रोल भडकण्याआधी तुमची आईबहीण एक करत नाही. पेट्रोल चप्पल घालत नाही. पेट्रोलला भाऊ किंवा बाप नसतो. (खोटं वाटत असेल तर आजमावून बघा.)
मानलेला भाऊ असतो, मानलेली बहीण असते, तशी मानलेली बायको असायला काय हरकत आहे?
– रवी रॉड्रिग्ज, नालासोपारा
मग बायकोनेही नवरा मानला तर? याच भीतीने बायको मानायला हरकत आहे. नाहीतर घोडे इतके बेलगाम उधळले असते की खरी बायको करायला मुलगी मिळाली नसती.
संतोषजी, खरं सांगा, बायकोचा राग आल्यावर तुम्ही काय करता?
– संजय शेंडे, बेलापूर
मला बायकोचा राग येत नाही आणि तिला राग येईल म्हणून मी कधी खरं बोलत नाही… खरंच सांगतो…
माणसाने किती पैसा कमावला म्हणजे तो श्रीमंत आहे असं म्हणता येईल?
– प्रीती पोंक्षे, पाटण
‘शहाणा’ माणूस पैसे नसले तरी मनाने श्रीमंत असतो. आणि कितीही पैसे कमवले तरी जो मनाने गरीबच राहतो तो ‘अडाणी’ असतो. आता किती पैसे कमावून श्रीमंत व्हायचं ते तुमचं तुम्ही ठरवा.
आम्हा स्त्रियांनाच सगळं जग चालवायला दिले तर?
– मंजिरी पाटील, अलिबाग
मग आता जग कोण चालवतंय? (स्त्रीचा पती हे तिचं जग असतं. त्या जगाला ती चालवतच नाही तर नाचवते सुद्धा… त्याच जगात समाधान माना. खर्याखुर्या जगाला चालवायचं म्हणाल तर आपल्या पतीला, दुसर्या स्त्रीच्या तालावर कोणती स्त्री चालू देईल? सध्या या प्रश्नाचा विचार करा. जग चालवायचा विचार डोक्यातही येणार नाही.)
नॉलेजच्या स्पेलिंगमध्ये के, डी वगैरे भलतीच भरती असते, सोल्जरच्या स्पेलिंगमध्ये जे नसतो आणि तरी इंग्लिश भाषा जगात भारी का मानली जाते?
– उल्हास पासलकर, सांगली
ज्यांना ‘देशी’च आवडते, त्यांना इंग्रजी झेपत नाही. कधीतरी ‘इंग्लिश’ ट्राय करा… इंग्रजी किती हलकंफुलकं वाटतं ते बघा.