□ सहकार हा केंद्राचा नाही, राज्याचाच विषय : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
■ मग उगाच ढवळाढवळ कशाला केंद्राची त्यात मोटाभाय? आधीच शेतकरी दिल्लीवर धडका देतायत ते पुरेसं नाहीये का?
□ आम्ही पुन्हा सत्तेत येणार : देवेंद्र फडणवीस
■ कसे? – महाराष्ट्राच्या जनतेचा सवाल
□ देशाला आणखी चार मोठ्या बँकांची गरज : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
■ आता कोणत्या लाडक्या उद्योगपतींना बँकांना बुडवून परदेशात फरारी व्हायचे वेध लागले आहेत?
□ वर्षातून एकदा ‘नदी उत्सव’ साजरा करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ आणि बाकीचे ३६४ दिवस बेबंद वाळू उपसा, पात्रं बदला, कचरा टाका, सांडपाणी सोडा, प्रेतं वाहावा… असंच ना! कधीतरी उत्सवबाजीच्या पलीकडचा विचार करा की आता तरी!
□ ईडीची नोटिस पाठवण्याची फॅशन : सुप्रिया सुळे यांची टीका
■ हो तर, हल्ली कितीतरी घरांतून बायकांचा वैतागलेला आवाज ऐकायला येतो, ‘इतकी वर्षं राजकारणात/ पोलिस सेवेत/ सनदी सेवेत घालवून काय कमावलंत? साधी ईडीची नोटिसही नाही आली तुम्हाला. चारचौघांत तोंड दाखवण्याचीही लाज वाटते हल्ली.’
□ मोदींच्या संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणानंतर कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत : पी. चिदंबरम
■ रिकामी बाकडी टाळ्या कशी वाजवतील? त्या इथे वाजवल्या ना भक्तगणांनी आणि प्रसारमाध्यमांनी.
□ भाजपच्या पुण्यातील महिला आमदाराची महिला अधिकार्याला शिवीगाळ
■ संस्कृतीची कल्हई कधी कधी उडते आणि आतलं पितळ उघडं पडतं!
□ आग्रा येथे वर्गात फिल्मी गाण्यांवर नाचणारे पाच शिक्षक निलंबित
■ शिक्षकांच्या कलागुणांची काही तरी कदर ठेवा… यांच्यातला एखादा नंतर टीव्हीवरची एखादी स्पर्धा जिंकला तर सत्कार करतील त्याच शाळेत.
□ महाराष्ट्राच्या भ्रष्टाचारमुक्तीची जबाबदारी माझ्यावर : किरीट सोमय्या
■ फार छान विनोद होता. खूप हसलो. आता दुसरा सांगा किरीट जी.
□ सर्वोच्च न्यायालयाच्या ईमेलवरून मोदींचा फोटो आणि भाजपचे घोषवाक्य हटवण्याचा आदेश, तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या फोटोची पुनर्स्थापना
■ आता लसीच्या प्रमाणपत्रावरून तिच्याशी कसलाच संबंध नसलेल्या मोदींचा फोटो हटवून लसवंताचा फोटो येण्यासाठी काय करावं लागेल?
□ जबाबदार वर्तनाने कोरोनावर मात शक्य : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
■ आपण फोटोसाठी लोकांच्या तोंडावरचे मास्क खाली ओढले नाहीत तरी पुष्कळ आहे महामहीम!
□ विद्यार्थी म्हणजे फुटबॉल नव्हेत, सर्वोच्च न्यायालयाचा ‘नीट’ परीक्षागोंधळावरून संताप
■ इतका गोंधळ आणि परीक्षेचं नाव ‘नीट’!
□ तेलंगणात आठवीच्या पुस्तकात कुराण हाती घेतलेल्या दहशतवाद्याचा फोटो
■ अलीकडची मुलं पाठ्यपुस्तकं फक्त परीक्षेसाठी वापरतात; खरा इतिहास नंतर कष्टपूर्वक शोधावा लागेल, हे एव्हाना त्यांच्या लक्षात आलेलं आहे.
□ केस, दाढी कापून घ्याल तर खबरदार : अफगाणिस्तानात तालिबानच्या फतव्याने सलूनच्या धंद्यावर अवकळा, सलूनमध्ये ‘गानाबजाना’ही बंद
■ बंदुकीच्या जोरावर आणि तेवढ्यापुरत्याच अशा बंदी चालतात, बंदुकी हटल्या की बंदीचा फज्जा उडतो, हे तालिबानांना अजूनही कळलं नाही. अफगाण जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.
□ ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी भुताचा व्हिडिओ तयार करणार्यांना जळगावात अटक
■ रोज रात्री घराघरात विकतची घबराट निर्माण करणार्या मालिका चालतात, त्यांचं काय?… की त्या पाहून हसायलाच येतं, हे माहिती आहे पोलिसांना!
□ कोरोनामुळे लोकांच्या आयुर्मानात घट : ऑक्स्फर्ड विद्यापीठात संशोधन
■ कोरोनाने ज्यांचं जगणं अवघड करून ठेवलंय, त्यांना या बातमीने ‘दिलासा’च मिळेल; भोगतोय त्या यातना कमी दिवसच भोगायच्या आहेत म्हणून.
□ २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहं सुरू होत असल्याने २० सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर
■ थिएटरमध्ये बसून सिनेमा पाहण्याचा आनंद काही वेगळाच… सिनेमा सुरू असताना पॉपकॉर्न, वडे, समोसे खाण्यासाठी, मोबाइलवर गप्पा मारण्यासाठी किंवा मेसेज पाहण्यासाठी येणारे सहप्रेक्षक आणि त्यांची थिएटरभर बागडणारी ऐन महत्त्वाच्या प्रसंगी टयँहँ करणारी मुलं यांची किती आठवण येत होती ना आपल्याला!