अनेक हिट नाटकांची वेशभूषा प्रकाशने केली आहे. त्यात ‘जाऊबाई जोरात’, ‘सही रे सही’, ‘मोरूची मावशी’ यांसारखी हिट नाटके आहेतच; पण ‘गंगाधर टिपरे’, ‘हसा चकटफू’ यांच्यासारख्या मालिका आणि ‘हाच सूनबाईचा भाऊ’, ‘भस्म’ यांसारखे चित्रपटही आहेत. विशेष म्हणजे ‘टूरटूर’, ‘मुंबई मुंबई’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ यांसारख्या नाटकांमध्ये त्याच्या भूमिकाही गाजल्यात.
—-
‘एक्सक्यूज मी…’ असं म्हणून हक्काच्या चार गोष्टी सांगून अत्यंत सौजन्याने शेवटी ‘ओके .. हॅव अ नाईस डे..’ असं म्हणून फोन ठेवणारा आमचा एक मित्र आहे. त्याच्याशी बोलल्यानंतर खूप दिवसांनी आपली एक अस्तित्व चाचणी झाल्याची अनुभूती येते. आपण खूप काही आहोत, असे वाटू लागते, कारण तो आपल्याला आपल्यातल्या काही चांगल्या गोष्टींची परत परत आठवण करून देतो आणि आपण विसरलेल्या अनेक चांगल्या गोष्टींची तो अशी काही उजळणी करून देतो की आपण पुनः एकदा आपल्या वाळलेल्या अंगावर मूठभर मांस चढल्यामुळे सुदृढ वाटू लागतो… हा मित्र म्हणजे प्रकाश निमकर… आणि अनेक जवळच्या मित्रांचा पकी किंवा नंतरच्या पिढीचा पकीदादा…
पुणेकर हा त्याच्या बोलण्यातून कळतो, तसे मुंबईकरही कळतो, मुंबईकर तर आणखी तपशिलात कळतो. तो नुसता मुंबईचा नसतो, तो गिरगावकर, दादरकर, परळकर किंवा गिरणगावकरही असतो. नुसत्या बोलण्यावरून मुंबईतला चाणाक्ष माणूस समोरचा नेमका कुठचा आहे हे जाणू शकतो. अगदी लालबाग, परळ ते काळबादेवी, भेंडीबाजारपासून ते उपनगरांपर्यंत. दादरकरांमध्येही खूप पोटजाती आहेत… पूर्व-पश्चिमपासून ते टायकलवाडी किंवा शिवाजी पार्क संस्कृतीपर्यंत; आणि एक अस्सल मराठमोळी उच्चस्तरातील संस्कृती म्हणजे हिंदू कॉलनी संस्कृती. ही साधारण पुणे आणि मुंबईचे मिश्रण असलेली संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये लहानाचा मोठा झालेला पकी म्हणजे प्रकाश निमकर…
प्रकाश निमकर हा जे जे इन्स्टिट्यूटमधून शिकून बाहेर पडलेला चित्रकार आणि आजचा मराठी रंगभूमीवरचा आघाडीचा वेशभूषाकार आणि हौशी अभिनेता. अनेक हिट नाटकांची वेशभूषा प्रकाशने केली आहे. त्यात ‘जाऊबाई जोरात’, ‘सही रे सही’, ‘मोरूची मावशी’ यांसारखी हिट नाटके आहेतच; पण ‘गंगाधर टिपरे’, ‘हसा चकटफू’ यांच्यासारख्या मालिका आणि ‘हाच सूनबाईचा भाऊ’, ‘भस्म’ यांसारखे चित्रपटही आहेत. विशेष म्हणजे ‘टूरटूर’, ‘मुंबई मुंबई’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ यांसारख्या नाटकांमध्ये त्याच्या भूमिकाही गाजल्यात. तरी प्रकाशकडे तुम्ही केव्हाही पाहिलंत तरी आत्ताच आंघोळ करून आल्यासारखी टवटवीत, प्रसन्न आणि सुहास्यवदनी व्यक्ती भेटल्याचे समाधान मिळते. विशेष म्हणजे तो जे कपडे घालतो, त्यावरचे रंग त्याच्यासाठीच तयार झालेत असे वाटते. कारण ते कपडे आणि रंग अंगावर घेऊन कसे वावरावे याचेही ज्ञान त्याला आहे हे जाणवते. हेच कपडे तुम्ही हौस म्हणून घालून फिरलात तर कदाचित आत्ताच एसटी स्टँडवरून उतरल्यासारखे वाटाल. आपण नेमके काय केले पाहिजे आणि केव्हा केले पाहिजे हे प्रकाशला अगदी लहानपणापासून कळते.
वडील ही काय चीज असते हे कळण्याआधीच तो पितृछत्र गमावून बसला. त्यामुळे आई आणि मोठी बहीण, मानलेल्या मावश्या, अशा गोतावळ्यात पकी लहानाचा मोठा होत गेला. दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये घर असणं हा त्याचा उज्ज्वल नशिबाचा भाग. आई आणि बहिणीने अगदी जबाबदारीने काळजी घेत त्याला मोठे केले तरी या परिस्थितीत आपल्या कर्तव्याची जाणीव प्रकाशला लवकर झाली. शालेय शिक्षण पूर्ण होताच पुढे काय, हा त्यालाही प्रश्न पडला होताच… पण प्रभाकर बर्वे या महान चित्रकाराची आई ही प्रकाशच्या आईची खास मैत्रीण. प्रभाकर बर्वेंच्या सांगण्यावरून प्रकाशने जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अॅप्लाइड आर्टमध्ये मॉर्निंग इव्हनिंग बॅचला अॅडमिशन घेतले. परिस्थितीची जाणीव असलेल्या प्रकाशने मधल्या वेळात नोकरी करून शिक्षण पूर्ण केले. जेजेमध्ये सकाळ-संध्याकाळच्या बॅचमधून शिक्षण घेतेलेले अनेक लोक मधल्या काळात नोकरी करून शिकले आणि नंतर यशस्वी झाले. अशाच एका ठिकाणी प्रकाशला आमच्या ‘या मंडळी सादर करू या’ या हौशी नाट्यसंस्थेतला अशोक वंजारी भेटला. प्रकाशचा मित्र सुनील राजे आणि अशोक एका अॅड एजन्सीत एकत्र काम करीत होते. त्याच्यामुळे त्यांची ओळख झाली, त्याने प्रकाशला नाटकाची आवड आहे बघून ‘या मंडळी…’त बोलावले. आमच्या संस्थेत जेजेमधल्या आजी आणि माजी कलावंतांना लगेच प्रवेश मिळे आणि आवड एकच असल्यामुळे नवीन कलाकार आमच्यात लगेच मिसळून जात. तसाच प्रकाश आमच्यात आला.
पहिला ब्रेक
त्यावेळी मी ‘अलवरा डाकू’ या नाटकाची नव्याने तालीम करीत होतो. त्यात काही महत्वाचे कलाकार बदलणार होते. राणी सबनीसच्या जागी निवेदिता जोशी काम करीत होती. निवेदिता तेव्हा हिंदू कॉलनीमध्ये प्रकाशच्या शेजारच्या बिल्डिंगमध्येच आत्याकडे राहात होती. त्यामुळे प्रकाश यथावकाश आमच्या एकेका नाटकात दिसू लागला. मैत्री वाढली. ‘या मंडळी…’तली सर्व कलाकार मंडळी म्हणजे एकापेक्षा एक नग. कोणाचंही सरळ बोलणं नसायचं. प्रकाश मात्र अत्यंत शिस्तबद्ध आणि सात्विक वृत्तीचा. त्याचे बोलणे, वागणे इतरांच्यासारखे बेदरकार नव्हते. त्याला येणारी चीडही सात्विकच असायची. त्यामुळे तो थोडा अलग अलग राहू लागला. तरी या मंडळीतल्या विकास फडके, सुधीर कोसके आणि रघुवीर कुल यांच्याबरोबर त्याची चांगली दोस्ती झाली. ‘अलवरा डाकू’ नाटकात आणि ‘श्री मनाचे शोक’ या एकांकिकेत प्रकाशने भूमिका केल्या. तसेच रघुवीरच्या ‘चूहे’ या नाटकातही त्याने काम केले आणि प्रसंगी बॅकस्टेजही सांभाळले. मित्रमंडळींमध्ये स्वत:ला झोकून द्यायची वृत्ती असल्याने पुढे तो आमच्या संस्थेचा अविभाज्य घटक झाला आणि जेव्हा मी ‘टूरटूर’ व्यावसायिक रंगभूमीवर आणायचे ठरवले तेव्हा त्यात विजय केंकरे, संदीप कश्यप आदी ‘या मंडळी…’च्या कलावंतांबरोबर प्रकाशही ‘टूरटूर’मध्ये दाखल झाला आणि त्याचे ते पहिले व्यावसायिक नाटक ठरले.
प्रकाशला नाटकाची हौस असली तरी त्याला उठसूट कोणाच्याही नाटकात काम करून नट म्हणून प्रस्थापित व्हायचं नव्हतं. मला प्रकाशमध्ये दिसलेले कितीतरी वेगळे टॅलेंट्स मी हेरून ठेवले होते. एक तर त्याच्यातली शिस्त, त्याचा कलात्मक जागृत दृष्टिकोन, बारीकशी संशयित वृत्ती आणि अंगात जन्मत:च असलेला सात्विक संताप. ‘टूरटूर’सारखं आगळं वेगळं चाकोरीबाह्य नाटक मी व्यावसायिक रंगभूमीवर आणत होतो. मोठं जोखमीचं काम होतं. त्यासाठी शांत चित्त, सबुरी, विचारपूर्वक आर्थिक निर्णय आणि कलावंतांना सांभाळून घेण्याची वृत्ती या सर्व गोष्टींची गरज होती आणि त्या सर्व गोष्टी माझ्यात होत्याच; पण प्रकाश निमकर, विजय केंकरे दिलीप जाधव या सहकार्यांमुळे आणि त्यांच्याही अंगी असलेल्या वेगळ्या गुणांमुळे मला नाटक दीर्घ काळ चालवणे शक्य झाले. प्रकाश आणि विजय या दोघांमुळे रिप्लेसमेंट म्हणून येणार्या कलावंतांच्या रिहर्सलचा प्रश्न सुटला. पुढेपुढे प्रकाश इतका ‘टूरटूर’मय झाला की नाटकाचा निर्माता मी असलो तरी प्रकाशच निर्माता आहे की काय असे वाटायचे. १९९५ साली ‘टूरटूर’ बंद झाले, पण कधी त्याचे कुठल्या हौशी संस्थांना प्रयोग करायचे झाल्यास प्रकाशला गाठून त्या संस्था एखाददुसरा प्रयोग करीत. अर्थात प्रकाश इमानदारीत लेखकाचे मानधन मला आणून देई.
‘टूरटूर’च्या दौर्यात प्रकाशचे रूम पार्टनर असत बाप्पा म्हणजे दीपक शिर्के, गायक मंगेश दत्त, हार्मोनियमवादक मिलिंद हाटे आणि ढोलकीवादक नाना साळुंके. नाटकातले सगळेच्या सगळे पुढे स्टार झाले, तरी आपसात कोणाच्याही डोक्यात कधी हवा गेली नाही. बसमध्ये लक्ष्या, विजय कदम, विजय चव्हाण, प्रशांत दामले, चेतन दळवी, विजय केंकरे वगैरे धमाल करीत असले तरी पकीचा स्वत:चा एक समांतर ग्रूप होता. त्यात बाप्पा वगैरे सर्व मंडळी होती. पुण्यात आमचे खूप प्रयोग व्हायचे, शिवाय सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा इथे प्रयोग असतील तर मुक्काम पुण्यात असायचा आणि तोही बालगंधर्व रंगमंदिरात. तिथे पहिल्या मजल्यावरच्या कलावंतांसाठी असलेल्या सदनिका आम्ही घेत असू, हॉटेलमध्ये कलाकारांना उतरवायची प्रथा तोपर्यंत फोफावली नव्हती. त्यामुळे प्रकाशचा सगळा ग्रूप बालगंधर्व रंगमंदिरातील पहिल्या मजल्यावरच्या कोपर्यातल्या खोलीत नेहमी राहात असे. शिवाय त्या खोलीत ‘भुताटकी’ आहे या समजुतीने इतर कोणीही त्यात राहायला मागत नसे. शिवाय त्या खोलीतले भूत हे विनोदी कलावंतांच्या मानगुटीवर बसते, अशीही एक वदंता होती. त्यामुळे तर ‘टूरटूर’मधले सगळेच विनोदवीर त्या रूमपासून दूर पळत. मग राहिले गायक मंगेश दत्त, वादक नाना साळुंके, हार्मोनियमवादक मिलिंद हाटे, खलनायक दीपक शिर्के आणि प्रकाश. त्यात ‘मी अजिबात विनोदी नट नाही,’ असं म्हणून प्रकाशने त्या खोलीत राहायचे घोषित केले. त्याचा खरा इंटरेस्ट होता तो संगीतात. कारण त्याला गायक व्हायचे होते, पण ‘माझा गळा संगीताच्या मापात बसला नाही’ असे तो म्हणतो. त्या रूममध्ये या सर्वांची वाद्यसंगीत मैफल जमायची. त्यात बाप्पाकडे असंख्य गाण्यांचा स्टॉक, त्यातल्या शब्दांसहित आणि काव्यासहित बाप्पा रात्र रात्र जागवत गाणी म्हणायचा, त्याला साथ असायची मंग्याची आणि मिलिंदची… रात्री-आपरात्री त्या रूममधून गाणी ऐकू आली तर आजूबाजूला मुक्कामाला आलेल्या नवीन कलाकारांना इथे भुताटकी असल्याची खात्री पटायची… मला तर खात्री आहे की ती खोली दुसर्या कुणाला मिळू नये म्हणून हिंदू कॉलनीतला टारगट प्रकाश निमकर आणि गिरगावातला खट्याळ बाप्पा या दोघांनी ती अफवा उठवून त्या रूमवर ताबा मिळवला असावा.
प्रकाशचा आणखी एक गुण जो त्याला हिंदू कॉलनीच्या नाक्यावरून मिळाला होता, तो म्हणजे गॉसिपिंग आणि त्याला साथ देणारा दुसरा ग्रूप प्रकाशने बनवला होता. त्या ग्रूपचे मेंबर्स होते विजय केंकरे, विजय चव्हाण आणि विजय कदम. प्रयोगाच्या आधी किंवा लागोपाठ दोन प्रयोगांच्या मध्ये या गप्पा सॉलिड रंगायच्या. मग त्यात नाट्यक्षेत्रातील कोण कोणाबरोबर सध्या रोमान्स करतोय इथपासून ते कोणाचा घटस्फोट झाला इथपर्यंत गॉसिप चाले. त्यात मग कधी मधी एखादे नवीन नाटक रंगभूमीवर आले की त्याचे चालते बोलते परीक्षण (किंवा टीका) या ग्रूपमध्ये रंगत असे. या ग्रूपमध्ये पुढे पुढे पद्मश्री जोशीही सामील झाली. दौर्यात बसमध्ये रात्रीच्या प्रवासात झोपायची व्यवस्था खास असायची. दोनच बर्थ असायचे बसमध्ये, त्यात एकावर मी, दुसर्यावर लक्ष्या असे. आणि मग सीटवर सीनियर नट मंडळी.. आणि दोन सीटच्या मध्ये, खाली, प्रथम विजू केंकरे, नंतर विजय चव्हाण, पकी निमकर, त्यांतर विजय कदम. कहर म्हणजे त्या गॅपमध्ये झोपून या लोकांच्या गॉसिप गप्पा रंगायच्या. कारण सीटच्या खालून बारीक आवाजात अनेकांच्या चारित्र्याची जळमटं स्वच्छ केली जायची. अगदी नवीन आणि ताजी करून मिळायची. गंमत म्हणजे बसमध्ये बाप्पा आडवा झाला तर त्याचे पाय खिडकीच्या बाहेर जायचे, त्यामुळे तो रात्रभर पायरीवर बसून राहायचा आणि तिथून त्या मैफिलीत सामील व्हायचा. त्या मैफिलीत विजय कदम आणि पद्मश्री यांच्या नाजुक प्रेमकथेची घोषण स्वत: प्रकाशने करून उपस्थित युगुलालाही अचंबित केले होते. ‘टूरटूर’मध्ये काम करता करता विजय आणि पद्मश्री जोशी आधी चांगले मित्र झाले, मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचे लग्नात, हे सर्व पकी निमकरच्या साक्षीने झाले. ‘अरे तुला ती आवडलीय ना? मग तसं सांगून टाक ना तिला, नाहीतर बस निघून जाईल आणि तू बसशील मैलाच्या दगडावर दुसर्या बसची वाट बघत’ असा सल्ला सात्विक संतापाने डोळे मोठ्ठे करून बहुतेक प्रकाशने विजयला दिला असावा… दोन सीटच्या मध्ये झोपून ही चौकडी गॉसिपिंगचा तळ गाठायची आणि त्यावर कडक कॉमेंट करून आपसात ठो ठो हसायची.. विशेष म्हणजे या सर्व कलागतींचा सूत्रधार प्रकाश निमकर होता हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. याला म्हणतात हिंदू कॉलनी कल्चर.
माझ्या पुढच्या नाटकात म्हणजे ‘मुंबई मुंबई’मध्ये प्रकाशला एक छान भूमिका मिळाली. मी त्याला त्याच्या बाजाचीच भूमिका दिली. नाक्यावरच्या टिपिकल ‘टपोरी’ पण सुशिक्षित एज्युकेटेड तरुणाची. त्यात त्याने तिसर्या मजल्यावरच्या मुलीला, ‘ए रेखा, ए रेखा, टॉक टॉक…’ अशी हाक मारताना टाळूला जीभ लावून आवाज काढायचा असायचा. तो त्याला जमता जमत नव्हता… अखेर बरोबर त्याच वेळी विंगमधून प्रसाद कावले तो आवाज असा काढायचा की जणू काय प्रकाशच तो आवाज काढतोय. हे इतकं परफेक्ट सिंक व्हायचं की कोणाला त्यातली गोम शेवटपर्यंत कळली नाही.
दुसरा ब्रेक
दोन्ही नाटकांत प्रकाशने माझ्याकडून एक खास सवलत मागून घेतली, ती म्हणजे त्याचे कपडे तो स्वत: घेऊन यायचा आणि तेही इतर कोणाच्या कपड्यांना डिस्टर्ब न करता. त्याच्या वेशभूषा-संकल्पनेचा पवित्रा खरंतर तिथूनच सुरू झाला. पुढे माझ्या ‘हाच सूनबाईचा भाऊ’ या चित्रपटासाठी मी त्याला सहायक दिग्दर्शक म्हणून टीममध्ये घेतले. तेव्हा तो जरा नाराज झाला. त्याला कॉस्च्युम डिझायनर व्हायचे होते, दिग्दर्शक व्हायचे नव्हते. मी म्हटले, तू त्याच डिपार्टमेंटचा सहायक दिग्दर्शक हो, म्हणजे तुझा यातल्या सर्व कलाकारांच्या भूमिकांचा अभ्यास पण होईल आणि त्यांच्याशी एक डिझायनरने कसे संबंध प्रस्थापित करावेत, याचे शिक्षणही मिळेल. ही गोष्ट त्याच्या चांगलीच पचनी पडली. या चित्रपटातून नीना कुलकर्णी, रेणुका शहाणे, मोहन जोशी यांनी पदार्पण केले. शमा देशपांडे, प्रसाद कावले आणि अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर त्याचे छान ट्यूनिंग झाले. त्यानंतर लक्ष्मीकांतच्या प्रत्येक नाटकात आणि सिनेमात या ना त्या कारणाने प्रकाशचा समावेश झालेला असायचा.
त्याच्यातल्या वेशभूषाकाराला त्यानंतर मोकळे मैदान मिळाले. विजय केंकरेचे पहिले व्यावसायिक नाटक त्याला वेशभूषेसाठी मिळाले. त्यानंतर विजयचा तो खास कॉस्च्युम डिझायनर झाला. विजय केंकरेच्या ‘असा मी असामी’, ‘लग्नाची बेडी’, ‘खरं सांगायचं झालं तर’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘हृदयी वसंत फुलताना’ आदी नाटकांची वेशभूषा त्याने केली. विजय पाटकरच्या ‘हलकं फुलकं’ या नाटकाच्या वेशभूषेसाठी त्याला पुरस्कारही मिळाले. केदार शिंदेचे ‘सही रे सही’ हे सुपरहिट नाटक आणि त्यानंतरची त्याची सगळीच नाटकं ते अगदी आताच्या ‘मोरूची मावशी’पर्यंत आणि वामन केंद्रेचं ‘अशी बायको हवी’, हेमंत भालेकरचे ‘अथांग’ आणि ‘तारा सखाराम’ ही नाटकं आणि ‘सुयोग’च्या विजय केंकरेने केलेल्या सर्व नाटकांच्या वेशभूषा प्रकाशच्या आहेत. मी केलेलं ‘जाऊबाई जोरात’ त्याने वेशभूषेने छान सजवले होते. त्यातल्या सोळाजणींना त्या त्या भूमिकांप्रमाणे सजवणे हा मोठा ‘टास्क’ त्याने लिलया पार पाडला. ‘आवाज की दुनिया’ या वाद्यवृंदाची वेशभूषा ही त्याच्यासाठी मोठी पर्वणी घेऊन आली. या वेशभूषेमुळे प्रकाशचे वेशभूषाकार म्हणून इंग्लंड-अमेरिकेत नाव झाले. माझ्या आणि कुमार सोहोनी, ए. राधास्वामी यांच्या चित्रपटांची वेशभूषाही प्रकाशने केली. माझ्या ‘जमलं हो जमलं’ या चित्रपटासाठी त्याला शासनाचा पुरस्कारही मिळाला.
जेव्हा ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेचा उल्लेख होतो, तेव्हा प्रकाश अत्यंत भरभरून बोलतो. केदार शिंदेच्या या गाजलेल्या मालिकेच्या वेशभूषेची संपूर्ण जबाबदारी केदारने प्रकाशवर सोपवली. नुसती वेशभूषा नव्हे, तर त्यातल्या एकेक पात्राचा लुकही प्रकाशने डिझाईन केला. उदाहरणार्थ दिलीप प्रभावळकरांचा टिपरे- त्यांची कानटोपी, मफलर, जाड भिंगांचा चष्मा… यासकट सर्व आज अजरामर झालेलं आहे. स्वत: दिलीप प्रभावळकरही याचं श्रेय प्रकाशला देतात. त्यात काम करणारा राजन भिसे हा स्वत: एक सेट डिझायनर आणि वेशभूषाकार आहे, पण तोसुद्धा कधी कधी प्रकाशचेच नाव सुचवतो.
ब्रेक के बाद..
नाटक-सिनेमात प्रचंड व्यस्त झालेला प्रकाश अत्यंत मनस्वीपणे आणि स्वत:ला हवे तसे काम करीत होता. त्यानंतर अलीकडे मात्र त्याने नाटकांची वेशभूषा करणे कमी केले. का विचारले तर म्हणतो, ‘अरे मी पुरुषोत्तम बेर्डे, विजय केंकरे, केदार शिंदे, विजय पाटकर, वामन केंद्रे या दिग्गजांबरोबर कामं केली, यापैकी कोणीही माझ्या कामात कधी ढवळाढवळ केली नाही. अलीकडच्या दिग्दर्शकांना कॉस्च्युम डिझायनर नकोय, ‘बाजार मास्टर’ हवाय- म्हणजे नुसते कपडे खरेदी करून देणारा ‘मास्टर’. नायिका म्हणेल ती साडी आणून देणारा. अशा परिस्थितीत मी काम करू शकत नाही आणि तेवढ्यात मला एक फ्रेंच कॉस्च्युम डिझायनर भेटला. कोकॉई नावाचा. त्याने मला त्याच्याबरोबर काम करणार का म्हणून विचारले. तेही ‘फॅशन शो’चे. मॉडेल्सना सजवायचे. मला ही संधी वाटली. त्यानिमित्ताने माझे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचे दौरे वाढले. त्याच्याबरोबर मी भरपूर काम केले आणि पैसे म्हणशील तर तेही भरपूर मिळवले.’
आज प्रकाश एकटा आहे. पण पोरका नाही. त्याच्या मित्रमंडळींची कुटुंबं हीच त्याची कुटुंबं आहेत असे तो मानतो. आई आणि बहीण यांचं स्थान त्याच्या आयुष्यात खूप महत्वाचे आहे. पाच वर्षांपूर्वी आई गेली. म्हणजे त्याची सख्खी जिवाभावाची मैत्रीणच गेली. तिच्याशी तो वाद घालायचा, भांडायचा, तेवढंच प्रेमही करायचा, तिची काळजी घ्यायचा. तिचा आणि लतादीदींचा जन्मदिवस एकच. म्हणजे २८ सप्टेंबर. त्यावरून तो तिला चिडवायचा, ‘बघ ती कुठे आणि तू कुठे?’ त्यावर ती म्हणायची, ‘अरे सोन्या, देवाने आधी मला विचारले, मला तुम्हा दोघींपैकी एकीला ‘गानसरस्वती’ करायचे आहे… कोणाला करू? मी ताडकन उत्तर दिले, हिला करा, ही आताच सुरात रडतेय… मला निमकरांच्या घरात टाका, त्यांचं तरी भलं होईल.’
प्रकाशची मोठी बहीण ऑस्ट्रेलियाला असते. भारतात येऊन जाऊन असते. हिंदू कॉलनी सोडून प्रकाशने स्वत:ला एक फ्लॅट ठाण्याला आणि एक बहिणीला कांदिवलीला घेऊन ठेवलाय. हिंदू कॉलनी सोडली तरी बोलण्यातून अजून ती गेली नाही. सध्या प्रकाशने एक वेगळीच मोहीम हातात घेतलीय. मुंबईत नाटक-सिनेमात करियर करायला आलेल्या तरुणांना मार्गदर्शन. तेही त्यांची आर्थिक जबाबदारी घेऊन, गेल्या पाचसहा वर्षात त्याने ‘दत्तक’ घेतली ही मुलं आज प्रकाशच्या जिवावर मुंबईत स्ट्रगल करतायत, त्यातल्या चारपाच मुलांना मोठा ब्रेकही मिळालाय. विकास पाटील नावाचा मुलगा दोन तीन मालिकांमध्ये नायक म्हणून आला. विशाल भालेकर आज स्वतंत्रपणे वेशभूषाकार म्हणून काम करतोय. ‘अथर्व’ डॉक्टर झालाय आणि त्याला ऑस्ट्रेलियात त्याने बस्तान बसवून दिले. काही तरुणांना रँप वॉक आणि फॅशन शोमध्ये त्याने प्रेझेंट केले. एका मुलाने विचारले, ‘सर, तुम्हाला मी काही प्रेझेंट देऊ इच्छितो, काय देऊ? त्याला प्रकाश म्हणाला, ‘अरे बाळा, तू आणखी मोठा हो, बीएमडब्ल्यू घे आणि पहिल्या दिवशी तुझ्या गर्लफ्रेंडच्या आधी मला त्यातून फिरवून आण… बस्स आणि काही नको…’
प्रकाशच्या एकाकी जीवनात आज अनेक सुशोभित महाल तयार आहेत, ज्यात तो कधीही दोन दिवस व्यतीत करू शकतो. तो डोळे मिचकावून म्हणतो, मी एकटा आहे, पण ‘अविवाहित’ नाही, माझ्या बहिणींची मुलं आणि मित्रमंडळींची मुलं, सुना नातवंडं ही माझीच आहेत… मी आठदहा दिवस सोशल मीडियावर दिसलो नाही तर चौकशीचे फोन येतात. बस्स, जीने को और क्या चाहिये. या एवढ्या एनर्जीवर मी आणि माझा डायबेटिस आराम की जिंदगी जी रहे है… थँक्स टू गॉड… अँड हॅव अ नाईस डे…’
हॅव अ नाईस डे.. प्रकाश निमकर..
– पुरुषोत्तम बेर्डे
(लेखक नाट्य व चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त अष्टपैलू कलावंत आहेत)