अजित पवार
एका दगडात किती पक्षी
मारले मी ते कळेल आता
माझीच शिकार होऊ नये
म्हणून गाठला भाजप त्राता
माझी दादागिरी आता
काकांपुढे चालत नाही
समजून गेलो माझ्याशिवाय
भाजपलाही पर्याय नाही
शिंदे आणि देवेंद्रांच्या
नाकात घातली त्यांनी वेसण
बोबडा किरीट उघडा पडला
आता ऐका माझे भाषण
—– —– —–
संभाजी भिडे
माझ्याशिवाय कुणालाही
खरा इतिहास नाही माहीत
संघासाठी खणून काढला
जरी मी होतो मोठ्या घाईत
देश स्वतंत्र झाला केव्हा
मोदी पीएम झाले तेव्हा
१५ ऑगस्ट काळा दिवस
आम्ही खातो काळा मेवा
कोण म्हणतो टागोरांनी
राष्ट्रगीत लिहिले होते
हिंदुराष्ट्राचा नाही उल्लेख
असले कसले देशभक्त ते
—– —– —–
शरद पवार
तुमचे बंड, आमचे बंड
त्यात मोठा आहे फरक
आम्ही नव्हते खोके दिले
आमदार पळवून नेले तडक
तुम्ही तेव्हा होता शाळेत
गमभन गिरवत होता
तुम्हाला काय माहीत इतिहास
तेव्हा भोवरे फिरवत होता
तुमचेच लोक होते आमच्यात
विचारा त्यांच्या मित्रांना
खोके देऊन विकत नव्हते
कोणीही आपल्या निष्ठेला
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
मंत्रीमंडळाचा विस्तार
आता अगदी जवळ आहे
सगळे आमदार होतील मंत्री
जम्बो रेकॉर्ड अटळ आहे
जेवढा बदनाम आहे नेता
तेवढे त्याचे खाते मोठे
जेवढा गद्दार भ्रष्टाचारी
आणि ज्यांचे नाणे खोटे
अशाच धूर्त आयारामांची
भाजपाला आहे निकड
निर्ढावलेले हवे मात्र
असले जरी कितीही भेकड
—– —– —–
नरेंद्र मोदी
केवढी जगात वटवट माझी
कित्ती नेते करती सलाम
कित्ती मोठी असामी मी
विचारत नाहीत इथले गुलाम
इतकी मोठी अमेरिका ती
घाबरते जग सगळे तिजला
कित्ती केले कौतुक माझे
कित्ती दिल्या भेटी मजला
मीही मारले मग इंप्रेशन
लोकशाहीची केली भलावण
ठाऊक आहे मजला येथे
लोकशाहीचा मरतो कणकण