□ पंढरपूरहून परतणारे वारकरी रेल्वेत घुसमटले, क्षमतेच्या दुप्पट वारकरी ट्रेनमध्ये घुसले…
■ वारकर्यांनो, व्हीआयपी दर्शने घेऊन गेलेल्या राज्यकर्त्यांना लक्षात ठेवा आणि विठुरायाला पुढच्या वेळी तरी योग्य साकडे घाला…
□ ताई, वेळ पडलीच तर सासुरवास सहन कर, पण आहेस तिथेच राहा. नाहीतर भावाचा पक्ष आहेच. : रासपच्या महादेव जानकरांचा पंकजा मुंडे यांना सल्ला.
■ पंकजा ताई, आमचा एकच सल्ला… या सर्व दादांपासून सावध राहा.
□ काँग्रेसची स्वत:ची गॅरंटी नाही. ते मोफत वीज देणार म्हणतात, तेव्हा ते दर वाढवणार आहेत, हे लक्षात घ्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी.
■ हे कोण सांगतंय तर बस हो गयी महंगाई की मार म्हणत सत्तेवर येऊन गॅस सिलिंडर तिप्पट आणि पेट्रोल-डिझेल दुप्पट महाग करून ठेवणारे मोदी? फार धारिष्ट्य आहे बुवा यांच्या अंगात (फक्त याच बाबतीत)!
□ समृद्धीवर अपघातात मृत्यू झाल्यास लोक देवेंद्रवासी झाला, असं म्हणतात : शरद पवार यांची टीका.
■ रविवारी त्याच ‘समृद्धी’च्या महामार्गावर अपघात होऊन अजितदादा पवारांसह नऊ जण देवेंद्रवासी झाले पवार साहेब!
□ समृद्धी महामार्गावर आतापर्यंत ३००हून अधिक प्रवासी मरण पावले असताना आता तरी सरकारचे डोळे उघडावेत : उद्धव ठाकरे यांचे खडे बोल.
■ डोळे मिटून समृद्धीची मलई खाणार्या मांजरी डोळे उघडतील कशाला उद्धवसाहेब!
□ मुंबईच्या लुटारूंना जेलमध्ये टाकणार : आदित्य ठाकरे यांची गर्जना.
■ निवडणुका घ्यायची हिंमत दाखवली या गद्दारांनी, तर जनताच त्यांना विजनवासाच्या तुरुंगात कायमची पाठवून देईल.
□ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मिरा-भाईंदरचे रस्ते गुळगुळीत.
■ त्यांची पाठ वळताच खडी उघडी पडून सगळे खड्डे पूर्ववत होणार
□ महानगरपालिकेत शिवसेनेसह भारतीय जनता पक्ष पण सत्तेत होता. तेव्हा भ्रष्टाचार दिसला नाही? : आमदार सुनील प्रभू यांचा सवाल.
■ हे तर लांबचे आहेत, जे अडीच वर्षं सत्तेत, उच्चपदांवर होते, ते आपल्याच पक्षातले गद्दार पण लांब जिभा काढून बोलतायत, ही खरी हद्द आहे सुनीलजी!
□ आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, जाहिरातीची चूक शिंदे यांनी लगेच मान्य केली : देवेंद्र फडणवीस.
■ हा छान विनोद होता. आणखी एक सांगा.
□ राजकारणात काही वेळा अनैतिक गोष्टी पण कराव्या लागतात : देवेंद्र फडणवीस.
■ काही वेळा आणि सदा सर्वदा यांच्यातला फरक फारच मोठा आहे हो साहेब! तुमच्या पक्षाने अपवाद म्हणून दोनपाच नैतिक गोष्टी कराव्यात, निदान नियम सिद्ध करण्यासाठी.
□ भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला, हल्लेखोर मोकाट.
■ हल्ल्यामागे कोण असणार हे उघडच आहे. त्यामुळे बचावले हेच नशीब!
□ ब्राझिलचे माजी अध्यक्ष बोल्सनारो यांच्यावर निवडणूक प्रचारात सरकारी माध्यमांचा गैरवापर केल्याचा ठपका, २०३०पर्यंत निवडणूक लढवण्यास बंदी.
■ आपल्याकडे असा कायदा अंमलात आणला तर बहुतेक पक्षांना निवडणुका लढवायला उमेदवारच सापडायचे नाहीत.
□ मणिपूरबाबत पंतप्रधानांचे मौन अनाकलनीय : राज ठाकरे यांची टीका.
■ तिथे ना निवडणूक, ना ते मोठं, हिंदीभाषक राज्य, त्यावर बोलण्यात मोदी आपला अमूल्य वेळ का वाया घालवतील राजसाहेब? तेवढ्यात दोन उद्घाटनं करून होतात गल्लीतले डांबरीकरण किंवा पथदिव्यांच्या रंगरंगोटीची!
□ समृद्धी महामार्गावरच्या अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास केला जाईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
■ उपाय नको, पण अभ्यास आवर, असं म्हणायची वेळ आलेली आहे महाराष्ट्रातील जनतेवर.
□ प्रत्येक शेतकर्याला केंद्र सरकार ५० हजार रुपयांचे लाभ देत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी.
■ आधीच खात्यात १५ लाख रुपये, वर दरवर्षी ५० हजार रुपयांचे लाभ (ही काही रेवडी नव्हे) खरोखरच मिळत असतील, तर शेतकरी कष्टाची शेती कशाला करत बसतील आणि गळफास का लावून घेत असतील?