आँखे हा १९५० साली आलेला हिंदी सिनेमा फारसा कोणाच्या लक्षात असण्याचे कारण नाही. नंतरच्या काळात अवीट गोडीची गाणी देऊन अजरामर झालेल्या मदनमोहनचा हा पहिलाच सिनेमा. पण, त्यातली गाणी यथातथाच होती. तरीही त्यातले एक गाणे सध्या देशभरात गाजते आहे. भारत भूषण, शेखर आणि नलिनी जयवंत या प्रमुख कलावंतांऐवजी या सिनेमात सहायक व्यक्तिरेखा साकारणार्या याकूब आणि कुक्कू यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे शमशाद बेगम आणि मुकेश यांनी गायलेले आहे… ते चालीसाठी नाही, तर शब्दांसाठी गाजते आहे. राजा मेहंदी अली खाँ यांनी लिहिलेल्या या गाण्यात एक प्रेयसी प्रियकराला सांगते आहे, ‘हमसे नैन मिलाना बीए पास करके, हमसे प्रीत लगाना बीए पास करके…’ प्रियकर कोणत्या राज्याचा आहे, ते स्पष्ट नाही; पण प्रेयसीचा त्याच्यावर जराही विश्वास नाही, त्यामुळे तो कुठला असावा, याचा काही अंदाज येतो. तो उद्या येऊन सांगेल की मी झालो बीए पास, तर ते ती मानणार नाही… तिला पुरावा पाहिजे. ती म्हणते, ‘बीए पास करके मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ…’ त्यावर हा सहनायक लगेच खिशातून एक कागद काढून डिग्री दाखवून मोकळा होतो. ‘ये है बीए की डिग्री गोरी गुस्से में न आओ’ अशी तिची मनधरणी करतो. या प्रियकराचे आडनाव काय आहे कोण जाणे, पण प्रेयसी त्याला लफंगाच समजते आहे. ती त्याला सरळ सांगते, ‘अपनी ये चार सौ बीसी किसी और पे चलाओ, जाओ ये हे झूठी डिग्री इसे कूडे में फेंक आओ…’ कचर्यात टाक तुझी बनावट डिग्री! प्रेयसीने रूद्रावतार धारण केल्यानंतर प्रियकर सरळ शरणागती पत्करतो आणि आपण बीए पास नाही आहोत, हे सांगतो. पण, मी प्रेमात एमए केलेले आहे, अशी मखलाशीही करतो. त्याला प्रेयसी अर्थातच भीक घालत नाही…
एका विस्मृतीत गेलेल्या सिनेमातल्या विस्मृतीत गेलेल्या गाण्याचे हे एवढे रसग्रहण कशासाठी? या देशाला आणखी ६४ वर्षांनी एक अतीव कर्तबगार पंतप्रधान लाभणार आहेत; मात्र, त्यांच्या कारकीर्दीत एका टप्प्यावर त्यांच्या पदवीवरून देशात वाद होणार आहेत, हे भविष्य स्पष्ट दिसल्याप्रमाणे या गाण्याची रचना झाली आहे, हे मनोरंजक आहे. त्यामुळे हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा जेवढ्या प्रेक्षकांनी तो पाहिला नसेल, त्याहून वैâकपटींनी अधिक लोकांनी हे गाणे पाहिले आहे आणि ते पाहून खो खो हसूनही घेतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेमके शिक्षण किती झाले आहे, हे एक गूढच आहे. ते उकलण्याचा प्रयत्न दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केला. त्यांनी माहितीच्या अधिकारात पंतप्रधानांची पदवी मागितली. त्यावर विद्यापीठाने कोर्टात जाण्याचा मार्ग पत्करला आणि कोर्टही गुजरातचे असल्याने त्यांनी डिग्री दाखवण्याऐवजी केजरीवाल यांनाच दंड ठोठावला. हा सगळा घटनाक्रम विलक्षण हास्यस्फोटक आहे. मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका मुलाखतीत आपले शालेय शिक्षणापलीकडे शिक्षण झालेले नाही, असे सांगितले होते. नंतर कधीतरी इंजीनियर्स डेच्या दिवशी आपण इंजीनियर आहोत, असा दावा केला होता. पंतप्रधानपदावर आल्यावर त्यांनी १९८३ सालातली एमएची डिग्री फडकवली होती. ती देणारे विद्यापीठ गुजरातचेच. ही डिग्री ज्या कोणी बनवली तो साष्टांग दंडवतास पात्र होता. ज्या काळात संगणकाचा तो फाँट तयारच झाला नव्हता, त्या काळात त्याने त्या फाँटमध्ये डिग्री बनवली (त्यावर त्यांच्या आयटी सेलने दिलेली स्पष्टीकरणे वाचली की हसून हसून पोट दुखते), त्यात युनिव्हर्सिटी या शब्दाचे स्पेलिंग चुकवले आहे. पोलिटिकल सायन्स अर्थात राज्यशास्त्र हा विषय असताना चमचेगिरीच्या नादात एन्टायर पॉलिटिकल सायन्स अशा नव्या विषयाला जन्म दिलेला आहे. केजरीवाल यांच्या तोंडावर ही डिग्री फेकणे गुजरात विद्यापीठाला शक्य होते, ते का केले नाही? एखाद्या विद्यापीठाचा विद्यार्थी उच्च पदावर पोहोचतो, तेव्हा ते विद्यापीठ तो आपला विद्यार्थी आहे, हे अभिमानाने सांगते. गुजरात विद्यापीठाला डिग्री लपवावीशी का वाटते?
आपण लोकशाहीतले पंतप्रधान असलो तरी लोकांना उत्तरदायी नाही, पत्रकारांना उत्तरदायी नाही, विरोधकांना उत्तरदायी नाही, असा मोदींचा टेंभा असतो. ते केजरीवालांना उत्तर देणार नाहीत, हे निश्चित. पण, आधी मोदानी (मोदी + अदानी) या विषयावरून कारकीर्दीत प्रथमच संशयाच्या भोवर्यात सापडलेल्या मोदींविषयी त्यांच्या समर्थकांमध्येही चलबिचल व्हावी, असा त्यांच्या पदवीचा विषय पुढे आला आहे. त्यावर भारतीय जनता पक्षाचे नेहमीचे बोलके पोपट मौनात का गेले आहेत?
मोदी अडाणी, अशिक्षित आहेत, असा थेट आरोप केजरीवाल यांनी केला आहे आणि देशाचा पंतप्रधान अशिक्षित असता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मोदी अशिक्षित असले, तरी तो काही गुन्हा नाही. या देशात निवडून येण्यासाठी आणि सुशिक्षितांवर राज्य करण्यासाठी पदवीची अट नाही. िंकबहुना शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रेही सादर करण्याची अट नाही. मोदींचे अनेक समर्थक शिक्षित आहेतच की! तेही (जे एरवी अन्यपक्षीयांना अडाणी म्हणून हिणवत असतात) पदासाठी शिक्षणाची अट नाहीच, याच मुद्द्यावर दाताच्या कण्या करत आहेत. पण, मुळात मोदी पदवीधर आहेत की नाहीत हा विषय नाही, ते या देशातल्या जनतेशी या बाबतीत खरे बोलले आहेत का, असा विषय आहे. तो अधिक गंभीर आहे. जिथे मालगाड्याच थांबत होत्या त्या स्टेशनात ते स्टेशन बनण्याच्या आधी चहा विकला, लहानपणी मगर पकडली, असे काही ते भावनेच्या भरात बोलून जात असतात. असते काहीजणांना मीठमसाला लावून स्वकौतुक सांगण्याची सवय, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येते. पण, शिक्षणाच्या बाबतीत खरे बोलले पाहिजे, हे कोणीही सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणूस मान्य करील, (भले त्यांच्याकडे डिग्री असो नसो) मोदीजीही मान्य करतील… नाही का?