मनीषने आयटीआय केले होते. एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीची संधी असल्याचा मेसेज त्याला मोबाईलवर आला. आपण या नोकरीसाठी इच्छुक असल्याचे सांगत मनीषने त्या मोबाईलवर संपर्क साधला, तेव्हा समोरच्या व्यक्तीने त्याला आपला ई-मेल मागितला आणि त्यावर त्या दोघांचे संभाषण सुरु झाले. सुरुवातीला त्याने मनीषला आपला बायोडेटा पाठवण्यास सांगितले. मनीषने तो पाठवला. काही मिनिटांतच मनीषाला फोन आला, तुझा बायोडेटा बरोबर नाही, यावर तुझे सिलेक्शन होणार नाही, तो चांगला करायला लागेल. मग तुझं सिलेक्शन पक्कं होईल. त्यासाठी तुला पाच हजार रुपये फी म्हणून भरावे लागतील.
बायोडेटा चांगला नाही म्हणजे काय, चांगला करायचा म्हणजे काय, याचा कशाचाही विचार न करता मनीषने त्या माणसावर आंधळा विश्वास ठेवून त्याला पाच हजार रुपये पाठवून दिले. त्यांनी पुढे काय केलं, बायोडेटा दुरुस्त केला म्हणजे काय केलं, हे काही मनीषला कळलं नाही. त्याने ते जाणून घेण्याचा प्रयत्न पण केला नाही. कारण त्याला लगेचच त्या नोकरीचा कॉल आला. आपली त्या कंपनीत निवड झाली, हे कळल्यानंतर तर त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यात हे प्रश्न त्याला कसे पडणार. नीट व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची मुलाखतही झाली. अवघ्या दोनच दिवसात मनीषला सिलेक्शन झाल्याचा मेसेज आला. ही आनंदाची बातमी त्याने बीडला असणार्या आई-वडिलांना कळवली. नोकरी मुंबईमध्ये असल्यामुळे तिथे जाण्यासाठी राहण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे काम मनीषने सुरु केले होते.
आता पुन्हा मनीषला एक मेल आला. त्यामध्ये नियुक्तीपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला साडेचार लाख रुपये भरावे लागतील, असं सांगण्यात आलं होतं. हे त्याने वडिलांच्या कानावर घातलं, तेव्हा त्या शेतकरी बापानेही नोकरीचे नियुक्तीपत्र मिळवण्यासाठी इतके पैसे द्यावे लागतात का, असा प्रश्न केला. मनीषवर मात्र नोकरीचं भूत स्वार झालं होतं. शहरात अशाच प्रकारे पैसे चारून नोकरी मिळवावी लागते, असे उत्तर त्याने दिले. मनीषने लोकांकडून उधार पैसे घेऊन ते साडेचार लाख रुपये भरले. त्यानंतर त्या कंपनीचा लोगो असणार्या लेटरहेडवर मनीषला टीम लीडर पदावर नियुक्ती झाल्याचे पत्र मिळाले. कंपनीच्या नियमाप्रमाणे स्वतंत्र बँक खाते, आयडी कार्ड, पीएफ, आदींची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० लाख रुपये देण्याची मागणी मनीषकडे करण्यात आली. तुम्ही ३० तारखेपर्यंत ही रक्कम बँकेत भरली नाही तर तुमच्यापुढील उमेदवाराला संधी देण्यात येईल, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते. हातात आलेली संधी जायला नको, म्हणून मनीषने चक्क कर्ज काढून १० लाख रुपयांची ती रक्कम उभी केली होती.
अखेर ते तथाकथित नियुक्तीपत्र घेऊन मनीष मुंबईत त्या कंपनीच्या कार्यालयात गेला, तेव्हा त्याच्यावर वीजच कोसळली. अशी कोणतीही भरती झालेली नाही, हे नियुक्तीपत्र खोटे आहे, असं तिथल्या अधिकार्यांनी त्याला सांगितलं. आपली मुलाखत झाली होती, असं सांगून मनीषने त्याचा पुरावा तिथल्या सुरक्षा रक्षकाला दिला. पण त्याने तो मानला नाही. कंपनीच्या व्यवस्थापनाला त्याने आपण वेळोवेळी बँकेत भरलेल्या रकमेच्या पावत्या दाखवल्या. पण त्याचा काहीच फरक पडला नाही. त्या सगळ्या व्यवहारांशी त्या कंपनीचा काहीही संबंध नव्हता.
आपण पुरते फसलो हे समजल्यावर त्याने पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी याचा तपास करण्यास सुरवात केली. बँक अकाऊंटच्या आधारे पोलसांनी शोध घेतला, तेव्हा हा सगळा कारभार करणारी एक टोळी कार्यरत असल्याचे समोर आले. आरोपीने एका बंद दुकानाचा पत्ता ऑफिसचा म्हणून दिला होता. नोकरीच्या शोधात असणार्या मंडळींचे ई-मेल मिळवून ही टोळी त्यांना फसवत होती. भारतीय दंड कायद्यानुसार पोलिसांनी या टोळीवर कारवाई केली. या सगळ्या प्रकारामुळे मनीषला मोठ्या निराशेचा सामना करावा लागला. गावी गेल्यावर मित्रांनी त्याला धीर दिला. डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी त्याला शेती करावी लागली. शहरातील नोकरी मिळवताना कोणतीही शहानिशा न केल्यामुळे त्याला लाखांचा फटका बसला होता.
हे लक्षात ठेवा…
या प्रकाराला ‘फेक जॉयनिंग लेटर फ्रॉड’ या नावाने ओळखले जाते. नोकरी लागण्याच्या आधी कोणीही, कोणत्याही कारणाने पैशाची मागणी करत असेल, तर हा प्रकार संशयास्पद आहे म्हणून समजावे आणि तात्काळ त्या व्यवहारातून बाहेर पडावे. समोरच्यांचे सगळे नंबर, ईमेल वगैरे ब्लॉक करून टाकावेत. या प्रकारात सतत पैशाची मागणी करत राहणे ही गुन्हेगारीची पद्धत आहे. असे व्यवहार घाईघाईत केले जातात, त्यामुळे इथे फसवणुकीची शक्यता असते. आपल्याला एसएमएस, ईमेल या माध्यमातून अचानकपणे नोकरीची ऑफर आली असेल तर ती फसवी आहे, असे समजावे. हा कॉमन सेन्स आहे. नोकर्या काही झाडाला लागत नाहीत. इतक्या नोकर्या असत्या तर देशात इतकी बेरोजगारी असली असती का? नोकरीत जॉईन होण्याची प्रक्रिया काय असते, हे मित्र, नातेवाईक, शिक्षक यांच्याकडून समजून घ्यावे. नोकरीसाठी कुणी पैशाची मागणी करत असेल तर आपण खरोखरच कंपनीला पैसे भरायचे आहे का, याची शहानिशा कंपनीशी थेट संपर्क साधून करून घ्यावी. त्यामुळे आपल्याशी जर आर्थिक धोका होणार असेल तर तो निश्चितपणे टळू शकतो.