दोस्तांनो, परीक्षा संपल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचे याचा विचार तुम्ही करत असाल… कारण, सुट्टी मोठ्या माणसांनी खूप ग्लॅमरस करून ठेवली असली तरी शाळेतल्या मुलांना सुट्टीचा कंटाळाच येतो. शाळेत अभ्यास करायला लागतो, पण टाइमपासही होतो. सुट्टीत आधी वाटतं, ही कार्टून्स पाहू, हे अॅनिमे पाहू, हे सिनेमे पाहू, इकडे फिरायला जाऊ, तिकडे जाऊ… पण, शेवटी सगळं बोअर होतं… बरोबर ना! सुट्टीत काहीतर धमाल करता आलं पाहिजे… मी देऊ का काही आयडिया?
कबूल कबूल, मी काही शाळेत नाही, तुमच्या वयाचा नाही. पण, कधीतरी शाळेत जात होतोच ना यार! तुमच्या वयाचा होतोच ना ब्रो! तेव्हा मी काय मजा केली ते आठवतं… तेच तुमच्याशी शेअर करतो आणि आपण मिळून धमाल करू पुढे…
लाँग स्टोरी शॉर्ट करू या. लहानपणीच्या माझ्या मस्त मस्त आठवणींपैकी एक म्हणजे बर्फाचा गोळा किंवा आईसफ्रूटचा गोळा. सुट्टीत मी माझ्या आजोबांच्या घरी जायचो. मी तिथे माझी चुलत बहीण आणि तिच्या मैत्रिणींसोबत खेळायचो. त्यासाठी आजोबांकडून प्रत्येकी पाच रुपये घ्यायचो आणि खिशात ठेवायचो. संध्याकाळी ३-४च्या सुमारास एक काका वेगवेगळ्या चवीच्या सरबतांनी भरलेल्या वेगवेगळ्या रंगीत काचेच्या बाटल्या आणि वरती निळ्या रंगाच्या मशीनची गाडी ढकलत यायचे. त्यावर एक मोठी बर्फाची लादी असायची. ते त्या यंत्राचा वापर करून बर्फाचा कीस करायचे आणि तो किसलेला बर्फ एका काचेच्या ग्लासमध्ये ते घ्यायचे. तो कापसासारखा दिसणारा शुभ्र बर्फाचा कीस दाबून त्याचा बांबूच्या काडीवर गोळा बनवायचे. मस्त गोळा तयार झाल्यावर आता आपल्या चॉईसने त्यावर ते सिरप टाकायचे. आंबा, संत्रा, स्ट्रॉबेरी, रूफझा, द्राक्ष, अननस, व्हॅनिला असा ज्याच्या त्याच्या आवडत्या सिरपने सजलेला रसाळ गोळा हाती मिळायचा… गोळा फ्लेवर्सचा माझा आवडता राजा ‘काला खट्टा’ मला खूप आवडायचा.
काहीजण गोळ्यावरचे फ्लेवर्स मिसळत असत, मला समजत नाही की त्यांच्या जिभेला एकाच वेळी हे अनेक स्वाद कसे जाणवतात. त्यांच्याकडे काही तरी सुपर पॉवर असावी. माझा आवडता काला खट्टा होता. खाल्ल्यानंतर माझी जीभ जांभळी व्हायची आणि इतरांच्या गुलाबी, पिवळी आणि इतर रंगाने आमच्या तोंडात कोणीतरी होळी खेळत आहे असे दिसायचे. आम्ही मित्र उत्साहाने एकमेकांच्या जिभेकडे बघायचो, जणू काही नवीन रंग सापडला आहे. कधी-कधी काडीचा गोळा पडायचा आणि मला त्यावेळी वाईट वाटायचं. तेव्हा आजोबांनी आयडिया शिकवली. गोळा घ्यायला जाताना वाटी घे असं सांगितलं. बर्फ पडला तर तो वाटीत पडेल आणि मी कसाही खाऊ शकतो आणि वाया जाणार नाही. हे कळल्यावर मी गोळ्याची वाटी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायला सुरुवात केली आणि रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून खायला सुरुवात केली.
सगळ्यात बेस्ट गोष्ट सांगू का?
मी स्वत: घरी गोळा बनवू शकतो हे देखील शोधले!
टेप नाही लावत, खरं सांगतोय.
तुम्हाला बनवायचा का? सांगतो आयडिया.
फक्त रसनाचे एक पॅकेट घ्या ते १ लिटर पाण्यात मिसळा आणि एका ग्लासमध्ये ओता आणि ३-४ तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि तुमचा गोळा तयार आहे. आता रस्त्यावरचे काका बर्फ किसून बनवतात, त्या गोळ्याची चव ओरिजिनल असते.. ती काही मिळणार नाही… पण, तुमचा तुम्ही बनवलात याचा कॉलर टाइट आनंद आहे की नाही काही?