जसे जसे वय वाढत जाते तसे शरीररूपी इंजिन जुने होत जाते. भोवतालची परिस्थिती आधुनिक तंत्रज्ञाने वेगात बदलत असते आणि जुन्या संकल्पना, विचार मोडत राहते. काही जण कुढत राहतात, परिस्थितीला दोष देत राहतात आणि आलेला दिवस पुढे ढकलत राहतात. पण काही जण बदल स्वीकारतात, आधुनिक तंत्रज्ञानाला आपलेसे करतात आणि वेगावर स्वार होतात.
अशाच स्वभावाची आयरीन, सिंगापूरला राहणारी, चिनी वंशाची… आम्हाला दिवाळीच्या सुट्टीत, ट्रॉम्सोला म्हणजे नॉर्वेमध्ये भेटली, म्हणून तिचा नॉर्वेच्या नवलाईत समावेश. वय हा फक्त एक आकडा आहे, याची पुरेपूर खात्री तिच्या स्वभावावरून आणि अथक बडबडण्यावरून पटते. एक वेळ पुजारा ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात ५० बॉलमध्ये शतक मारू शकतो यावर विश्वास बसेल, पण अशी ही पन्नाशी पार, पेन्शनर, सर्वात महागड्या देशात, एकटी बुजुर्ग महिला अशा ठिकाणी येते यावर विश्वास बसायचा नाही.
दिवाळीच्या आदल्या दिवशी आमची आणि तिची जुजबी ओळख एअरबीएनबी घरात झाली. दुसर्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी आम्ही बर्फात भारतीय पारंपरिक कपडे घालून फोटोशूट करत होतो. आयरीनने हे फोटो सेशन तिच्या रूममधून बघितले आणि आम्हाला तिघांचे एकत्र फोटो काढायला ती बाहेर पण आली. आम्ही एयरपोर्टवरून भाड्याची कार घेतली होती. तिने सिटी सेंटर/ टाऊनपर्यंत सोडण्याची विनंती केली. तिथपासून ज्या गप्पा रंगल्या (जसे जुनी ओळख किंवा खूप दिवसांनी मित्र/मैत्रीण भेटल्यासारख्या) त्या टाऊनच्या भुयारी पार्किंग स्लॉटपर्यंत. त्या दिवशी घरी परत जाताना आमच्यासाठी तिने काही फळे आणली.
साठीच्या आसपास असणारी, स्पष्ट उच्चाराचे इंग्रजी बोलणारी, लग्नाच्या बंधनातून लवकर विभक्त झालेली, पण मुलीचा लंडनमधील शिक्षणाचा खर्च नवरा आणि आपण वाटून घेतला हे सांगताना न संकोचणारी अशी ती. आता कमावत्या अविवाहित मुलीकडे लंडनला न राहता, मध्य लंडनला एअरबीएनबीमध्ये थोडे दिवस आणि मग काही दिवस युरोपमधल्या ठराविक ठिकाणी एकटीच फिरण्याची हौस भागविणे हा तिचा गेल्या काही वर्षाचा क्रम. एक एक बकेट लिस्ट पूर्ण करायचा तिला ध्यास. म्हणून लवकर स्वेच्छानिवृत्ती घेऊन, आयुष्यभर गुंतवणूक केलेले पैसे ट्रिपसाठी टप्प्याटप्प्याने कसे वापरावे याचेही मार्गदर्शन केले.
आताचे ठिकाण तिने चक्क चॅट जीपीटीमधून शोधले. तर कसे, प्रश्न विचारून. एआयला विचारलं, नॉर्दर्न लाइट्ससाठीचे सर्वोत्तम ठिकाण कुठले? मग एअरबीएनबीच्या साइटवरून ट्रॉम्सोमधील लाइट्ससाठी चांगली राहण्याची जागा सुद्धा शोधून काढली आणि नऊ दिवसांसाठी बुक पण करून टाकली. मौसमाच्या पहिल्याच धुवांधार बर्फात एयरपोर्टवरून लोकल बस पकडली. मग बॅग घेऊन अंधारात बस स्टॉपपासून एक किलोमीटर लांब असलेल्या एअरबीएनबीच्या घरापर्यंत पायी बर्फ तुडवत पोहचली. साधे स्पोर्टशूज बर्फात घातल्यामुळे घराजवळ घसरून पडली, पण सुदैवाने काही लागले नाही. एवढा प्रवास आणि त्रास सहन करूनसुद्धा रात्री घराबाहेर पडली, नॉर्दर्न लाइट्ससाठी.
तिने सकाळी आम्ही साडी आणि पारंपरिक कपडे का घातले हे विचारले. मी अनोळखी लोकांसोबत जास्त ओपनअप होत नाही आणि त्रोटकच माहिती देतो. म्हणून तिला सहज म्हटले की आमचा आज सण आहे. ताबडतोब हिंदी चित्रपटांचा परिणाम समोर आला! ‘आज ‘दीपावली’ आहे ना? ऑक्टोबरमध्ये असतो ना हा भारतीय सण?’ असे बोलून तिने माझी आणि बायकोची विकेट काढली. तिने ‘दीपावली’ असा स्पष्ट उच्चार करून हे एक वेगळेच रसायन आहे हे दाखवून दिले.
दिवाळीच्या दुसर्या दिवशी पहाटे आम्ही एयरपोर्टसाठी निघताना ती दुरून कुठून तरी फिरून आली आणि घराजवळ दोन रेनडियर दिसल्यामुळे जबरदस्त आनंदात होती. ती नऊ दिवसानंतर लंडनला परतणार होती, आपण परत भेटू लंडनमध्ये असं सांगून ग्रीट करून रूममध्ये गेली. आता हिची आणि आपली कुठे भेट होणार असे वाटून गेले. ऑस्लोला जाणारी फ्लाइट सकाळी असल्यामुळे चेकआउटच्या घाईमुळे आम्ही मुलीची सॅक तिकडेच विसरलो. त्यामध्ये तिची पुस्तके आणि ड्रॉइंगचे पुस्तक होते (जे आम्ही विमानप्रवासात वापरतो, जेणेकरून मोबाईल किंवा टीव्हीपासून मुलीला दूर ठेवता यावे). एयरपोर्टवर आम्हाला सॅकची आठवण आली आणि आम्ही कपाळावर हात मारला. सॅकमधले सामान जास्त किमतीचे नव्हते, परंतु ती सॅक मुलीला गिफ्ट म्हणून मिळाली होती. सॅक आणि सामानावर पाणी सोडावे का या विचारात असताना मात्र आयरीनची आठवण आली. तिला फोन करून विनंती केली की घरी राहिली असेल तर ती सॅक आम्हाला लंडनमध्ये आणून द्यायला जमेल का? तसे बघायला गेले तर इंग्लंडच्या आमच्या घरापासून लंडनच्या ट्रेनप्रवासाच्या खर्चात अशा ४/५ बॅग्ज सहज येतील. पण मुलीच्या हट्टापुढे कोणाचे काही चालले आहे का? आयरीनही पटकन तयार झाली.
परत तिला भेटायला आणि बॅग परत घ्यायला मी लंडन गाठले. तिला विचारले, मुलीला भेटलीस का? पण मुलगी बॉयफ्रेंडबरोबर यूएसला गेली असल्यामुळे ती आता भेटणार नाही, आता परत कधी भेटेल याची गॅरंटी नाही, असे ती हसून बोलली. मी आता हिवाळ्यात युरोपला नाही येणार, पण उन्हाळ्यात मात्र येईन, पण दोन वर्षांनी, तोपर्यंत पैसे साठवेन पुढच्या ट्रिपसाठी, असंही तिने सांगितलं.
‘पण तुझी मुलगी सिंगापूरला येईल ना पुढच्या महिन्यात ख्रिसमसमध्ये?’ मी न राहवून विचारलं.
‘नाही, ती स्वीसला (स्वित्झर्लंड) बॉयफ्रेंडच्या मूळ घरी जाईल ख्रिसमस साजरा करायला,’ असे म्हणताना चेहरा कितीही हसरा ठेवण्याचा प्रयत्न करत असली, तरी तिचं दु:ख ती लपवू शकत नव्हती. ती पुढे बोलत राहिली, मी काही टिपिकल मम्मी नाही. सिंगापूर खूपच छोटा देश आहे. इकडे युरोप किंवा लंडनला जॉबच्या संधी जास्त आहेत. जिकडे तिला राहावसे वाटते तिकडे तिने राहावे, मी काही अडवत नाही की विचारत नाही. तिला माझ्याबरोबर फिरायला आवडत नाही. मग मी एकटीच फिरते. मला ही कधी कधी वाटते कुणीतरी सोबत असले, तर ती व्यक्ती कार चालवेल, मग भरपूर ठिकाणे बघता येतील. कुणीच बरोबर नसल्यामुळे मी एकाच ठिकाणी जास्त मुक्काम करते आणि एअरबीएनबी शोधते, जेणेकरून मला सवडीने, हळुहळू स्थळे पाहता येतील आणि आपले आपण जेवण बनवून खाता येईल, बाहेरच्या जेवणाचे पैसे वाचावता येतील. मला साधी कॉफी साध्या रेस्टॉरंट्समधली पण चालते, पण यांना कोस्टा किंवा स्टारबक्सचीच हवी. आता तिला सांगेन चिनी नवीन वर्षाला तरी ये, नातेवाईकांना एकदा तरी भेट. बघू कसे जमते ते. पण तुम्ही दोघांनी दुसर्या बाळाचा पण विचार करा, मुलांना भावंडे हवी, हे माझ्या अनुभवावरून सांगते.
या साठीच्या पुढच्या पिढीला मी सँडविच पिढी म्हणतो. यांचे सुरुवातीचे, बालपणीचे आयुष्य शिक्षण मिळवण्यासाठी झगडण्यात गेले, नंतर दुसर्यांच्या घरी राहून नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष, मग लग्नानंतर सासू-सासरे आणि नातेवाईक काय म्हणतील याचे दडपण, मग रिटायर लाइफमध्ये कुणीतरी सोबतीसाठी पाठशिवणीचा खेळ. आयरीनसारखी माणसे भेटायला हवीत वारंवार. जगण्याचा अर्थ शोधणारी, विपरीत परिस्थितीत ध्रुवतारा बनून दुसर्यांना मार्गदर्शन करणारी. अशी माणसे नॉर्दर्न लाइट्ससारखी असतात. आपल्याला शिकवतात की आयुष्यातील अनिश्चिततेला स्वीकारावे आणि केवळ गंतव्यस्थानाचा आनंद न घेता प्रवासाचा आनंदही लुटावा.
मला आशा आहे ती आणि तिची मुलगी चिनी नवीन वर्षाचे स्वागत करायला एकत्र असतील, आमेन.
(समाप्त)