शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात नुकतीच २३ जानेवारीला झाली. बरोबर तेव्हाच प्रबोधनकारांच्या चरित्राचा मागोवा घेणारं हे सदरही त्यांच्या जन्मवर्षापर्यंत येऊन ठेपलं आहे. या काळात प्रबोधनकार नेमकं काय करत होते, हे जाणून घेतल्याखेरीज शिवसेनाप्रमुखांची जडणघडण समजून घेताच येणार नाही.
– – –
`मी पुस्तकाच्या कपाटातला माणूस नाही, मी मैदानातला माणूस आहे, असं सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आत्मचरित्र लिहिलं नाही. मात्र प्रबोधनकारांनी ते लिहिलं. माझी जीवनगाथा हे प्रबोधनकारांचं रूढ अर्थाने आत्मचरित्र असलं, तरी त्या खरं तर आठवणी आहेत. त्याही वैयक्तिक नाहीत. प्रामुख्याने सामाजिकच आहेत. त्यामुळे या वडिलांच्या आत्मचरित्रात त्यांच्या कर्तृत्ववान मुलाचं चरित्र सापडत नाही. त्यामुळे २३ जानेवारी १९२६ या दिवशी झालेला बाळ केशव ठाकरे यांचा झालेला जन्म ही प्रबोधनकारांच्या चरित्रातली लक्षणीय घटना आपल्याला इतर साधनांच्या आधारे शोधावी लागते.
आपण या सदरात पाहतोच आहोत, त्यानुसार जानेवारी १९२६ला प्रबोधनकार पुण्यातच होते. सातार्याहून पुण्याला जाणं, पण आजारपणामुळे चार महिने मुंबईत अडकणं आणि त्यानंतर प्रबोधनसाठी प्रबोधनकारांचं पुण्यात स्थिरावणं, याला जानेवारी १९२६ला बरोबर एक वर्ष झालं होतं. मोडकं छपाईचं यंत्र पुन्हा उभं करून प्रबोधन प्रिटिंग प्रेस उभी राहिली होती. आधी पाक्षिक असणारं प्रबोधन आता दर महिन्याला प्रकाशित होणारं मासिक बनून नियमित येऊ लागलं होतं. प्रबोधनकारांची नवी जुनी पुस्तकं सातत्याने प्रकाशित होत होती. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता. त्यातून दोन वेळ पोटापुरतं मिळत होतं.
प्रबोधनकारांनी या परिस्थितीचं फर्मास वर्णन केलं आहे, ते असं, लव्हाळ्या युवतीप्रमाणे लक्ष्मी जरी माझ्या गळ्यात चतुर्भुज धावत येऊन पडली नाही, तरी रोजच्या मीठ भाकरीची ददात तिने ठेविली नाही. मी. श्रीयुत कै. चित्रे आणि माझे विश्वासू चार कामदार देव बुद्धी देईल तसे, एका जीवाभावाने प्रबोधन कार्याचे गाडे रेटीत होतो. अल्पसंतोष हाच आमच्या जीवनाचा वाटाड्या असल्यामुळे सुक्या ओल्या भाकरीचे अमृत करून व्यवहार चालवीत होतो. हातात पैसा नव्हताच. याच दरम्यान द बॉम्बे क्रॉनिकलने प्रबोधनकारांविरोधात बदनामीचा खटला भरला. त्यात वकिलांना फी देण्यासाठीही प्रबोधनकारांकडे पैसे नव्हते. पतसंस्थांची कर्जं भागवण्यात कमाई संपत होती. अशा अडचणीच्या तरीही समाधानी परिस्थितीत ठाकरेंच्या घरात बाळच्या जन्माने आनंदाला पारावार उरला नाही.
पुण्याच्या सदाशिव पेठेतील बॅ. गाडगीळ स्ट्रीटवरून ज्ञानप्रबोधिनीकडे जाताना सार्थक नावाची एक बिल्डिंग दिसते. तिच्या समोरच एक छोटा चौथरा बांधण्यात आलाय. त्यावर हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब केशव ठाकरे जन्मस्थळ असं लिहिलं आहे. त्यावर शिवसेनाप्रमुखांची जन्मतारीख आणि जन्मतिथी कोरलेली आहे. शिवसेनेच्या स्थानिक शाखेने हे स्मारक उभारलेलं आहे. त्यावर झेंड्यासाठी जागा आहे, पण तिथे आता झेंडा मात्र दिसत नाही.
प्रबोधनकार १९२४ साली पुण्यात आले ते इथेच राहिले. सदाशिव पेठ हा तेव्हा ब्राह्मणी कंपूचा सगळ्यात मोठा गड होता. त्यामुळे ब्राह्मणेतर विचारवंत म्हणून प्रसिद्ध असणार्या प्रबोधनकारांना इथे जागा मिळणं कठीण होतं. प्रचंड विरोध असूनही प्रबोधनकारांचे पनवेलमधले बालमित्र वासू नातू यांनी त्यांना इथे राहायला जागा दिली. तेव्हा हा नातू वाडा होता. पुढे त्याची ओळख दातार वाडा अशी झाली. नव्वदच्या दशकात हा वाडा तोडून सार्थक नावाची इमारत बांधण्यात आली. तिथे काही राहती घरं आणि ऑफिस आहेत. प्रबोधनच्या जानेवारी १९२६च्या अंकावर प्रबोधन प्रेस, ८४५ सदाशिव पेठ, पुणे शहर असा पत्ता आहे. ते हेच ठिकाण आहे. पण आता शहरीकरणाच्या धबडग्यातत्याचा पत्ता बदलला आहे, ८९६, सदाशिव पेठ, गाडगीळ स्ट्रीट, पुणे.
प्रबोधनकार पुण्यात आले तेव्हापासून त्यांचं घर इथेच होतं, मात्र प्रबोधनची कचेरी बुधवार पेठेत दगडूशेठ हलवाई गणपती देवळाजवळ शाळूकरांच्या बोळात होती. पण हा छापखाना बंद झाल्यामुळे प्रबोधनकारांनी राहण्याच्या ठिकाणी म्हणजे नातूंच्या वाड्यातच प्रबोधन छापखाना हलवला असावा, असे तुटक संदर्भ सापडतात. या वाड्याच्या जवळच डॉ. इंदिराबाई खाड्ये यांचं मॅटर्निटी होम होतं. तिथे शिवसेनाप्रमुखांचा जन्म झाला. आता हे मॅटर्निटी होम नेमकं कुठे होतं, याचा माग काढणं कठीणच आहे.
ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांच्या देवाधर्माच्या नावानं या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शिवसेनाप्रमुखांनी प्रबोधनकारांच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यात त्यांच्या लहानपणीच्या आठवणी बुधवार पेठेतल्या घराच्या आहेत. प्रबोधनकारांचं बिर्हाड बुधवार पेठेत असल्याचे संदर्भ मात्र सापडत नाहीत. तरीही विचारांचं सोनं या पुस्तकातला शिवसेनाप्रमुखांच्या भाषणातला हा तुकडा मात्र महत्त्वाचा आहे, दादांना (प्रबोधनकारांना) घडवलं ते पुण्याने घडवलं. त्या वेळेला आमची एक गल्ली होती, बुधवार पेठेत. तिथे पेठाच जास्त. दादांची ती डेक्कन स्पार्क नाटक कंपनी होती. त्यांनी ‘खरा ब्राह्मण’ नाटक काढलं आणि कोणते दिवस काय माहीत, होळी कुठची आणि काय कुठचं; आम्ही नेहमीच बोंबा मारणारे. आम्हाला वâाही बोंबा मारायला शिमगा आणि होळीची गरज नव्हती. आजही नाही. आणि शेण मारा काय चाललंय. दगडफेक चाललीय काय आणि काय काय विचारू नका. नंतर मेलेली गाढवं आणून टाकायची. प्रेतयात्रा काढायची. हे सगळं आम्ही बघत होतो. मला काही कळायचं नाही काय चाललंय ते; पण हे संस्कार होत होते बालवयापासून. आम्ही पण का असे घडलो; कारण आम्ही पुण्याचे आणि माझा जन्मही पुण्याचा. माझी सगळी भावंडं मुंबईला जन्मली; पण मी एकटा पुण्याला. वडिलांनी इकडे आणलं म्हणून वाचलो.
शिवसेनाप्रमुखांनी गमतीत असं म्हटलं असलं तरी त्यांना त्यांच्या जन्मगावाविषयी विशेष जिव्हाळा होता. त्यांना मुंबईतल्या धावपळीच्या तुलनेत पुण्याचा निवांतपणा आवडत असे. अनेक भाषणांमध्ये त्यांचं पुण्याविषयीचं प्रेम व्यक्त झालं आहे.
प्रबोधनकारांनी शिवसेनाप्रमुखांचं नाव बाळ असं का ठेवलं, याविषयी इतिहासाचे अभ्यासक डॉ. य. दि. फडके यांनी ‘व्यक्तिरेखा’ या पुस्तकात एक आठवण सांगितली आहे, ब्राह्मणेतर चळवळीचे नेमके लक्ष्य महाराष्ट्रात तरी कोणते होते असा प्रश्न मी दादांना (प्रबोधनकारांना) एकदा विचारला होता. तेव्हा ते हसून म्हणाले, `ब्राह्मणेतर पक्षाचा खरा हल्ला चित्पावन ब्राह्मणांच्या मक्तेदारीवर होता. संख्येने नेहमीच टीचभर असलेली ही पोटजात. पण छत्रपतींना नामधारी बनवून भटपेशव्यांनी सत्ता बळकावली. पेशवाईनं महाराष्ट्राला लावलेली कीड नाहीशी होताच इंग्रजांच्या नोकर्या करून भाग्योदय करून घेण्यात चित्पावनच आघाडीला होते. तुम्ही चित्पावन मांजरासारखे आहात. मांजराला कुठंही, कसंही फेका ते लगेच चार पायांवर उभं राहून पळायला तयार. पण आमचा राग तेव्हाही सर्व चित्पावनांवर नव्हता. गोपाळांवर आमचा राग कधीच नव्हता (म्हणजे गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी, गोपाळ गणेश आगरकर आणि गोपाळ कृष्ण गोखले या गोपाळांवर) आमचा राग होता बाळांवर! दादांच्या बोलण्याचा रोख होता लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांवर. त्यांच्या या अभिप्रायात मिस्किलपणाही होता. मला घरी ‘बाळ’ म्हणून हाक मारतात हे कधीतरी मी त्यांना सांगितले होते, तेही त्यांच्या लक्षात असावे. त्यांचा मिस्किलपणा लक्षात घेऊन मीही गमतीने त्यांना म्हटले, दादा, तुमचा बाळांवर खराच राग असता ना तर लोकमान्यांच्या निधनानंतर जन्मलेल्या तुमच्या चिरंजीवांचे तुम्ही ‘बाळ’ असे नामकरण केले नसते.’ त्यावर त्यांनी दाद दिली आणि ‘वत्तृâत्वशास्त्र’ या आपल्या पहिल्याच पुस्तकाची प्रशंसा लोकमान्य टिळकांनी कशी केली त्याची आठवणही त्यांनी सांगितली. ‘माझी जीवनगाथा’ या त्यांच्या अखेरच्या पुस्तकात त्यांनी हीच आठवण तपशीलवार सांगितलेली आहे.
प्रबोधनकारांनी वापरलेल्या बाळगोपाळ या जोडशब्दामुळेच य. दि. फडकेंनी त्यांच्या एका पुस्तकाचं नाव ‘शोध बाळगोपाळांचा’ असं ठेवलं आहे. एकूणच विसाव्या शतकातल्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या फडकेंनी केलेल्या अभ्यासावर आणि त्याच्या मांडणीवर प्रबोधनकारांचा किती प्रभाव होता, हे या लेखातून स्पष्टपणे जाणवतं. प्रबोधनकार महाराष्ट्राच्या विसाव्या शतकाच्या पूर्वाधातील इतिहासाचा चालताबोलता एनसायक्लोपीडिया होते. त्यांच्याशी संपर्क नसता तर फडके इतकं मोठं काम करू शकले असते का, असा प्रश्न पडण्याइतपत हा प्रभाव दिसतो.
पण या आठवणीतल्या गमतीजमतीच्या संवादाच्या जिवावर, बाळासाहेबांचं नाव लोकमान्य टिळकांच्या नावावरून ठेवलं असा सुतावरून स्वर्ग गाठणंही योग्य नाही. कारण प्रबोधनकार याच काळात लोकमान्यांवर आणि त्यांच्या अनुयायांवर किती जहरी टीका करत होते, हे प्रबोधनची पानं चाळली तर सहज लक्षात येतं. त्या तुलनेत विसाव्या शतकातल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणखी एक महत्त्वाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितलेला तर्क अधिक सुसंगत वाटतो. `प्रबोधनकार डॉट कॉम`साठी प्रबोधनकारांवर दिलेल्या एका व्याख्यानात डॉ. मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आद्य चिटणीस बाळाजी आवजी यांच्यावरून बाळ हे नाव ठेवलं असण्याची शक्यता सांगितली होती. बाळाजी आवजी यांनी स्वराज्याच्या कारभाराची घडी लावण्याचं काम केलंच, पण शिवरायांच्या राज्याभिषेकाला असणारा विरोध मोडून काढत स्वराज्याला छत्रपती देण्यात मोठं योगदान दिलं. बाळाजी आवजी हे आदर्श म्हणून प्रबोधनकारांच्या लेखनात नेहमीत येतात.
विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुखांचा जन्म ज्या महिन्यात झाला, त्या जानेवारी १९२६च्या प्रबोधनच्या अंकात करवीर संस्थानचे दिवाण सर रघुनाथराव सबनीस यांच्या निवृत्तीनिमित्त हंटर`कार खंडेराव बागल यांनी लिहिलेला `शाहू छत्रपतींचे बाळाजी आवजी’ हा लेख पुनर्मुद्रित केला आहे. हे विचार प्रबोधनकारांनी मांडलेल्या विचारांशी सुसंगत असल्यानेच त्यांना प्रबोधनमध्ये स्थान मिळालं आहे. या लेखात बाळाजी आवजींचा संदर्भ येतो तो असा, क्षत्रिय मराठे व कायस्थ प्रभू ज्ञातींचा अत्यंत नाजूक व अत्यंत बळकट प्रेमसंबंध जोडण्याचा धागा असेल तर तो इतिहास प्रसिद्ध दोन व्यक्तींत आढळतो. समशेरबहाद्दर बाजीप्रभू (देशपांडे), कलमबहाद्दूर बाळाजी आवजी. शिवछत्रपतींना या दोन्ही इमानी सेवकांनी देहबलाची व बुद्धीबलाची मदत सारखी केली. मोगलाई धुळीत मिळवण्याचे कामी बाजींनी देह ठेवला व आपली कामगिरी उत्तम बजावली. ब्राम्हणी कारवाईस शेरास सव्वाशेर बाळाजी आवजी भेटले व त्यांनी ब्राम्हणांचा नक्शा जिरवला. हा उल्लेख शिवसेनाप्रमुखांचा जन्म झाला त्याच महिन्यातला असला तरी याला बाळासाहेबांचं नाव बाळाजी आवजींवरून ठेवल्याचा पुरावा मानता येणार नाही.
त्यामुळे बाळासाहेबांच्या नावासाठी इतिहासकारांपेक्षाही ठाकरे कुटुंबाचा भाग असणार्या श्रीकांतजी ठाकरेंनी लिहिलेलं जास्त महत्त्वाचं आहे. प्रबोधनकारांचे प्रतिभावान चिरंजीव श्रीकांतजींनी जसं घडलं तसं या आत्मचरित्रवजा पुस्तकात आपल्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यात ते लिहितात, प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांनी आपली धर्मपत्नी रमाबाईंना चार मुली झाल्यानंतर विचारलं, काय हो, आपल्या शेतात ज्वारी-बाजरीच पिकते काय? गहू पिकतच नाही!’ आणि २३ जानेवारी रोजी रमाबाईंनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर केशवराव नि रमाबाई या दोघांनीही ते बाळ जगदंबेच्या ओटीत ठेवले नि म्हणाले, ‘हे बाळ तुझे, तुझ्या स्वाधीन केलेय!’ म्हणून त्या बाळाचं नाव बाळ असे ठेवलं. पण ज्योतिष्यांनीही सांगितलं नाही की हेच बाळ पुढे जगविख्यात व्यंगचित्रकार बाळ ठाकरे बनेल नि त्याचा पुढे मराठी मनाचा मानबिंदू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बनेल!