मित्रवर्य प्रकाश सावंत यांनी संध्याकाळी फोन केला आणि एकदम धक्काच बसला… ‘अरे योगेश, टेणी साहेब गेले…’ क्षणभर काही सुचेना. आणि मग जुने दिवस आठवले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधन प्रकाशनतर्फे एक दैनिक सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. १९८८ साल होते. लोकसत्तामध्ये जाहिरात आली होती. मी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात बसलो असताना माझ्या वडिलांचे आणि नंतर माझेही सहकारी झालेले ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी मला सांगितले की अरे योगेश, आज ‘लोकसत्ता’मध्ये जाहिरात आली आहे तू अर्ज करुन टाक. मी सुद्धा अजिबात वेळ न दवडता अर्ज केला.
काही दिवसांनी मला लेखी परीक्षेसाठी बोलावणे आले. मी परीक्षा दिली. मग ‘सामना’ दैनिकासाठी आपली निवड करण्यात आली आहे, शिवसेना भवन येथे बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखतीसाठी बोलावले आहे, असे मुद्रक प्रकाशक सुभाष देसाई यांचे पत्र मिळाले. १५ डिसेंबर १९८८ रोजी शिवसेना भवनात आम्ही पोहोचलो. तिथे निरोप मिळाला की मातोश्रीवर बोलावले आहे. आम्ही सर्वजण टॅक्सीने मातोश्रीवर पोहोचलो. दस्तुरखुद्द बाळासाहेबांनी आमच्या मुलाखती घेतल्या आणि ‘भगवा’ कंदील मिळाला. सुमारे १५-२० जण होतो. मातोश्रीहून प्रभादेवी येथील सद्गुरु दर्शनच्या पायर्या चढलो.
‘सामना’चे मुख्य संपादक बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारी संपादक होते अशोक पडबिद्री. अशोक पडबिद्री हे औरंगाबाद लोकमतमधून मुंबईत रमेश राऊत, नंदकुमार टेणी आणि अनिल फळे यांना घेऊन आले होते, तर किरण हेगडे आणि संजय डहाळे यांना मुंबई तरुण भारतमधून आणले होते. रत्नागिरीहून नंदकुमार सामंत आले होते. सामना खर्या अर्थाने २३ जानेवारी १९८९ रोजी बाळासाहेबांच्या वाढदिवशी सुरु झाला. पण आम्ही आधीपासूनच कार्यरत होतो. स्वतः बाळासाहेबांनी निवडलेल्या आमच्या पहिल्या फळीला विविध प्रकारची वृत्त/बातम्या आणण्यासाठी विधिमंडळ, मंत्रालय, महापालिका, क्रीडा, पोलीस, न्यायालय, सांस्कृतिक आदि क्षेत्रात पत्रकार नियुक्त करण्याची जबाबदारी उपवृत्तसंपादक या नात्याने नंदकुमार टेणी यांच्यावर होती. पुरवण्यांची जबाबदारी आधी रमेश राऊत यांच्याकडे होती. मला नंदकुमार टेणी यांनी विचारले की तुम्ही कोणते क्षेत्र निवडणार? मी क्षणार्धात राजकीय क्षेत्र निवडले. प्रकाश सावंत आणि सुचिता मराठे यांच्याकडे क्रीडा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली. किरण हेगडे हे मुख्य वार्ताहर (चीफ रिपोर्टर), मंत्रालय आणि विधिमंडळ संजय डहाळे यांच्याकडे तर मुंबई महापालिका वार्तांकनाची जबाबदारी माझ्याकडे. रवींद्र राऊळ क्राइम बीट कव्हर करायचे. पण आम्ही सारेजण एकमेकांच्या सहकार्याने कामे करीत असू. १९९०च्या विधानसभा निवडणुकीच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रचारसभांच्या राज्यातील सर्वच ठिकाणच्या वार्तांकनाची जबाबदारी संजय डहाळे आणि मी सांभाळत होतो.
नंदकुमार टेणी हे सहसा लिहिण्याऐवजी संगणक चालकाला थेट मजकूर फटाफट सांगायचे. त्यामुळे वेळेची बचत होत असे. टेणी संगणक विभागात मजकूर सांगायला बसले की त्या विभागावर नाही म्हटले तरी एक प्रकारचे दडपण येत असे. सामना हे मुंबईतील मराठी वर्तमानपत्रांच्या क्षेत्रातील नवीन वर्तमानपत्र असले तरी शिवसेनाप्रमुखांचे, पर्यायाने शिवसेनेचे मुखपत्र असल्याने ‘सामना’चा सुरुवातीपासूनच दरारा/दबदबा निर्माण झाला होता. त्यामुळे आमची जबाबदारीसुद्धा वाढली होती. स्वतः संपादक बाळासाहेब ठाकरे, कार्यकारी संपादक अशोक पडबिद्री, विश्वस्त म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज श्रीकांत ठाकरे, मुद्रक प्रकाशक सुभाष देसाई, विश्वस्त अॅडव्होकेट लीलाधर डाके यांची दालने सद्गुरु दर्शन या इमारतीत होती.
वास्तुविशारद जयंत टिपणीस यांच्या अधिपत्याखाली ही इमारत तयार करण्यात आली होती. आम्ही सर्वजण नवीन असल्याने कार्यालयात येण्याची आणि घरी परतण्याची वेळ निश्चित नव्हती. मी अंबरनाथ येथून ये जा करीत असल्याने अनेक वेळा कार्यालयात मुक्काम होत असे. वृत्तसंपादक या नात्याने नंदकुमार टेणी हे कार्यक्रम लावीत असत. ‘पंक्ती मयूर’ म्हणून ते अनेकदा छायाचित्रांना कॅप्शन देत असत. अशोक पडबिद्री हे तर शीर्षक सम्राटच होते. पडबिद्री आणि टेणी मिळून अंकासाठी सर्व पानांची तयारी करीत असत. वर्तमानपत्रांची डेडलाईन सांभाळून वर्तमानपत्र छपाईसाठी पाठविणे हे फार महत्त्वाचे आणि जिकिरीचे काम होते. टेणी हे काम उत्तमरीत्या करीत असत. कधी छपाईसाठी अंधेरी येथे सुप्रेसामध्ये, तर कधी नवीन मुंबईत, नंतर सद्गुरु दर्शनमध्ये छपाई सुरु झाली. महत्वाच्या घडामोडी असताना टेणी यांची धावपळ आणि कामाचा झपाटा विलक्षण होता. राजकीय पक्षाचे मुखपत्र असल्याने बाळासाहेबांचा अग्रलेख आणणे, श्रीकांत ठाकरे यांच्याकडून चित्रपट परीक्षण आणणे, ते व्यवस्थित पानावर लावून घेणे, रात्री उशिरा अशोक पडबिद्री यांना वाचून दाखविणे या सर्वच बाबी आम्ही जवळून पाहिल्या आहेत.
कधी कधी तर बाळासाहेब फोनवर चौकशी करीत असत. रवींद्र खोत हे पडद्याआडून हे नाट्यपरीक्षणाचे सदर चालवीत असत. या सदराचे व्यंगचित्र स्वतः राज ठाकरे यांनी तयार केले होते. अतुल जोशी हे संपादकीय पानाची सूत्रे सांभाळत होते व आहेत. सुधा मधुसूदन जोशी या ‘असा हा गौरीहर पुजिला’ आणि ‘एक शल्य सलते आहे’ या नावाची सदरे लिहित असत. ख्यातनाम साहित्यिक इंद्रायणी सावकार आणि वसंत गडकर हेसुद्धा महत्वपूर्ण लेख लिहित असत. वसंत मोहरीर यांचेही योगदान होते. राजकीय, क्राईमच्या घडामोडींकडे नंदकुमार टेणी यांचे खास लक्ष असायचे. प्रादेशिक, क्रीडा या जबाबदार्या त्यांनी विविध व्यक्तींकडे सोपविल्या. राजेश दर्यापूरकर, रवींद्र पारकर, माधव डोळे, नारायण जाधव, रवींद्र बिवलकर, शुभांगी वाघमारे, जीतेन्द्र कीर, संजय घारपुरे, अरुण निगवेकर, वंदना साळसकर आदि अनेक सहकार्यांना त्यांनी वेगवेगळ्या जबाबदार्या दिल्या. मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कार्यवाह झालो, तेव्हा रवींद्र पारकर यांच्या पुढाकाराने उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि अशोक पडबिद्री व नंदकुमार टेणी यांच्या उपस्थितीत माझा सत्कार घडवून आणला होता. उत्सव पुरवणीची जबाबदारी मग शिल्पा राजे यांच्याकडे देण्यात आली होती. शनिवारी फुलोरा आणि रविवारी उत्सव अशा पुरवण्या होत्या. या पुरवण्यांमध्ये लिखाणाची संधी पडबिद्री आणि टेणी यांच्यामुळे सर्वांना मिळायची. मजकूर आणि छायाचित्रे यांची निवड करुन पाने पटापटा कशी भरायची याचे कसब टेणी यांच्याकडे होते.
लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा, त्यांचे चिरंजीव विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांच्यासमवेत नंदकुमार टेणी यांचे चांगले संबंध असल्याने आणि बरीच वर्षे लोकमतमधून पत्रकारिता केली असल्याने बाबूजी म्हणजे जवाहरलाल दर्डा यांच्या आठवणी, लोकमतच्या आठवणी काढल्या की मग टेणी यांची कळी एकदम खुलायची. वर्तमानपत्रांच्या पानांची सजावट करणे टेणी यांना आवडत असे. मग त्यातून काही मुद्दे पुढे यायचे. ज्येष्ठ समाजवादी नेते साथी श्रीधर महादेव उर्फ एस. एम. जोशी यांच्या निधनाच्या बातमीत आणि सुधा मधुसूदन जोशी यांच्या लेखात टेणी यांच्याकडून अनवधानाने एसेम अण्णांऐवजी युसुफ मेहेर अली यांचे छायाचित्र छापले गेले. दैनिकात काम करतांना अशा चुका होत असतात.
अशोक पडबिद्री यांचा कार्यकारी संपादक म्हणून करार संपल्यावर ते ‘नवशक्ती’मध्ये संपादकपदी विराजमान झाले. त्या पाठोपाठ टेणीसुद्धा ‘नवशक्ती’मध्ये रुजू झाले. आधी वृत्तसंपादक आणि नंतर काही वर्षांनी पुन्हा नवशक्तीमध्ये संपादकपदी नंदकुमार टेणी यांनी काम केले. टेणी यांच्या अर्धांगिनी स्वामिनी या अनेक वर्षे ‘सामना’मध्ये संगणक चालक म्हणून कार्यरत होत्या.
मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा टेणी यांनी त्यांच्यावर ‘नांदवी ते वर्षा’ हे पुस्तक लिहिले. सरांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील नांदवी असल्याचा संदर्भ त्याला होता. ते पुस्तक गाजले. सुरुवातीला डोंबिवली येथे वास्तव्यास असलेल्या टेणी यांनी ठाणे लोकमतची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आणि नंतर ते नाशिक येथे स्थायिक झाले. मध्यंतरी देशदूत आणि मग डॉ. प्रशांत हिरे यांच्या मालकीच्या ‘लोकनामा’चे संपादक म्हणून त्यांनी काम केले. यावेळी त्यांनी मला राजकीय लिखाणाची संधी दिली होती. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. म्हणून ते डोंबिवली येथे वास्तव्यास आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या काळात त्यांचे आणि माझे बोलणे, चर्चा होत होत्या.
माझ्या घरातील वातावरण राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने ‘सामना’च्या सुरुवातीला टेणी यांनी राजकीय क्षेत्रातील वार्तांकनाची संधी मला उपलब्ध करुन दिली असल्यामुळे मी माझ्या राजकीय पत्रकारितेची शिखरे पादाक्रांत करु शकलो, हे मी मोठ्या मनाने आणि अभिमानाने सांगू शकतो. विश्वस्तरावर गाजलेले मिस्टर युनिव्हर्स प्रेमचंद डोग्रा यांची मद्रास (आता चेन्नई) येथे जाऊन मुलाखत घेणारा पहिला मराठी पत्रकार मी होतो. मालाड येथे बनावट अमेरिकन डॉलरची घटना घडली होती. त्याची संध्याकाळमध्ये छोटीशी बातमी आली होती. त्यावरुन रात्री उशिरापर्यंत मालाड येथे जाऊन पहिली क्राईम स्टोरी नंदकुमार टेणी यांनी माझ्याकडून करवून घेतली होती. असे अनेक किस्से टेणी यांच्या काळात घडले आहेत. ‘आहुति’पासून सुरु झालेल्या माझ्या मराठी पत्रकारितेत ‘नवशक्ती’, ‘मुंबई सकाळ’, ‘ठाणे वैभव’ यानंतर ‘सामना’मुळे माझी कमान चढती होत गेली, हे निर्विवाद सत्य आहे आणि ते टेणी यांच्या सहकार्याने शक्य झाले.
३० एप्रिल १९६० साली जन्मलेले टेणी वयाने माझ्यापेक्षा लहान असले तरी मराठी वर्तमानपत्रात मोठ्या हुद्द्यांवर काम केले असल्याने माझ्यापेक्षा निश्चितच मोठे होते. त्यांच्या अकाली निधनाने मराठी वृत्तपत्रसृष्टीने वर्तमानपत्रांची डेडलाईन सांभाळून झपाटून काम करणारा पत्रकार गमावला आहे.
मो. ९८९२९३५३२१