गरबा आणि दांडिया खेळून माझा परमप्रिय, मानलेला मित्र पोक्या आणि मी आमचे पाय खूप दुखतायत. गेली दोन वर्षे शिल्लक राहिलेली नाचण्याची खाज आम्ही या नवरात्रात दाढीवाल्यांच्या कृपेने आणि भाजपच्या सौजन्याने भागवून घेतली. खरं तर सुरतमध्ये, गुजरातमध्ये गरबा किंवा दांडिया खेळण्याची मजा काही औरच असते. तसं वातावरण कोणीही, कितीही मुंबईत उभं करण्याचा प्रयत्न केला तरी ओरिजनल ते ओरिजनल. त्याची मजा डुप्लिकेटला नाही. यंदा ईडीच्या ऑफिसात किरीट सोमय्या यांचा एकपात्री गरबा आणि दांडियाही पाहण्यासारखा होता. दांडियात हातातील टिपर्यांचा वापर ते बाजूच्या टेबल-खुर्च्यांवर आपटून ताल धरण्यासाठी कसा करतात ते पाहणे तर थ्री इन वनसारखं असतं. कारण एकाचवेळी वाजवणं, नाचणं आणि बोबड्या शब्दांत गाणं म्हणणं कुणाला जमत नाही.
यावेळी पाडकामाबाबत त्यांचा सल्ला घ्यायला भाजपचे दिल्लीतील अनलिमिटेड खात्याचे बोलघेवडे मंत्री आणि आम्हा दोघांचे गाववाले मित्र परमपूज्य नारायणराव राणेजी पूर्वीच्याच शर्ट-पॅन्ट स्टायलीत आले होते. पण खूप चिंतेत दिसत होते. हल्ली ते भावनाविवश पटकन होतात आणि त्यांच्या मनात नसतानाही आपल्या शत्रूंना अस्सल मालवणी शिव्या हासडून जातात. इथे कार्यालयात प्रवेश करताच त्यांनी किरीटना एक सणसणीत ओवी हासडली. त्याबरोबर किरीटाचा गरबा थांबला. राणेजी म्हणाले, तुझ्यामुळे हे सगळं झालं. नाहीतर कुणाची हिंमत होती, माझं इतकं देखणं आणि आलिशान बांधकाम पाडण्याचे आदेश देण्याची! ही जमीन, हे आकाश, हा देश, तो विदेश, ही सारी सगळ्या मानवजातीची मालमत्ता आहे. मी कुठेही, काहीही बांधीन. माझ्यात हिंमत आहे. इतरांच्यात नाही. म्हणून ते बांधत नाहीत. मी बांधतो. अरे किरीट, तू तुझ्या शत्रूच्या जिवावर उठलास. त्याचे बांधकाम पाडण्याचे नको ते उद्योग करायला लागलास. पण त्याची फळं मला भोगायला लागली ना. आता मी काय त्यांच्या नावानं गरबा खेळत बसू? तसे किरीट दात विचकत त्यांच्यासमोर गेले आणि म्हणाले, राणेजी रागावू नका. यात माझी काही चूक नाही. तुम्ही वड्याचं तेल कोंबडीवर, सॉरी वांग्यावर काढू नका. तुमच्यासाठी काय फाफडा, ढोकळा मागवू काय? होणारी गोष्ट चुकत नाय. सुप्रीम कोर्टाच्या वर आणखी कुठला कोर्ट असता तर मी माझा वजन खर्च करून तुमच्यासाठी काय वाटल ते केला असता. पण आता या प्रश्नावर आपल्याकडे गरबा खेळण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाय. त्यावर राणेजींचा तीळपापड झाला. किरीटही घाबरले आणि म्हणाले, मी हे प्रकरण राणाबाईंच्या कानावर घालू काय? अशा प्रकरणात त्या बरोबर मार्ग काढतात.
– आता सगळे मार्ग बंद झालेत. चारी बाजूंनी माझी कोंडी झालीय रे किरीट. न्यायदेवता माझ्यावर का रुसलीय तेच समजत नाही. दाढीवाले सीएम झाल्यापासून शिवसेनेशी दगाफटका करणार्यांना न्यायदेवतेकडून फटके पडतायत रे! किती खोके, किती पेट्या ओतल्यात आमच्या दिल्लीवाल्यांनी गद्दारांपुढे, पण अजून यांच्या झाडाला गोड फळे येत नाहीत रे! तिकडे दिल्लीत मला तोंड दाखवायला जागा उरली नाही. मोदी, शहासुद्धा मला बघितल्यावर तोंड फिरवतात. आता कुत्रंसुद्धा विचारत नाही दिल्लीतलं! माझ्यापुढे शेपटी हलवणारे सारे एकदम कुठे गायब झाले? या दाढीवाल्याचा पायगुण चांगला नाही रे किरीट. तुम्ही लोकांनी कशाला फूस लावली त्यांना. जे आपल्या धन्याशी इमान राखू शकत नाहीत ते तुमच्या लोकांशी काय इमान राखणार?
– पण तुम्हीसुद्धा बंड करून बाहेर पडलात ना शिवसेनेतून?
– माझा प्रश्न वेगळा होता. मी शिवसेना घेऊन बाहेर पडण्याचे नाटक नाही केलं. मी सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये गेलो.
– पण नाही मिळालं ना ते.
– पण इतर काही भरपूर मिळालं. तरीही सांगतो, शिवसेनेत जी वट होती तशी वट नंतर कुठेच नाही मिळाली. आता फक्त भाजपच्या तालावर कळसूत्री बाहुल्यासारखं बोलायचं, नाचायचं. आता तेही बंद झाल्यासारखं होईल काही दिवसांनी. दाढीवाल्यांची पिल्लावळ घेऊन भाजपलाच बुरे दिन येतील. त्यात आमचं सॅण्डविच होणाराय. केवढी स्वप्नं पाहिली होती मी. ‘दुनिया मेरी मुठ्ठी में’ म्हणून. पण आता भाजपनेच मला मुठीत ठेवलंय. मी काय बोलतो ते माझं मलाच कळत नाय. सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यावर एक कोण मायेचा पूत आला नाय माझं सांत्वन करायला. माझी अडचण झालीय सर्वांना. सिंधुदुर्गातल्या लोकांना सुद्धा माझी किंमत राहिली नाय.
– साहेब, मोदी आणि शहांवर विश्वास ठेवा. त्यांना तुमची पॉवर माहिती आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पू माणसावर त्यांनी विश्वास ठेवला आणि माझ्याकडे महाराष्ट्रातल्या ईडीच्या कारभाराची मेन एजन्सी दिली. तेव्हापासून मी होल महाराष्ट्रात किती आणि कसा धुमाकूळ घातला ते पाहताय तुम्ही. जे नेते भाजपात प्रेमाने आले त्यांना भाजप वॉशिंगमध्ये घालून शुद्ध करून घेणे, त्यांच्या मनातली ईडीची भीती काढून टाकणे, त्यांना मोदींच्या भक्तिमार्गाला लावणे, ही कामं मी इमानेइतबारे केली. त्याचं फळ मला आज ना उद्या कधीतरी मिळेलच. कारण मी म्हणजे काही दाढीवाल्यांसारखा नाही. माझे ते माझे आणि तुझे तेही माझे, ही माझी वृत्ती नाही. त्यांनी त्यांच्याबरोबर नेलेले गद्दार ही त्यांनी लावलेल्या फांदीवरील विषवल्लीला आलेल्या बिया आहेत. हळूहळू त्या आपोआप गायब होतील. उगाच नाही मोदी-शहांनी त्यांना सत्तेच्या झाडावर उंच चढवून देवेंद्रांना सेफमध्ये ठेवलं. एखाद्याचा पोपट करायचा असला तर मोदी-शहा असंच करतात. त्याला खेळवतात, नाचवतात, फिरवतात, नको त्या गोष्टी करायला भाग पाडतात आणि फजिती झाली की दोघेही कशी गंमत केली म्हणून पोट धरून हसतात. आपल्या माणसांना मात्र बरोब्बर सांभाळून ठेवतात.
– तुझं हे मोदी-शहा पुराण बस् झालं. ते तिथं इंटरनॅशनल पुढार्यासारखं वागतात. बाकीचे मंत्री म्हणजे किस झाड की पत्ती.
– राणेसाहेब, त्यांचं इंग्लिश चांगलं आहे. तसं बोलण्यासाठी आपल्याला बोभाटे इंग्लिश क्लासला जावं लागेल. सगळेच काही फडणवीसांसारखे आयत्यावेळी मदत करणारे नसतात… चला आपण गरबा खेळू.