मुझे प्यार हुआ अल्ला मियाँ, सुहाना सफर और ये मौसम हँसी, जवा नवीन पोपट हा… अशी भक्तिरसपूर्ण गरबागीते कानावर पडत आहेत… तुम्ही या यादीत भर घालू शकता का गरब्यात ऐकलेल्या गाण्यांची?
– स्नेहा साबळे, बोरिवली
‘मैं तो भूल चली बाबुल का देस’ या ठेक्यावरची सगळी गाणी किंवा या ठेक्यात बसवता येतील अशी कुठलीही गाणी घ्या.
तामीळ, तेलुगू या मराठीप्रमाणेच प्रादेशिक भाषा आहेत, त्यांची राज्येही महाराष्ट्रापेक्षा काही फार मोठी वगैरे नाहीत. तरी तिथे त्यांच्या भाषेत हिंदीपेक्षा वरचढ आणि भव्य अशी शेकडो कोटींची चित्रपटनिर्मिती कशी होते?
– राम देशपांडे, ओतूर
आपल्या मराठी माणसांना हिंदी बोलता येत नसलं तरी हिंदी समजतं हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण आपल्या भाषेतल्या चित्रपटाविषयी आग्रही राहात नाही.. आणि सगळी हिंदी इंडस्ट्री महाराष्ट्रातच आहे. काय करणार आपल्या चित्रपटाची स्पर्धा त्यांच्याशी असते… बजेट परवडत नाही… आणि प्रेक्षकही येत नाहीत… त्यांना ती भव्यता हिंदीत मिळतेय.. मराठी चित्रपट कसे तग धरणार?
तुम्हाला मराठी, हिंदी याव्यतिरिक्त इतर कोणत्या भाषेत काम करायला आवडेल?
– योगिता गुरव, पंढरपूर
हो. तामीळ आणि मल्ल्याळम.
देशात आता सुपरफास्ट फाइव्ह-जी नेटवर्क वाजत गाजत आले आहे. त्याचा महागाईने पिचलेल्या सर्वसामान्य माणसांना नेमका काय फायदा होईल, असे वाटते?
– विकास इनामदार, पैठण
खूप फायदा होईल. पटापट व्हिडिओ पाहता येतील. अपलोड करता येतील… सोशल मीडियावर खूप छान रमता येईल.
ते शी जिनपिंग काही दिवस गायब होते म्हणतात… तुमच्याशी गप्पा मारायला गुप्तपणे आले होते, असं ऐकिवात आहे… कशा गप्पा मारता तुम्ही त्यांच्याशी चिनी भाषेत?
– अमोल चंद्रात्रे, कळवण
हो. चिनी भाषेत इतर जगाला समजावयाला खूप वेळ जातो… तर मराठी शिकता येईल का चिनी लोकांना असं विचारत होते ते.
तुम्ही बिग बॉसमध्ये गेलात तर?
– राधिका सोमणे, यवतमाळ
तिथे जाण्यापेक्षा मी स्पॉटबॉयचं काम करेन.
माझं लग्न झालेलं आहे. बायको सतत मोबाइल चेक करते. मैत्रिणींचे नंबर कसे सेव्ह करू?
– सागर पन्हाळकर, जिंतूर
तोंडपाठ करून ठेवा. पुरावा सापडला तर महागात पडेल.
‘निंदकाचे घर, असावे शेजारी’ असं तुकोबा म्हणून गेले आहेत… पण भोचकाचे घर शेजारी असेल तर काय करायचं?
– महंमद अत्तार, गुलबर्गा
पाणउतारा कसा करायचा याची शिकवणी घ्यायला या माझ्याकडे.
भोंडला आणि गरबा यांच्यात काय आवडतं तुम्हाला? का?
– सई बाणाईत, परतवाडा
काहीच नाही.
मी जिच्याकडे दातांवरच्या उपचारांसाठी जातो ती डेन्टिस्ट फार सुंदर, तरूण मुलगी आहे… मला ती आवडते… पण, माझ्या भावना तिच्यापर्यंत कशा पोहोचवाव्यात ते कळत नाही… मी काय करू?
– चिन्मय पाळंदे, पुणे
उगाच तसल्या भानगडीत पडू नका… दातात येणार्या कळा या प्रसूतीवेदनेसारख्या असतात म्हणे.
ज्या रस्त्याचा टोल भरतो, कर भरतो तो रस्ता चांगला नसेल, तर सरकारने टोलचा परतावा आणि नुकसान भरपाई किंवा दंडाची रक्कम फास्टॅगने प्रत्येकाच्या अकाऊंटमध्ये जमा करायला नको का?
– बाबुराव पाटील, केळेवाडी
असं झालं असतं तर देश भ्रष्टाचाराच्या यादीत वरच्या क्रमांकावर नसता.
इंग्लंडमधली मुलं अगदी लहान वयातच फाडफाड इंग्लिश बोलायला लागतात म्हणे… इतकी कशी हुशार असतात ती?
– स्वप्नील पांढरे, घाटकोपर
हे बाळबोध विनोद मी दुसरीत असतानाही केले नाहीत.
आज आपल्या देशात महात्मा गांधींचे विचार कालबाह्य झालेत, असं मानणारा आणि ठासून सांगणारा एक वर्ग तयार झाला आहे. गांधी खरंच कधी कालबाह्य होतील?
– अवधूत चिंचणकर, परळ
बहुमतात काहीही शक्य आहे.