‘तुमची मुलगी काय करते?’ अशी विचारणा सिरीयलवाले करतात… हा मुलींवर अन्याय नाही का? तुमचा मुलगा काय करतो, हा प्रश्न विचारणं अधिक महत्त्वाचं नाही का?
– सरला भिडे, कवळापूर
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हेच होणार… आणि टीव्ही हा मूर्ख खोका आहे हे कळल्यावर बघणं बंद करावं.
आपल्याकडे शहाणीसुरती, कायद्याने सज्ञान झालेली माणसं अचानक चारचौघांत कुत्र्यामांजरांचे आवाज काढायला लागतात… असं का होत असेल?
– अभिनव कांबळी, कणकवली
मुळात आपण प्राणीच आहोत, नाही का?
आपण सर्रास पुरुषाला बैल म्हणतो, कुत्रा म्हणतो, डुक्कर म्हणतो, बायकांना म्हैस म्हणतो, घोडी म्हणतो… हा त्या प्राण्यांचा अपमान नाही का? त्यांच्या भावना दुखावत नसतील का?
निनाद अष्टपुत्रे, पालघर
प्राण्यांना भावना नसतात म्हणून! नाहीतर आपण शिल्लक राहिलो नसतो.
मुलींच्या लग्नाचे वय २१ केल्याने नेमका काय फायदा होईल?
– वीणा ओंबळे, अंबरनाथ
मुलाकडल्या कुटुंबाचा अधिक अपमान करू शकतील… जो झाला पाहिजे.
प्रत्येक माणसाचा कोणी ना कोणी आदर्श असतो… तुमचा आदर्श कोण?
– विनम्र घोडके, सातारा
मीच
तुमच्या विनोदी अभिनयाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे तुमचं अफलातून टायमिंग. लेखनगुणही तुमच्यात आहेतच. मग तुम्ही एक विनोदी नाटक किंवा चित्रपट का लिहीत नाही?
– श्रीराम बापट, सदाशिव पेठ
मागे याच सदरात सांगितलंय की मला जे येत नाही, त्याच्या वाटेला मी जात नाही… जे येतं असं वाटतं तेही अजून मी शोधतोच आहे…
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला आता बर्यापैकी कायदेशीर मान्यता मिळत चालली आहे… भविष्यात लग्नसंस्काराची काही आवश्यकता उरेल का?
यशोधरा शिंदे, नागपूर
होय… विवाहसंस्था टिकणार.
एकीकडे नाटकाच्या निर्मितीचा खर्च मोठा आहे, दुसरीकडे त्यामुळे वाढवलेले नाटकाच्या तिकिटाचे दर सर्वसामान्य मराठी माणसाला परवडत नाहीत. यातून मार्ग काढण्याचा आणि नाटक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा काही उपाय तुम्ही सांगू शकाल का?
– नरेंद्र गांधी, सोलापूर
सर्वसामान्य नाटक पाहायला परवडत होतं, असा काळ कधीही नव्हता. पण नाटक करणं आता फायद्याचं राहिलेलं नाही… खूप खर्च येतो आणि ही कला महागच आहे. तिचा अनुभव तिकीट काढूनच घ्यावा.
माझे वय ७२ आहे. पण मला कायम जवान राहायचे आहे. काय करू?
– अशोक प. परब, ठाणे
कॉलेजच्या गेटवर भेळ विका!
माणूस आनंदातही रडतो, तर तो दु:खात हसत का नाही?
– रसिका शेणई, झावबा वाडी
दुःखात हसलं तर पाहणारा आपल्याला गंभीरपणे घेणार नाही म्हणून. खरं तर आतून हसत असतो आपण…
तुम्ही रागसंगीतातले जाणकार आहात. गानसरस्वती किशोरी आमोणकरांचा स्नेह तुम्हाला लाभला. या संगीताशी फारसा परिचय नसलेल्यांना राग ओळखताही येत नाहीत. हे कसे साधावे?
– शिवप्रिया सोनाळकर, राधानगरी
ऐकायची सवय लागली, त्यात रुची निर्माण झाली की आपोआप रागाचा भाव, स्वभाव कळायला लागतो. मग आपण ओळखू शकतो. पण कान उघडा हवा.
कोणत्याही पक्षाने भ्रष्टाचारमुक्ततेचे कितीही दावे केले तरी सरकारी कार्यालयात चिरिमिरी दिल्याशिवाय कामे होतच नाहीत… अशा वेळी काय करावे?
– रामदास शेटे, सावंतवाडी
काहीही करू शकत नाही, कारण भ्रष्टाचार आपल्या रक्तात आहे.
हॉलिवुडच्या तुलनेत हिंदी सिनेमा आणि हिंदी सिनेमाच्या तुलनेत मराठी सिनेमा सर्वच बाबतीत मागासलेला का वाटतो?
– लता कोरडे, भुईगाव
याला मागासलेला प्रेक्षकच जबाबदार आहे.
तुम्हाला विश्वसुंदरी स्पर्धेत परीक्षक नेमलं तर तुम्ही काय प्रश्न विचाराल? कोणत्या गुणांवर निवड कराल?
– गोदावरी सानप, आष्टी
कोणकोणती पुस्तक वाचल्येत? आणि ती का वाचल्येत?