स्वत:शीच बडबडत मदार्याने वळकटी सोडली, खांद्यावरची घोंगडी खाली टाकली, हातात डमरू घेतला आणि तारस्वरात ओरडला ‘चलो चलो बच्चा लोग, फिर आये है मदारी चाचा. चलो चलो, साथ में नया बंदर आया है.’ ओळखीची आरोळी ऐकताच कमळगल्लीमधील पोरंटोरं चड्डी सावरत मदार्याभोवती पिंगा घालत फेर धरून नाचू लागली. तसा मदारी दात विचकत हसला आणि इथे तरी आपला खेळ हिट होणार याची खात्री पटली.
‘मदारी चाचा, काल तुम्ही दुसर्या गल्लीत खेळ दाखवत होता ना?’
‘ए देखो, मी सर्व गल्ल्या पालथ्या घातल्या आहेत. एकही सोडली नाही. आज इथे, तर उद्या तिथे.’
‘आज काय खेळ दाखवणार मदारी चाचा?’ गर्दीतून पोरं ओरडली, तसा मदार्याला जोर चढला आणि दात विचकत हसून माकडाचं लहान पिल्लू पुढे करत म्हणाला, ‘ये क्या है बच्चौ.’
‘मदारी चाचा, बंदर का बच्चा’.
‘है क्या ना? तर ये माकड का बच्चा अब म्यांव म्यांव करके वरडेगा. जमुरे म्यांव वरडके बताओ. है क्या नाय चमत्कार?’
तसे पोरं शिट्ट्या मारू लागले आणि नागिन डान्स सुरू केला. मदार्याने माकडाच्या पिल्लाच्या बुडाला चिमटा काढला तसे पिल्लू कळवळून म्यांव म्यांव करू लागले. मदारी जाम खुश झाला आणि अभिमानाने पोरांकडे बघू लागला.
पोरटोरं जाम खूश झाली आणि फिदीफिदी हसायला लागली.
मदार्याने नवा खेळ दाखवायचा म्हणून काठी उगारली आणि पिल्लाला दरडावले, ‘जमुरे, तू शादी करेगा, शादी करेगा? भागाबाई आणू क्या तेरे लिये?
तसे माकडाचे पिल्लू खूश झाले व उड्या मारू लागले.
पोरंटोरं पुन्हा जाम खुश झाली आणि टाळ्या पिटायला लागली.
नंतर मदार्याने सपाटाच लावला. दोरीवरून पिलाला उड्या मारायला लावल्या. दोरीवरून चालायला लावले.
दुनिया में जीना है तो काम कर प्यारे,
काम कर, झुक कर सलाम कर प्यारे
वरना ये दुनिया जीने नहीं देगी,
खाने नहीं देगी, पिने नहीं देगी…!
तारस्वरात मदारी गात होता. एवढ्यात पिलाचा तोल गेला आणि ते खाली आदळलं. पिलू केकाटायला लागलं. हा पण खेळाचाच भाग आहे असं समजून पोट्ट्यांनी पुन्हा टाळ्या कुटायला सुरुवात केली. शिट्ट्या दिल्या. मदारी मात्र काळजीत पडला. पण काळजी कशीबशी लपवून पिलाला हातात वाडगा दिला.
‘चलो, अब पेटपानी की बात. जमूरे, जाओ और पैसा इकठ्ठा कर के लाओ. जाओ. बच्चा लोग पैसा देगा.’
पिलाने वाडगं हातात घेऊन चक्कर मारायला सुरुवात केली. पोरं फिदीफिदी हसायला लागली आणि टुक टुक माकड असे म्हणत धूम ठोकत कमळगल्लीत दिसेनाशी झाली.
मदारी खजील झाला. हातातली काठी जमिनीवर आपटली आणि रागाने पिलाकडे बघितलं. पिलू खांद्यावर चढून बसले आणि मदार्याचा कानाशी येऊन म्हणाले, ‘चचा, आपून का उद्योग अब कमी करना पडेगा, खेळ फेल चालला आहे. आता लघुउद्योग व सूक्ष्म उद्योगावर लक्ष केंद्रित करावे चचा.’
मदारी तोंडात मारल्यागत पिलाकडे बघत वळकटी खांद्यावर मारुन चालू लागला.