प्रगल्भ लोकशाही असलेल्या अनेक देशांमध्ये सत्तापक्षाचे लोकप्रतिनिधी आपल्याच पक्षाच्या ध्येयधोरणांवर खरपूस टीका करतात आणि काही वेळा पक्षाचा आदेश धुडकावून विरोधात मतदानही करतात. आपल्याकडे लोकशाहीच्या बुरख्यात सरंजामशाही आणि व्यक्तिपूजक राजेशाहीच वावरत असल्याने आपल्याला मतभेदांचे वावडे आहे. हल्ली तर दिल्लीतल्या सत्तापक्षाच्या विरोधात इतरांनी ब्र काढलेलाही चालत नाही; त्यांची रवानगी पाकिस्तानात होते- तर स्वपक्षीयांनी तोंड उचकटून कसं चालेल? ती हिंमत मोदीनामावर नौका तरलेल्या होयबांमध्ये कुठून येणार? तरीही मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक, खासदार सुब्रम्हण्यम स्वामी आणि खासदार वरूण गांधी हे सत्तापक्षाला अधूनमधून घरचा अहेर देत असतात. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुखांच्या अमोघ कुंचल्यातून साकारलेलं हे अफलातून व्यंगचित्र पाहून त्यांचीच आठवण येते. काँग्रेस पक्षाच्या तेव्हाच्या गायवासरू या निवडणूक चिन्हाचा कल्पक वापर करून बाळासाहेबांनी गायीच्याच अंगावर धावून येणारं वासरू चित्रित केलं आहे. त्यात गायीच्या चेहर्यावरही आश्चर्याचे भाव दाखवण्याचे त्यांचे अलौकिक कसब पाहून थक्क व्हायला होते.