तारखांचे तपशील जुळत नसले, तरी सुजाता इनामदारचा या प्रकरणाशी काही ना काही संबंध आहे का, हा वाघमारेंच्या मनातला संशय कायम राहिला. एका सहकार्याला बरोबर घेऊन पुन्हा घाटात ज्या ठिकाणी तो पाठलाग आणि नंतर अपघात झाला, त्या भागात जायला निघाले. कुठलीही शंका आली, की तिच्या मुळाशी जायचं, हा वाघमारेंचा स्वभावच होता. या बाबतीतही त्यांनी असंच केलं आणि त्यातून काही आधी न दिसलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या.
– – –
तपकिरी रंगाची एक कार दारूचे बॅरल घेऊन शहरात येणार असल्याची खबर मिळाल्यावरून पोलिसांनी नाकेबंदी केली होती. शहरात जाणार्या आणि शहरातून बाहेर जाणार्या सगळ्याच गाड्यांची तपासणी केली जात होती. तसंही नववर्षस्वागताच्या जल्लोषाच्या नादात लोक कुठल्याही थराला जातात, त्यातून अपघात, गुन्हे घडतात, यात पोलिसांसाठी काही नवीन गोष्ट नव्हती. ते प्रमाण कमी राखण्यासाठीचा दरवर्षीचाच खबरदारीचा हा एक उपाय होता. रात्रीचे दोन वाजायला आले होते. आत्तापर्यंत काही संशयास्पद नजरेत आलं नव्हतं. मात्र दोन वाजून दहा मिनिटांनी एक गाडी तपास नाक्याच्या दिशेने येताना दिसली आणि पोलिसांची तुकडी अलर्ट झाली. इशारे देण्यात आले. गाडी थांबवण्याची सूचना लांबूनच करण्यात आली. अचानक काय झालं कुणास ठाऊक, गाडी काही अंतरावरच थांबली. पोलिसांनी लगेच शस्त्रं सरसावली. गाडी जोरात तपास नाक्याच्या दिशेने येणार की काय, अशी शक्यता वाटू लागली. मात्र गाडी समोर न येता रिव्हर्स घेतली गेली आणि तशीच वळून यू टर्न घेऊन पुन्हा उलट्या दिशेनं सुसाट निघाली. पोलिसांचा अंदाज चुकला आणि गाडीचा पाठलाग करण्यासाठी ताबडतोब एक टीम जीपमध्ये बसली. पोलिसांची जीप आता त्या गाडीचा पाठलाग करू लागली. रस्त्यात अंधार होता, घाटही होता. वळणावळणाच्या रस्त्यात समोरच्या गाडीचा माग काढत पाठलाग करणं अवघड होतं. अखेर एका ठिकाणी गाडी झाडाला धडकण्याच्या बेतात असताना बंद पडली आणि पोलिसांनी ताबडतोब खाली उतरून गाडीला घेरलं.
“मुकाट्यानं बाहेर या!’’ इन्स्पेक्टर वाघमारेंचा करारी आवाज घुमला. गाडीचं दार उघडलं गेलं आणि पोलिसांना धक्काच बसला. आत एक तरूण महिला होती. गाडी अचानक थांबल्यामुळे तिला थोडी दुखापत झाली होती. थोडी कण्हतच ती बाहेर आली. पोलिसांचा पवित्रा आता अचानक बदलला. त्यांनी तिला बाहेर येण्यासाठी मदत केली. गाडीची तपासणी केली, तर फार काही नुकसान झालेलं नव्हतं.
“तुम्हाला लागलं तर नाही ना?’’ वाघमारेंनी तिला काळजीनं विचारलं. आता तिचा सगळा राग निघाला.
“ही काय पद्धत आहे इन्स्पेक्टर साहेब? पोलीस आहात म्हणून सामान्य नागरिकांना कसाही त्रास द्याल?’’ तिच्या आक्रमक पवित्र्याने पोलिसांची टीम थोडी हबकलीच.
“हे बघा, आम्हाला वाटलं, की…’’
“काय वाटलं? मी कुणी चोर आहे, दरोडेखोर आहे? एखादी बँक लुटून पळून जाणार्या टोळीतली आहे?’’ पोलिसांना पुढे बोलू न देता ती डाफरायला लागली.
“चोर दरोडेखोर नाही आहात, मग गाडी का पळवलीत? आणि चेकनाक्यावर न थांबता या बाजूला का निघून आलात?’’ पोलीसही काही ऐकून घेणार नव्हते.
“ते… मी… म्हणजे… माझं…’’ आता मात्र ती बाई त-त-प-प करायला लागली. स्वतःच्या तोंडावर हात घेऊन बोलायला लागली, तसा पोलिसांना संशय आला.
“मी पार्टीत जरा जास्तच ड्रिंक केलं होतं. पोलीस उगाच पकडून त्रास देतील, असं वाटलं. म्हणून मी परत निघाले होते.’’
बाईंनी खुलासा केला. पोलिसांना त्यावर विश्वास ठेवणं भागच होतं. टेस्ट केल्यावरही त्यात त्यांनी दारू प्यायली असल्याचं स्पष्ट झालं. एवढ्या रात्री एकट्यानं कुठे गेला होतात, पार्टी कुठे होती वगैरे सगळी चौकशी पोलिसांनी केली. तिनं त्याची सगळी उत्तरं दिली. सुजाता इनामदार असं तिचं नाव होतं. साधारण मध्यमवयाची ही महिला शहराच्या उच्च मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या भागात राहत होती. शहराबाहेर असलेल्या तिच्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर रात्री पार्टी होती, तिकडूनच ती परत येत होती, असंही तिनं पोलिसांना सांगितलं. या मैत्रिणीचा नंबर दिला, तिच्याकडे चौकशी करायला सांगितलं. तिनं दिलेली माहिती खरीच ठरली होती. रात्री मैत्रीण राहण्यचा आग्रह करत असतानाही आपण घरी परत निघालो आणि चेकनाक्यापाशी मात्र पोलिसांचाच त्रास नको म्हणून परत वळलो, तिथून मैत्रिणीकडे परत जाण्याचा विचार होता, अशी माहितीही तिनं दिली. तीही पटण्यासारखी होती. एकूणच सुजाता इनामदारचा पाठलाग केल्याने तिलाच त्रास झाला, अपघाताची शक्यता निर्माण होऊन तिचाच जीव धोक्यात आला, असंच चित्र उभं राहिलं. पोलिसांनी हे प्रकरण आपल्यावर शेकू नये, म्हणून तो विषय तिथेच मिटवला आणि सुजाता इनामदारला तिच्या घरी पाठवून दिलं.
“पाटील, ही बाई जरा विचित्र वाटते. ती सांगतेय ते सगळं खरं असलं आणि संशय घेण्यासारखं काही दिसत नसलं, तरी काहीतरी गडबड आहे, असं उगाच वाटतंय,’’ वाघमारे त्यांच्या सहकार्याला म्हणाले. तिचे सगळे डिटेल्स घेऊन ठेवा, कधीही उपयोगी येतील, असा सल्लाही दिला.
या घटनेला साधारण महिनाभर उलटून गेला असेल. पोलिसांच्या एका आढावा बैठकीत कुठल्या कुठल्या गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही, यावर चर्चा सुरू असताना अचानक असा एक गुन्हा वाघमारेंच्या पाहण्यात आला, ज्याचे तपशील वाचून त्यांचे डोळे चमकले. शेजारच्याच तालुक्याच्या ठिकाणी राहणारा एक तरूण व्यावसायिक महादेव काटकर काही दिवसांपासून बेपत्ता होता. विशेष म्हणजे, त्याच्या बायकोने त्याच्या बेपत्ता होण्याची खबर नोंदवली असली, तरी तिच्याऐवजी इतर काही माणसेच त्याचा शोध लागण्यासाठी आग्रही होती. त्याने म्हणे त्यांच्याकडून भरपूर उधारी घेतली होती आणि ती फेडायच्या आधी तो गायब झाला होता. कर्जबाजारीपणामुळे तो पळून गेला असेल, असा पोलिसांचा अंदाज होता. त्याची बायको सुषमा हिनेही तीच शक्यता व्यक्त केली होती. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात ज्यांच्या साक्षी आणि जबाब नोंदवले होते, त्या सुजाता इनामदार हे नाव वाचून वाघमारेंचं लक्ष वेधलं गेलं. हे नाव कुठे ऐकलंय, ह्याचा विचार करत असताना त्यांना महिनाभरापूर्वी झालेला तो अपघात आणि त्यावेळी त्यांची झालेली बाचाबाचीही आठवली.
सुजाता इनामदारचा महादेव काटकरसारख्या माणसाशी काय संबंध, असा प्रश्न साहजिकच त्यांना पडला. त्यातून सुजाताबाई शहरात राहत होत्या आणि हा महादेव तालुक्याच्या ठिकाणी. थोडी अधिक चौकशी केल्यावर त्यांना स्थानिक पोलिसांकडून कळलं, की सुजाता इनामदार आणि सुषमा ह्या लांबच्या बहिणी होत्या आणि सुजाताबाई सुषमाकडे काही वेळा जात येत असत. वाघमारेंच्या अंगातला पोलिसी चिकित्सक स्वभाव जागा झाला आणि त्यांनी या प्रकरणाची आणखी माहिती घ्यायचं ठरवलं. त्यासाठी खात्याकडून विशेष परवानगीही घेतली. महादेव नक्की कधीपासून गायब झाला, ह्याची चौकशी सुरू केली. महादेव गायब झाल्याची तक्रार सुषमाने नोंदवली होती, ३१ डिसेंबरला. वाघमारेंनी आपल्याकडच्या नोंदी तपासून पाहिल्या. घाटात ती गाडी अडवली आणि पाठलाग केला, ती घटना घडली होती २८ तारखेला. ३० तारखेपर्यंत महादेव घरीच होता असं सुषमाने तक्रारीत म्हटलं होतं. ३१ तारखेला तिनं तक्रार दिली होती.
तारखांचे तपशील जुळत नसले, तरी सुजाता इनामदारचा या प्रकरणाशी काही ना काही संबंध आहे का, हा वाघमारेंच्या मनातला संशय कायम राहिला. एका सहकार्याला बरोबर घेऊन पुन्हा घाटात ज्या ठिकाणी तो पाठलाग आणि नंतर अपघात झाला, त्या भागात जायला निघाले. कुठलीही शंका आली, की तिच्या मुळाशी जायचं, हा वाघमारेंचा स्वभावच होता. या बाबतीतही त्यांनी असंच केलं आणि त्यातून काही आधी न दिसलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या.
घाटात चौकशी करत असताना एक फाटका दिसणारा माणूस समोर आला. घाटात एका वळणावर त्याची चहाची छोटीशी टपरी होती.
“साहेब, काय शोधताय?’’ त्यानं विचारलं. हवालदार त्याला उडवूनच लावणार होता, पण वाघमारेंनी त्याला अडवलं. त्या माणसाची नीट चौकशी केली. पोलिस महिन्यापूर्वीचं काहीतरी शोधायला बघतायंत, हे त्याला सांगितल्यावर त्यानं त्याच्याकडे असलेली एक वस्तू आणून दिली. वाघमारेंनी बघितलं, तर ती एक छोटी हॅँडबॅग होती. त्यात काय आहे, काय नाही, त्या माणसानं उघडूनही बघितलं नव्हतं. वाघमारेंनी ती बॅग ताब्यात घेतली. त्यात छोट्या छोट्या काही वस्तू होत्या. कुठलीतरी पाकिटं, गुंडाळून ठेवलेले काही कागद वगैरे. त्याचबरोबर त्यात एक छोटा, जुना मोबाइल पोलिसांना सापडला आणि वाघमारेंना आश्चर्य वाटलं. जुन्या मॉडेलचा मोबाइल असला, तरी पुरावे मिळवून देण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त होता. हा मोबाइल महादेवचा होता, हे लगेचच दिसून आलं आणि पोलिसांची तपासाची चक्रं फिरली.
ज्या गावात महादेव राहत होता, तिथे आसपास चौकशी केल्यावर तो २८पासूनच बेपत्ता होता, असं पोलिसांच्या लक्षात आलं. त्याचं छोटं दुकान त्याच दिवसापासून बंद होतं. कुणीकुणी त्याला फोनही करायचा प्रयत्न केला होता, पण तोही बंद लागला होता. असं असताना सुषमानं ३१ तारखेला, म्हणजे तीन दिवसांनी तक्रार का दिली आणि ३० तारखेपासून तो गायब आहे असं का सांगितलं, हा पहिला प्रश्न वाघमारेंना पडला.
सुजाता इनामदारचा या घटनेशी नेमका संबंध काय, हेही अजून त्यांना उलगडत नव्हतं. वाघमारेंनी आता तिच्या फोनचे सगळे रेकॉर्ड्स मागवायचं ठरवलं. ते मिळायला एक दिवस जाणार होता. तोपर्यंत सुषमाकडे, म्हणजे महादेवच्या बायकोकडे आणखी चौकशी करण्याची गरज होती. त्यासाठीची रीतसर परवानगी त्यांनी काढली. स्थानिक पोलिसांनाही विश्वासात घेतलं.
“महादेव खूप लोकांचे पैसे बुडवायचा, साहेब. अधूनमधून तो असा गायबही व्हायचा. मग एकदम दहा पंधरा दिवसांनी उगवायचा. कधीकधी त्याचा फोनही बंद असायचा. त्या दिवशी पण त्यानं असाच फोन बंद ठेवला होता,’’ सुषमानं पोलिसांना सांगितलं.
तिच्या बोलण्यातून त्यांना समजलं, की तिचा महादेवशी प्रेमविवाह झाला होता. घरच्यांना तो मान्य नव्हता, त्यावेळी सुजाताताईने तिला मदत केली होती. सुजाता ही तिची लांबची बहीण असली, तरी मनानं तिच्यासाठी अगदी जवळची होती. प्रत्येक बाबतीत ती सुजाताचा सल्ला घेत असे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नासाठीही सुजाताताईच त्यांच्या मदतीला धावली होती.
अर्थात, फक्त सुषमाच्या साक्षीवर पोलीस अवलंबून राहणार नव्हते. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली, तेव्हा स्ाुषमा आणि महादेवचं २८च्या रात्री जोरदार भांडण झालं आणि त्यानंतर पुढचे दोन दिवस मात्र घर शांत होतं, असंही त्यांना समजलं. सुजाता इनामदारच्या फोनचे रेकॉर्डस हाती आले आणि वाघमारेंना जे हवं होतं ते मिळालंय, असं वाटलं. त्यांनी ताबडतोब सुजाताबाईंना पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं.
सुजाताबाईंचा यावेळचा पवित्रा आधीपेक्षा आक्रमक होता.
“मी तुमच्याविरुद्ध मीडियाकडे जाईन!’’ त्यांनी वाघमारेंपाशी त्रागा व्यक्त केला.
“त्याआधी आम्हीच जाणार आहोत. तुमच्याविरुद्धचे पुरावे घेऊन.’’ वाघमारेंनी असं सांगितल्यावर मात्र सुजाताबाई थोड्या नरमल्या.
“कुठले पुरावे?’’ त्यांनी विचारलं.
“महादेवचा खून केल्याचे पुरावे,’’ वाघमारे म्हणाले. त्यांनी आता तपशीलवार एकेक गोष्ट सांगायला सुरुवात केली. २८ डिसेंबरला सुजाताबाई पार्टीला मैत्रिणीकडे गेल्या होत्या हे खरं, पण त्याआधी त्या सुषमाच्या घरी गेल्या होत्या. महादेवच्या विचित्र वागण्यावरून अनेक तक्रारी सुषमाकडून त्यांच्या कानावर आल्या होत्या. तो कुठलाच व्यवसाय धड करत नव्हता, शिवाय अधूनमधून सुषमाला मारहाणही करत असे. त्याला बजावूनही त्याच्या वागण्यात सुधारणा होत नव्हती. शेवटी त्याला ताकीद देण्यासाठी सुजाताताई त्याला भेटणार होत्या. मात्र त्यांच्यात वादावादी झाली आणि त्याने सुजाताताईंनाच मारण्यासाठी तिथली एक मोठी वस्तू उचलली. सुषमाने प्रसंगावधान राखून सुजाताताईंना वाचवण्यासाठी त्याच्या डोक्यात तिथल्या काठीचा प्रहार केला आणि त्यात महादेव जागीच मरण पावला. लाडक्या बहिणीला खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागू नये, म्हणून सुजाताताईंनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. एका दुष्ट आणि वाईट माणसाचा शेवट झाला, असं समजून त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता करू नये, असं सुषमाला त्यांनी समजावलं. त्याचं प्रेत सापडणार नाही अशा ठिकाणी पुरून टाकलं. मैत्रिणीनं पार्टीला बोलावलंय, ह्याचं निमित्त होतंच. कुणाला कुठला संशय येऊ नये म्हणून त्या पार्टीलाही गेल्या. मात्र, येताना चेकनाक्यावर गाडी अडवण्याचं निमित्त झालं आणि पुढचं त्यांचं सगळं गणित बिघडून गेलं. महादेवचा मोबाइलही त्यांना नष्ट करून टाकायचा होता, पण चुकून ती पिशवी गाडीत राहून गेली होती आणि त्या दिवशी घाटात पाठलागाच्या वेळी गाडीतून पडली होती. सुजाताताईंनी बहिणीच्या भल्यासाठी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांपासून काही लपत नाही, हेही पुन्हा सिद्ध झालं.