महाराष्ट्रावर कोसळलेल्या अतिवृष्टी आणि महाभयंकर वादळाच्या तडाख्यात अनेक घरे भुईसपाट झाली, अनेक संसार उद्ध्वस्त झाले तर शेकडो ग्रामस्थ प्राणास मुकले. मदतीसाठी सेवाभावी कार्यकर्त्यांची आणि पाहणीसाठी विविध पक्षांच्या नेत्यांची रीघ लागली. काहीजण खरोखरच तळमळीने तिथे गेले तर काही अरेरावी, दमबाजी आणि नाटकी डायलॉगबाजी करण्यासाठी गेले. आधीच खासदार आणि त्यात सूक्ष्मातिसूक्ष्म लघु की दीर्घ उद्योग खात्याचे डोस प्यायला दिल्यामुळे तांबारलेल्या डोळ्याने केंद्रीय सरकारी लव्याजम्यासह स्वतःला उत्तराखंड कोकणचे स्वयंभू नेते समजणारे पुढारी डोळे फाडफाडून चिपळुणात सूक्ष्म पाहणी करत होते. ते आमचे पूर्वीचेच मित्र आणि महागुरू असल्यामुळे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ते तिथे नाटकबाजी करणार याची कल्पना होतीच. मी माझा मानलेला मित्र पोक्या याला तसे बोललोसुद्धा.
दिल्लीतला एवढा मोठा केंद्रीय मंत्री चिपळूणात चिखल तुडवीत नुकसानीची पाहणी करण्यासाठी येतो आणि राज्यातला एक चपराशीही त्यांच्या स्वागतला नाही म्हणजे त्यांच्या अंगाचा तीळपापड होणारच. ते लालबुंद झाले होते. डोळे इतके मोठे वटारले होते की बघ्यांची गाळण उडाली होती. बरे, त्यांच्यासमोर बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती.
मी पोक्याला म्हटले, त्यांची तोफ कितीही धडाडली ना, तरीही ते बॉम्बगोळे फुसके असतात. आता ऐकून ऐकून लोकांना सवय झाली आहे. आलेत कशाला आणि करतायत काय! ही काय तुमचा रूबाब दाखवण्याची वेळ नाही. त्यानंतर एखादी खाष्ट म्हातारी सुनेसकट तावडीत सापडेल त्याला त्या सीरियलमधल्या सरू आजीसारख्या ठेवणीतल्या शिव्या देते ना, तशी अपशब्दांची सरबत्ती या महाशयांनी कुणाचाही मान-अपमान न पाहता सुरू केली तेव्हा मात्र पाहणारे वैतागले. आम्ही दोघे तर व्हिडीओ शूटिंगच करत होतो. स्वत:च्या (लेटेस्ट) पक्षाच्या लोकांनाही त्यांनी सोडले नाही.
शेवटी पोक्याच्या हातात कॅमेरा देऊन मी पुढे गेलो. खिशातल्या पुडीतला अंगारा त्यांच्या कपाळाला लावला. एक सणसणीत गार्हाडणा घातला. जी काय दिल्लीपासून गल्लीपर्यंत आल्यागेल्याची, भुताखेतांची, बायाबापड्यांची, चिंधीचोरांची, मेल्यागेल्यांची दृष्ट लागली असेल तर ती मातीत मिळवून टाक. त्येचा कढत चाललेला ब्लडप्रेशर आणि डोक्या ताळ्यावर येवंदे. इकडे येताना जर कुठे झपाटले असतील तर येत्या गटारीला बारा कोंबडी ते उपस्थित नसले तर प्रतीकात्मक रूपात पोक्याच्या अंगावरून उतरून त्याची राखण आम्ही चेंबूरला देऊन टाकू.
एवढे बोलल्यावर त्यांचा राग हळूहळू शांत झाला. माझ्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, टोक्या, आज मी किती मोठा माणूस झालो आहे याची या लोकांना कल्पना नाही. माझ्या मोठेपणाचे श्रेय अनेकजण घेऊ इच्छितात. पण मी माझ्या कर्तृत्वाने मोठा झालो. माझे कर्तृत्व सर्वांना ठाऊक आहे. ते जगजाहीर आहे. पण एकाच ठिकाणी माझा जीव रमत नाही. म्हणून अनेक पक्षांचा अनुभव घेत आज एका महान पक्षात गेलो. त्यांनी माझी खरी किंमत ओळखली आणि मला ते सूक्ष्म का अतिसूक्ष्म उद्योगाचे खाते दिले. खाते कसलेही असो मी त्यावर कशी छाप उमटवतो ते थोड्याच दिवसात समजेल. तिथे पहिल्याच दिवशी सर्वांना तंबी दिलीय, माझ्याशी चालबाजी नाय पायजेल. होशियारी कराल तर भारी पडेल. आता फक्त डोळे वटारले की खाली मान घालतात. ‘शोले’तल्या सरदारांसारखे ‘जी सरकार’ म्हणतात. खरे तर हातात हंटर घेऊनच फिरले पाहिजे.
– ते तुम्ही फिरा हो. पण कोकणात जे नुकसान झाले आहे त्यासाठी केंद्राकडून भरपूर मदत तरी द्यायला सांगा पीएमना. ७५० कोटी दिलेत तेही मागच्या वर्षीच्या वादळाचे.
– तुम्ही घाबरू नका, माझे खाते जरी सूक्ष्म असले तरी मी पीएमकडे मला जेवढे मोठमोठे आकडे पाठ आहेत तेवढी मोठी मदत द्यायला सांगेन. आज मी मुख्यमंत्री असतो तर संपूर्ण कोकणच्या आकाशाला जाड प्लॅस्टिकचे छप्पर लावून ते पाणी वरच्यावर अडवले असते. माझ्याकडे एवढ्या आयडिया आहेत ना, जर मोदींनी मनावर घेतले तर मी त्यांच्याकडून सर्व प्रत्यक्षात उतरवीन.
– पण तुम्हाला राग पटकन येतो. मंत्र्यांनी अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. निदान मुख्यमंत्र्याबाबत तरी अपमानास्पद बोलू नये. आपण काय बोलतो याचे भान ठेवावे लागते.
मी गेले उडत म्हणालो हे सत्य आहे. पण ते पाहणी करायला हेलिकॉप्टरने उडत जातात, असे मला म्हणायचे होते.
– लोक शहाणे आहेत. ते बरोबर ओळखतात. रागाचा पारा इतका चढू देऊ नका की कोणालाही काहीही बोलाल. पदाचा तरी मान ठेवावा माणसाने. सत्तेचे विष डोक्यात भिनले की रागाचे आणि बोलण्याचे ताळतंत्र राहत नाही.
समर्थ रामदास स्वामींनी काय म्हटले आहे ते ऐका-
अति कोपता कार्य जाते लयाला
अति नम्रता पात्र होते भयाला
अति काम ते कोणतेही नसावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे।।
अति वाद घेता दुरावेल सत्य।
अति ‘होस हो’ बोलणे नीचकृत्य
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे।।
ते उद्धवजी पाहा. किती शांत आणि संयमी तसेच वेळप्रसंगी कठोरही होतात. पण तुमचा आक्रस्ताळेपणा आहे ना, तो नेता या शब्दाला शोभा देणारा नाही. म्हणून आता तरी स्वतःला सुधारा. नुसती रावडेबाजी आणि धमकीची भाषा कामाला येत नाही. मग कोणीच जवळ करत नाही. मिंधेपण येते. हांजी हांजी करावी लागते. लोक स्वार्थासाठी जवळ करतात आणि उपयोग नाही, असे वाटले की दूर लोटतात. अहंकाराने सारे काही नष्ट होते. मी जुना मित्र म्हणून हक्काने सांगतोय. आता तरी ताळ्यावर या.
– माझा स्वभावच तसा आहे. अगदी लहानपणापासून. एके काळी मी बोले आणि सिंधुदुर्ग हाले अशी स्थिती होती. पण आता काही खरे राहिले नाही. इथे अपमानाचे जिणे जगण्यापेक्षा ती आपली दिल्ली बरी. खायचे, प्यायचे मजा करायची. सध्या भजी खावीशी वाटतात. मिळतील का इथे कुठे?
ते भजी शोधायला गेले आणि मी आणि पोक्या चिखलातून वाट तुडवत एस.टी.ने सरळ मुंबईच्या मार्गाला लागलो.