असल्या लाल डब्यातून जाण्यापेक्षा लाखांच्या गाडीतून मग्रूर नजरेने आजूबाजूला बघत जावं असं का नसेल वाटलं?
आमदार निधीच्या १० कोटीला टक्केवारीचे कोंदण का घालावेसे वाटले नसेल? मुंबईत समुद्र नजरेत घेणारा, आलिशान फ्लॅट टक्केवारीतून घेत, सामाजिक ताणाचा विरंगुळा का घ्यावासा वाटला नसेल? मतदारसंघात अवैध धंदे, बिल्डर लॉबीच्या उद्योगाकडे फक्त ‘दुर्लक्ष’ करण्याच्या रकमेतून देश विदेशी पर्यटनाची शक्यता का आजमावली नसेल? मुंबईत पंचतारांकित हॉटेलात बुद्धिजीवी घेऊन देशातील दारिद्र्यावर चर्चा का करावीशी वाटली नसेल?
नष्ट होत चाललेल्या पक्षात थांबण्यापेक्षा जनतेच्या विकासाच्या नावाखाली पक्षांतर करून लाल दिवा का पेटवला नसेल?
असे अनेक प्रश्न पडतात गणपतराव,
ज्याची उत्तरे माहीत असूनही
नीट समजत नाहीत
की बेरीज वजाबाकी समजूनही
हिशोब लागत नाही अशा अहिशोबी आयुष्याचा…
मोहाच्या क्षणावर ही माणसं कशी मात करत असतील?
इतरांच्या गाड्या, वैध, अवैध संपत्ती बघून नसेल का मनात येत यांच्यासारखे असावे आपलेही काही?
१० पिढ्यांची सोय करणारे आजूबाजूला असताना
किमान पुढच्या दोन पिढ्यांची सोय तरी करावी?
इतके निष्कलंक समर्पित जगून तुम्हाला समाधान सोडून काय मिळाले असेल गणपतराव?
हे सारं सोडून तुम्ही काय मिळवता पैसे कमावणारे यंत्र झालेल्या आम्हाला कळत नाही.
हे ऐहिक आनंद गमावताना, तुम्ही काय कमावता? हे आमच्या पिढीला कळत नाही.
कळलं तरी वळत नाही.
आमच्या रेंजबाहेर जगणारी तुमच्यासारखी आयुष्ये आम्हाला अनरिचेबल वाटतात…
हे सारे कुठून येते?
कुठल्या मातीची बनलेले असता तुम्ही?
गुगल सर्च करूनही याची उत्तरं मिळत नाही
संपत्ती उधळून देणारा कुसुमाग्रजांचा नटसम्राट गणपतराव
आणि इथे आयुष्य उधळून देणारा हा गणपतराव
नष्ट होणार्या प्रजातीतील तुम्ही शेवटच्या काही वनस्पती…
नंतर उरेल फक्त वाळवंट,
इथे वनस्पती होत्या हे सांगणारे…