‘भ्रम हा शब्द भ्रमित करणार्यालाही भ्रमात ठेवतो. जसं आहे तसं न दिसणं, म्हणजे भ्रम. काही माणसं नेहमी स्वतः भ्रमात राहून इतरांना भ्रमात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. पूर्ण माहिती नसताना ज्ञानी असल्याचे दाखविणे, इतरांपेक्षा चांगलं बोलता येते म्हणून स्वतःला ईश्वर म्हणवून घेणे. इतकेच नाही तर, या भ्रमाला पुष्ट करणारे अनुयायीही त्यांना मिळतात. ते तर इतके भ्रमिष्ट असतात की संपूर्ण जगालाच ते अज्ञानी समजतात. आहे ते झाकण्याच्या प्रयत्नात व आहे ते न समजण्यात आयुष्य जातं. नाही ते दाखविण्याचा सतत प्रयत्न असतो. काही जण कातडं रंगवून सुंदरता दाखवितात. दाखविण्याच्या नादात माणसं स्वतःला आयुष्यभर अविकसित ठेवतात. स्वतःच स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करतात.’
डॉ नामदेव शास्त्री यांनी लिहिलेल्या उताऱ्यातून भ्रमाबद्दलच्या वरील ओळी साभार.
या पार्श्वभूमीवर आता बघू सध्याच्या काही घडामोडी. देशात जातीधर्माच्या नावावरून भावनांचे हिंसक वातावरण करणाऱ्या भ्रमिष्ट व्यक्तीने ‘भारत जोडो’ची हाक दिली तर कसे वाटेल? तशी हाक देण्याचा नैतिक हक्क कोणत्याही भेदभावाशिवाय उच्च मानवी आदर बाळगणाऱ्या व्यक्तीलाच असतो. बलसागर भारत करण्याची संकल्पना मांडणाऱ्या साने गुरुजींनी स्वतंत्र भारताला राष्ट्र म्हणून एकत्र ठेवण्याचे चिंतन मांडले व सांगितले. मानवी हक्क रक्षणासाठी काम उभे करणाऱ्या बाबा आमटे यांनी ‘भारत जोडो’चा नारा साधारणत: ४० वर्षांपूर्वीच दिला व त्यावर कामही केले. सगळ्या धर्मजातींना, सगळ्या भाषांना एकत्र आणणारी आंतरभारतीची संकल्पना साने गुरुजींनी मांडली. त्यावर चंद्रकांत शहा व सुब्बाराव यांनी सातत्याने भारतातील मुलांची शिबिरे घेऊन युवामने जोडण्याचे काम केले व ते अजूनही सुरू आहे.
ज्यांच्यासाठी राजकीय पक्ष प्रथम आहे, ज्यांच्यासाठी एखादा धर्म प्रथम व सर्वश्रेष्ठ आहे, ज्यांच्यासाठी विशिष्ट रंग प्रथम आहे त्यांनी ‘देश प्रथम’ असल्याचे सांगावे का? विविधताच ज्या देशाचे सौदर्यस्थळ आहे व त्यातूनच भारतीयत्वाचा उगम होतो तेथे धर्मावरून नागरिकत्व ठरविण्याचा व काही भारतीयांना दुय्यम ठरविण्यासाठी प्रयत्न करणारे ‘देश प्रथम’चा नारा देतात, तेव्हा हा भ्रम पासरविण्याचा उद्देशाने दिलेला कॉल ‘रॉग नंबर’वरून आला आहे हे लक्षात घ्यावे लागते. आधी स्वत: केलेल्या चुकांमुळे, गुन्हेगारीमुळे झालेल्या देशभरातील मानवी पडझडीची कबुली प्रामाणिकपणे द्यावी, माफी मागावी अशाच प्रक्रियेतून वाल्याचा वाल्मिकी होत असतो. मग वाल्मीकीने ‘भारत जोडो’ची किंवा ‘देश प्रथम’ची हाक द्यावी. असे ते असते.