एक काळ असा होता की, नाटकाची संहिता हा केंद्रबिंदू होता. त्यातील भाषेचं सौंदर्य हे वैभव होते. पण काळ बदलला. संहितेची जागा दिग्दर्शकाच्या कौशल्याने घेतली. भाषा गौण ठरली. एकूण परिणामाला महत्त्व आलं. नाटककार आणि दिग्दर्शक या दोन्ही जबाबदार्या बहुदा हल्ली एकीकडेच असल्याने नाटककारावर दिग्दर्शकाने मात केली. ‘सही रे सही’पासून नवी वाट सुरू झाली. चित्रपटाच्या वनलाइनप्रमाणे सारा डोलारा उभा करण्यात येऊ लागलाय. कलाकारांची जमेची बाजू, उपलब्ध सेट्स वगैरेचा प्रामुख्याने विचार त्यात होऊ लागला. नाटकाच्या संहिता पूर्वी नाटकांपूर्वी सहज मिळायच्या, आता त्या पूर्णपणे बंद झाल्यात. संहितेपेक्षा प्रयोगाच्या सादरीकरणाचा वरचष्मा ठरलाय. पण त्यामुळे नाट्यइतिहास म्हणून संहितेची जपणूक अन् उपलब्धता हे नाट्यअभ्यासक व दर्दी रसिकांसाठी प्रश्नचिन्ह बनले आहे. सेन्सॉरसंमत संहिता आणि प्रत्यक्ष प्रयोग यातही काहीदा तफावत आलीय. अर्थात हा एक स्वतंत्र मुद्दा ठरेल. असो.
संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकामुळे आणखी नवीन प्रकार प्रकाशात आलाय. अर्थात हा प्रयोग यापूर्वी करण्यातही आलाय, पण या नाटकात ठळकपणे ही नवी वाट निवडली गेली आहे- देवेंद्र पेम यांचे गाजलेले ‘ऑल द बेस्ट’ आणि संतोषचेच ‘दिवसा तू रात्री मी’, या दोन नाटकांमधली ‘गम्मत’ इथे एकाच कथानकात खुबीने मांडून त्यात दोन फॅमिलींची गम्माडी गम्मत केलीय!
देवेंद्र पेमने १९९३च्या सुमारास स्पर्धेतल्या एकांकिकेवरून ‘ऑल द बेस्ट’ हे पूर्ण नाटक तयार केले. निर्माते-नेपथ्यकार मोहन वाघ यांच्या ‘चंद्रलेखा’ने ते दिमाखात रंगभूमीवर आणले होते. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर यांनी अंध, मुका, बहिरा साकारून त्यांच्या लपवाछपवीचा खेळ रंगविला होता. व्यावसायिक दारे यातून अलगद उघडली गेली. पुढे दुसरा भागही आला- ऑल द बेस्ट टू! एकूणच नव्या पिढीच्या रसिकांना आकृष्ट करणारे हे एक नव्या वळणावरले नाटक ठरले. स्पर्धेतूनच गाजलेला संतोष पवार याने ‘दिवसा तू रात्री मी’ हे नाटक ‘सुयोग’तर्फे रंगभूमीवर आणले. २०१० या वर्षी नाटकाचा ५५५वा प्रयोग झाला. हे नाटक परदेशी दौर्यावरही गाजले. ‘कौटुंबिक घरंदाज कॉमेडी’ म्हणून रसिकांनी त्यालाही डोक्यावर घेतले. एक मुलगा मुलगी बघण्यासाठीच्या कार्यक्रमासाठी निघतो. पण त्याला संध्याकाळी बोलविले जाते कारण, मुलीला दिवसा सात ते रात्री सातपर्यंत दिसत नाही. यावरून उडालेला गोंधळ, पळापळ असलेला तो एक अॅक्शन ड्रामा. आता त्याच चालीवर दोघा शेजारी कुटुंबियांना ‘आमने-सामने’ आणून एका लग्नाची प्रेमापासून ते लग्नापर्यंतची गोष्ट या नव्या नाट्यात निव्वळ करमणूक म्हणून मांडली आहे. याची नवीकोरी संहिता आणि एकापेक्षा एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा असल्या, तरीही त्याची पक्की नाळ ‘दिवसा तू रात्री मी’शी जुळली आहे. हे सतत जाणवत राहाते. अर्थात जुने नाटक न बघितलेल्या रसिकांना ही फ्रेश हास्यस्फोटक मेजवानीच ठरेल!
दोन कुटुंबं. अगदी समोरासमोर. पहिल्या फॅमिलीत कर्णबधीर असलेला कुटुंबप्रमुख दादा आणि त्याची पत्नी वैनी. या दांपत्यासोबत बंधू नयन हा रातांधळा. जो लग्नासाठी उंबरठ्यावर, खिडकीजवळ उभा. दुसरा भाऊ मुकेश. हा मुका. असे हे चौघांचं कुटुंब. व्यंग असले तरीही ताकदीने वावरताहेत. ते लपवताहेत. आता त्यांच्यासमोर एक नवी ‘फॅमिली’ राहण्यासाठी येते. त्यात नारायण हे वडील. जे कमालीचे विसरभोळे आहेत. त्यांची पत्नी लक्ष्मी आणि सुंदर मुलगी सुनयना. तिची सुद्धा अजब तर्हा. तिला दिवसा दिसत नाही. रात्रीच ‘नजर’ येते! आता या दोन ‘शेजारी’ फॅमिलीत व्यंग नसणार्या दोघीजणी, एक वैनी आणि दुसरी लक्ष्मी. त्यांच्या हाती खर्या अर्थाने फॅमिलीची सारी सूत्रे आहेत. पहिल्या घरातले चौघेजण आणि दुसर्यातले तिघेजण एकत्र आणून ही ‘गम्मत’ जुळवण्याचा धम्माल खेळ रंगविला आहे.
फॅमिली नंबर वनमधला नयन आणि नंबर टू मधली सुनयना, यांच्या ‘दृष्टी’ येण्याच्या वेळा काही जमत नाहीत, पण दोघांच्या घरच्यांना या दोघांची जोडी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू होते. दोघांची भेट, बघण्याचा कार्यक्रम आणि लग्न या प्रवासात एकेक धम्माल किस्से घडतात. व्यंग लपविण्याची ही तारेवरची कसरत सारेजण करतात खरे, पण शेवट आनंदीआनंद! नवरदेव नयन-चंदन आणि नवरी-सायली देशमुख या दोघांनी बेअरिंग मस्त सांभाळले आहे. मुलगा नयन याला दिवसा दृष्टी असते आणि तो रात्री आंधळा होतो, तर मुलगी सुनयना ही दिवसा आंधळी असते, तर रात्री ती डोळस होते. ही कसरत त्यांनी मस्त रंगविली आहे. दोघांची भेट, बघण्याचा कार्यक्रम, लग्नाची तयारी यात जागोजागी हक्काने हशा, टाळ्या आणि शिट्ट्याही वसूल होतात. हशे वसूल करणारी एकही जागा दोघांनी सोडलेली नाही. भट्टी चांगली जमली आहे.
कर्णबधीर दादा सागर कारंडे यांनी ताकदीने उभा करून बारकाव्यांसह टायमिंगचे नेमके तंत्र वापरून प्रत्येक प्रसंग बहारदार केलाय. मुका भाऊ मुकेश हा अजिंक्य दाते याची व्यक्त करण्याची पद्धत काहीदा चटका लावून जाते. पण विनोदाची चांगली समज त्यात दिसते. शेजारच्या घरातील लक्ष्मी- सिद्धीरुपा करमरकर हिने पळापळ चांगली केलीय. आणि वडील नारायणाच्या भूमिकेत अनुभवी रंगकर्मी रमेश वाणी यांनी कहर केलाय. विसरभोळेपणा कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकतो याचा कळसच! आणि सर्वात लक्षवेधी ठरते ती वैनीची भूमिका! सर्व संकटांवर मात करण्यासाठी सज्ज होऊन दोघांना लग्नापर्यंत पोहोचविणारी वैनी- शलाका पवार! अभिनयातील सहजता सर्वांगसुंदरच. अचूक पात्ररचना ही या ‘फॅमिलीत’ली जमेची बाजू म्हणावी लागेल. ही तयारीची टीम आणि रसिक हे दोघेही हे नाट्य ‘एन्जॉय’ करतात, हे महत्त्वाचे!
यातील हसवाहसवीचे अनेक छोटे-मोठे प्रसंग हे अक्षरशः लोटपोट करतात. मुलगी बघण्याच्या प्रसंगात अनेक क्षण ज्याप्रकारे टिपले आहेत ते हसून बेजार करतात. ‘मुलीला गाता येतं का?’ हा दादाने म्हणजे सागर कारंडे याने विचारलेला एकमेव व वारंवारचा प्रश्न आणि कोचावरून खाली उतरलेली स्वारी! मुलीचं ‘ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर’ हे गाणं. त्यावरला कर्णबधीर दादाचा भलताच ठेका, हे सारं काही कळसच. दोन्ही फॅमिलीची या टिपिकल पारंपारिक बघण्याच्या कार्यक्रमात उडालेली फजिती आणि लपवाछपवीसाठी सुरू असलेली धडपडही कमालच! कलाकारांचे टीमवर्क दृष्ट लागण्याजोगे.
लेखन, दिग्दर्शन संतोष पवार याने ‘राजाराणी’चा लोककला फॉर्म यात न वापरता घराच्या चौकटीत फॅमिलीची गम्मत उभी करताना जराही उसंत ठेवलेली नाही. व्यंगांची चेष्टा न होता त्यातून प्रासंगिक हशे कसे वसूल होतील याची दक्षता घेतली आहे. ‘यदाकदाचित’पासून त्याने रसिकांना हसवण्याची जी सवय लावली आहे ती वेगळ्या शैलीतही कायम ठेवण्यात त्याच्यातील दिग्दर्शकाने बाजी मारली आहे. व्यंगातून विनोदनिर्मितीचा हा ‘हटके’ बाज लक्षात राहण्याजोगा. संहितेला तर्कशास्त्र किंवा सत्यतेच्या शक्यता या फूटपट्ट्या न लावता हे निव्वळ हसवणुकीचे नाट्य म्हणून बघितल्यास त्याची लज्जत अधिक वाढेल. भरपेट खळाळून हसविणार्या चैतन्यशाली प्रयोगाचा अनुभव त्यातून मिळतो.
स्थळाला आशय-विषयाचे लागेबंधे असतात आणि हे वास्तववादी नाट्य असल्याने दोन फॅमिलीचे घर महत्त्वाचे ठरले आहे. दोन ‘आमने-सामने’ असलेली घरे. त्यातील निवडक वस्तू, दिवाणखाना, खिडक्या, दरवाजे, तुळशीवृंदावन हे सारं नेपथ्य उभं करतांना ‘अॅक्टिंग एरिया’वर गदा येणार नाही याकडे नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी पुरेपूर लक्ष दिलंय. दोन्ही घरांची रंगसंगती वातावरणनिर्मिती चांगली करतेय. सातजणांचा वावर असूनही कुठेही अडथळ्यांची शर्यत वाटत नाही. नेपथ्यनिर्मितीमागे कल्पकता आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषा, अशोक पत्की यांचे संगीत, किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना याही तांत्रिक बाजू नाट्याच्या शैलीला अनुरूप असून त्यात कुठेही भडकपणा नाही. त्यातून नाट्याचा वेग जपला आहे.
चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रदर्शनापूर्वी ज्याप्रमाणे ‘प्रोमोशूट’ करण्यात येतो. जेणेकरून ‘ट्रेलर’मधून त्याची उत्कंठा वाढते, त्याच धर्तीवर या ‘फॅमिली’चा ‘प्रोमोशूट’ करण्यात आला होता आणि तो दर्दी रसिक आणि देश-विदेशातील नाट्यप्रेमी संस्थांपर्यंत पोहचविण्यात आला. प्रसिद्धीच्या तंत्रात हे एक वेगळेपण या नाटकाने पार केलंय. दुसरं म्हणजे ‘टायटल साँग’. ते देखील ज्येष्ठ, कल्पक संगीतकार अशोक पत्की यांनी वेगळ्या ठेक्यात बांधलं आहे. लंबचौडं टायटल असूनही ते सुरात मस्त गुंफलंय. गोपाळ अलगेरी आणि सुनीता अहिरे या निर्मात्यांनी निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड केलेली नाही.
नाटकाच्या शीर्षकाबद्दल एक नोंद. अशोक पाटोळे लिखित ‘हीच तर प्रेमाची गम्मत आहे’ हे नाटक २००३च्या सुमारास ‘सुयोग’ने रंगभूमीवर आणले होते. त्याचे दिग्दर्शक विजय केंकरे. एका इंग्रजी नाटकावर बेतलेलं ते नाटक चर्चेत होतं. त्या नाटकाच्या शीर्षकातील ‘प्रेमाची’च्या जागी ‘फॅमिलीची’ हा शब्द आलाय. गाजलेल्या शीर्षकाची ही पळवापळवी हा देखील ‘चाणाक्ष’ व सुखद धक्का म्हणावा लागेल! शीर्षकातही ‘गम्मत’ आहे!!
यंदाच्या मौसमात रंगमंचावर आलेल्या ‘वाकडी-तिकडी’ या नाट्यात अपंगत्व, व्यंगाच्या फसवणुकीचा घोळात घोळ होता, तर या ‘फॅमिली’त खरोखरच व्यंगाने ग्रासलेल्या दोन कुटुंबातील सोयरीक जमवणारी ही विनोदी ‘मॅरेज स्टोरी’ आहे, आणि ही दोन्ही नाटके रसिकांपुढे मनोरंजनासाठी एकापाठोपाठ एक हजर आहेत!
हीच तर फॅमिलीची गंमत आहे!
लेखन / दिग्दर्शन – संतोष पवार
नेपथ्य – संदेश बेंद्रे
प्रकाश – किशोर इंगळे
वेशभूषा – मंगल केंकरे
संगीत – अशोक पत्की
निर्माते – गोपाळ अलगेरी / सुनिता अहिरे
निर्मिती – वेद प्रॉडक्शन