प्रबोधनकाराचं पहिलं पुस्तक वक्तृत्वशास्त्र चित्रशाळा प्रेससारख्या आघाडीच्या प्रकाशकाकडून आलं, त्यामुळे गाजलं. त्यासाठी कारण ठरले ते त्यांचे मित्र रा. द. पराडकर आणि दत्तोपंत पोतदार.
– – –
वक्तृत्वशास्त्र ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर चांगल्या प्रकाशकाच्या शोधात नव्या लेखकाचे हाल होतात ते प्रबोधनकारांचेही झाले. पण त्यांचा शोध चांगल्या ठिकाणी पोचला. त्यासाठी ते बराच विचार करून पुण्याला मोरोपंतांचे वंशज रामकृष्ण दत्तात्रय पंत पराडकर यांना भेटायला गेले. मोरोपंतांनी स्वतः लिहिलेल्या पोथ्यांवरून त्यांच्या काव्याचे खंड प्रकाशित करण्याचं काम रा. द. पराडकर यांनी तेव्हा अत्यंत निष्ठेने हाती घेतलं होतं. १९१२ ते १९१६ या काळात त्यांनी मोरोपंताच्या आर्याभारताचे तीन खंड, हरिवंश, मंत्रभागवत, कृष्णविजय, अष्टोत्तरशत रामायणे, संस्कृत काव्यं असे नऊ खंड प्रकाशित केले होते, अशी माहिती `मराठी वाङ्मयकोशा`त मिळते. त्यांनी मोरोपंतांच्या स्फुट काव्याचे आणखी तीन खंड प्रसिद्ध करण्याची तयारी केली होती. पण त्यांच्या हयातीत त्यांचा संकल्प पुरा होऊ शकला नाही.
या पंत पराडकरांची निष्ठा आणि मेहनत यामुळे प्रबोधनकार प्रभावित झाले असावेत. ओळख नसताना ते पराडकरांना सदाशिव पेठेतल्या घरी जाऊन भेटले. पराडकर त्यांच्याशी जिव्हाळ्याने आदर देत वागले. वक्तृत्वशास्त्र ग्रंथाचं हस्तलिखित चोपडं त्यांनी अगत्याने पाहिलं आणि म्हणाले, `व्वा, आपण हा चांगला विषय हाती घेतला. मराठीत या विषयाचा सांगोपांग विचार कोणीतरी करायला हवाच होता. सध्या मीच माझ्या मोरोपंती प्रकाशनाच्या ओझ्याखाली वाकलो आहे. पण चोपडे ठेवा दोन दिवस माझ्यापाशी. काढू काहीतरी मार्ग प्रकाशनाचा.` मोरोपंताच्या काव्यप्रकल्पामुळे पंत पराडकर आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते, हे खरंच होतं. तरीही त्यांनी प्रबोधनकारांना नाराज केलं नाही.
पराडकरांचं सौजन्य इतकं होतं की ते स्वतःच तिसर्या दिवशी हस्तलिखित घेऊन प्रबोधनकारांचा शोध घेत समर्थांच्या वाड्यात आले. तिथे प्रबोधनकार उतरले होते. ते म्हणाले, `हे पहा केशवराव, ग्रंथ फार छान आणि सध्याच्या काळाला अगदी उपयुक्त आहे. हा छापला गेलाच पाहिजे. चला उठा. आपण आत्ताच्या आत्ता आमच्या दत्तोपंत पोतदारांना जाऊन भेटू. दत्तोपंत म्हणजे आमच्या पुण्याचे एक उमलते मोगर्याचे फूल आहे फूल.` तेव्हा पोतदार न्यू पूना कॉलेजात म्हणजे आताच्या सर परशुरामभाऊ कॉलेजात इतिहास आणि मराठी शिकवत. एक तरुण लेखक, रसाळ वक्ते आणि व्यासंगी इतिहास संशोधक म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती. पुण्यातल्या सामाजिक आणि शैक्षणिक कामातही ते हिरीरीने सामील होत असत. पुढे भारत सरकारने त्यांना दिलेल्या महामहोपाध्याय तसंच पद्मभूषण या पदव्या, पुणे विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून केलेलं काम, साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, इंडियन हिस्टरी काँग्रेसची स्थापना अशा अनेक गोष्टींनी त्यांचं मोठेपण सिद्धच झालं.
तर पराडकर प्रबोधनकारांना घेऊन पोतदारांकडे म्हणजे अगदी योग्य ठिकाणी आले. पराडकरांनी प्रबोधनकारांची स्तुती करत पुस्तक छापण्याची गरज अगदी सविस्तरपणे सांगितली. प्रबोधनकार सांगतात की इतकी चांगली प्रस्तावना मलाही साधली नसती. हे ऐकत असतानाच पोतदार एकेक प्रकरण सावकाश चाळत होते. जवळपास एक तास पुस्तकावर बारकाईने नजर टाकल्यावर ते म्हणाले, `अहो, असले उपयुक्त पुस्तक आमच्या काका जोश्यांनीच छापायला घेणे जरूर आहे. चला, आपण आत्ताच जाऊ त्यांच्याकडे. भलतीच मेहनत घेतली आहेत हो या पुस्तकासाठी. चला.`
काका जोशी म्हणजे वासुकाका अर्थात वासुदेव गणेश जोशी. त्या काळात सर्वाधिक प्रतिष्ठित मानल्या जाणार्या चित्रशाळा प्रेस या प्रकाशनगृहाचे ते मालक होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या नंतर त्यांनीच चित्रशाळा प्रेस नावारूपाला आणली होती. ते लोकमान्य टिळकांचे जवळचे सहकारी होते. स्वातंत्र्यलढ्यात, विशेषतः होमरूल चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. शिवाय पहिल्या महायुद्धाच्या काळात नेपाळ नरेशांची संपर्क साधून ब्रिटिशांच्या विरोधात जपानशी हातमिळवणी करण्याचे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले होते. पण त्यांचे हे प्रयत्न पडद्यामागचे असल्याने देशातील एक अग्रगण्य प्रकाशक म्हणूनच त्यांची ओळख राहिली.
अशा या वासुकाका जोशांकडे प्रबोधनकारांना घेऊन जाण्याचं काम पराडकर आणि पोतदारांनी केलं. तिघे चित्रशाळेत गेले. तिथे या दोघांनी प्रबोधनकार आणि त्यांच्या पुस्तकाची जोरदार शिफारस केली. ती इतकी कळकळीची होती की वासुकाका लगेच हो म्हणाले. `तुम्हा दोघांची एवढी शिफारस असल्यावर हो काय, छापतो.` एका नव्या लेखकाचं पहिलंच पुस्तक चित्रशाळेने छापणं हा तेव्हा मोठाच सन्मान होता. हे सारं घडलं ते पंत पराडकर आणि दत्तो वामन पोतदारांमुळे. या दोघांचा उल्लेख प्रबोधनकार `जिव्हाळ्याचे स्नेही` असा करतात. पुढे प्रबोधनकारांवर ब्राह्मणद्वेष्टा असल्याचे आरोप करण्यात आले, तरीही या तिघांच्या मैत्रीत अंतर पडल्याचं दिसत नाही.
`पाक्षिक प्रबोधन`च्या काळात म्हणजे १९२४ साली सातारा मुक्कामी प्रबोधनकार अडचणीत आले होते, तेव्हा पंत पराडकरांनी त्यांना आधार दिला होता. त्याच दरम्यान पराडकरांची कविता `केकार्थकेका` दोन भागांत प्रबोधनमध्ये प्रकाशित झाली होती. मात्र त्यात पराडकरांचं नाव कवी म्हणून नाही तर गायक म्हणून आलं आहे. दत्तो वामन पोतदार आणि प्रबोधनकारांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही खांद्याला खांदा लावून काम केलं. दोघांनी अनेक सभा आपल्या वक्तृत्वाने गाजवल्या. इतिहासाच्या अनेक वादांमध्ये दोघेही हिरीरीने उतरले.
प्रबोधनकारांच्या साठीनिमित्त लिहिलेल्या टिपणात पोतदारांनी या मैत्रीचा उल्लेख केला आहे, `रा. केशवरावांनी साधारण प्रकारे ग्रंथकार म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न आरंभिला त्या काळी योगायोगाने त्यांचा माझा संबंध आला आणि त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा माझ्या मनावर अनुकूल परिणाम झाला. त्यांचेही मजवर प्रेम आहे, असे माझ्या अनुभवास आलेले आहे. केशवराव निर्भीड व धाडसी आहेत. एकाद्या कार्यात ते धडाडीने पडतात आणि मोठ्या आवेशाने आपला गाडा रेटतात, म्हणून त्यांचेविषयी मला कौतुक वाटते.` प्रबोधनकारांना ते किती जवळून ओळखत होते, हे त्यांच्या पुढच्या निरीक्षणांवरून दिसतं, `त्यांच्या लेखणीला धार आहे. त्यांच्या स्वभावातच तुफानी आवेश आहे. त्यांच्या गुणांच्या मानाने त्यांना यश लाभले नाही, असे मला वाटते. शब्दांचा मार देताना दिसतात तितके ते `भयंकर` नाहीत. आमचे केशवराव फिरले पुष्कळ, पण ठरले कोठेच नाहीत. यांतच त्यांचे सारे गुणही आले आणि दोषही आले.`
प्रबोधनकारांनीही या दोघांचे ऋण आत्मचरित्रात मानले आहेत, `माझा पहिलावहिला ग्रंथ, त्याला थोर विद्वानांच्या अभिप्रायाचे आशीर्वाद, चित्रशाळेचे प्रकाशन, आणि या सगळ्या भाग्याचे श्रेय दत्तोपंत पोतदार आणि पंत पराडकर यांचे.` यात उल्लेख असणार्या विद्वानांच्या अभिप्रायाची कल्पना वासुकाका जोशींची. पुस्तकाच्या प्रकाशनाच्या आधीच मातब्बर विद्वानांचे अभिप्राय मिळवून छापण्याचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी त्यांनी १२-१५ कापडी बांधणीच्या प्रती तयार करून घेतल्या. काही प्रबोधनकारांना दिल्या तर काही पोष्टाने पाठवून अभिप्राय मागवले. पुस्तकात ज्यांचे अभिप्राय आहेत, त्यांची यादीच प्रबोधनकारांनी दिली आहे.
बॅ. मुकुंदराव जयकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका काशीबाई हेरलेकर, प्राचीन इतिहासाचे विद्वान रावबहाद्दूर चिंतामणराव वैद्य, कोलकात्याचे रावबहाद्दूर बाळकृष्ण आत्माराम उर्फ भाईसाहेब गुप्ते, प्रार्थना समाजाचे नेते कवी नाटककार रावबहाद्दूर मोरेश्वर विष्णू महाजनी, विद्वान अनुवादक लेखक रावसाहेब गोविंद वासुदेव म्हणजेच गो. वा. कानिटकर, करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी, काळकर्ते प्रा. शिवरामपंत परांजपे, कोल्हापूरचे प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. खेडकर, अशी एकापेक्षा एक जाणकार विद्वानांनी आपले अभिप्राय आधीच दिले होते. ते ग्रंथात छापण्यात आले.
पण या ग्रंथात नसलेला एक अत्यंत महत्त्वाचा अभिप्राय होता, तो म्हणजे लोकमान्य टिळकांचा. तो कसा मिळाला आणि या पुस्तकाच्या निमित्ताने प्रबोधनकारांची लोकमान्यांशी कशी भेट झाली, याचे किस्से प्रबोधनकारांनी सांगितले आहेत. ते स्वतंत्रपणेच नोंदवावे लागतील.