आमच्या एकूणच नाट्यपालनपोषणाचा तो काळ होता. आमच्यासारखे अनेक रंगकर्मी तेव्हा प्रायोगिक रंगभूमीवर उपडी वळत होते, पावले टाकून चालायला शिकत होते, लेखनांतून बोबडे बोल उच्चारत होते अशा काळात ‘गार्बो’, ‘गोची’, ‘चल रे भोपळ्या’, ‘सूर्यास्ताच्या प्रथम किरणापासून…’, ‘पार्टी’, ‘जुलूस’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘पाहिजे जातीचे’ ही प्रायोगिक नाटके आकर्षित करीत होती.
– – –
१९७५ साली जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमधले आम्ही शेवटच्या वर्गातले सगळे विद्यार्थी वार्षिक स्टडी टूरला कर्नाटकात जाऊन आलो होतो. शेवटच्या वर्षी त्यावर आधारित ‘टूरटूर’ नावाची एकांकिका केली आणि ती खूप गाजली. तोच आमचा सगळा ग्रूप आजही ‘मित्र’ म्हणून एकत्र आहे आणि तो ग्रूप म्हणजेच त्यावेळी स्थापन झालेली ‘या मंडळी सादर करू या’ ही नाट्यसंस्था. ही आमची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था १९७६ साली स्थापन झाली. या संस्थेतर्फे छबिलदासमध्ये आम्ही चार एकांकिकांचे एकत्रित प्रयोग केले. त्यातल्या दोन मी लिहिल्या होत्या आणि दोन रघुवीर कुलने. प्रा. षांताराम पवार आमचे अध्यक्ष होते. अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, चिं. त्र्यं. खानोलकर, मनोहर काटदरे हे त्यांचे मित्र. आविष्कार या संस्थेसाठी नेपथ्य आणि ‘तुघलक’ची प्रसिद्धी षांताराम पवार सरांनी केली होती.
छबिलदासकडे..
जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे सहायक डीन प्रा. दामू केंकरे हे आमचे मार्गदर्शक होते. त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून प्रयोगिक रंगभूमीबद्दल मार्गदर्शन व्हायचे. छबिलदासमध्ये नुसत्या एकांकिका करू नका, तिथे सुरु असलेली नाटकेही बघा असेही ते म्हणायचे. छबिलदास शाळेच्या हॉलमध्ये ‘आविष्कार’च्या पुढाकाराने प्रायोगिक नाटके व्हायची. आम्ही ती आवर्जून पाहायचो. तिथे मी पाहिलेले पहिले प्रायोगिक नाटक म्हणजे विजय बोंद्रे दिग्दर्शित ‘क्षितिज रेषा’. त्यात विनय आपटे प्रमुख भूमिकेत होता. त्या नाटकाने मला तत्कालीन व्यावसायिक नाटकांच्या प्रेमातून बाहेर काढले, छबिलदासमधील प्रायोगिक नाटके बघण्याचा सपाटाच लावला मग.
अच्युत वझे लिखित आणि अमोल पालेकर दिग्दर्शित ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक‘ नवाच्या नाटकाने एक वेगळाच, अमूर्त पेंटिंग बघितल्याचा आनंद दिला. अत्यंत चटपटीत संवाद, आणि बोचरे विनोद, तशात दिग्दर्शनीय शैली अॅबसर्ड. अत्यंत साधेपणा आणि सोप्पे चित्रात्मक अनुबंध, या नाटकाचे त्यावेळी दूरदर्शनवर प्रसारण झाले आणि त्यातले ‘बस आली, बस आली, अरे आपली नव्हे ती बस…’ हे संवाद ‘शोले’तल्या गब्बरसिंगच्या संवादाप्रमाणे तरुणांच्या तोंडात बसले. या संवादाचा गर्भितार्थही अमूर्तच होता… तरुणांच्या आशाआकांक्षांचा लोळ कुठेतरी उठलाय आणि तो आपल्या दिशेने येतोय, असा काहीसा सिंबॉलिझम त्या संवादातून व आकृतीबंधातून दिसे.
अमोल पालेकर हे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून पेंटिंगचा अभ्यासक्रम शिकून आलेले विद्यार्थी. अमूर्त शैलीतली चित्रकला हा त्यांच्या अभिव्यक्तीचा आणि चित्रांचा विषय. तीच शैली त्यांनी नाटक दिग्दर्शित करताना अंगीकारली असावी. कधी एखाद्या लेखकाची लेखनशैली स्वत:च्या अमूर्त शैलीत दिग्दर्शन करून साकारली, तर कधी एखाद्या लेखात त्यांना तशा प्रकारची कलाकृती दिसली. कवी प्रा. सदानंद रेगे यांच्या नाटकातल्या पात्रांची रोजच्या जीवनात झालेली कोंडी त्यांनी संवादातून व्यक्त केली आणि पालेकरांनी दिग्दर्शन करताना नटनट्यांचा वापर ‘सामुग्री’सारखा करून अमूर्त शैलीतल ‘गोची’ हे नाटक सादर केले. त्यात चित्रा पालेकर आणि दिलीप कुलकर्णी यांचा कोरस म्हणून केलेला वापर नाटकाच्या फॉर्मची वीण घट्ट करीत होता. अच्युत वझे या भन्नाट लेखकाने लागोपाठ सहा सात नाटके लिहिली आणि प्रायोगिक चळवळीत लखलखाट जिवंतपणा ठेवला. ‘षड्ज’ या नाटकानंतर ‘भोपळा’, त्यानंतर ‘सोफा कम बेड’ हे अफलातून चमकदार कल्पनेवर आधारित नाटक आणि त्यातली विनय आपटेची बंडखोर बॉक्सर ‘जोमो’ची कडक भूमिका आजही विसरू शकला नाही.
दिवाकरांच्या नाट्यछटा अमोल पालेकरांनी रंगावृत्तीत सादर केल्या. तोपर्यंत ‘छबिलदास’ने चांगलेच अंग धरले होते. त्याहीपूर्वी बादल सरकार यांची मुक्तशैलीतली नाटके कलकत्त्यात पाहून अत्यंत प्रभावित झालेले अमोल पालेकर यांनी बादलदांचा एक वर्कशॉप मुंबईत आयोजित केला होता. त्यातून पुढे बादल सरकार लिखित ‘जुलूस’ हे नाटक पालेकरांनी दिग्दर्शित केले आणि ‘बहुरूपी’ या प्रायोगिक नाट्यसंस्थेतर्पेâ ते सादर केले. ‘जुलूस’ हे नाटक डाव्या विचारसरणीचे, राजकीय आणि परिणामी सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे. बादल सरकार यांची लेखक म्हणून त्यात एक विशिष्ट भूमिका होती. काँग्रेसी किंवा भांडवलशाही धोरणावर कम्युनिस्ट विचारसारणीच्या लेखकाची कडवट प्रतिक्रिया प्रसंगांमधून येत होती. पण नाटक उभे राहते ते साठ सत्तर कलावंताच्या जथ्थ्यात. पिरामिड्स, शारीरिक आकृतींचे अनुबंध, आवाजाचा विशिष्ट वापर, झुंडीने कलावंत येत आणि शारीर अभिनय करून विविध काँपोझिशन्समधून प्रसंग उभे करीत. कवायतसदृश अशी एक परेडच आपण पाहतोय की काय असं वाटे आणि त्यातून उभं राहायचं एक सद्य:स्थितीवर भाष्य करणारं अत्यंत परिणामकारक असं नाटक. मध्यंतरविरहित. छबिलदासचा तो इंटिमेट थिएटरचा अवकाश भारून टाकणारे ते नाटक होतं. प्रोसिनियम काढून संपूर्ण हॉल मोकळा केला जायचा. प्रेक्षक मध्ये किंवा चारही बाजूने बसलेले असायचे. चारही बाजूंचे दरवाजे ‘एन्ट्री एक्झिट’साठी मोकळे ठेवले जायचे. कधीही कुठूनही ‘जथ्था’ यायचा आणि त्यातले प्रसंग सादर करायचा. असे हे अत्यंत परिणामकारक नाटक प्रायोगिक रंगभूमीचा ‘माइलस्टोन’ ठरले. पुढे अनेक वर्षे प्रायोगिक एकांकिकांमधून, नाटकांमधून ही कवयतीची शैली अनुकरणीय ठरली. इतकी की नंतर त्याचा उबग येऊ लागला.
अमोल पालेकरांनी छबिलदासची रंगभूमी कार्यरत होण्यापूर्वी मिळेल त्या स्पेसमध्ये नाटकांचे प्रयोग करून प्रायोगिक नाटक प्रोसिनियमच्या बाहेर आणले. नंतर छबिलदास सुरु झाल्यावरही असे प्रयोग सुरूच होते. अपवाद महेश एलकुंचवार लिखित ‘पार्टी’ या नाटकाचा. एलकुंचवारांची या नाटकातली पात्रे, नाटक रंगत जाई तसतशी सोलून निघत असत, संपेपर्यंत सुरुवातीची आणि शेवटी उघडी पडलेली माणसे पाहून अस्वस्थपणा येत असे. वास्तव शैलीच्या जवळ जाणारे हे नाटक बहुधा पालेकरांचे दिग्दर्शित असे पहिले नाटक असावे. कारण लेखकही तितकाच प्रयोगशील होता. चिं. त्र्यं. खानोलकर लिखित, अमोल पालेकर दिग्दर्शित ‘अवध्य’ हे नाटक वरवर जरी ‘कळले’ असे वाटले तरी खरेच कळले नव्हते. अर्थात त्या वयात आलोही नसू कदाचित. कारण त्या नाटकाची समीक्षा प्रख्यात समीक्षक माधव मनोहर यांनी ‘मराठी रंगभूमीवरील वयात आलेले पहिले नाटक‘ असे केले होते.
आमच्या एकूणच नाट्यपालनपोषणाचा तो काळ होता. आमच्यासारखे अनेक रंगकर्मी तेव्हा प्रायोगिक रंगभूमीवर उपडी वळत होते, पावले टाकून चालायला शिकत होते, लेखनातून बोबडे बोल उच्चारत होते. अशा काळात अमोल पालेकरांची ‘गार्बो, गोची, चल रे भोपळ्या, सूर्यास्ताच्या प्रथम किरणापासून…’, ‘पार्टी’, ‘जुलूस’ तसेच डॉ जब्बार पटेल यांचे ‘घाशीराम कोतवाल’ आळेकरांची ‘महानिर्वाण’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’, अरविंद देशपांडे यांची ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘पाहिजे जातीचे’ ही प्रायोगिक नाटके आकर्षित करीत होती, आमच्यावर संस्कार करीत होती. विजया मेहता, दामू केंकरे, माधव वाटवे आदी ‘रंगायन’कार दिग्दर्शक आणि त्यांची नाटके हे पर्व तोपर्यंत संपून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर वेगळी नाटके करायला सुरुवात केली होती. वझे, आळेकर, एलकुंचवार आणि त्यावर कळस म्हणजे ‘तेंडुलकर’ हे प्रवाह उसळत होते.
छबिलदासमध्ये हिंदी नाटकेही व्हायची. त्यात मोहन राकेश यांचे ‘आधे अधुरे’ पाहिले. नसिरुद्दीन शहा यांचा लखलखता अभिनय, अमरीश पुरी, सुनीला प्रधान, भक्ती बर्वे, नीना गुप्ता या सर्वांनी वेड लावले होते. सत्यदेव दुबे नावाचे ‘विद्यापीठ’ छबिलदासच्या खाली भेटले, की आपोआप शाळा भरायची. आम्ही खाली रेंगाळत असायचो ते थोड्या वेळाने वर सुरु होणारे गिरीश कर्नाड लिखित आणि सत्यदेव दुबे दिग्दर्शित ‘हयवदन’ नाटक बघण्यासाठी… त्यात अमोल पालेकर, अमरीश पुरी आणि सुनीला प्रधान यांच्या अप्रतिम भूमिका होत्या. दुबेजींचं कडक दिग्दर्शन. प्रयोग सुरु व्हायच्या एक तास आधी ही सर्व मंडळी हजर असायची. ग्रीन रूममध्ये ते काय गप्पा मारतात, कसे वावरतात याचीही उत्सुकता असायची. काकडे काकांना भेटायच्या निमित्ताने एक कान त्यांच्या गप्पांकडे आणि दुसरा काकडे काकांकडे, असे आम्ही ‘या मंडळीकर’ तिथे ‘बारावा गडी’ असल्यासारखे वावरायचो आणि मग ‘संगीत हयवदन’ सुरु व्हायचे. त्यातला मल्ल आणि खडकाळ कपिल (अमरीश पुरी) तर विद्वान आणि सर्वांगसुन्दर देवदत्त (अमोल पालेकर) आणि सौंदर्याचे प्रतीक असलेली नायिका पद्मिनी (सुनीला प्रधान). ते नाटक म्हणजे माझ्यासाठी लेखन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय, वेशभूषा यांचा वस्तुपाठच होता. मी दुबेजींचा वर्कशॉप कधी केला नव्हता किंवा त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम केले नाही. पण हे नाटक इतक्या वेळा पाहिले की आज त्याची संहिता वाचली तरी ते नाटक पात्रांसहित जसेच्या तसे माझ्यासमोर उभे रहाते.
तीच गोष्ट ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’ या नाटकांची. तेंडुलकर, जब्बार पटेल आणि सतीश आळेकर यांनी या नाटकांमुळे अक्षरश: झपाटून टाकले होते… ‘घाशीराम कोतवाल’ इतक्या वेळा पहिले की ते जवळजवळ पाठ झाले होते. रवी साठे माझा जवळच मित्र, त्याला सांगून ठेवले होते की, तुमच्यातले तालवाद्ये वाजवणारे कधी आले नाहीत तर मला बोलव. सगळा रिदम वाजवेन… टेन्शन नको.. तसे झाले नाही..
मात्र एकदा मी छबिलदासला ‘काय वाट्टेल ते’ हे जया दडकर यांचे नाटक, जे अरुण होर्णेकर यांनी बसवले होते, ते बघायला गेलो, तर अर्धा पाऊण तास नाटक सुरूच होईना. नंतर कळले त्यातला वाजवणारा आला नाही. तशात आतल्या मंडळींना मी नाटकाला आल्याचे कळले, त्यांनी मला विनंती केली आणि मी चक्क वाजवायला बसलो, नाटक अंदाजाने वाजवले, ते बरोबर निघाले.
त्याआधीच्या छबिलदासी नाटकांमुळे आणि तिथल्या प्रायोगिक नाटकांच्या प्रभावामुळे आमच्या ‘सबकॉन्शस माइंड’मध्ये काही नाटके आकार घेत होती, त्यातूनच पुढे ‘अलवारा डाकू’सारखे नाटक माझ्याकडून घडले असावे. छबिलदासमध्ये ‘अलवरा डाकू’च्या प्रयोगांमुळे तिथल्या वार्या वाढल्या. अरविन्द देशपांडे, सुलभाताई, काकडे काका, जयदेव हट्टंगडी वगैरे अविष्कारची मंडळी आमच्यावर जाम खूश होती. काकडे काका आणि जयदेव तर सतत मदतीला तत्पर असायचे. ‘पाहिजे जातीचे’च्या रिहर्सल छबिलदासमध्येच व्हायच्या. त्याही आम्ही अगदी अभ्यासक्रम असल्यासारखे बघायचो. नंतर त्याचे प्रयोग सुरू झाले, तेव्हा त्याची पारायणे केली.
एकदा अरविन्द देशपांडे (त्यांना सर्वजण ‘पप्पा’ म्हणायचे, आम्हीही) छबिलदासच्या खालीच भेटले आणि म्हणाले, ‘अरे आमचं एक बालनाट्य येतंय. पार्वतीकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश पुरवसर ते बसवतायत. तू त्याची वेशभूषा आणि नेपथ्य करशील काय?’ मला आनंदच झाला, पण मी त्यावेळी नेमकं आयएनटीचे ‘खंडोबाचे लगीन’ बसवत होतो. त्यामुळे मी त्यांना म्हटले, ‘मला आवडलं असतं, पण मी ‘खंडोबाचं लगीन’ बसवतोय, त्यापेक्षा मी आमच्या या मंडळीतल्या, दोघांना तुमच्याकडे उद्या पाठवतो, प्रदीप मुळ्ये आणि रघुवीर कुल, दोघेही सॉलिड आहेत, ते करतील’. आणि तसेच झाले, ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकाचे नेपथ्य आणि वेशभूषा प्रदीप मुळ्ये आणि रघुवीर कुल यांनी केली ती प्रचंड गाजली. पुढे प्रदीप मुळ्ये ‘आविष्कार’चा एक प्रमुख रंगकर्मी झाला. रघू सिनेमात गेला. ‘खंडोबाचं लगीन’नंतर माझ्या मनात एक वेगळेच नाटक घोळत होते. माझ्याच एका एकांकिकेवर आधारित ‘टुरटूर’.
त्या काळात ज्या अमोल पालेकरांची ‘जुलूस’ ‘गोची’ ‘पार्टी’ (लेखक : महेश एलकुंचवार) ‘जुलूस’ आणि ‘हयवदन’सारखी नाटके प्रभावित करीत होती, त्याच अमोल आणि चित्रा पालेकरांबरोबर चार फुटांवर बसून कधीकाळी मी माझं पाहिलं व्यावसायिक नाटक वाचून दाखवीन असं मला वाटलंही नव्हतं.
शिवाजी मंदिरकडे…
त्याचं असं झालं… ‘टूरटूर’ या माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचं कास्टिंग सुरु होतं. गोट्याने (लक्ष्मीकांत बेर्डेने) एक फोन नंबर हातात दिला आणि म्हणाला…’ बाळा, (म्हणजे मी) हा चित्रा पालेकरचा नंबर… तिला फोन कर.. मी तिच्याशी बोललोय… तिला स्क्रिप्ट ऐकायचंय… फोन करुन वेळ ठरव…’ ‘टुरटुर’ नाटकाचं कास्टिंग सुरु होतं… पण नीट होत नव्हतं… नाटक लिहिताना गोट्या आणि विज्या कदम ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणून डोक्यात फिट्ट होते. प्राध्यापक आणि त्या मुलीची भूमिका कोण करणार?… तेवढ्याच ताकदीचे कास्टिंग हवे होते… दिलीप प्रभावळकर, भक्ती बर्वे यांच्यासारखी नावे समोर होती.
एक जानेवारी १९८३ला माझ्या ‘चौरंग’ या व्यावसायिक नाट्यसंस्थेचा आणि ‘टुरटुर’ नाटकाचा मुहूर्त ठरला होता… वसंत सबनीस यांच्या हस्ते संस्था आणि नाटक दोहोंचा मुहूर्त होणार होता… त्याच्या अधीच सर्व कास्टिंग ठरायला हवे असा माझा हट्ट होता…
लक्ष्याने चित्रा पालेकरचे नाव सुचवले. मी म्हटले, ‘ती करेल? व्यावसायिक नाटक आहे… तिला इंटरेस्ट असेल?’
‘विचारुन तर बघ… आपलं नाटक वेगळं आहे म्हणून केलं तर करेल…’ लक्ष्या.
मी ताबडतोब होकार दिला, त्याने तिचा फोन नंबरच दिला आणि मी चित्रा पालेकरांना फोन केला.. ‘३१ तारखेला संध्याकाळी ५ वाजता… चालेल?’ मी बेधडक ‘हो’ म्हटले… नंतर लक्षात आले… ३१ डिसेंबर म्हणजे पार्टीचा दिवस… आमची या मंडळींची पार्टी… शिवाय बाबाभाई मेहता यांची पार्टी.. तिथे अख्खी नाट्यसृष्टी येते… आणि लक्ष्या तिथला प्रमुख मॅनेजर… म्हणजे तो या वाचनाला नसणार… दुसर्या दिवशी सकाळी ११ वाजता मुहूर्त… समजा चित्राला भूमिका आवडली आणि नाटक आवडले नाही किंवा नाटक आवडले पण भूमिका आवडली नाही तर? शिवाय प्राध्यापकाची भूमिका कोण करणार? समोर काहीच स्पष्ट होत नव्हते… तरीही म्हटले जे होईल ते होईल…
मी वाचनाची तयारी केली… वाचनाला अमोल पालेकर असण्याची शक्यताच नव्हती… कारण तो तोपर्यंत अनेक हिंदी चित्रपटात व्यग्र होता… त्याआधी सहा वर्षे, म्हणजे १९७८मध्ये माझे ‘अलवरा डाकू’ नाटक राज्य नाट्य स्पर्धेत गाजले होते.. त्या स्पर्धेच्या प्रयोगाला दिलीप कुळकर्णी, हेमू अधिकारी, विजय शिर्के हे ‘बहुरुपी’ या नाट्यसंस्थेचे कलाकार हजर होते… त्यांनी अमोल पालेकरांकडे आमच्या ‘अलवरा’चे प्रचंड कौतुक केले… त्यामुळे छबिलदासच्या एका प्रयोगाला अमोल, चित्रा आणि त्यांचे मित्रमंडळ आले होते… त्यांनी नाटकाचे अमाप कौतुक केले… शिवाय जाताना अमोलनी लक्ष्याकडे निरोप दिला… ‘तू आणि पुरुषोत्तम येत्या दोन दिवसांत मला भेटा… या नाटकावर आपण बोलू…’
‘काय बोलणार आहोत आपण आता या नाटकावर?’ मी लक्षाला विचारले… कारण तोपर्यंत नाटक खूप गाजले होते… शिवाय छबिलदासला सुरुवातीला बर्यापैकी गर्दी असे. नंतर नंतर म्हणजे चार पाच प्रयोग आम्ही कसेबसे लावले… बघायचे होते अनेकांना, पण यायचे खूप थोडेच… माफक गर्दीत प्रयोग व्हायचे… एका प्रयोगाला तर दोनच तिकिटे गेली होती आणि पाच मिनिटे आधी एक तिकिट गेले… ती तिकिटधारी व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मी सत्यदेव दुबे… प्रयोग करायचा की नाही या विचारात असतानाच दुबेजी आत आले आणि जवळ जवळ तंबीच्याच सुरात दम देउन म्हणाले… हे तीन प्रेक्षक तीनशे आहेत समजून प्रयोग करा… शो मस्ट गो ऑन…’ तो प्रयोग प्रत्यक्ष दुबेजींसमोर दणक्यात सादर झाला… खरे तर नाटकापेक्षा प्रयोग कसे होणार याचीच काळजी आम्हाला होती… त्यात पालेकर आता काय चर्चा करणार कळत नव्हते… पण लक्षा खूप पॉझिटिव्ह थिंकिंगवाला होता.. त्याने अमोल आणि चित्राबरोबर ‘अनिकेत’ या पालेकरांच्या नाट्यसंस्थेच्या ‘गड्या आपला गाव बरा’ या नाटकात काम केले होते. ‘आपण जाऊन तर येऊ, बघूया काय म्हणतोय अमोल..’ लक्ष्याने सल्ला दिला… (बाय द वे… ‘टुरटुर’ नाटक हिट झाल्यानंतर आम्ही एकमेकांना लाजेखातर ‘गोट्या’ आणि ‘बाळा’ म्हणणे सोडून ‘लक्ष्या’ आणि ‘पुरु’ म्हणायचे ठरवले, नंतर तो लक्ष्मीकांत बेर्डे झाला.)
दोन दिवसांनी फोनाफोनी करुन मी आणि लक्ष्या सकाळी सात वाजता, हो पालेकरांनी सकाळी सात वाजता गोवालिया टँकच्या घरी बोलावले होते, तिथे गेलो… तोपर्यंत पालेकर ‘रजनीगंधा’, ‘छोटीसी बात’, ‘दामाद’सारख्या सुपरहिट्ट सिनेमांचे मोस्ट वाँटेड हिरो होते.. त्यांना भेटायला पालेकरांचा भूतकाळ, म्हणजे दोन रंगकर्मी.. त्यातला एक चित्रकार, दिग्दर्शक आणि दुसरा भावी सुपरस्टार, म्हणजे मी आणि लक्ष्या, भेटायला चाललो होतो…
दरवाजाची बेल वाजवली.. एक गृहस्थ दरवाजा उघडायला आले…
‘अमोल आहे? ‘ लक्ष्याने विचारले…
अमोलचा एकेरी उल्लेख लक्ष्याने इतक्या आत्मविश्वासाने केला की त्याने पुढचा प्रश्न न विचारता आम्हाला सरळ आत घेतले… हॉलमध्ये सोफ्यावर अमोलदादाची वाट बघत आम्ही बसलो. बसल्या बसल्या चाळा म्हणून हे बघ ते बघ करताना समोरच्या एका पेंटिंगकडे लक्ष गेले… एक अॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग होते ते. अमोलदादाचंच असावं. मी शांतपणे बघत होतो… तेवढ्यात माझं लक्ष लक्ष्याकडे गेलं… तोही ते पेंटिंग बघत होता आणि मला धडकी भरली… मुळगांवकर, दलाल यांच्या वास्तववादी चित्रांच्या पलीकडे न गेलेला, (तेही दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावरील) लक्ष्या या पेंटिंगवरुन घोळ घालणार याची पाल माझ्या मनात चुकचुकली…
‘पुरु.. हे काय काढलंय?’… पेंटिंग बघता बघता लक्ष्याने मला विचारले..
‘तुला जेवढं कळतंय तेवढंच आहे ते.. अशा चित्रांचा अर्थ विचारायचा नसतो..’
पण लक्ष्या हट्ट सोडेना…’ मी अमोललाच विचारतो…’
‘ए बाबा… हात जोडतो… असलं काही करु नकोस… गप्प बस… ‘
‘का?’
‘इन्सल्टिंग आहे ते…’
‘काय नाय… अमोल माझा जुना मित्राय… मी विचारेन.’
‘लक्ष्या प्लीज… आपल्याला ज्या कामासाठी बोलवलंय ते करुन निघूया…’
तरीही अमोलदा बाहेर येताच लक्ष्याने संधी साधून विचारलेच…
‘अमोल… हे कसलं पेंटिंग आहे?’
मला वाटलं, आता अमोलदा अॅबसर्ड, फॉर्म्स वगैरेचं महत्व समजावून सांगतील. पण अचानक आलेल्या प्रश्नावर अजिबात न डगमगता पालेकरी थाटात अमोलदाने उत्तर दिले…
‘अरे हे फक्त बघायचं… कळलं तर ठीक… नाही तर सोडून द्यायचं…’
असं म्हणून अमोलदाने सतत वाजणार्या फोनला हातात घेतले… आणि त्याचवेळी पेंटिंगचा मुद्दा हातावेगळा झाल्याने मी सुटकेचा श्वास घेतला…
समोर सारखा फोन घणघणत होता… एक बंद झाला की दुसरा… अमोलदाने फोनवर उत्तरे देऊन आमच्याकडे मोर्चा वळवला…
‘सुंदर नाटक… राणी आणि अशोक वंजारी एक्सलंट… पण ह्याचे प्रयोग व्हायला हवेत’…
अमोलदाने आल्या आल्या विषयाला हात घातला… पुन्हा नाटकाचे आणि या मंडळीचे कौतुक केले… नुसते कौतुक करुन न थांबता ‘पुरु, तू आमच्या विजय शिर्केला भेट… ‘अनिकेत’ या आमच्या संस्थेतर्फे आपण पाच प्रयोग छबिलदासला करु…’
आम्हाला तो सुखद धक्का होता… राज्य नाट्य स्पर्धेत स्पर्धेचा प्रयोग करताना संस्थेचे कंबरडे मोडलेले असते… त्यानंतर प्रयोग करण्यासाठी उत्साह असतो, पण आर्थिक गणिते जमत नाहीत…’ अलवरा डाकू’ उभं करताना त्याच्या रिहर्सल्स आणि खर्च अफाट होत होता. पण त्यावेळी व्हीटीचे कॅनन स्टॉलवाले आप्पा दांडेकर आमच्या पाठीशी उभे राहिले. पुढे पाच सहा प्रयोग कसेबसे केले आणि गाडी अडून राहिली होती…
‘अमोल पालेकर सादर करीत आहे..
या मंडळी सादर करुया ‘अलवरा डाकू’
अशी एक छोटी जाहिरात केली… छबिलदासमध्ये त्याचा खूप परिणाम झाला. पालेकरांच्या नावामुळे उत्सुकतेपोटी अनेकांचे पाय आपोआप छबिलदासकडे वळले… नाटकाबद्धल उत्सुकता होतीच… आमचाही उत्साह द्विगुणित झाला आणि त्यानंतर पंचवीस प्रयोगही सहजपणे झाले.
पालेकरांशी पहिला ‘एन्काउंटर’ मस्तच झाला… लक्ष्याला त्यातून पेंटिंगबद्दल चांगला डोस मिळाला… त्यानंतर पालेकर जुहूच्या ‘चिरेबंदी’ बंगल्यात गेले… आणि ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी पाच वाजता मी ‘टुरटुर’चे स्क्रिप्ट घेऊन ‘चिरेबंदी’वर गेलो…
बहादूरने फारशा चौकशा न करता आत घेतले…
चित्राशी बर्याच गप्पा झाल्या. चहा वगैरे होईपर्यंत मला वाटले होते की नाटक ऐकायला चित्राच असेल… पण एकदम आश्चर्याचा धक्काच बसला… बंगल्याच्या आतल्या जिन्यावरुन अमोलदा खाली उतरत होता… पांढरे शुभ्र धोतर आणि सदरा… अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्वातला तो हिंदी सिनेमाचा आघाडीचा नायक आणि मराठी प्रायोगिक रंगभूमीचा अध्वर्यू खाली उतरला… आणि म्हणाला… ‘चला आपण त्या रूममध्ये बसून स्क्रिप्ट ऐकूया…’ क्षणभर मला कळलेच नाही, कारण चिरेबंदी बंगल्याच्या ‘त्या’ रूमवर माझ्या नाटकाचे वाचन मी करणार होतो… आणि ऐकणार होते… अमोल आणि चित्रा पालेकर…
वाचन संपले… जेजेच्या स्टडी टूरवर आधारित असल्यामुळे अमोलदाला ते खूप आवडले… ‘मस्त आहे’ अशी शाबासकीही दिली. चित्रा मात्र त्यातल्या टॉमबॉइश भूमिकेवर प्रचंड खूश झाली. ‘पुरू, तू मला नवीन वर्षाचं छान गिफ्ट दिलंस’ असं म्हणून तिने मला होकारच दिला… म्हणजे नाटक करणार असल्याचं प्रमाणपत्रही दिलं…
पुढे चित्राने ‘टूरटूर’च्या रिहर्सल्स, प्रयोग, दौरे वगैरे करीत जवळ जवळ ९० प्रयोग केले. शंभराव्या प्रयोगासाठी एक भलामोठा केक आणून आनंदही साजरा केला. छबिलदासचे रंगकर्मी याच सत्तर ऐंशीच्या दशकात वेगवेगळे ‘ब्रेक’ मिळून मराठी नाटक, सिनेमा, तसेच हिन्दी चित्रपटसृष्टी गाजवू लागले.
ब्रेक के बाद
अमोल पालेकरांचा प्रायोगिक नाटकांचा दिग्दर्शक, अभिनेता ते हिंदी सिनेमातला एक सुपरस्टार अशा प्रवासाचा एक ट्रॅक. चित्रा पालेकरबरोबर ‘टूरटूर’ नाटकाच्या प्रवासापर्यंत एक आदर्श सहप्रवासी म्हणून अनुभवला.
डॉ. जब्बार पटेल यांचे एकामागोमाग एक सिनेमे आले. नाना पाटेकर ‘महासागर, ‘हमीदाबाईची कोठी’ करून ‘पुरुष’चा सुपरस्टार झाला आणि पुढे मराठी हिन्दी सिनेमे गाजवू लागला. भक्ती बर्वे, रीमा लागू, नीना कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, दिलीप कुलकर्णी, मोहन गोखले, मंगेश कुलकर्णी यांचा अभिनेत्री व अभिनेता म्हणून प्रायोगिक ते व्यावसायिक असा प्रवास सुरू झाला होता. दिग्दर्शकांमध्ये, दिलीप कोल्हटकर, विनय आपटे, प्रकाश बुद्धीसागर, विनय आपटे, वामन केंद्रे, विजय केंकरे, कुमार सोहोनी यांचाही प्रायोगिक ते व्यावसायिक प्रवास सुरू झाला.
तोपर्यन्त मी स्वत:च्या व्यावसायिक नाटकांच्या कारकीर्दीत रमलो होता आणि लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा दुसरा सुपरस्टार माझ्याबरोबर वावरत होता. पुढे, शिवाजी मंदिर ते प्लाझा हा दोन मिनिटांचा रस्ता क्रॉस करायला मला सहा वर्षे लागली.