अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्याही वादाशिवाय घडणे हे आजच्या काळात फारच अवघड. उदगीरला नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली असे शांत शांत साहित्य संमेलन झाले. भारतीय जनता पक्ष पुरस्कृत दडपशाहीच्या, मुस्कटदाबीच्या वातावरणाबद्दल सासणे यांनी काही खडे बोल सुनावल्यावर साहित्य संमेलनात साहित्याची चर्चा व्हावी, इतर विषयांची कशाला, असले अशक्त सूर एका विशिष्ट गोटात उमटले खरे; पण साहित्य संमेलन वादंगाविना पार पडले. एकेकाळी दर संमेलनामध्ये कोणत्या ना कोणत्या वादाचा धुरळा उडायचाच. साहित्य संमेलनांना भक्कम आर्थिक पाठबळ असलेले पुरस्कर्ते लागतात. ते पाठबळ अर्थातच राजकारणी पुढार्यांकडे असते. त्यांनी खर्च करावा आणि वर कमीपणा घेऊन साहित्यिकांना मोठेपणा द्यावा, अशी साहित्यिकांची अपेक्षा असते. काही सुजाण, रसिक आणि साहित्यप्रेमी राजकारणी अशी भूमिका घेत. मात्र संमेलनात व्हायचे ते वाद होतच असत. त्यावर खास ठाकरी शैलीत टिप्पणी करणारे हे व्यंगचित्र. साहित्यातील राजकारण आणि चारित्र्यहननाचा उकिरडा साफ कुणी करायचा असा खडा सवाल इथे साक्षात माता सरस्वतीच करते आहे!