अशी आहे ग्रहस्थिती
रवि-राहू मेषेत, बुध वृषभेत, केतू तुळेत, शनि-मंगळ कुंभेत, शुक्र-नेपच्यून मीनेत, चंद्र कर्केत, त्यानंतर सिंह, कन्या राशीत. सप्ताहाच्या अखेरीस तुळेत. दिनविशेष – १२ मे रोजी मोहिनी एकादशी…
– – – –
मेष – अनपेक्षित लाभ होणार असले तरी काही अडचणी जाणवतील. मंगळ लाभात आणि शनीचे लाभात आगमन त्यामुळे कामात थोडा त्रास होईल. लग्नी रवि आणि राहूमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडेल. भुर्दंडस्वरूपात पैसे खर्च होतील. संततीच्या चुकांमुळे त्रास होईल. ८ आणि ९ या तारखांना कौटुंबिक सौख्याचा आनंद मिळेल. परदेशातील मंडळींना मातृसुखाचा लाभ होईल. दाम्पत्यजीवनातील कुरबुरींकडे दुर्लक्ष करा. व्यापार्यांना चांगले लाभ मिळतील.
वृषभ – सुप्त बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगले लाभ मिळतील. शुक्र लाभात, सोबत गुरू, लग्नी बुध यांचा चांगला फायदा होईल. गायक, कवी, संगीतकारांना आठवडा अधिक लाभदायक राहील. विद्यार्थी चमकदार कामगिरी करतील. व्यापारी मंडळींची धावपळ होईल. हातातोंडाशी आलेले काम लांबणीवर पडेल. मात्र, त्यामुळे फारसे काही बिघडणार नाही. सुखस्थानावर शनि-मंगळाची दृष्टी असल्याने कुटुंबात नाराजी, वादविवादाचे प्रसंग घडतील.
मिथुन – प्रवास, धार्मिक कार्ये या ठिकाणी इच्छेविरुद्ध पैसे खर्च करावे लागतील. लाभातील रवि-राहूमुळे धनलाभ होईल. ८ ते १० मे या काळात विशेष लाभ होईल. शेअर बाजार, वायदा बाजारात व्याजस्वरूपात पैसे मिळतील. दशमातील गुरु-शुक्रामुळे चांगले लाभ होतील. वास्तूसंदर्भातील प्रश्न मार्गी लागतील. दाम्पत्यजीवनात आनंद मिळेल. लांबच्या प्रवासाचे बेत आखा.
कर्क – संमिश्र घटनांचा काळ आहे. चंद्राचा स्वराशीत लग्नात मुक्काम राहील. त्यामुळे आगामी काळ आनंददायक आहे. घरात धार्मिक कार्य घडेल. नोकरीनिमित्ताने प्रवासाचे योग येतील. अष्टमातील शनि-मंगळामुळे प्रकृतीच्या अडचणी निर्माण होतील. विशेषकरून कंबरदुखीचा त्रास होईल. सरकारी-राजकीय क्षेत्रात वजन वाढेल. सरकारी नोकरीत बदली होईल. अपेक्षित ठिकाणी कामाची संधी मिळेल. संततीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.
सिंह – थोडे श्रद्धासबुरीने घ्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी आततायीपण करू नका. न होणार्या कामात मन अडकवून ठेवले तर ते बिघडू शकते. सप्तमातील शनि-मंगळामुळे काही गडबड होऊ शकते. जोडीदाराबरोबर विदेशात वास्तव्यास जाण्याचा बेत सफल होईल. व्यापारी-उद्योग-व्यावसायिक यांना नव्या कामाच्या संधी येतील. त्यात नीट लक्ष द्या, भविष्यात चांगला फायदा होईल. स्थावर मालमत्तेमधून लाभ मिळतील. भागीदारात लिखापढी आवश्यक आहे, अन्यथा नसते मनस्ताप उद्भभवतील.
कन्या – आठवडा संस्मरणीय राहील. बुध भाग्यात आहे. सेवेचा लाभ होईल. गुरु-शुक्र-चंद्र नवपंचम योगामुळे अनपेक्षित लाभ मिळतील. ८ आणि ९ या तारखा महत्वाच्या राहतील. विद्याव्यासंगी मंडळींना लाभदायक काळ आहे. चित्रकार, फोटोग्राफर, गायकांसाठी शुभकाळ आहे. आयात-निर्यातदारांना चांगले यश मिळेल. खेळाडूंना स्पर्धांमध्ये चांगले यश मिळेल.
तूळ – पैशाचे प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. पतप्रतिष्ठा उंचावेल. हातून चांगले काम घडेल, त्यामुळे नावलौकिक वाढेल. काही मंडळींना प्रतिमा मालिन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. विरोधक आपल्या नावाचा वापर करून दुष्कृत्य करतील, सावध राहा. थकीत पैसे पदरात पडतील. सासुरवाडीकडून लाभ मिळेल. संततीच्या वागणुकीमुळे मनस्ताप वाढेल. सट्टा, जुगार, मनोरंजनात पैसे खर्च होतील.
वृश्चिक – उद्योग- व्यवसायातील आडाखे चुकतील. नुकसान होईल. मंगळ सुखस्थानात, सोबत शनीचे आगमन सुखात बाधा आणणारे ठरेल. लाभभावावर गुरु आणि उच्च शुक्राची दृष्टी त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. कलाकारांसाठी लाभदायक काळ. कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते. कामे रखडल्याने चिडचिड वाढेल.
धनु – आनंदाचा काळ सुरु झाला आहे. पराक्रमातील शनि आणि मंगळामुळे धाडसी निर्णय घ्याल. नोकरीच्या ठिकाणी पत वाढेल. मार्केटिंग, विमाव्यवसाय करणार्यांसाठी चांगले दिवस आहेत. प्रवासात दगदग टाळा. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. नवीन गुंतवणूक टाळा. शिक्षणक्षेत्रातील मंडळींसाठी चांगला काळ आहे. गर्भवतींनी काळजी घ्यावी.
मकर – कोणालाही सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. कौटुंबिक हेव्यादाव्यात मध्यस्थी करताना सावध राहा. सुखस्थानातील रवि-राहूमुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडू शकते. वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. डोकेदुखी, मायग्रेन यासारखे आजार डोके वर काढतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. उधार उसनवारी टाळा. अन्यथा पैसे बुडीत खात्यात गेले समजा. गुरुमहाराजांची कृपा राहणार आहे. ध्यानधारणा करा, त्यामधून चांगले समाधान मिळेल.
कुंभ – एखादा निर्णय घेताना, हे करू की ते करू हे ठरवताना चिडचिड होईल. सरकारी काम अडकून पडेल. ते पूर्ण करून घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागतील. व्यावसायिक भागीदार, लाइफ पार्टनर यांच्याबाबत द्विधा मनस्थिती राहील. व्यवसायातले ठोकताळे चुकतील. प्रवासात वस्तू सांभाळा. स्थावर-जंगम मालमत्ता मिळवण्यात अडचणी येतील.
मीन – शनीचे व्ययातील भ्रमण खर्च वाढवणारे ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. मंगळ व्ययभावात असल्याने नव्या समस्या उभ्या राहतील. सावध राहा. गुरुमहाराजांच्या शुभदृष्टीमुळे अनेक कामे व्यवस्थित पार पडतील. संततीच्या बाबतीत शुभवार्ता कळेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ आहे. धनस्थानात रवि-राहू असल्यामुळे गरज नसताना व्यवहार करणे टाळा. देणेकरी वाढवून ठेवू नका.