मर्चंटच्या ओपनिंग स्पीचने कोर्टाचे वातावरण बदलून टाकले होते. आकाशकडे बघण्याची सर्वांची दृष्टी आता बदलली होती. ’सैतान..’ प्रत्येकाची नजर त्याला हिच हाक जणू मारत होती. अशा वातावरणात धवल उठला. समोरच्या अंधाराला आता त्यालाच दूर करायचे होते. ‘युवर ऑनर. वकीलापेक्षा पुराव्यांनी अधिक बोलावे अशी माझी कायम अपेक्षा असते. पण आज मर्चंट साहेबांनी त्यांच्या शब्दांनी माझ्या अशिलाच्या चेहर्याला जो काळा रंग लावला आहे, तो उतरवणे मला गरजेचे वाटते आहे. मला मान्य आहे की, बलात्कार हा काही क्षणीक रागात घडणारा गुन्हा नाही. मात्र बलात्कार हा फक्त शारीरीक असतो असे नाही, तर तो मानसिक देखील असतो.
– – –
‘शोभा रावत खून खटल्यात धक्कादायक वळण. बॅ. धवल राजहंसने पालटली बाजी!’ पेपरच्या पहिल्या पानावरचा मथळा वाचत धवलने स्वत:शीच मान डोलावली आणि तो कोचावर मान मागे टाकत सुस्तावला. ह्या खून खटल्यात त्याची चांगलीच धावपळ झाली होती. हातात एकही पुरावा नसताना त्याने बाजी मारली होती. त्यासाठी त्याने प्रचंड कष्ट देखील घेतले होते. आता चार दिवस मुंबई सोडायची आणि अलिबागच्या फार्महाऊसवर विश्रांती घ्यायची असे बेत तो रचायला लागला होता. पण नेहमीप्रमाणेच त्याच्या आयुष्यात ’शांतता’ या शब्दाला परवानगी नव्हती हेच खरे!
‘सर…’ अनुपमाची हाक आली आणि त्याने डोळे उघडले.
‘अनुपमा, चार दिवस आता मला तुझा आवाज ऐकायचा नाही आणि चेहरा देखील बघायचा नाहीये. तुला सुट्टी.’
अनुपमा दात काढत हसली तसा तो आणखी वैतागला, ‘काय झालं दात काढायला?’
‘मला सुट्टी चालेल सर. पण तुमचं काय?’
‘माझं काय? मी मस्त पिकनिकला चाललो आहे.’
‘मग बाहेर आलेल्या क्लायंटला चार दिवसांनी बोलवू?’
‘क्लायंट आलाय?’
‘तेच तर सांगायला आलेय आणि साधासुधा क्लायंट नाही, तर चक्क तुमचे परममित्र सारंग दर्यावर्दी यांचा वशिला घेऊन आला आहे.’
सारंगचे नाव ऐकले आणि धवल ताडकन् उभा राहिला. शहरात पोलिसांच्या जोडीने कोणी गुन्हेगारी आणि अन्यायाविरुद्ध धाडसाने उभे राहात असतील ते म्हणजे धवल आणि सारंग ही जोडगोळी. धवल भरभर चालत हॉलमध्ये आला. बाहेर कोचावर अंग आखडून एक विशीतला तरुण विमनस्क अवस्थेत बसलेला होता. उतरलेला चेहरा आणि लाल झालेले डोळे त्याला अजूनच कावरा बावरा बनवत होते. धवलला पाहून तो ताडकन उभा राहिला.
‘बस बस.. पाणी वगैरे मिळाले ना?’
‘हो मिळाले सर. तुम्हीच बॅ. धवल राजहंस ना?’ त्याच्या डोळ्यात आता थोडी चमक आली होती. धवलचे व्यक्तिमत्वच समोरच्या माणसाला नुसत्या उपस्थितीने देखील आश्वस्त करत असे.
‘हो मीच तो. तुमचे काही काम होते का माझ्याकडे?’
‘मी बलात्कार केलाय..’ तो कावर्या बावर्या स्वरात म्हणाला.
‘काय?’ धवलच्या मागे उभी असलेली अनुपमा एकदम किंचाळली.
‘नाही… म्हणजे मी तो केलाय असा आरोप केलाय माझ्यावर रागिणीने आणि पोलीस केस देखील केली आहे.’ त्याने चेहरा ओंजळीत लपवला.
‘मला तुझे नाव कळेल का?’ शांत स्वरात धवलने विचारले आणि तो तरुण भानावर आला.
‘आकाश कुलकर्णी..’
‘आकाश, हे बघ आधी शांत हो आणि काय घडलं ते मला सविस्तर सांग.’
‘सर, मी पारसनीस कॉलेजमध्ये आर्ट्सचे शिक्षण घेतो आहे. चित्रकला ही माझी पॅशन आहे. फावल्या वेळात मी विविध पेंटिंग काढून ती विकत असतो. अशाच एकासंदर्भात माझी मॉडेल म्हणून रागिणीबरोबर ओळख झाली. ती देखील आमच्या कॉलेजमध्ये आर्ट्सला आहे. माझी चित्रकला पाहून तिने स्वत:ची दोन तीन चित्रं माझ्याकडून काढून घेतली. त्यानिमित्ताने आमची ओळख वाढत गेली आणि भेटीगाठी देखील वाढल्या…’
‘…आणि मग तुम्ही प्रेमात पडलात…’ धवलने वाक्य पूर्ण केले.
‘शक्यच नव्हते सर! रागिणी अब्जाधीश आहे. मी महिन्याला कमावतो तेवढे पैसे ती एका फटक्यात फक्त हॉटेलमध्ये उडवते. माझ्या संपूर्ण वर्गाचे जेवढे महिन्याला कँटीनचे बिल होत असेल, त्याच्या दुप्पट एकट्या रागिणीचे बिल असते सर. त्यातून तिला सौंदर्याचा आणि पैशाचा प्रचंड माज आहे. प्रत्येकाने सतत तिचे कौतुक करत राहावे आणि मुख्य म्हणजे तिच्या आज्ञेत राहावे हा तिचा हट्ट असतो. त्यासाठी ती वाटेल त्या थराला जाऊ शकते. आता माझेच उदाहरण बघा ना…’
‘का? तुझ्यासोबत काय घडले असे? ह्या बलात्काराच्या केसबद्दल बोलतो आहेस का तू?’
‘हो सर! रागिणीला मी पहिल्या दोन भेटींतच व्यवस्थित ओळखले होते. हे आपले काम नाही हेदेखील माझ्या लक्षात आले होते. त्यामुळे मी शक्य तेवढे अंतर ठेवूनच वावरत असायचो. पण बहुदा ती गुंतायला लागली होती माझ्यात. तिने एका दिवशी मला तसे स्पष्ट बोलून देखील दाखवले. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की, हे वरवरचे आकर्षण आहे. तिच्या आणि माझ्यात किती सामाजिक अंतर आहे, हे देखील मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या हट्टी स्वभावाला औषध कुठून आणणार? तिला कुठल्याही परिस्थितीत मी हवाच होतो. पण तिला हो म्हणून तिचे खेळणे बनून राहण्यात मला स्वारस्य नव्हते. मी तिला स्पष्ट नकार दिला. ’नाही’ हे ऐकायची सवय नसलेल्या रागिणीला माझा नकार अत्यंत झोंबला. शेवटी ’एक रात्र तरी माझ्यासोबत घालव’ अशी ऑफर तिने मला दिली आणि माझे डोके फिरले. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी इतके खालच्या थराला उतरायचे? ’आयुष्यभरासाठी नाही, तर निदान एका रात्रीसाठी तरी आकाशला मिळवून दाखवलेच,’ हा अहंकार जोपासण्यासाठी? स्वत:चा अहंगंड कुरवाळण्यासाठी? मी रागाच्या भरात तिच्या मुस्काडीत मारली.
‘पुढे?’
‘रागिणी काही अबलावर्गात मोडणारी नाही. तिने देखील उलटून माझ्या एक मुस्काटात मारली आणि ती तरातरा निघून गेली. मला वाटले हे प्रकरण इथेच संपले. पण दुसर्या दिवशी पोलिस मला शोधायला कॉलेजवर आले आणि मी सावध झालो. मी तसाच मागच्या दाराने बाहेर पडलो. मला काय करावे हेच सुचत नव्हते. शेवटी अचानक मला गुप्तहेर सारंग दर्यावर्दींचे नाव आठवले. मी त्यांच्यासाठी एक चित्र बनवून दिले होते. आमची छान मैत्री जमली होती दोन दिवसांत. मी सरळ त्यांना फोन केला आणि त्यांच्या घराचा रस्ता धरला. नशिबाने ते घरी असल्याने मला लगेच भेटले. त्यांनी त्यांची पोलिस डिपार्टमेंटमधली ओळख वापरून, पोलीस मला का शोधत आहेत त्याची माहिती काढली. त्यांना जी माहिती मिळाली ती ऐकून मला धक्काच बसला. रागिणीने मी तीन दिवसांपूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप माझ्यावर केला आहे आणि माझ्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे. सारंग सरांनी मला तातडीने तुमच्याकडे जाण्याचा सल्ला दिला आणि मी धावत इकडे आलो.’ आकाशने आपली कर्मकथा संपवली आणि एका दमात समोरचा पाण्याचा ग्लास रिकामा केला.
‘काळजी करू नकोस आकाश. सगळे ठीक होईल.’
‘पण सर तुमची फी..’ आकाश चाचरत म्हणाला.
‘त्याची काळजी करू नकोस. निर्दोष माणसाला सोडवण्यासाठी वेळ पडली तर मी स्वत: पैसा खर्च करत असतो,’ धवलचे वाक्य संपले आणि आकाशचा काळवंडलेला चेहरा जरा खुलला.
‘आकाश, सर्वात आधी म्हणजे अनुपमा कागदपत्रं बनवेल त्यावर सही कर आणि दुसरे म्हणजे मी आता पोलिसांना फोन करतोय. त्यांच्या स्वाधीन हो.’
‘काय?’
‘हो आकाश. कायद्यापासून पळून नाही, तर कायद्याला मदत करून तुझी सुटका होऊ शकेल,’ बोलता बोलता धवलने बाजूचा फोन उचलला आणि पोलीस स्टेशनचा नंबर फिरवला. फोन केल्याबरोबर आठव्या मिनिटात धवलच्या घराची बेल वाजली. अनुपमाने दरवाजा उघडला आणि इन्स्पेक्टर राणा वादळासारखा आत शिरला.
‘कोण म्हणतं आपली पोलीस यंत्रणा चपळ नाही?’ धवल हसत हसत म्हणाला आणि राणाचा चेहरा अजून लाल झाला.
‘एका बलात्कार्याला घरात आश्रय देणे हा गुन्हा आहे मिस्टर बॅरिस्टर!’
‘आपण चुकताय इन्स्पेक्टर साहेब. आकाश माझा मित्र असून काही चित्रांच्या संदर्भात बोलण्यासाठी तो इथे आला होता. त्याचवेळी पोलीस त्याला शोधत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि मी फोन करून तुम्हाला बोलावून घेतले. आणि हो त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. तो खरा खोटा ते कोर्ट ठरवेल,’ खोट्या विनयाने धवल बोलला आणि राणा सरळ त्याच्याकडे पाठ करून आकाशकडे वळला.
—
‘स्टेट वर्सेस आकाश कुलकर्णी…’ कोर्टाचा पुकारा झाला आणि कोर्टात हजर असलेला प्रत्येकजण खुर्चीत सावरून बसला. आकाशला चांगला धडा शिकवायचा हा बहुदा रागिणीने निश्चय केलेला असावा. एच. मर्चंटसारखा नामांकित वकील तिच्या बाजूने कोर्टात उभा ठाकला होता.
‘जज साहेब…’ शांत स्वरात मर्चंटनी बोलायला सुरुवात केली. ‘आरोपीच्या पिंजर्यात उभा असलेला हा कोवळा तरुण एक चांगला चित्रकार आहे, चांगला विद्यार्थी आहे, कोणत्याही आईबापाला अभिमान वाटेल असा एक चांगला मुलगा देखील आहे… सॉरी… होता. त्याच्या एका कृत्याने आता या सर्वावर पाणी पडले आहे. असा सुसंस्कृत मनुष्य बलात्कारासारखा गुन्हा करतो, तेव्हा त्याच्याकडे ’सैतान’ म्हणून बघायला हवे. बलात्कारासारखा गुन्हा काही रागाच्या भरात किंवा क्षणाची चूक म्हणून घडत नाही. अनेक काळासाठी दबलेली विकृत वासना त्याच्यामागे असते. आकाश हा सुसंस्कृतपणाचा मुखवटा घातलेला एक विकृत सैतान आहे. गरिबीत वाढलेल्या आकाशला रागिणीच्या रुपाने श्रीमंती दिसली आणि त्याने भविष्याचे बेत रचायला सुरूवात केली. अनाथ असलेल्या आणि वडिलांच्या मित्राच्या आश्रयाने जगणार्या, मात्र अब्जाधीश असलेल्या रागिणीमध्ये त्याला आपले ऐषोआरामी भविष्य दिसत होते. रागिणी ही एका सुसंस्कृत आणि चांगल्या घरात वाढलेली मुलगी आहे. तिला बिचारीला आकाशच्या डोक्यात घोळत असलेल्या विखारी विचारांची कल्पना देखील नव्हती. ती आकाशला एक चांगला मित्र, एक चांगला कलाकार समजत होती. एक दिवशी साधून आकाशने तिच्यासमोर मन उघडे केले. मात्र रागिणीने शालीन शब्दांत त्याची मागणी नाकारली. मात्र, आकाश तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. शब्दाला शब्द वाढला आणि संतापाच्या भरात रागिणीने आकाशच्या तोंडात मारली. नेमक्या त्याच वेळी आऊट हाऊसच्या दरवाज्यातून आत येणार्या त्यांच्या कॉमन मैत्रिणीने, सुरेखाने हे बघितले. दुसर्याच दिवशी कॉलेजमध्ये हा ’कानाखाली मारल्याचा’ किस्सा फेमस झाला आणि आकाशच्या डोक्यातला सैतान पेटून उठला. त्याने रागिणीला तिची चित्रे परत देण्याच्या बहाण्याने शेवटचे भेटायला बोलावले. आरोपी एका बंद बंगल्याच्या आऊट हाऊसमध्ये स्टुडिओ चालवतो. झालेल्या प्रसंगाने रागिणीचे मन देखील तिला खात होते. जातोच आहोत तर आपणही माफी मागावी अशा उद्देशाने रागिणी आकाशकडे गेली आणि त्या नराधमाने….’ कोर्टात अचानक हुंदक्यांचा आवाज आला आणि सगळ्यांच्या माना तिकडे वळल्या. हातात तोंड खुपसून रागिणी ढसाढसा रडत होती.
मर्चंटच्या ओपनिंग स्पीचने कोर्टाचे वातावरण बदलून टाकले होते. आकाशकडे बघण्याची सर्वांची दृष्टी आता बदलली होती. ’सैतान..’ प्रत्येकाची नजर त्याला हीच हाक जणू मारत होती. अशा वातावरणात धवल उठला. समोरच्या अंधाराला आता त्यालाच दूर करायचे होते.
‘युवर ऑनर. वकिलापेक्षा पुराव्यांनी अधिक बोलावे अशी माझी कायम अपेक्षा असते. पण आज मर्चंट साहेबांनी त्यांच्या शब्दांनी माझ्या अशिलाच्या चेहर्याला जो काळा रंग लावला आहे, तो उतरवणे मला गरजेचे वाटते आहे. मला मान्य आहे की, बलात्कार हा काही क्षणिक रागात घडणारा गुन्हा नाही. मात्र बलात्कार हा फक्त शारीरीक असतो असे नाही, तर तो मानसिक देखील असतो. जो माझ्या अशिलावर करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. अत्यंत सुसंकृत, सालस, एक गुणी चित्रकार असलेला हा तरुण आयुष्यातून कसा उठेल यासाठीची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. आणि हे सर्व कशासाठी? तर त्याने दिलेला एक नकार कोणा श्रीमंतीत जोपासल्या गेलेल्या गुलबकावलीला सहन झाला नाही म्हणून. आयुष्यात कधी कानावर देखील न पडलेला ’नाही’ हा शब्द ऐकावा लागला म्हणून. लवकरच माझा अशील कसा निर्दोष आहे हे मी सिद्ध करेनच; पण फक्त ’बलात्कारा’सारख्या आरोप केला गेल्यामुळे त्याच्याकडे ’सैतान किंवा हैवान’ म्हणून बघितले जाता कामा नये. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे कायम लक्षात ठेवायला हवे!’ आपले बोलणे संपवून धवल खाली बसला तेव्हा कोर्टातले वातावरण बरेच निवळले होते.
‘मिस सुरेखा, त्या दिवशी भांडणाच्या वेळी तुम्ही तिथेच होतात?’
‘नाही सर. मी दरवाजातून आत शिरले आणि अचानक रागिणीने आकाशच्या थोबाडीत मारली. ती का मारली ते मला नंतर तिच्याकडून समजले.’
‘ही गोष्ट संपूर्ण कॉलेजला देखील समजली होती?’
‘रागिणीने संपूर्ण कँटीनसमोर सांगितली. मग दुसरे काय होणार?’
‘रागिणीने सांगितली का तुम्ही पसरवली?’
‘नो वे! आपण कँटीनमध्ये सगळ्यांसमोर ही गोष्ट सांगितली आहे असे रागिणीनेच मला दुसर्या दिवशी आकाशकडे जाताना सांगितले होते.’
‘एक मिनिट.. एक मिनिट.. म्हणजे गुन्हा घडला तो दिवस? त्या दिवशी तुम्ही तिथे होतात?’
‘मी असते तर हे सगळे झालेच नसते सर. रागिणीची कार खराब झाली होती म्हणून मी तिला लिफ्ट दिली होती. मीच तिला आकाशच्या स्टुडिओपर्यंत सोडले होते.’
मर्चंटनी खूण केली आणि धवल उभा राहिला.
‘मिस सुरेखा, घडलेले भांडण तुम्हाला माहिती असताना देखील तुम्हाला मैत्रिणीच्या सोबत राहावे, तिला एकटीला धाडू नये असे वाटले नाही?’
‘मी बरोबर जायला तयार होते सर, पण रागिणीच नको म्हणाली. विचारा हवे तर तिला..’
‘असो. मला सांगा, तुम्ही रागिणीला सोडले, तेव्हा आकाश तिथे हजर होता?’
‘हो, गाडीचा आवाज ऐकून तो गेट उघडायला आला होता.’
‘साधारण किती वाजले असतील तेव्हा?’
‘कॉलेज सुटले चार वाजता.. म्हणजे साधारण साडेचार वाजले असतील.’ सुरेखाचे उत्तर संपले आणि आकाशच्या तोंडून एकदम ’ओह’ असे शब्द बाहेर पडले. त्याने तातडीने धवलला जवळ बोलावून त्याच्या कानात काही सांगितले. ते ऐकून धवल आकाशच्या तोंडाकडे पाहातच राहिला.
‘युवर ऑनर, कोर्टाची परवानगी असेल, तर मला मिस रागिणीला एक प्रश्न विचारायचा आहे.’
‘गो ऑन मिस्टर राजहंस,’ गंभीर आवाजात जज सुभेदार म्हणाले.
‘मिस रागिणी तुमच्यासोबत जे ’कृत्य’ घडले; ते साधारण तुम्ही आकाशला भेटल्यानंतर किती वेळाने घडले?’
‘सुरेखा मला सोडून गेली आणि मी आऊट हाऊसच्या दिशेने गेले. आकाश दरवाजात उभा होता. तो माझ्यासोबतच आत शिरला आणि क्षणात त्याने दरवाजा बंद केला. मी त्याला कारण विचारण्यासाठी वळले आणि.. आणि…’ रागिणीला पुन्हा एकदा हुंदका फुटला.
‘म्हणजे साधारण पावणे पाचचा सुमार? माझे वेळेचे गणित बरोबर आहे?’ धवलने विचारले आणि रागिणीने होकारार्थी मान हलवली. धवलने आता मर्चंटकडे पाहिले. त्यांची देखील मान हलली. धवल शांतपणे जज सुभेदारांसमोर उभा राहिला. युवर
ऑनर, मिस रागिणी यांच्यासोबत बलात्कार झालेलाच नाही; तेव्हा माझ्या अशीलाची त्वरित निर्दोष म्हणून मुक्तता करावी,’ धवलचे वाक्य संपले आणि कोर्टात एकच खळबळ माजली… अरे हा काय प्रकार आहे? वेळेचे गणित काय मांडतो, एकदम आरोपीला सोडून द्या काय म्हणतो?
‘युवर ऑनर हा नक्की काय प्रकार चालला आहे? माझे वकील मित्र नाटकीपणा बंद करून कोर्टाला समजावतील का?’ संतापाने थरथरत मर्चंट विचारते झाले.
‘युवर ऑनर.. ज्या दिवशी आपल्यावर बलात्कार झाला असे रागिणीचे सांगणे आहे. त्या दिवशी दुपारी एकपासून आकाश कुलकर्णी हा लोणावळ्यात एका आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शनाला उपस्थित होता आणि रागिणीच्या दुर्दैवाने त्या प्रदर्शनाचे उदघाटन पोलिस कमिशनर बक्षी यांच्या पत्नीच्या हस्ते झाले होते. संपूर्ण वेळ त्या तिथे हजर होत्या आणि त्यांच्याच गाडीतून आकाश परत देखील आला,’ धवलचे वाक्य संपले आणि कोर्टात पुन्हा एकदा हल्लकल्लोळ माजला.
‘युवर ऑनर, आरोपीने आयडिया तर चांगली लढवली, प्लॅन देखील झकास आखला. पण त्याच्या दुर्दैवाने आता तंत्रज्ञान बरेच पुढे गेले आहे. ज्यावेळी हा गुन्हा घडला, त्यावेळी रागिणी आणि आरोपी दोघांचेही मोबाइल एकाच ठिकाणी म्हणजे आरोपीच्या स्टुडिओत हजर होते. दोन्ही मोबाइलमधील कॉल रेकॉर्ड देखील उपलब्ध आहे. पोलिसांना काही अशा गोष्टी मिळाल्या आहेत, जो हा आरोप सहजपणे सिद्ध करायला पुरेशा आहेत,’ ठाम आवाजात मर्चंट बोलले आणि धवल देखील चिंताग्रस्त झाला.
कोर्टाचे त्या दिवशीचे कामकाज संपले आणि थकलेला धवल ऑफिसच्या खुर्चीत येऊन विसावला. सकाळच्या कामासाठीची तयारी करण्यात त्याचा पुढचा एक तास गेला आणि टेबलावरचा फोन खणखणला. अनुपमाने तत्परतेने तो उचलला.
‘हॅलो बॅ. राजहंस यांचे ऑफिस..’
…..
‘बोला..’
…..
‘काय? असे एकदम कसे पण? अहो पण… हॅलो हॅलो…’
‘अनुपमा, काय झाले?’ तिच्या चेहर्यावरचे न वाचता येणारे भाव बघत धवलने विचारले.
‘सर, रागिणीने केस परत घेतली आहे. आकाश देखील त्याला तयार झालाय…’
‘काय??’
‘मलाही ऐकून असाच धक्का बसला सर!’
धवल शांतपणे खुर्चीत बसला आणि त्याने विचार करत डोके मागे टेकवले. पंधरा मिनिटांनी तो एकदम खळाळून हसला आणि हसतच राहिला. अनुपमा त्याच्या तोंडाकडे बघत राहिली.
‘हुशार! जाम हुशार! बॅ. धवल राजहंसला पण प्यादे बनवले पोरांनी. हॅट्स ऑफ! अनुपमा जरा सारंगला फोन लाव.’
‘सारंग काही माहिती मिळवायची आहे. तीही फक्त अर्ध्या तासात.. येस येस. केस मागे घेतल्याचे ऐकल्यावर मला देखील तोच विचार स्ट्राइक झालेला आहे. शुअर शुअर… मी वाट बघतो तुझ्या फोनची..’
‘सर, काय झाले आहे सांगाल का?’
‘माझा फक्त अंदाज आहे. सारंगचा फोन आला आणि अंदाज खात्रीत बदलला की सांगतो.’
तासाभरात सारंगचा फोन आला आणि दोघेही नुसते खिदळत होते. शेवटी रागाने दरवाजा उघडत अनुपमा आत आली आणि धवलने आपला फोन संपवला.
‘आता तरी सांगणार आहात का?’
‘ही आजची पिढी कमाल आहे बघ. रागिणी अब्जाधीश पण अनाथ मुलगी. तिच्या वडिलांनी मरताना सगळ्या संपत्तीचा ट्रस्ट केला आणि आपल्या मित्राला राघवनला त्यावर नेमले. राघवन साधा, सरळ पण कडक शिस्तीचा माणूस. लग्न करेपर्यंत तो देईल तेवढ्या पैशावरच रोहिणीला गुजराण करावी लागणार होती. एवढ्या लहान वयात लग्न करून तिला आयुष्याच्या धमालमस्तीला मुकायचे देखील नव्हते; पण धमालमस्तीला पैसा देखील पुरत नव्हता. आता राघवनसारख्याला गंडवून पैसा मिळवायचा कसा? ह्यातून मग ह्या भन्नाट कल्पनेचा उगम झाला. कल्पनेचे भाग होते रागिणी, आकाश आणि सुरेखा हे जिवश्चकंठश्च मित्र. रोहिणीने आकाशवर बलात्काराचा आरोप केला. तोही मुद्दाम तीन दिवसांनी, त्यामुळे मेडिकल चेक-अप मध्ये फारसे काही सिद्ध झाले नसते. राघवनने एखादा बेस्ट वकील नेमला तर तो एका दिवसात केसला निकालात काढायची भीती देखील होतीच. मग काळजी म्हणून आकाश माझ्याकडे मदतीसाठी धावला. हा गुन्हा घडल्याचा आरोप करण्यात आला, तो दिवस मुद्दाम प्रदर्शनाचा दिवस निवडला. म्हणजे आकाशच्या बाजूने एक भक्कम पुरावा निर्माण झाला. त्या दिवशी आकाशने फोन मुद्दामच स्टुडिओमध्ये ठेवला. दुपारी काही वेळासाठी रागिणी देखील तिथे गेली आणि दोघांच्या फोनचे लोकेशन देखील एकत्र आले. मर्चंटसारखा वकील सुद्धा हे पुरावे बघून आकाशला आरोपी सिद्ध करण्यासाठी झपाटून गेला. चित्र तर अगदी देखणे रंगवले होते पोरांनी. मग केस नाजुक वळणावर असताना, आकाशने मला बोलावून प्रदर्शनाचा किस्सा सांगितला आणि मी चमकलो. मला तेव्हा थोडी शंका आली होती. मी कमिशनर बक्षींच्या बायकोचा दाखला दिला आणि रागिणीने एकदम घाबरल्याचे नाटक करायला सुरुवात केली. शेवटी अत्यंत अप्रतिम असा रडण्याचा अभिनय करून तिने घरी गेल्यावर राघवनला आपण हा खोटा बनाव रचल्याची कबुली दिली. आता पुढे काही अनुचित घडू नये, म्हणून राघवनने सरळ आकाशशी संपर्क केला आणि प्रकरण मिटवण्याची विनंती केली. विश्वास ठेव अनुपमा, आकाशने कमीत कमी दहा ते पंधरा कोटी घेऊनच प्रकरण मिटवायला मान्यता दिली असणार आहे!’ हसत हसत धवल बोलला आणि अनुपमाने डोक्याला हात मारला.