१६ ऑक्टोबर १९२१ला प्रबोधनकारांनी `प्रबोधन` या नियतकालिकाची सुरवात केली. तो त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा होता. विशेष म्हणजे सरकारी नोकर असूनही वर्तमानपत्र काढण्याची खास परवानगी त्यांना देण्यात आली होती.
– – –
प्रबोधनकारांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३चा. त्यांना ८८ वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं. हा बहुरंगी माणूस एकाच आयुष्यात अनेक भन्नाट आयुष्यं जगला. विचारवंत, समाजसुधारक, लेखक, वक्ते, इतिहासकार, नाटककार, अभिनेते, चळवळींचे नेते यापैकी त्यांची प्रत्येक ओळख महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रभाव टाकेल अशी आहे. तरीही या सगळ्यात त्यांची ओळख बनलं ते त्यांनी संपादित केलेलं `प्रबोधन` हे नियतकालिक.
`प्रबोधन`चा पहिला अंक १६ ऑक्टोबर १९२१ ला प्रकाशित झाला. पहिली दोन वर्षं म्हणजे १९२१-१९२२ आणि १९२२-१९२३ या प्रकाशन वर्षांत `प्रबोधन` हे मुंबईतून पाक्षिक म्हणून नियमित प्रकाशित झालं. दोन्ही वर्षी दर महिन्याच्या एक आणि १६ तारखेला `प्रबोधन` प्रकाशित व्हायचं. या दोन वर्षांचे मिळून ४८ अंक उपलब्ध आहेत. तिसर्या प्रकाशन वर्षात `प्रबोधन` सातारा रोडहून प्रकाशित होऊ लागलं. १९२३-१९२४ या प्रकाशन वर्षाचेही पाक्षिक म्हणून पहिले १८ अंक सलग निघाले. त्यानंतर `प्रबोधन`दहा महिने प्रकाशित होऊ शकलं नव्हतं. चौथ्या वर्षापासून `प्रबोधन` मासिक बनून पुण्याहून प्रकाशित होऊ लागलं. चौथ्या वर्षात एप्रिल १९२५पासून मे १९२६ या १४ महिन्यांत `प्रबोधन`चे १२ अंक प्रकाशित झाले. पाचव्या प्रकाशन वर्षातला पहिला अंक जुलै १९२६चा आहे. तेव्हापासून नोव्हेंबर १९२७पर्यंत दहा अंक प्रसिद्ध झालेत. त्यानंतर तब्बल दोन वर्षांचा खंड आहे. ऑक्टोबर १९२९मध्ये पाचव्या प्रकाशन वर्षाचा ११-१२वा जोडअंक प्रकाशित झालाय. सहाव्या प्रकाशन वर्षात नोव्हेंबर १९२९पासून मार्च १९३०पर्यंत पाच अंक पाठोपाठ प्रकाशित झालेत. त्यानंतर कोणतीही घोषणा न करता `प्रबोधन` बंद पडलं. अधिक नेमकेपणानं बोलायचं तर त्यानंतर `प्रबोधन`चा कोणताही अंक आज उपलब्ध नाही.
याचाच अर्थ `प्रबोधन`चे पहिल्या प्रकाशन वर्षांत २४, दुसर्या प्रकाशन वर्षात २४, तिसर्या प्रकाशन वर्षात १८,चौथ्या प्रकाशन वर्षात १२, पाचव्या प्रकाशन वर्षात १२ (एक जोडअंक असल्यामुळे खरंतर अकराच) आणि सहाव्या प्रकाशन वर्षात ५ अंक प्रकाशित झालेले आढळतात. ऑक्टोबर १९२१ ते मार्च १९३० या ८ वर्षं ५ महिने कालावधीत `प्रबोधन`चे ९५ अंक प्रकाशित झालेत. त्यापैकी आज ९१ अंक अभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र तिसर्या प्रकाशन वर्षातले १, २, ३ आणि ९ क्रमांकाचे सातारा इथे प्रकाशित झालेले अंक अद्याप उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. हे ९५ अंक आज प्रबोधनकारांची ओळख बनले आहेत. त्यातले बहुतांश लेख गेल्या वर्षीपर्यंत वाचकांसाठी पुस्तकरूपाने उपलब्ध नव्हते. तरीही ही ओळख बुलंद आहे, इतकं ते लिखाण महत्त्वाचं आहे.
`प्रबोधन`च्या निर्मितीला स्वाभाविकपणे प्रबोधनकारांनी लिहिलेल्या `कोदंडाचा टणत्कार` या गाजलेल्या ग्रंथाचा पार्श्वभूमी आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी महाराष्ट्राचा इतिहास लिहिण्याच्या बहाण्याने बहुजन समाजातल्या जातींची बदनामी करण्याचा चंग बांधला होता. तेव्हा प्रबोधनकारांनी त्याला प्रत्युत्तर देऊन त्यांची बोलती बंद केली होती. `कोदंडाचा टणत्कार` पाठोपाठ आलेले `भिक्षुकशाहीचे बंड` आणि `ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास` हे इतिहासलेखनाचा नवा शिरस्ता मांडणारे ग्रंथ त्याचाच भाग होता. आता ग्रंथांच्या पुढे जाऊन नियमित काही दिवसांनी विचारांची ठिणगी पेटवता येईल, अशा नियतकालिकाची गरज प्रबोधनकारांना वाटत होती. `मी चांगला वक्ता आहे. खंबीर लेखक आहे. समाजातले अन्याय मी उघड्या डोळ्यांनी पहात आहे. बहुजन समाजाच्या बाजूने लिहिणारा बोलणारा खमक्या वक्ता लेखक कोणीही नाही. मी स्वस्थ का बसावे?` असा विचार प्रबोधनकार करतच होते. शाहू महाराजांच्या प्रेरणेने बहुजन समाजातले अनेक तरूण नियतकालिकं काढत होते. त्या चळवळीत सामील होण्याचा निर्णय प्रबोधनकारांनी घेतला.
प्रबोधनकारांनी वर्तमानपत्रासारखं हत्यार शोषणाच्या विरोधात परजलं नसतं तरच नवल. त्यांची सगळी जडणघडणच पत्रकार म्हणून झाली होती. शाळेत असताना `विद्यार्थी` नावाची दाबयंत्रावरची पत्रिका काढणं असो किंवा `करमणूक`सारख्या लोकप्रिय साप्ताहिकात लेख छापून येणं असो, त्याच्या हाताला लहानपणीच छापखान्याची शाई लागली होती. पुढे तत्त्वविवेचक छापखान्यात प्रूफरिडर म्हणून केलेलं काम, ठाण्याच्या `जगत्समाचार`मध्ये केलेलं विपुल लेखन, ल. ना. जोशी आणि कृष्णाजी नारायण आठल्ये या जाणकार संपादकांच्या हाताखाली गिरवलेले पत्रकारितेचे धडे आणि जळगावात असताना `सारथी` नावाचं मासिक संपादक म्हणून सुरू करणं, यातून ते संपादक म्हणून तयार झाले होते. त्यांच्या लिखाणाचे चाहते महाराष्ट्रभर पसरलेले होते. कोल्हापुरात त्यांनी काही महिने एक छापखानाही चालवलेला होता. असा सगळा अनुभव गाठीशी असल्यामुळे त्यामुळे प्रबोधनकारांनी नियतकालिक सुरू करण्याचा विचार करणं अत्यंत स्वाभाविक होतं.
१९२१च्या सप्टेंबरमधे नियतकालिक काढण्याचा त्यांचा निर्णय पक्का झाला. पण त्यात एक अडचण होती. प्रबोधनकार मुंबई इलाख्याच्या पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या कचेरीत नोकरीला होते. या नोकरीमुळे आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना स्थैर्य मिळालं होतं. नियमित पगार हातात येत होता. दादरमध्ये सगळं कुटुंब स्थिरस्थावर झालं होतं. सुखाचे चार दिवस अनुभवत असताना त्यांना मात्र बहुजन समाजाच्या शोषणाविरोधात एल्गार करायचा होता.
पहिल्या महायुद्धामुळे आलेल्या मंदीच्या काळात इतर काहीच पर्याय नाही म्हणून प्रबोधनकार साधे टायपिस्ट म्हणून सरकारी नोकरीत रूजू झाले होते. त्यांच्या इलेक्ट्रिक इंजिनियरच्या ऑफिसात मोठ्या संख्येने जुने रेकॉर्ड होते. त्याची नीट व्यवस्था होत नाही म्हणून दरवर्षी ऑडिटर चीफ इंजिनियरच्या नावाने कडक शेरे मारत असे. रेकॉर्डच्या गोंधळावर उपाय म्हणून सरकारमधले कार्ड इंडेक्स सिस्टमचे तज्ञ अँडरसन यांनाही बोलावणं धाडलं होतं. त्यांचेही आठवडाभर ऑफिसात बसून डोकं आपटून झाले. पण त्यांनाही उपाय शोधता आला नाहीच.
अशा वेळेस प्रबोधनकारांची तल्लख बुद्धी कामाला आली. त्यांनी सगळे रेकॉर्ड नीट जपण्यासाठी एक अल्फा न्युमरिकल कार्ड इंडेक्स पद्धत तयार केली. ती सरकारकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली. प्रबोधनकारांनी त्याचा प्रयोगही करून दाखवला. ती पद्धत रेकॉर्ड सेक्शनमधला घोळ निस्तरण्यात यशस्वी ठरली. त्यामुळे वरचे अधिकारी खूष झाले. त्यांनी रेकॉर्डचे वेगळे खाते तयार केले. त्याचे हेडक्लार्क म्हणून प्रबोधनकारांची नेमणूक करण्यात आली. अवघ्या तीन चार महिन्यात त्यांनी रेकॉर्डचा सगळा गोंधळ कायमस्वरूपी दूर केला. काही वर्षांतच प्रबोधनकार एका टायपिस्टचे हेडक्लार्क बनले. त्या काळात ही बढती लक्षणीय होती. त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या ऑफिसात प्रबोधनकार महत्वाचा कर्मचारी ठरले.
इतकं सगळं चांगलं सुरू असताना प्रबोधनकारांनी नियतकालिक काढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सरकारी नोकराला पुस्तकं लिहिण्याची आणि छापण्याचीही बंदी होती. त्यामुळे वर्तमानपत्रं काढण्याचा तर विचारच दूरचा! त्यामुळे प्रबोधनकारांनी नोकरीचा राजीनामा द्यायचं ठरवलं. चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर विल्यम स्टुअर्टमेंटिथ साहेबाचा प्रबोधनकारांवर लोभ होता. त्यांना त्यांचा गुणी कर्मचारी गमावायचा नव्हता. त्यांना पर्याय मिळू शकेल, असं साहेबाला वाटत नव्हतं. पण नियतकालिक काढण्याची परवानगी तर ते देऊ शकत नव्हते. म्हणून मेंटिथ साहेबाने हे प्रकरण सचिवालयात नेलं. मला हा कर्मचारी सोडायचा नाही, असा त्याचा आग्रह होता.
शेवटी मुंबई इलाख्याचे चीफ सेक्रेटरी एल. रॉबर्टसन यांनी प्रबोधनकारांना बोलावणं धाडलं. त्यांनी समजावून पाहिले. पण प्रबोधनकारांनी पक्कं ठरवलं होतंच. त्यांनी चीफ सेक्रेटरीला सांगितलं, `सर, सरकारी नोकराने लेखन प्रकाशन करू नये, हे ठीक आहे. मग आतापर्यंत मी कितीतरी वर्तमानपत्रांत नावाने लिहित आहे. स्वतः चार पाच ग्रंथही पब्लिश केले आहेत. आजवर तुमच्या सीआयडींनी का नाही तसा रिपोर्ट केला?` त्यांनी स्पष्टपणे राजीनाम्याची तयारी दाखवली. बरीच चर्चा झाली. पण प्रबोधनकार वर्तमानपत्र काढण्याच्या निर्णयावर ठाम होते.
शेवटी चीफ सेक्रेटरीने प्रबोधनकारांना नोकरीत राहून नियतकालिक काढण्याची विशेष परवानगी दिली. परवानगी देताना ठळकपणे नोंदवण्यात आलं होतं, धिस मस्ट नॉट बी ट्रीटेड अॅज अ प्रीसिडण्ट. पुन्हा अशा प्रकारे कुणालाही परवानगी देण्यात येऊ नये.` त्यावर प्रबोधनकारांनी केलेली मल्लिनाथी अशी, `कर्दनकाळ ब्रिटिश सरकारच्या अमदानीत सरकारी नोकरीला असतानाही, वर्तमानपत्र काढण्याची खास परवानगी मिळविणारा, मला वाटते मीच पहिला नि अखेरचा गव्हमेंट सर्व्हंट आहे.` प्रबोधनकार म्हणतात, ते खरंच असावं. सामाजिक विषयांवर निर्भीडपणे लिहिणार्या कोणत्याही सरकारी अधिकार्याला वर्तमानपत्र काढण्याची अशी परवानगी क्वचितच मिळाली असेल. प्रबोधनकार नोकरीत जे काम करत होते, तिथेही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. कोणतंही काम छोटं न मानता झोकून देऊन काम करण्याच्या त्यांच्या हुनरबाजीमुळे त्यांना ही विशेष परवानगी मिळाली होती. तो एक प्रकारे मोठाच सन्मान होता. त्यातून `प्रबोधन` नावाच्या एका इतिहासाचा जन्म होत होता. प्रबोधनकारांच्या आयुष्यात प्रबोधन पर्व सुरू होत होतं.