हे मुखपृष्ठ चित्र आहे १९८४ सालातले, म्हणजे ३८ वर्षांपूर्वीचे. तेव्हा बेळगावात रावसाहेब गोगटे नाट्य मंदिराचे उद्घाटन तेव्हाचे संरक्षण मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते, याचे आजच्या वातावरणात अप्रूप वाटते. बेळगाव हे नाटकवेड्या, संगीतप्रेमी रसिकांचे शहर. इथे सर्वाधिक प्रयोग होणार होते ते मराठी नाटकांचे आणि मराठी भावसंगीताचे. अर्थात कानडी यक्षगानाला किंवा कर्नाटक संगीताचे कार्यक्रम करण्याला तिथे मज्जाव नव्हताच. मात्र, मराठी संस्कृतीशी संबंधित काही सरळपणे घडू देईल ते कर्नाटक सरकार कसले? गंमत म्हणजे रामकृष्ण हेगडे यांच्यासारखे जनता पक्षाचे, राष्ट्रीय पातळीवरचे सुस्वभावी आणि मृदुभाषी नेते कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदावरून मात्र आगच ओकत होते. नाट्यमंदिराचे उद्घाटन आणि हेगडे यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची केलेली गोची यांचा समन्वय साधून बाळासाहेबांनी या व्यंगचित्रात नाट्यमंदिरात पहिला प्रयोग लावला आहे तो ‘सीमेवरून परत जा’ याच नाटकाचा! प्रमुख भूमिकेत अर्थातच रामकृष्ण हेगडे आहेत… आज या व्यंगचित्राला इतकी वर्षे झाली तरी बेळगावात हाच प्रयोग सुरू असतो… मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असो, तो महाराष्ट्राविरोधात गरळ ओकण्याच्या कर्तव्यात कधी कसूर करत नाही… सध्या बोम्मई महाराष्ट्रातल्या महाशक्तीच्या मिंध्यांना हेच ठणकावून सांगत आहेत आणि ते बापुडवाण्या चेहर्याने महाराष्ट्राचा हा अपमान सहन करत आहेत.