तुम्ही मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री असं मंत्रिमंडळ बनवायचा विचार आहे- येता का?
– यतीन सोनटक्के, अकोला
एकटा पडलो तरी चालेल पण हे मी कधीही करणार नाही.
रणवीर सिंगप्रमाणे फोटोशूट करण्याची ऑफर तुम्हाला मिळाली तर?
– राधिका बाळ, इचलकरंजी
नाही. पण तुम्ही येऊन करणार असाल तर नक्की करेन.
ज्या देशात देवीदेवतांची नग्नशिल्पं आणि त्याही पुढची मिथुनशिल्पं मंदिरांवर कोरली आहेत आपल्या पूर्वजांनी, तिथे एखाद्या कलावंताने नग्नतेचा आभास निर्माण करणारं फोटोशूट केलं, तर इतका गदारोळ का?
– जितेंद्र शेंडे, सोलापूर
कारण समाज ढोंगी आहे.
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी असं आपण एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे स्त्रीला सगळ्याच बाबतीत कमी लेखतो, हा दुटप्पीपणा का?
– स्नेहा चितळे, पिंपरी
क्रमांक-३चे उत्तर पाहणे.
अनेक तथाकथित विनोदी लेखक आत्मनिवेदनपर कथा आणि ललित लेखांमध्ये ‘बायको’ या विषयावर इतके भयाण विनोद कसे करू धजतात? त्यांची बायको त्यांना लाटण्याने प्रसाद देत नाही का?
– संपत सोनावणे, चेंबूर
असेलही देत तसा प्रसाद. ते येऊन थोडंच सांगणार आहेत?
तुमच्यावर विनोदी नट असा शिक्का बसला आहे, असं तुम्हाला वाटतं का? हा शिक्का तुम्हाला मान्य आहे का?
– कौंतेय साने, शिरगाव
असा शिक्का नाही बसलाय.
मांजरीला वाघाची मावशी म्हणतात, तर बोक्याला वाघाचा काका का म्हणत नाहीत? हा बोक्यांवर अन्याय नाही का?
– अनया गाडगीळ, राजापूर
नाही, कारण मुलं कर्तबगारीमध्ये आईवर जातात. आईची बहीणही मग महत्वाची.
पृथ्वीवर मनुष्यजात आता फार काळ टिकणार नाही. ती आत्मनाश ओढवून घेणार आणि या ग्रहाचाही नाश करणार, असं अनेक विचारवंत म्हणतात. तुम्हाला काय वाटतं?
– चंद्रशेखर सानप, जालना
खरंय, पण काळजी करू नका. ते पाहण्याची वेळ तुमच्यावर नाही येणार.
रणवीर आणि रणबीर यांच्यात तुम्हाला जास्त कोण आवडतो? का?
– सायली पाळंदे, धायरी
रणवीर कपूर.
आम्ही रोजच्या कामाने कंटाळतो, थकतो, कोमेजतो; तुम्ही कला क्षेत्रातले लोक कायम प्रसन्न, प्रफुल्लित, टवटवीत दिसता… याचं रहस्य काय असतं?
– गणेश गावडे, बिरवाडी
गैरसमज आहे तुमचा… आम्हालाही कंटाळा थकवा येतो, पण पोट महत्वाचं… जे कलेवर अवलंबून आहे… आणि तुला तर आमचं ग्लॅमरच पाहायचं असतं.
जो पाप करतो, त्याचं मन त्याला खात असतं, असं म्हणतात. हे राजकारणातल्या गद्दारांनाही लागू असतं का हो?
– रश्मी कन्याळकर, बदलापूर
तुमच्या काय धारणा आहेत त्यावर पाप-पुण्य अवलंबून आहे..
‘चल गवतात शिरू नि गंमत करू’ असं म्हणणार्या दाजिबाला गवतातल्या साप आणि विंचवांची भीती कशी वाटत नाही?
– जगन दिघे, पुलाची वाडी, पुणे
जायच्या आधी त्याने सगळं चेक करून घेतलं असेल हो… तुम्ही नका टेन्शन घेऊ.
एखाद्या स्त्रीच्या मनात घर करायचे असेल तर किती दगड, वाळू, विटा, लागतील?
– अशोक परब, ठाणे
ते घर बांधताच क्षणी तुटणार … त्यामुळे ते सतत बांधतच राहावं लागणार.