आता क्लिक करणार तोच पाठीमागून किक बसल्यागत जोराची थाप पडली. मी रागारागाने मागे वळून पाहिले हातात रायफल घेतलेला खडबडीत चेहर्याचा अक्राळविक्राळ पोलीस दिसला. माझी ततपप झाली. तुम्हाला सांगूनसुद्धा तुम्ही परत फोटो घ्यायला आलात, असे म्हणून रायफल सांभाळत त्याने पोलिसी भाषा वापरायला सुरुवात केली. मी म्हटलं, याच्या बंदुकीतून कधी, कुठे गोळी सुटेल त्याचा नेम नाही. आपण दमानं घ्यावं.
– – –
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत साजरा होणारा महाराष्ट्र विधानसभेचा सुवर्ण महोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला होता. संपादक मला म्हणाले, या सोहळ्याची जी काही तयारी चालू असेल त्याची बातमी आणि फोटो घेऊन ये.
त्यावेळी आमचे वृत्तपत्र काँग्रेसधार्जिणे होते. त्यामुळे काँग्रेसच्या लहान सहान कार्यक्रमाला आवर्जुन जावे लागे. मी विधान भवनाजवळ गेलो, तेव्हा बाहेरील प्रांगणात मोठा सभामंडप टाकण्याचे काम सुरू होते. काही कामगार बांबूच्या परातींवर चढून छतावरचे बांधकाम करत होते. काहीजण जमिनीवर रेड कार्पेट अंथरत होते. मी इथे यापूर्वी अनेकदा फोटो काढण्यासाठी आलो होतो. पोलीस फोटो घेऊ देत असत. मात्र अधिवेशन चालू असताना हाऊसमधील गोंधळाचे फोटो काढण्यास मनाई असे. बाहेरच्या पॅसेजमधील घडामोडी, गाठीभेटी आणि मंत्री-अधिकार्यांच्या चेंबरमधील बैठकीचे फोटो मी अनेकदा घेतलेत. त्यामुळे आज कुणी फोटो घेण्यास आक्षेप घेईल असे वाटत नव्हते.
पंतप्रधान येणार म्हणून पोलिसांनी अधिक दक्षता घेतली होती. शस्त्रधारी पोलीस डोळ्यात तेल घालून बारीक सारीक हालचालीवर लक्ष ठेवून होते. मी मंडपात गेलो तेव्हा पोलिसांनी हटकले नाही, पण फोटो घ्यायला सुरवात केली तेव्हा पोलीस धावून आला. म्हणाला, कमाल करता. आम्हाला काही विचारत नाही आणि सरळ आत घुसून फोटो काढता. तुम्हाला आत सोडलेच कुणी?
तो मला पोलीस उपायुक्त बच्छेवार यांच्याकडे घेऊन गेला. ते म्हणाले, हे बघा, यापूर्वी तुम्ही इथे भले अनेकदा फोटो काढले असतील, पण यापुढे असे करू नका. तुम्हाला जे फोटो हवे आहेत, ते रस्त्यावरून घ्या. विधान भवनाच्या कंपाऊंडमध्ये येऊ नका असे म्हणून बच्छेवारांनी आपला बचाव करून मला कायद्याचे धडे शिकवले. समारंभाला अजून तीन दिवस बाकी असताना मंडपाचे फोटो आतून काढले काय अन् रस्त्यावरून काढले काय, काय फरक पडणार, असं विचारल्यावर त्यांनी माझी समजूत घातली, हे पाहा भडेकर, तुम्ही फोटो काढाल आणि उद्या वृत्तपत्रात छापाल, चांगली गोष्ट आहे. आमच्या लोकांनाही कामाची प्रसिद्धी हवी असते, पण मी काहीही सहकार्य करू शकत नाही. तुम्ही सचिवांना भेटा, त्यांनी परवानगी दिली, तर माझी काहीच हरकत नाही. माझे हात कायद्याने बांधलेले आहेत, असे म्हणून त्यांनी दोनही हात एकमेकांवर क्रॉस ठेवून दाखवले.
मी म्हटलं, आजही कायद्याने बांधले आहेत? अहो, निदान आज तरी बहिणीच्या प्रेमाने बांधलेल्या राखींचे हात दिसायला हवेत. आज नारळी पौर्णिमा आहे, साहेब. रक्षाबंधनासारखा पवित्र सण असताना तुम्ही कायद्याची कठोर भाषा करता…
पण शेवटी पोलिसांना त्यांची ड्युटी करावी लागते आणि मलाही माझी…
त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सचिवांची वाट पाहात बसलो. तासाभराने हातावर रंगीबेरंगी चकाकणार्या राख्या बांधून सचिव मोटारीने आले. कपाळावर लाल रंगाचा टिळा आणि डोक्यात पडलेले तांदूळ पाहून यांना बहिणीने आरती करून ओवाळणी करून पाठवलेले असावे असे वाटले. त्यांना विनंती केली तर अतिशय सौजन्याने हसत हसत म्हणाले, छे… छे… काय करणार? तशी परवानगी देण्याचे अधिकारी मलाही नाहीत. तुमचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भोगटे माझे मित्र आहेत. मी त्यांचा चाहता आहे. त्यांना सांगा, मी आठवण काढली होती म्हणून. पण काय करणार! विधान भवनाच्या आवारात आम्ही कुणालाही फोटो घेऊ देत नाही. पण कमाल आहे हो… परवा एका फोटोग्राफरने हाऊस चालू असताना अनेक फोटो घेतलेत, असे माझ्या कानावर आले आहे. आमचा डोळा चुकवून त्याने ते कसे घेतले त्याचे आश्चर्य वाटते. तुम्ही साधेपणाने विचारायला तरी आलात. त्याने न विचारताच फोटो घेतले आणि घोटाळा झाला.
तुम्ही एक काम करा. सभापती शंकरराव जगताप साहेबांना भेटा. त्यांनी परवानगी दिली तरच तुम्हाला फोटो काढता येतील. तुम्ही त्यांना कन्विन्स करा. तुमच्या वृत्तपत्राचं नाव सांगा, पण माझं नाव सांगू नका. विचारत विचारत आलो सांगा, असे म्हणून ते विधान भवनात गेले.
पोलिसाने मला बच्छेवारांकडे नेले. बच्छेवारांनी सचिवांकडे पाठवले आणि सचिव सभापतींना भेटा म्हणतात… यांनी माझा फुटबॉल करून टाकला. च्यामारी, एका बांबूच्या मंडपासाठी माझी ससेहोलपट सुरू झालीय. पण आपणही आपला हक्क सोडायचा नाही. बाबासाहेबांनी संविधानात जे हक्क दिले आहेत, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा. मीही मनाने चिवट! यांची पाठ सोडायची नाही असे ठरवूनच टाकले. सभापतींना भेटून जाऊ, तेही नाही म्हणाले, तर गुपचूप फोटो घेवून जाऊ. मग उद्या काय होईल, ते संपादक पाहून घेतील. इतके मोठे वृत्तपत्र पाठिशी असताना यांना कोण भीक घालतो असे म्हणून सभापतींना भेटलो. नमस्कार केला. सभ्य भाषेत माझे येण्याचे प्रयोजन सांगितले. राज्य सरकारचे अधिस्वीकृती पत्र दाखवले. ते पाहून म्हणाले, हरकत नाही. मंडपाचे फोटो काढायला आमचे अधिकारी कशाला मनाई करत आहेत? तुम्ही खुशाल फोटो घेऊ शकता. त्यांनी एक अधिकारी माझ्या सोबत दिला त्याला घेवून मी बच्छेवारांकडे गेलो. त्याला पाहाताच ते समजून चुकले, त्यांनी फोन करून गेटवरील पोलिसांना सूचना दिल्या व म्हणाले, जा आता. तुम्हाला हवे आहेत ते फोटो घ्या. कुणीही तुम्हाला अडविणार नाही. माझे नाव सांगा.
प्रांगणातील मंडपाजवळ मी पुन्हा आलो. फुल कॉन्फिडन्समध्ये छाती पुढे काढून कॅमेरा डोळ्यावर धरला. आता क्लिक करणार तोच पाठीमागून किक बसल्यागत जोराची थाप पडली. मी रागारागाने मागे वळून पाहिले हातात रायफल घेतलेला खडबडीत चेहर्याचा अक्राळविक्राळ पोलीस दिसला. माझी ततपप झाली. तुम्हाला सांगूनसुद्धा तुम्ही परत फोटो घ्यायला आलात, असे म्हणून रायफल सांभाळत त्याने पोलिसी भाषा वापरायला सुरुवात केली. मी म्हटलं, याच्या बंदुकीतून कधी, कुठे गोळी सुटेल त्याचा नेम नाही. आपण दमानं घ्यावं.
ओ… दम द्यायचे कारण नाही. मी उगाच काही इथे पुन्हा आलोय. मला सभापतींनी परमिशन दिलीय.
कुठे आहे परमिशन -पोलीस
बच्छेवारांना विचारा -मी
ते काही चालणार नाही, परमिशन लेखी पाहिजे. लेखी का दिली नाही, तेसुद्धा त्यांनाच विचारा. कसा चोर सापडला लेकाचा, अशा थाटात पोलिसाने माझा हात पकडून गेटवरील चौकीवर नेले. तेथे झोपा काढत असलेल्या पोलिसाला उठवून त्याच्या ताब्यात मला देण्यात आले. त्याने लगबगीने बिस्तरा गुंडाळला, आरशात डोकावून भांग पाडला. टोपी फिट्ट बसवली व मला बच्छेवारांकडे घेऊन गेला. मी त्यांना म्हटलं, तुमचे लोक लेखी परवानगी मागतात. तुम्ही लेखी द्या किंवा माझ्यासोबत चला. त्यांनी एक पोलीस माझ्यासोबत दिला तो खो-खो खेळावे तसे प्रत्येक पॉइंटवरील पहार्यावर असलेल्या पोलिसाच्या कानात साहेबाने परवानगी दिल्याचे सांगून निघून गेला. त्यामुळे मलाही खो मिळाला. दोन तासाच्या तपश्चर्येनंतर मंडपाचा फोटो काढता आला.
दिनांक ३ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत विधानसभेचा सुवर्ण महोत्सव थाटात संपन्न झाला. त्याच दिवशी संध्याकाळी बिर्ला मातोश्री सभागृहात मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे एक मेळावा भरला होता. पंतप्रधान त्या कार्यक्रमाला येणार होते. मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रँचकडून आम्हाला खास ओळखपत्र दिले होते.
तो गोकुळाष्टमीचा दिवस होता. त्याचे निमित्त साधून युवक काँग्रेसच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री हॉलबाहेरील रस्त्यावर दहीहंडी बांधली होती. राजीव गांधी यांचे आगमन होताच त्यांच्या उपस्थितीत युवक कार्यकर्ते दहीहंडी फोडण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणार होते. या प्रसंगाचा फोटो किती सुंदर दिसला असता, या दुर्मिळ क्षणाचा फोटो घेण्यासाठी आम्ही लगबगीने पुढे गेलो, परंतु राजीव गांधी यांचे आगमन होताच पोलिसांनी ऐनवेळी मनाई केली आणि मर्जीतल्या काही खास फोटोग्राफरना फोटो घेण्यास परवानगी दिली. आम्हाला अडवून ठेवण्यात आले, त्यामुळे फोटो घेता आला नाही.
बिर्ला हॉलमध्ये प्रवेश करताना तेथेही पोलिसांनी पार्सलिटी केली. काही निवडक फोटोग्राफरना आत प्रवेश दिला व आम्हाला दहा बारा जणांना प्रवेश नाकारण्यात आला. पोलिसांच्या स्पेशल ब्रँचने ओळखपत्र दिले असतानाही दुजाभाव करण्यात आला. त्यामुळे सर्व फोटोग्राफर नाराज झाले. आम्ही एकत्र जमून विचारविनिमय केला आणि या सर्व समारंभावर बहिष्कार टाकण्याची एकमुखी घोषणा केली. कॅमेरा बॅगेत टाकून आम्ही निषेध व्यक्त केला.
सभागृहात राजीव गांधी यांच्यासमोर समारंभाची शानदार सुरुवात झाली. अनेक फोटोग्राफर फोटो टिपत होते. परंतु त्यात ओळखीचे कुणी प्रेस फोटोग्राफर दिसत नाहीत, ही गोष्ट अनेक पुढार्यांच्या लक्षात आली. त्यांची चुळबूळ सुरू झाली. त्यांनी आमची चौकशी केली, तेव्हा झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला. एका पुढार्याने त्यावेळचे पोलीस आयुक्त वसंत सराफ यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. सराफ साहेब कार्यक्रम अर्धवट सोडून तातडीने हॉलबाहेर आले, त्यांनी आमची सर्व तक्रार ऐकून घेतली आणि आम्हाला सभागृहात जाऊन फोटो घेण्याची विनंती केली. एव्हाना कार्यक्रमाचे उद्घाटन व महत्त्वाचे प्रसंग निघून गेल्यामुळे आत जाण्यात अर्थ नव्हता. आम्ही बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम राहिलो. दुसर्या दिवशी मुंबईतील सर्व प्रमुख वृत्तपत्रात बिर्ला मातोश्री सभागृहातील एकही फोटो प्रसिद्ध झाला नाही. गल्लीबोळातील दहीहंडी फोडतानाचे अनेक फोटो छापून आले, पण पोलिसांच्या आडमुठेपणामुळे पंतप्रधानांचा फोटो येऊ शकला नाही.