रामदासांनी विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालं नाही. पण माझ्या ५७ वर्षाच्या अवुक्षात मला थोडेफार उत्तर गावले आहे.
आळशी, निर्बुद्ध, अस्वच्छ माणसे सर्वात सुखी असतात. बाकी कामातुर (काम हे कार्य अर्थाने घ्या रे बाबांनो) जनता म्हणजे आमच्यासारख्या लोकांच्या डोक्याला शॉट.
सतत काही ना काही करत राहायचे, शिकायचे, फिरायचे, वाचायचे. आता म्हणाल यात काय ते वावगे करताहेत?
अरे, आमच्या मागे किती कटकट!!!
मी मुळात बैठ्या प्रकृतीची. त्यामुळे मैदानी खेळ बिळ कधीच आवडले नाहीत.एनसीसी जॉईन केलं, पण रविवार सक्काळी भल्या पहाटे उठून परेडसाठी जावे लागते हे कळले आणि मी घुमजाव केलं.
मुद्दा काय की माझ्यासारख्या अतिआळशी माणसांना असे कार्यकर्ते भुंगे हमखास भेटतात आणि मग मी आयुष्य कसे वाया घालवते आहे हे ऐकावे लागते… आणि यांचा आक्षेप कशावरही असू शकतो बरं.
म्हंजे हॉटेलात गेलं की माझी ऑर्डर दणदणीत असते, जे खाऊ नयेत ते सर्व पदार्थ मी मागवते आणि नशीब फुटके असल्याने बाजूला कोणीतरी आरोग्य जागरूक व्यक्ती असते, ती अखंड बडबड करत राहते, याने अमुक वाढते, त्याने ही इजा होते, यात केमिकल असते, त्यात आणखीन काही. तू व्यायाम करत नाहीस, निदान खाणे तरी जपून खा. मला अशावेळी नरभक्षक व्हावेसे वाटते.
दुसरा प्रकार स्वच्छताप्रेमी माणसांचा.आणि ही जमात अधिक करून बायकांची आहे. कारण आजही आपल्याकडे घर स्वयंपाक इत्यादी बायकी जबाबदारी समजली जाते. माझ्या अनेक मैत्रिणी आणि बहिणी या वर्गातल्या. कधीही फोन करा, काय करते या प्रश्नाला उत्तर.. आताच कपाट लावले, उद्या किचन डीप क्लीन करणार, परवा सोफे साफ करणार, नंतर काचा फोडणार…सॉरी धुणार… ही लांब यादी. नकळत मग मी माझ्या कपाटाकडे बघते, दरवाजे उघडले की कपड्यांचा हिमप्रपात अंगावर, खिडक्यांच्या काचा, धूळ आणि कबुतरांची घाण यामुळे आपोआप वन वे झाल्यात. आतून बाहेरचं काही दिसतच नाही.
माझ्याच घरात डोक्याला शॉट होतो बॉस. नंतर येतात काय करतेस सध्या? हे विचारणारे.
मी काय करावे आणि का करावे? मुळात सारखं काही ना काही करत राहायचे हा अट्टाहास का असतो? दिसामाजी काही तरी शिकत राहावे याचा अर्थ खूप सर्वव्यापी आहे लेको!!
अशी माणसे स्वतः सुखात जगत नाहीत आणि आम्हाला पण जगू देत नाहीत. मला गफ्फा मारायला आवडतात, अस्सल कोकणी असल्याने एलोन मस्क ते युक्रेन युद्ध अशा कोणत्याही विषयावर आम्ही बोलू शकतो. काय वायफळ चकाट्या पिटते? काहीतरी कर? असं बोलायची काही गरज? झालं, उगा अपराधी भावना आली.
वास्तविक आम्ही अस्वच्छ, आळशी, संथ लोक उपकारक असतो. ना कोणाच्या भानगडीत ना कोणाच्या मागे. संथ वाहते कृष्णामाई तसे आम्ही.
प्रवासाला गेल्यावर तर मला अतिशय वैताग कशाचा येतो तर लवकर उठून, आवरून ठराविक वेळेत नाश्ता करून बसमध्ये बसायचं आणि रपरप करत गाईडमागे धावत ठिकाणं बघायची, याचं. पहिले तर मला पॉवर ब्रेकफास्ट ही आयडिया कळत नाही. फुकट असल्याने मी आडवा हात मारते आणि बसमधे बसले की जी पेंग येते ती वर्णन करणे कठीण. आणि पर्यटनस्थळावर आपण उतरलो नाही की बाकी असे तुच्छतादर्शक नजरेने, काय आळशी बाई आहे म्हणून बघतात की विचारता सोय नाही.
च्यायला रग्गड पैसे खर्च करून का आलो? लवकर उठायला? मग घरी काय वेगळे होते?
पण झक मारत, पाय ओढत, मेंढरागत फिरावे लागते आणि आपण हे बघितले याची खातरजमा म्हणून फोटो काढावे लागतात.
नवं काहीतरी शीक, असा सल्ला देणारे हे अजून एक शॉट.
ही लोकं काहीही शिकतात. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने स्पॅनिश भाषा शिकवणार्या वर्गात नाव घातले. याच्या पिढ्या दरवर्षी देवगडला जाणे याला पर्यटन समजणार्या आणि कोणीही समुद्र उल्लंघन करण्याचे पातक केलेला कुटुंबात नाही.पासपोर्ट पण नाही, अशा माणसाने डायरेक्ट स्पॅनिश भाषा? अर्थात, त्याचा पैसा त्याचा वेळ, पण कधीही भेटला की हे वाक्य स्पॅनिशमध्ये कसे होते माहिते का? ऐक ऐक, या वैतागाला सामोरे जावे लागायचे. तो पाब्लो एस्कोबर परवडला याच्यापेक्षा बॉस.
काहीही न करता स्वस्थ बसणे याला आळशीपणा का समजले जाते. गंमत बघा, ऋषी मुनी, ध्यानधारणा करायचे, काहीतरी वाचायचे, त्यांना ग्रेट म्हणतात आणि आमच्यासारख्या माणसांना आळशी. ये सरासर अन्याय है बॉस.
मला वाटते सध्या सतत काहीतरी करत रहा, कार्यमग्न व्हा, याचा खूप अतिरेक झालाय आणि आपण साधे सरळ जगणे विसरून गेलोय. खास करून जेव्हा आर्थिक प्रापंचिक जबाबदार्या पार पडलेल्या असतात, निवृत्ती असते तेव्हा तरी माणसाला हवे तसे जगू द्या की. तुम्हाला काय पहाटे चार वाजता उठून रस्ते पालथे घालायचे आहेत, डोंगर दर्या बघायच्या आहेत, चार दिवसात आठ देश फिरायचे आहेत, ते तुम्ही खुशाल करा लेको. पण आमच्यासारख्या लोकांना मात्र प्लीज त्रास देऊ नका.