ऑलिंपिक खेळाच्या शंभरहून अधिक वर्षांच्या इतिहासात आजवर फक्त एकाच भारतीय महिलेने कुस्तीमध्ये पदक मिळवले आहे, ती महिला आहे साक्षी मलिक. ती हिंदुस्तानचा अभिमान आहे. २०१६ साली रियो येथे ऑलिंपिक मैदानात आपला तिरंगा फडकला, राष्ट्रगीताची धुन वाजली आणि त्या पार्श्वभूमीवर ऑलिंपिकचे कांस्यपदक स्वीकारणारी साक्षी मलिक ज्यांनी ज्यांनी पाहिली, त्या सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन आला. पी. व्ही. सिंधू, नीरज चोप्रा, रविकुमार दहिया, सायना नेहवाल, अभिनव बिंद्रा, बजरंग पुनीया, फवाद मिर्झा, फोगाट भगिनी हे खेळाडू ऑलिंपिक, एशियाड, कॉमनवेल्थ स्पर्धेत पदके जिंकतात, तिरंगा फडकवतात, तेव्हा आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. पदक जिंकणारा प्रत्येक खेळाडू ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आज तरुणाईसमोर मोजके देखील आदर्श उरलेले नाहीत, त्या काळात हे खेळाडूच ती पोकळी भरून काढतात.
गेल्या काही वर्षांपासून महिला कुस्तीपटूंनी देशाची मान जगभरात उंचावली आहे. याची सुरुवात गीता आणि बबिता फोगाट या भगिनींनी केली. फोगाट भगिनी आणि त्यांचा इतर नातेवाईक भगिनी हा म्हणजे भारतीय महिला कुस्तीसाठीचा खजिना आहे. गीता, बबिता आणि विनेश फोगाट यानी जागतिक स्पर्धेत पदकांची अक्षरशः लयलूट केली. त्यांच्या योगदानाला तोडच नाही. साक्षी मलिक, अलका तोमार, फोगाट भगिनी ही नावे भारतीय महिला कुस्तीक्षेत्रात सुवर्णाक्षरांत लिहावीत अशीच आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यांनी मेहनतीने यशाची शिखरे सर केली आहेत. आमीर खानला फोगाट भगिनींवर ‘दंगल’सारखा चित्रपट करावा वाटण्याइतके यांचे आयुष्य खडतर आहे, नाट्यमय आहे.
खरे तर पदक जिंकल्यावर या सर्वच खेळाडूंचे कष्टप्रद आयुष्य संपायला हवे होते. पण दिल्ली येथे या खेळाडूंचे जे धरणे आंदोलन सुरू आहे ते पाहता तसे झालेले दिसत नाही. कारण आज स्वतःच्या स्त्रीसन्मानाला जपण्यासाठी, मूलभूत हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ त्यांच्यावर येत असेल, तर देशासाठी त्यांनी जी पदके जिंकली, त्यांचे मोल देशाने आज काय ठेवले? दिल्लीत कुस्तीगर महिलांना आंदोलन का करावे लागले हे वरवर जरी समजून घेतले तर ‘मोदी है तो क्या क्या (घृणास्पद) मुमकिन है’ याचा अंदाज येईल.
उत्तर प्रदेशच्या कैसरगंजचा भाजपाचा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हा खुनासह किमान चाळीसएक गंभीर गुन्ह्यांतील आरोपी आहे. गेली दहा वर्षे तो भारतीय कुस्तीगर परिषदेचा जणू कायमस्वरूपी अध्यक्ष असून याची एकट्याची तिथे हुकूमशाही चालते. याच्यावर भ्रष्टाचार आणि लैंगिक शोषणाचे आरोप सतत होत असतात. या खासदाराच्या अत्याचाराला कंटाळून जानेवारीमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट, सोनम मलिक, अंशू मलिक, अमित धनकर आणि सुमित मलिक यांच्यासह ३० नामांकित कुस्तीपटूंनी धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलकांच्या मागणीत प्रमुख मुद्दा होता तोच मुळात भाजपाच्या आणि विशेषकरून पंतप्रधान व गृहमंत्री यांचे निकटवर्ती असलेल्या ब्रिजभूषणच्या भारतीय कुस्तीगर परिषदेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टीचा होता. तसेच त्याच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी देखील प्रमुख होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: फार स्वच्छ, कार्यक्षम, कडक शिस्तीचे आहेत आणि आपल्या पक्षाच्या खासदारांवरही ते कडक नजर ठेवतात, शिस्तपालनाबाबत आग्रही असतात, अशा थापा मोदींच्या मांडीवर जाऊन बसलेला गोदी मीडिया सतत ऐकवत असतो. मग थेट भाजपाच्या एका खासदारावर ऑलिंपिक विजेत्या महिला खेळाडू लैंगिक छळाचा आरोप करतात, तेव्हा एवढ्या कठोर शिस्तीच्या पंतप्रधानांनी काय केले? सतत एकतर्फी मन की बात सांगणे आणि माझ्यावर लोक कशी टीका करतात, मला किती शिव्याशाप देतात, याची रडकथा जाहीर सभांमध्ये सांगणे, यातच हे आत्ममग्न गृहस्थ सतत गुंतलेले असतात. या महिलांनी ज्याच्यावर आरोप केला तो विरोधी पक्षाचा खासदार असता, तर खेळाडूंवर आंदोलनाची ही वेळ आलीच नसती. लागलीच तपास यंत्रणांनी कारवाई केली असती, खासदार वेगळ्या धर्माचा असता तर ऑन कॅमेरा, पोलिसांच्या देखरेखीत त्याचे एन्काऊंटर करवून घेऊन त्या महिलांना ‘न्याय’पण दिला गेला असता. स्वपक्षीय खासदारावर इतक्या गंभीर प्रकारचे आरोप होत असताना पंतप्रधानांनी तडफदारपणे त्याच्यावर कारवाई करायला हवी होती, किमान त्याचा कार्यभार काढून घेऊन त्याची चौकशी लावायला हवी होती. पण ज्याच्यावर आरोप आहे तो भाजपाचा बाहुबली खासदार आहे. अयोध्या परिसराचा तो जवळपास मालक बनलेला आहे. तिथे साक्षात मोदींची दातखीळ बसलेली असताना तपासयंत्रणांच्या हातांना लकवा मारला नसता तरच नवल होतं.
ब्रिजभूषणवर ठोस कारवाई होईपर्यंत आणि तो कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटेपर्यंत आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार नाही असे ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पुनिया हताश होऊन म्हणत असेल, तर डोळेझाक करून गप्प बसणे देशाच्या सरकारला शोभते का? ऑलिम्पिक वीरांगना साक्षी मलिकच्या मागणीवर डोळ्यांवर कातडे ओढून कसे बसू शकता?
मोदीभक्तीत लीन झालेले, डोक्यातला मेंदू, हृदयातली संवेदना, पाठीचा कणा आणि तोंडातली जीभ गमावून बसलेले भाजपवाले निगरगट्टपणे या आंदोलनाकडे दुर्लक्षच करत होते. पण एक गोष्ट ते विसरले की कुस्तीचे मैदानी डाव खेळून जग जिंकलेल्या या योद्ध्यांसमोर त्यांचे फुसके, कुटील राजकीय डावपेच चालत नाहीत. जानेवारीत ७२ तासांत तोडगा काढू म्हणून भाजपाने वेळ मारून नेली. मेरी कोम, योगेश्वर दत्त, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, सहदेव यादव हे खेळाडू व दोन विधिज्ञ अशी सात जणांची एक समिती यासाठी नेमली गेली. त्या समितीने अहवाल देखील दिला पण तो अजूनपर्यंत सरकारने दाबून ठेवलेला आहे. एप्रिल उजाडला, अहवाल दाबलेला आणि केंद्र सरकार ढिम्म हलत नाही, हे पाहून मग या खेळाडूंनी एप्रिलच्या २४ तारखेपासून परत आंदोलनाला सुरुवात केली. देशासाठी ऑलिंपिक पदक जिंकणारे हे खेळाडू दिल्लीच्या रस्त्यावर झोपले आहेत. इतके झाल्यावर तरी केंद्र सरकारच्या हाताखालच्या दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद करून घ्यायला हवा होता (निलाजरा ब्रिजभूषण आपले ४० गुन्हे उघडपणे पदकासारखे मिरवतोच, त्यात अजून एकाची भर पडल्याने त्याच्या ‘लौकिका’ला काही उणेपणा येणार नव्हता). या खेळाडूंना शेवटी सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणात त्यांची बाजू मांडली. दिल्ली पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवावा तसेच अल्पवयीन मुलीला संरक्षण द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि स्वतः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आपण एका आठवड्याने या विषयाची माहिती घेऊ, असे सांगितले. या देशातील न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास या कृत्यामुळे वाढला पण पण कोडग्यांचे शिरोमणी असलेले मोदी सरकार कोडगेच राहिले. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाडरा यांनी या आंदोलक खेळाडूंची भेट घेतली तेव्हा खेळाडूंना अजून एफआयआरची प्रतही मिळाली नसल्याचे उघडकीला आले. वाह रे दिल्ली पोलीस!
हे कुस्तीगीर म्हणजे ध्येयवेड्या खेळाडूंची पिढी आहे. देशातील तरुणाईला कुस्तीमध्ये देशाचे नाव मोठे करण्यासाठी ती प्रवृत्त करत आहे. ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू अल्पवयात हेरून तयार करावे लागतात. साक्षी मलिक बारा वर्षाची असल्यापासून स्पर्धेत उतरली होती. जगभरात हेच क्रीडाविषयक धोरण आहे. अशा अनेक अल्पवयीन मुली दिल्लीत कुस्तीचे प्रशिक्षण घ्यायला येतात. हल्ली मात्र ही महिला कुस्तीपटूंची सर्व राष्ट्रीय शिबिरे केवळ लखनौमध्ये घेतली जातात आणि याचे विनेश फोगाटने सांगितलेले कारण ऐकून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. विनेश म्हणते, ‘त्याचे (खासदार ब्रिजभूषण) लखनौमध्ये घर आहे. हे सर्व त्याच्या सांगण्यावरून केले जात आहे.’ महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या सोयीसाठी लखनौलाच शिबिर आयोजित केले जात आहे, हा आरोप हादरवून टाकणारा आहे. अशाने कोण आपली मुलगी तिथे प्रशिक्षण घ्यायला पाठवेल? टोकियो ऑलिम्पिकमध्ये अपयशी झाल्यानंतर विनेशने आरोप केला होता की तिला ‘महासंघातील एकाकडून’ जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, कारण तिने पंतप्रधान मोदींची भेट घेऊन ब्रिजभूषणविरुद्ध तक्रार केली होती. जगज्जेती होण्याची क्षमता असणारी विनेश त्यावेळी दुसर्याच फेरीत का बाद झाली होती? तिचा मानसिक छळ तर होत नव्हता ना? ‘राष्ट्रीय शिबिरातील काही प्रशिक्षक कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करतात. मी एकाच्या विरोधात तक्रार केली होती, पण तो अजूनही मुख्य प्रशिक्षक म्हणून शिबिराचा भाग आहे,’ असा गंभीर आरोप विनेशने केला होता. दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक जिंकणार्या विनेशच्या तक्रारीची दखल पंतप्रधान घेत नसतील, तर बाकीच्या खेळाडूंचे काय? फोगाटने दावा केला आहे ब्रिजभूषणने स्वतः देखील अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे. किमान १००पेक्षा जास्त मुलीं लैंगिक छळाने पीडित आहेत, हा आरोप किरकोळ नाही. फोगाट म्हणते की १०पेक्षा जास्त मुलींनी तिच्यावर विश्वास ठेवत तिला सर्व सांगितले आहे. साध्या घरच्या असल्याने त्या मुली उघडपणे विरोधात येऊ शकत नाहीत. शिवाय त्यांचे आयुष्य कुस्तीवर अवलंबून आहे. या सर्व पीडित महिला कुस्तीपटूंचे लहान अजाणते वय आहे. त्या भावी ऑलंपिक खेळाडू व्हायचे स्वप्न उराशी घेऊन मेहनत करायला आल्या, पण त्यांना वासनेची शिकार व्हावे लागले तर जबाबदार कोण? या मानसिक धक्क्यातून सावरून देशाला पदक मिळवून देणे इतके सोपे आहे का? देशाच्या क्रीडाजगताचे नुकसान करणारा हा सांड अजून मोकाट कसा आहे? देशाचा गौरव वाढवणार्या क्रीडापटूंना सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागतो, जंतर मंतरवर आंदोलन करावे लागते आणि तरीही प्रसारमाध्यमं मूग गिळून गप्प आहेत. स्वघोषित विश्वगुरू बनायला निघालेल्यांनी आधी एका वासनांध खासदारावर कारवाई करून स्वतःच्या आयाबहिणींच्या नजरेत तरी मोठे व्हायला हवे! गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिस खासदारावर गुन्हा नोंदवत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाला त्यासाठी आदेश द्यावे लागतात यातून या गृहमंत्र्यांची पॉवर काय आणि ती कुठे राजकीय धमक्या देण्यात वाया जात असते, ते दिसून येते. भाजपाच्या एका रावणाकडून महिला कुस्तीपटूंना धोका असेल, तर हे कसले रामराज्य? त्या रावणाचा बिमोड होणार नसेल तर यांचे प्रभू श्रीरामावरचे प्रेम तरी खरे आहे का बेगडी? बेटी बचावचे बेगडी आंदोलन करणार्यांच्या राज्यात बाहुबली सांसद से बेटी बचाव, अशी वेळ आलेली आहे. याची लाजही कोणाला वाटत नसेल, तर आपण रावणराज्यात येऊन पोहोचलो आहोत, हे नक्की. नुसती मंदिरं बांधून रामराज्य तयार होत नाही, त्यांचे आदर्शही अनुसरावे लागतात.
१४३ कोटींच्या जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येच्या आपल्या देशात ऑलिम्पिकविजेते खेळाडू हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही नसतात ही मुळात लाजिरवाणी गोष्ट. इथल्या बाबूगिरी आणि खाबूगिरीने ग्रासलेल्या, क्रिकेटच्या कॅन्सरने पोखरलेल्या क्रीडाविश्वात वेगळे खेळ खेळून स्वबळावर पदकं जिंकून आणणारा प्रत्येक खेळाडू हा देशाचा अनमोल ठेवा आहे. त्यांच्या बाबतीत एक देश आणि समाज म्हणून आपण ज्या प्रकारे वागतो आहोत, ते अक्षम्य आहे.
ज्यांनी निर्भया प्रकरणी राजकीय पोळी भाजून सत्ता मिळवली, ज्यांनी उन्नाव प्रकरणी राजकारण तापवले, ज्यानी हाथरसच्या पीडितेला शासकीय बंदोबस्तात परस्पर जाळून टाकले, ज्यानी बिल्कीस बानोचे बलात्कारी हार घालून पुजले, त्यांच्याकडून महिला सन्मानाची अपेक्षा कशी करता येईल? हे सरकार संवेदनशील असते तर गृहमंत्री आज हात जोडून खेळाडूंची माफी मागताना दिसले असते आणि पंतप्रधानांनी पीडित खेळाडूंची भेट घेण्याचे धाडस दाखवले असते. पण, हे दोन्ही निवडणूकजीवी कर्नाटकात प्रचारमग्न आहेत. या देशात हिंदू हे कालीमातेची पूजा करतात, परस्त्रीवर पजर टाकणार्या रावणाचे शिरकाण करणारा मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम हा हिंदूंचे दैवत आहे तसेच वासनांध दुर्योधनापासून द्रौपदीचा स्त्रीसन्मान अबाधित राखणारा श्रीकृष्ण देखील हिंदूंचे प्रिय दैवत आहे. या सर्व दैवतांची नावे घेत राजकारण करायचे पण लैंगिक शोषण करणारे नराधम पाठीशी घालायचे हे हिंदुत्वात बसत नाही.
ब्रिजभूषण शरण सिंह हा अयोध्येतील बाबरी मशीद पाडणार्या ३९ आरोपींपैकी एक आहे म्हणून संघाचा आणि भाजपाचा फारच लाडका आहे, असं म्हटलं जातं. या लाडक्यावर पॉस्कोसारखे गंभीर कलम लागणारा आरोप असला तरी त्याच्या दरवाजावर दिल्ली पोलिसांची साधी थाप पडत नाही, कारण तो रामलल्लाच्या अयोध्येचा बाहुबली आहे. अयोध्येत भव्य राममंदिर उभारले जात असताना ती अयोध्या एका रावणाच्या ताब्यात असावी, हे भारताचे दुर्दैव. पण, भारतीय जनता पक्षासारखा पक्ष सत्तेत पोहोचवून आपणच ते ओढवून घेतलेलं आहे.