फेटे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक होता, त्यावरून कितीतरी विशेषणे तसेच उपरोधिक उपाधी आल्या आहेत. फेटेधारी, फेटेबाज, पगडीबहाद्दर, मुंडासेबाज, जिरेटोपकरी, पगडीधर, आनंदाच्या प्रसंगी फेटे उडवणे असो वा कळकळीची विनंती करण्यासाठी फेटा समोरच्याच्या पायाशी ठेवणं असो, या फेट्यांनी मराठी माणसाच्या मनात मानापमानाचं स्थान मिळवलं आहे. फेटे बांधण्याच्या एका लहान कलेचं व्यावसायिक रूपांतर कसं करू शकतो, हे निहारने दाखवून दिलं आहे.
– – –
इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना इंडियन आयडॉल मराठी या कार्यक्रमाची एक क्लिप पाहण्यात आली. त्यात संगीतकार अजय-अतुल यांनी, स्पर्धकांनी घातलेल्या फेट्यांचं कौतुक केलं आणि ते फेटे बांधणार्या मुलाला स्टेजवर बोलावून विचारलं, ‘फेटा खूप छान बांधलाय! तुम्ही याव्यतिरिक्त काय करता?’ त्या मुलाने सांगितले की, ‘मी हेच काम करतो.’ त्यावर आश्चर्याने अतुल यांनी पुन्हा विचारलं, ‘दुसरं काहीही करत नाही?’ तो तरुण म्हणाला, ‘मला आपल्या संस्कृती आणि परंपरेचा अभिमान आहे, म्हणून केवळ हेच काम मी आता करतो.’
तो व्हिडिओ काही मिनिटांचा होता, पण पुढील अनेक दिवस एक प्रश्न माझ्या मनात सतत घोळत होता, इतरांच्या डोक्यावर फेटे बांधून कुणी आपला चरितार्थ चालवू शकतं का? काही दिवसांनी ‘चिरायू’ संमेलनात तोच फेटे बांधणारा मुलगा दिसला. त्याचं नाव निहार तांबडे. निहार या व्यवसायात कसा आला आणि त्याच्या व्यवसायाचा परीघ काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याची भेट घेऊन त्याला बोलतं केलं.
निहार म्हणाला, मुंबईचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या गिरगावात माझा जन्म झाला. वडिलांचा मालाडला स्टोव्ह रिपेअर करण्याचा व्यवसाय होता, पण गॅस शेगडी आल्यापासून त्यांचं काम कमी झालं, तेव्हा त्यांनी प्लंबिंगची काम घ्यायला सुरुवात केली, त्यात फारसा जम बसला नाही. हळूहळू वडील व्यासनाधीन होऊ लागले. २०१० साली मी नववीत असताना वडिलांचं निधन झालं. मी लहान असल्यापासून आई घरकाम करते ते आजपर्यंत. वडील वारल्यानंतर म्हणजे नववीची परीक्षा झाल्यापासूनच मी काम करायचं ठरवलं. मित्राचे वडील म्हणाले माझ्या ओळखीचे एक दुकानदार आहेत, त्यांच्याकडे तुला काम मिळू शकेल. ते स्टेशनरीचं दुकान होतं. मालक म्हणाले, हे घे ८० पेन आणि हे सगळे विकून संध्याकाळपर्यंत दुकानावर परत ये.
जॉटरचे बॉलपेन होते, मला जॉटर हा शब्द देखील नीट म्हणता येत नव्हता. कपडा मार्केटमध्ये पेन विकण्यासाठी फिरत होतो आणि दिवसभरात ८० पेन विकून आठशे रुपये मालकांच्या हवाली केले. ते खुश झाले म्हणाले, ‘‘तू पहिलाच मुलगा आहेस ज्याने एका दिवसात सगळे पेन विकून मला ८०० रुपयांचा व्यवसाय मिळवून दिला.’
त्यांनी मला कामावर ठेवले. दिवसाला ७० ते ९० रुपये असा माझा पगार होता. हळूहळू मोठी कामं ते माझ्यावर सोपवू लागले. लहान असून देखील पैशाचे व्यवहार सांभाळणं मला जमू लागलं होतं. दुपारी जेवणासाठी दहा रुपये मिळायचे त्यातल्या सहा रुपयाचा समोसा पाव आणि तीन रुपयांचा उसाचा रस असं खाऊन उरलेला एक रुपया मी त्यांना परत करायचो. पहिल्या दिवसाच्या कमाईचे ते ७० रुपये आईच्या हातात दिले तो दिवस आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. त्या दिवसापासून माझ्या कमाईला सुरुवात झाली ती कायमचीच. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण गिरगावातल्या आर्यन हायस्कूलमध्ये झालं. अकरावीला भारत कॉलेजला प्रवेश घेतला. शिक्षणाचा काही खर्च स्वतः उचलण्यासाठी मी गणपतीच्या कारखान्यात आणि इतरत्रही छोटी मोठी कामे करायचो, पण त्यामुळे कॉलेजला दांड्या व्हायच्या. बारावीच्या प्रीलिमला सरांनी माझा प्रोजेक्ट उशिरा सबमिट केला म्हणून नाकारला. वय लहान, तरुण रक्त त्यात आमचे सर दक्षिण भारतीय, त्यामुळे माझा मराठी बाणा नको तिथे जागा झाला. मी म्हणालो, मोडेन पण वाकणार नाही. आगापिछा न पाहता मी शिक्षण बंद केलं. मला वाटायचं की माझ्याकडे असलेल्या कलाच मला तारून नेतील, पुस्तकी शिक्षणाची मला गरज नाही. कारण शाळेत असल्यापासूनच मला चित्रकलेत रस होता. शाळेच्या शतक महोत्सवी समारंभात आम्ही विद्यार्थ्यांनीच मिळून शाळेच्या भिंतींवर वारली चित्र काढली होती.
आमच्या गिरगावात राहणार्या मुलांपैकी प्रत्येकाने वयाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर बाप्पासाठी मातीत काम केलेलं असतं. मीही त्याला अपवाद नव्हतो. गिरगावातील राजन वेदक सरांकडे जाऊन मी त्यांचं काम बघत असे, हळूहळू वाटलं की आपणही मूर्ती बनवण्याच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा. माती मळणं, दाबकाम, रंगकाम, मूर्ती वाळवणं, रंगकामाने वस्त्र परिधान करवणे अशी सगळी कामे शिकलो. वेळेअभावी केवळ आखणी करण्याचं म्हणजे डोळ्यांचं (सर्वात महत्त्वाचं मानलं जाणारं) काम शिकता आलं नाही.
माझ्या आवडीनिवडी घडवण्यात आजोबांचा मुख्य वाटा आहे. आजोबांमुळेच मला चित्रकलेची आवड निर्माण झाली. त्यांची रंगपेटी, ब्रश, बुद्धिबळाचा पट, पुस्तके हे सगळं मला माझ्या खेळण्यांपेक्षा प्रिय होतं. ऐतिहासिक पुस्तकांमधून मला महाराष्ट्राचा इतिहास समजला. भारतीय संस्कृतीविषयी नवनवीन माहिती मिळाली. सगळ्यात जास्त प्रभाव पडला तो छत्रपती शिवरायांचा. महाराजांचे गड किल्ले, मोहिमा मला नेहमीच स्फूर्तिदायक वाटत आल्या. त्यातूनच गड किल्ले संवर्धनासाठी असलेल्या मोहिमांमध्ये मी सहभागी झालो. या गोष्टी मला आवडतात म्हणून करत होतो. आता लक्षात येतं की या आवडींतूनच माझं व्यक्तिमत्त्व घडत होतं. किल्ल्यांवर फिरताना मनाने मी महाराजांच्या काळात मुशाफिरी करायचो. त्या काळातल्या प्रथा, विचार, रीती, पोषाख या सगळ्याची माहिती करून घ्यायचो. फिल्मी संगीतापेक्षा, ढोलताशांचा गजर आणि पोवाडे मला आवडायला लागले. गिरगावच्या ढोल पथकात आणि भजनी मंडळातही सामील झालो.
एकीकडे मराठी संस्कृतीची अधिकाधिक माहिती झाल्याने समृद्ध होतं होतो. पण त्याचवेळी आईचे कष्ट आणि रिकामा खिसा, काम शोधायला खुणावत होता. तात्पुरत्या कामापेक्षा स्थिर काहीतरी करावं असं वाटतं होतं. रागाच्या भरात शिक्षण अर्ध्यातून सोडल्यामुळे काम काय करायचं हा प्रश्न होता. मोठ्या पगाराची नोकरी मिळणार नव्हती आणि व्यवसाय करायचा तर अनुभव आणि भांडवल हाताशी नव्हतं. अचानक एक कमिशन मिळवून देणारा बिनभांडवली धंदा नजरेस पडला… शेजार्यांनी नाक्यावरच्या हॉटेलमधून पावभाजी मागवली होती. ती घेऊन नेहमीचा हॉटेलचा डिलिव्हरी बॉय न येता, पाठीवर बॅग घालून युनिफॉर्म घातलेला एक तरुण ऑर्डर डिलिव्हर करायला आला. स्विगी, झोमॅटो हे फूड डिलिव्हरी अॅप नव्यानेच सुरू झाले होते. अनेक परप्रांतीय मुलं घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवण्याचे काम करत होते. मला वाटलं मीसुद्धा हे काम करू शकतो. आईने धुणीभांडी करून मला लहानाचं मोठं केलं असल्याने मेहनतीच्या कोणत्याही कामाची लाज वाटणे, हा विषय माझ्यापुरता कधीच नव्हता. स्विगीमधे चौकशी केली. त्यांना फूड डिलिव्हरीसाठी स्वतःची टूव्हीलर असणारी मुलं हवी होती. मला दुचाकी चालवायला आवडायचं, पण स्वतःची गाडी नव्हती. तेव्हा आईने वडिलांची आठवण म्हणून ठेवलेलं मंगळसूत्र मारवाड्याकडे गहाण ठेवून मला ‘अॅक्टिवा ३जी’ ही गाडी घेऊन दिली. मी स्विगीला डिलिव्हरी पार्टनर म्हणून रुजू झालो. मला लवकरात लवकर आईचं मंगळसूत्र सोडवायचं होतं, त्यामुळे दिवसाचे अठरा तासही काम करायची तयारी होती. मी सकाळी सात वाजता अॅप सुरू करायचो, ग्राहकाने ऑर्डर टाकल्याचा मेसेज मिळाला की मी लगेच हॉटेलच्या दिशेने धावायचो. हॉटेलमधून जिन्नस ताब्यात घेतल्यावर, गल्लीबोळातून गाडी दामटवत मी कमीत कमी वेळात ग्राहकांच्या दारात हजर. माझा हा स्पीड पाहून ग्राहक गंमतीने विचारायचे, ‘तू खाण्याचे पदार्थ घेऊन आमच्या बिल्डिंगखाली उभा असतोस का?’ या जलद डिलिव्हरीची दोन कारणं होती. पहिलं, हॉटेल मालकांना ठरविक वेळी कोणत्या ऑर्डर्स येतात याची माहिती असते, त्याप्रमाणे ते जय्यत तयारीत असतात आणि ऑर्डर मिळताच झटपट रेडी करतात. दुसरं कारण म्हणजे, हॉटेल ते ग्राहकांचे घर यामधील सर्व शॉर्टकट मला माहीत होते. लहानपणी मित्रांसोबत दक्षिण मुंबईतील गल्ली न गल्ली पिंजून काढली होती. स्थानिक असण्याचा हा फायदा मला झाला. त्यामुळेच मी सलग सहा महिने मी दक्षिण मुंबईत प्रथम क्रमांकाचा डिलीव्हरी पार्टनर होतो. इतर डिलीव्हरी बॉय जेव्हा आठवड्याला १०० ऑर्डर्स पूर्ण करायचे तेव्हा मी २५०पर्यंत पोहोचलेलो असायचो. कंपनी नवीन असल्याने प्रत्येक डिलीव्हरीमागे चांगले पैसे मिळत होते. तीन महिन्यात आईचं मंगळसूत्र तर सोडवलंच, शिवाय आईला दरमहा चांगली रक्कमही देऊ शकलो. बाबा गेल्यावर आई आणि मी एवढंच आमचं कुटुंब होतं. आयुष्यातल्या प्रत्येक भल्याबुर्या प्रसंगात आई ढाल बनून माझ्यासोबत होती. स्विगीमुळे तिला थोडा आराम देता येत होता. त्यामुळे दमछाक होत असूनही मी काम सुरूच ठेवलं.
सुमारे ११ महिने मी एकही सुटी न घेता दिवसाचे १८ तास काम करत होतो. थोडा त्रास झाला तरी दुर्लक्ष करत होतो पण शरीराची एक क्षमता असते. एके दिवशी सकाळपासून अशक्त वाटतं होतं, चक्कर येत होती. कशीबशी पहिली ऑर्डर पूर्ण करून स्विगी हबला येऊन पोहोचलो. माझी अवस्था पाहून मॅनेजर सर घरी सोडायला आले. प्रकृती पूर्ववत व्हायला काही आठवडे लागले, बरं झाल्यावर पुन्हा कामावर रुजू झालो. पण मधल्या काळात स्विगी आणि झोमॅटोमध्ये चांगलं कमिशन मिळत असल्याने देशभरातून अनेक तरुण मुंबईत डिलीव्हरी बॉईजची नोकरी करण्यासाठी आले. कुणालाही पगार द्यावा लागत नाही आणि एक डिलीव्हरी करण्यासाठी चार तरुण रांगेत उभे असतील, तर कमिशन कमी दिले तरी चालते, यामुळे कंपन्यांनी देखील भरमसाठ भरती केली. जिथे मी दिवसाला पंचवीस ऑर्डर्स मारायचो, तिथे दोन तीन ऑर्डर मिळायला लागल्या. पेट्रोलचे देखील पैसे निघत नव्हते. उद्वेगाने काम सोडलं. पुन्हा बेरोजगार झालो.
मला फोटोग्राफीची आवड होती. काही मित्रांचा फोटोग्राफीचा व्यवसाय होता, त्यांना मदत म्हणून ऑर्डर लोकेशनवर जायला लागलो. त्यातून थोडे पैसे सुटत होते. पोथी पुराणे, महाराजांचे चरित्र, इतिहासवाचनाची सोबत होती. रूपक मोरे या मित्राचं लग्नात वाजणार्या बँडचं दुकान आहे. त्याचबरोबर तो लग्नात आणि अन्य समारंभांत फेटे बांधण्याचं काम करतो. रूपक सुरेख फेटे बांधतो. मला इतिहासाची आवड असल्याने फेटे, पगडी, टापशी, मुंडासे, जिरेटोप याबद्दल माहिती होती पण काय कसे बांधायचे ते ठाऊक नव्हतं. रूपकला मी फेटा बांधायला मदत करायला लागलो. रूपकने प्रोत्साहन दिलं की अरे तू सराव कर, तुलाही जमेल उत्तम फेटा बांधणं. एकदम डोक्यावर फेटा न बांधता आधी काही दिवस गुडघ्यावर, त्यानंतर हेल्मेटला फेटा बांधून सराव केला, मग स्वतःला फेटा बांधायला शिकलो. एव्हाना हात बसला होता.
एकदा रूपककडे एकाच दिवशी दोन लग्नांच्या ऑर्डर होत्या. त्याने मला एका ठिकाणी नवरदेवाला फेटा बांधायला पाठवलं. मला कॉन्फिडन्स नव्हता. प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा दिवस खास असतो. नवरा हा त्या दिवसाचा राजा असतो, अख्ख्या मांडवाचं लक्ष त्याच्याकडे असतं. नवरीला जसा साज-शृंगार असतो, तसा नवरदेवाला नसतो. त्याचा पेहराव आणि फेटा याच गोष्टी त्याला मांडवातील इतर पाहुण्यांपेक्षा वेगळं ठरवतात. त्या दिवशी ज्याचं लग्न होतं त्या नवरदेवाच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण आपल्यामुळे वाया जायला नको यासाठी फेटा बांधण्यापूर्वी हात जोडून खंडोबाचं नाव घेतलं आणि नवरदेवाला फेटा बांधायला सुरुवात केली. फेटा बांधेसूद दिसत होता, मानेच्या, डोक्याच्या हालचालीने सुटत नव्हता. व्हिडिओ कॉल करून रूपकला फेटा दाखवला, रूपकने कामाचं कौतुक केल्याने हुरूप आला. साडे तीन मिनिटात एक फेटा या वेगावर पोहोचल्यावर मी रूपकच्या बरोबरीने फेटे बांधायला लागलो. उजव्या बाजूचे फेटे डाव्या बाजूचे फेटे, वरातीचे साधे फेटे, नवरदेवाचे शाही फेटे, लहान मुलांचे फेटे, मारवाडी गुजराथी पगडी, राजस्थानी पगडी, पंजाबी पग, महाराष्ट्रातील अठरापगड जातीतल्या अठरा प्रकारच्या पगडी या सगळ्या प्रकारात प्रावीण्य मिळवत गेलो.
एकेदिवशी दुपारी मी आणि रूपक घरी असताना जय जय महाराष्ट्र ही नवी मालिका टीव्हीवर सुरू होती. सुबोध भावे सूत्रसंचालन करत होते. महाराष्ट्राची संस्कृती जपणारी ती मालिका आम्हाला आवडली, फक्त फेटे सोडून. चित्रीकरणाला लागणार्या रंगसंगतीच्या टेक्निकल गोष्टी माहीत नसल्या, तरी यापेक्षा चांगले फेटे आपण बांधू शकतो असं मला वाटलं. फेटे बांधणारा कलावंत म्हणून मला आवर्जून सुबोध भावेंना कळवावंसं वाटतं होतं, पण रुपकचं म्हणणं होतं, ‘कमेंट वाचून जर ते म्हणाले की फारच शहाणा आहेस तू, इतकं कळतं तर तू बांधून दाखव,’ तर तिथे जावं लागेल. फक्त टीका करून चालणार नाही. घेतलं खंडोबाचं नाव आणि केला सुबोधदादाला इंस्टाग्रामवर मेसेज, ‘सुबोध सर, मला हा कार्यक्रम खूप आवडला, पण एका गोष्टीची खंत वाटली. मंगलप्रसंगी डोक्यावर बांधले जाणारे फेटे महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे. आपल्या कार्यक्रमातील फेट्यांची बांधणी योग्य प्रकारे केल्याचे जाणवत नाही. मी सुद्धा फेटे बांधायला शिकलो आहे. तुम्हाला फेटा बांधून दाखवण्याची संधी मिळाली तर मला आवडेल आणि त्याबदल्यात कुठल्याही रकमेची अपेक्षा नाही. आणि काय आश्चर्य, थोड्याच वेळात इंस्टाग्रामवर सुबोध दादांचा मेसेज आला, ‘दहा तारखेला सेटवर या.’ मी हो म्हटलं. काही मराठी मुलं ‘चित्रपटसृष्टीत गटबाजी आहे. आम्हाला संधी मिळत नाही’ अशी तक्रार करतात. पण मी सांगेन, आवडीच्या कामात प्रावीण्य मिळवा आणि प्रामाणिक प्रयत्न करा. कोणताही वशिला नसेल तरी संधी मिळते, त्याचं सोनं कसं करायचं हे मात्र तुमच्या हातात असतं.
१० डिसेंबर २०१९… मी अॅक्टिवाने गिरगावातून ग्रीन व्हिल स्टुडिओ, मिरा रोड इथे जायला निघालो, तेव्हा वाटलं नव्हतं की याच मार्गावरून आपण सिनेसृष्टीत पाऊल टाकणार आहोत. स्टुडिओत शिरल्यावर प्रॉडक्शनच्या माणसांनी विचारलं, मालिकेतील कोणत्या भूमिकेसाठी तयार होऊन आला आहात? माझा पेहराव पाहून त्यांचा गैरसमज झाला होता. बर्याच वर्षांपासून सदरा लेहेंगा, करकर वाजणार्या कोल्हापुरी चपला, कानात कुंडल, डोक्याला भंडारा आणि कुलदेवीचं कुंकू, असा माझा पोशाख आहे. असो. सुबोध भावे दादांना भेटलो. त्यांनी आस्थेने चौकशी केली. सुबोधदादाचा मेकअप झाल्यावर मी माझ्या पद्धतीने त्या मेकअपला, त्यांच्या देहयष्टीला शोभेल असा फेटा बांधून तयार केला. फेटा बांधून व्हॅनिटीमधून सुबोध दादा खाली उतरला, तेव्हा सेटवरची सगळी मंडळी त्याच्याकडे बघतच राहिली. त्या दिमाखदार फेट्यामुळे सुबोध दादा राजबिंडा दिसत होता. त्या दिवशी तीन भाग शूट होणार होते, मी तिन्ही भागांत तीन वेगवेगळे फेटे बांधले. मी केलेलं काम सगळ्यांना आवडलं याचंच मला खूप समाधान मिळालं. मी काही पाकिटाच्या अपेक्षेने गेलो नव्हतो, पण शूटिंग संपवून निघताना मला त्यांनी ठरलेली बिदागी देऊ केली.
‘जय जय महाराष्ट्र’चे एपिसोड टीव्हीवर आले तेव्हा आमच्या विभागातील लोकांनी माझं खूप कौतुक केलं. मला फेटे बांधण्यासाठी विचारणा होऊ लागली. मी ‘फत्ते शिकस्त’ हा सिनेमा बघितला. त्यातील कलादिग्दर्शक सुमित पाटील हे माझे मित्र. दिग्पाल सर माझे आवडते दिग्दर्शक आहेत, असं सांगितल्यावर सुमितने दिग्पालदादांना कॉल लावून दिला. त्यांनी मी काय करतो हे विचारलं आणि भेटायला बोलावलं. फेट्यांची सगळी तयारी करून मी दिग्पाल दादांना भेटायला गेलो. त्यांनी ‘जय जय महाराष्ट्र’मधले फेटे बघितले होते. म्हणूनच ‘पावनखिंड’मध्ये सगळ्या कलाकारांचे फेटे बांधण्याचं काम मला मिळालं. मालिकेतून सिनेमात काम करताना कामाचं स्वरूप बदललं. दोन्ही माध्यमांतील फरक समजला. मोठ्या पडद्यावर दिसणार्या प्रत्येक गोष्टीची काटेकोरपणे पाहणी केली जाते. चित्रीकरण करताना झालेली एखादी लहानशी चूक, सीनचा लुक बिघडवू शकतो.
मोठ्या बजेटच्या ऐतिहासिक चित्रपटाचे काम मिळणं ही माझ्यासाठी चांगलं काम करून दाखविण्याची संधी होती. मी मन लावून काम करत होतो. मावळ्यांचे फेटे बांधताना त्यांचे फेटे डाव्या बाजूला तुरा असलेले आणि मुघलांच्या बाजूचे फेटे हे उजव्या बाजूला तुरा असे ठेवले. यातून दोन्ही सैन्यातील फरक ठळकपणे दिसला. बरेचसे सीन पावनखिंडीत लढाईचे होते. त्यामुळे शूटिंग सुरू असताना लढतेवेळी मावळ्यांचे फेटे विस्कटून चालणार नव्हते. एखादा सीन आपल्याला अवघ्या काही मिनिटांचा दिसतो, पण चित्रीकरण करताना खूप वेळ लागतो आणि सीनमध्ये भरपूर माणसं असतील तर तो सीन मनासारखा चित्रित होण्याकरिता असंख्य रिटेक घ्यायला लागतात. तासंतास उलटून जातात. अशावेळी फेटे व्यवस्थित जागेवर राहिले पाहिजेत हा माझा उद्देश होता आणि झालेही तसेच. बरेचसे सीन हे पाण्यात होते तरीदेखील शेवटपर्यंत एकाही मावळ्याचा फेटा घामाने किंवा पाण्यामुळे सुटला नाही. बांदलांच्या पूर्ण सेनेचे फेटे, बहिर्जींचा फेटा, मावळ्यांचे फेटे, मुघलांच्या सेनेतील फेटे असे विविध फेटे मी दर दिवशी बांधत होतो. कडेकपारीत किल्ल्यांवर शूटिंग करताना आम्ही सगळेच महाराजांच्या काळात पोहोचलो होतो. बाहेरच्या जगात काय सुरू आहे याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. आम्ही या जगात परत आलो ते चित्रपट महामंडळाच्या नोटिशीने. कोरोना महामारी असल्याने आऊटडोअर शूटिंग थांबवून सर्व कलाकार व तंत्रज्ञांनी घरी जावे, लॉकडाऊन लागल्यावर वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसेल, अशी नोटीस आल्याने शूटिंग थांबवून सगळे माघारी परतले. घरी आलो आणि तीन दिवसांनी लॉकडाऊन सुरू झालं. हे लॉकडाऊन मनोरंजन क्षेत्रात जवळ जवळ दोन वर्षे चाललं. २०२१च्या दिवाळीनंतर थांबलेले चित्रपट, सिरीयल शूटिंग पुन्हा सुरू झाल. टॅलेंट शोज देखील पुन्हा सुरू झाले. अवधूत गुप्ते दादा, आस्ताद काळे दादा अशा अनेक सेलिब्रिटींना फेटे बांधले. सिरीयल, शोज, लग्नसराई सुरू झाली आणि कामाने सुसाट वेग घेतला.
तात्पुरता फेटा बांधणं तसं सोपं आहे, पण एखाद्या प्रसंगानुरुप फेटा बांधणं ही कला आहे. त्या व्यक्तीच्या डोक्याचा आकार तसेच देहबोलीसाठी फेटा साजेसा हवा. आपण बांधलेला फेटा कार्यक्रम संपेपर्यंत सुटायला नको, तसेच त्याची बांधणी रेखीव राहिली पाहिजे हे खरं कौशल्य. मी नववीत असल्यापासून फेटा बांधणे बघत होतो, मग सराव केला आणि आज मी मराठी इतमामाला साजेसा फेटा बांधू शकतो. कुठल्याही प्रकारच्या फेटा पगडीचा मला प्रत्यक्ष किंवा फोटो दाखवला तर हुबेहूब प्रतिकृती मला तयार करता येईल हा विश्वास इतक्या वर्षांचा सराव आणि अनुभवाने मला दिला आहे. फेटा बांधताना सुरुवात खूप महत्वाची. उजव्या बाजूला असलेला सोगा आणि त्याची लांबी तुर्याएवढीच महत्वाची आहे. फेटा बांधण्याचा कापड जितकं सुती तितकं चांगलं, फेटा घालून व्यक्ती कॅमेर्यासमोर असणार आहे की घरगुती समारंभ आहे, लाइट्स कसे असणार आहेत, त्या समारंभातलं फेटा घालणार्याचं स्थान काय, म्हणजे वर्हाड्यांचा फेटा नवरदेवाच्या फेट्याएवढा शाही असून चालणार नाही, व्यक्तीच्या बांध्यानुसार सडपातळ माणसाला सहावारी साडीचा फेटा तर सशक्त बांध्याला नऊवारी साडीचा फेटा शोभून दिसतो.
कोणतेही काम सातत्याने आणि प्रामाणिकपणे करत राहिलात की त्या कामात तुमचा ब्रँड तयार होतो. दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा… सर्व हिरोईन्सना लग्नाची साडी म्हटलं की डिझायर सव्यसाची आठवतो, तसंच कोणत्याही लग्नात नवरदेवाला फेटा बांधायचा असेल तर त्यांना निहार तांबडे आठवायला हवा, हे माझं स्पप्न आहे, असे तो सांगतो.
फेटे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक होता, त्यावरून कितीतरी विशेषणे तसेच उपरोधिक उपाधी आल्या आहेत. फेटेधारी, फेटेबाज, पगडीबहाद्दर, मुंडासेबाज, जिरेटोपकरी, पगडीधर, आनंदाच्या प्रसंगी फेटे उडवणे असो वा कळकळीची विनंती करण्यासाठी फेटा समोरच्याच्या पायाशी ठेवणं असो, या फेट्यांनी मराठी माणसाच्या मनात मानापमानाचं स्थान मिळवलं आहे. फेटे बांधण्याच्या एका लहान कलेचं व्यावसायिक रूपांतर कसं करू शकतो, हे निहारने दाखवून दिलं आहे.
लग्न-समारंभात सजावट, मेकअप, वेशभूषा असे व्यवसाय करणारे अनेक व्यावसायिक आहेत. तसेच या व्यवसायात खूप कॉम्पिटीशन आहे. म्हणूनच मराठी तरुण मुलांनी व्यवसाय करण्याच्या नवनवीन संधी धुंडाळायला हव्यात. व्यवसाय म्हणजे मोठा उद्योग, लाखो रुपयांची उलाढाल हा गैरसमज आपल्या मनात ठसला आहे. तो आधी दूर करायला हवा. फेटे बांधणे हा व्यवसाय करून जर नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळणार असतील तर मराठी तरुणांनी असे कलात्मक बिनभांडवली व्यवसाय शोधायला हवेत… हे डोक्यात घ्याल, कष्ट कराल, तेव्हा डोक्यावर यशाचा मानाचा फेटा आपोआप बांधला जाईल.