नुकताच एक मराठी पेजवर जामनगर येथील रिफायनरी क्षेत्रातील तब्बल दीड लाख आंब्याच्या आमराईचे कौतुक केले आहे. तिथे आंब्याचे कंपनी भरघोस उत्पन्न घेत असून रिफायनरीमधून कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणाचा आमराईवर जराही परिणाम होत नाही किंबहुना रिफायनरी अजिबात प्रदूषण करणार्या नसतात, असे भासविण्याचा प्रयत्न लेखातून केला आहे. जिथे प्यायला पाणी नाही तिथे एवढ्या मोठ्या आमराईसाठी पाणी कुठून आणायचं म्हणून कंपनीने समुद्राचे पाणी निक्षरीकरण करून (डिसॅलीनेशन) आमराई वाढवली आहे आणि प्रदूषणकारी कंपनी आणि तिथेच शेती ह्या दोन टोकाच्या गोष्टी सहज शक्य आहेत असे भासविण्याचा प्रयत्नही लेखात केला आहे.
त्यामागचं सत्य काय आहे हे आता समजून घेऊ. हे खरं आहे की सदर रिफायनरीच्या अगदी जवळ तब्बल दीड लाख आंब्याची झाडे कंपनी न लावली आहेत. पण त्यावर प्रदूषणाचा काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी खोटं ठरेल. कारण ही आमराई रिफायनरीच्या चिमणीपासून सात कि.मी. उत्तरेला बनवण्यात आली आहे. इथेच फार मोठी गोम आहे. कारण कोणत्याही प्रदूषणकारी प्रकल्पाचा प्रभाव चिमणीच्या अगदी जवळ, म्हणजे पाच ते सात कि.मी. अंतरावर होतच नाही. कारण चिमणीमधून निघणारे घातक वायू तुलनेने खूपच हलके असतात, ते कधीच चिमणीच्या खाली वसलेल्या क्षेत्रावर पडत नाहीत ते उंचावर फेकले जातात आणि उंचावरून वाहणारी हवा त्यांना दूर घेऊन जाते. रिफायनरी क्षेत्रात कुठेच प्रदूषणाचा परिणाम दिसत नाही. परंतु रिफायनरी क्षेत्रापासून वीस ते पन्नास कि.मी. अंतरावर त्याचा खूप वाईट परिणाम दिसून येतो.
आणखी एक महत्वाची गोष्ट कंपनीने केली आहे ती म्हणजे चिमणीपासून आमराई ही उत्तरेला फुलवली आहे (मी उल्लेख केलेल्या लेखात ही बागायत रिफायनरीच्या पश्चिम दिशेला असल्याचं खोटं लिहिलं आहे.) समुद्राजवळ हवा रात्री जमिनीकडून समुद्राकडे आणि सकाळी समुद्राकडून जमिनीकडे वाहते. म्हणजेच पूर्व पश्चिम असा हवेचा प्रवास आहे. त्यामुळे चिमणीपासून उत्तरेला असलेल्या आमराईकडे चिमणीतून निघालेला धूर पोहोचतच नाही, तो आमराईच्या मागील बाजूस पूर्व आणि पश्चिम असा प्रवास करतो. तसेच, ऋतूबदल झाल्यावर देखील उन्हाळी मान्सून वारे पश्चिम नैऋत्येकडून पूर्व ईशान्य दिशेला वाहतात, तर हिवाळी मान्सून (परतीचा पाऊस) हा ईशान्येकडून पश्चिम नैऋत्य दिशेला प्रवास करतो. त्यामुळे रिफायनरीमधून निघणारा धूर कधीच या आमराईमध्ये जात नाही, तो नेहमी आमराईच्या विरुद्ध दिशेला जातो. म्हणूनच ही आमराई रिफायनरी क्षेत्रात असून देखील तिच्यावर प्रदूषणाचा अजिबात परिणाम होत नाही.
या लेखात आमराईसाठी समुद्राचे पाणी निक्षारीकरण करून वापरले जाते असं सांगितलं आहे आणि समुद्राचे पाणी निक्षारीकरण करणे कित्ती सोप्पे आणि फायदेशीर असल्याचे गळी उतरविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु असे करत असताना जेवढे समुद्राचे पाणी निक्षारी करन केलं जातं त्याच्या दीडपटीने अतिशय क्षारयुक्त (हायपर सलाईन ब्राईन) पाणी तयार होतं, ज्यासोबत घातक असे क्लोरीन आणि कॉपरयुक्त विषारी द्रव्ये देखील तयार होतात, जी थेट समुद्रात सोडावी लागतात. ज्यामुळे समुद्रातील जीवसृष्टीचा विनाश होतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे जर १.५ लाख आंब्याच्या झाडांना निक्षारीकरण केलेलं पाणी दररोज दिलं जात असेल तर एकट्या आंब्याच्या झाडाला दिवसाला १५० लिटर इतकं पाणी लागतं. त्या हिशोबाने १.५ लाख आंब्याच्या झाडांना दररोज १५ दशलक्ष लिटर पाणी द्यावं लागेल. आणि हे पाणी निक्षारीकरण केलेलं आहे असं पकडलं तर त्याच्या दीड पटीने अतिशय क्षारयुक्त आणि विषारी द्रव्ये तयार झालेलं पाणी, जे जवळपास २२.५ दशलक्ष लिटर असेल, ते पाणी दररोज कुठे टाकले जात असावे हा संशोधनाचा विषय असायला हवा. सांगायचं तात्पर्य हेच की अशा दिशाभूल करणार्या आमराईपासून आणि अशा प्रकल्पापासून आपण सावधच राहिलेलं बरं.
कोकणात सह्याद्रीच्या पश्चिम दिशेला जिथून मान्सून येतो त्या बाजूस रिफायनरी उभी केली तर तिचा खूप वाईट परिणाम संपूर्ण सह्याद्रीवरती होईल. रिफायनरीतून निघालेले धुराचे लोट दररोज सकाळी पश्चिम दिशेकडून पूर्वेस वाहणार्या हवेमुळे पूर्वेजवळ असणार्या डोंगराळ भागात जातील (जामनगर येथे भूभाग डोंगराळ नाही त्या मुळे धुराचे लोट डोंगराळ भागात अडले जात नाहीत). त्यामुळे पूर्वनियोजित नाणार येथे किव्वा बारसू सोलगाव येथे जर रिफायनरी उभी राहिली, तर त्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात असलेल्या डोंगराळ भागातील जंगल आणि गावं रिफायनरीमधून आलेल्या प्रदूषणाला बळी पडणार हे निश्चित. तसेच मान्सूनवेळी, पश्चिम नैऋत्य दिशेने वाहणार्या वार्यामुळे रिफायनरीमधून निघालेले धुराचे लोट कित्येक किलोमीटर उत्तर पूर्व दिशेला असलेल्या गावांमध्ये आणि समुद्राच्या पूर्वेला उभ्या असलेल्या सह्याद्री पर्वतावर जातील. ज्यामुळे त्यावर उभ्या असलेल्या वनराईला आणि त्यात राहत असलेल्या माणसासहित कित्येक जिवांना त्याची भयंकर किंमत मोजावी लागेल. त्याचसोबत जेव्हा मान्सून येईल तेव्हा ढगांच्या सोबत वाफेमधे रिफायनरीमधून निघालेल्या विषारी वायूचे लोट यांचे संयुग होऊन पावसासोबत खाली येतील आणि मग कोकणातील सर्व जमीन आणि नद्या देखील त्याची किंमत मोजतील आणि विषाक्त होऊन माणसाला त्याच्या करणीचे फळ देतील. आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा.