एका शेतकर्याची गोष्ट. जी गावापासून सुरू होऊन अगदी सातासमुद्रापार पोहोचली. शिक्षणाच्या जोरावर बड्या फार्मास्युटिकल कंपनीत सर्वोच्च पदापर्यंत तो पोहचला. पण गावच्या मातीचं अंतरंग मात्र विसरला नाही. गावची संस्कृती कायम त्याला खुणावत राहिली. तो पुन्हा गावात येतो आणि भूतकाळाला उजळा मिळतो. नवं जग अनुभवाच्या जोरावर उभं करण्याचा संकल्प करतो. ही एक सत्यकथा. जी आत्मकथनात्मक नाट्यमय शैलीतून नाचत गात, स्वगत-संवादातून अवतरते! या गोष्टीचा नायक आहे प्रदीप आडगावकर आणि गोष्ट सजविणारा पडद्यामागला महानायक आहे ‘सबकुछ’ पुरुषोत्तम बेर्डे!
मराठवाडा म्हटला की कायम दुष्काळी विभाग, अर्थात निसर्गापुढे आपण हतबल असतो. शेकडो शेतकर्यांच्या आत्महत्या आणि कर्जबाजारी कष्टकर्यांची आंदोलने; जसे ओसाड वाळवंटच. निस्तेज चेहरे अन् उदास मने… असं काहीसं चित्र शहरी मंडळींनी आजवर रंगवलंय. त्याला पुरेपूर छेद देणारा नव्या वाटेवरला मराठवाडा यातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. तसा सात जिल्ह्यांचा समावेश असणारा हा प्रदेश. या भूमीत अगदी शिवपुराणापासूनचे संदर्भ आहेत. बारा ज्योर्तिलिंगांपैकी तीन मंदिरे इथेच आहेत. नांदेडचे शीखधर्मीयांचे पवित्र स्थान, जे अमृतसरनंतरचे श्रद्धास्थान मानले गेले. पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान, परभणीतले सुफी मंदिर, तुराबुलचे हकदर्गा, तुळजापूरची तुळजाभवानी… ही सारी तीर्थक्षेत्रे, मंदिरे, संतभूमी इथलीच. हे धार्मिक पर्यटकाला अनुकूल ठरलंय. जागतिक वारसा सांगणारी अजिंठा-वेरूळ ही लेणी इथलीच. धार्मिक, सामाजिक तसेच शेतीविषयक नवी दिशा शोधणारे कृषीक्षेत्र हेसुद्धा वैशिष्टपूर्णच. यावर तिथल्या काहीशा आडवाटेवर असणार्या आडगावच्या नाट्याच्या निमित्ताने दुसरा सकारात्मक चेहराही प्रकाशात आलाय. वैचारिक, सांस्कृतिक संस्काराच्या संपन्नतेचे दर्शन त्यातून घडतंय.
दोन टिपिकल चोर. विशाल आणि संतोष. पाकीटमारी करणारे. त्यांना एक वाटसरू भेटतो. कोण-कुठले करता-करता मराठवाड्यातला जालना जिल्हा आणि भोकरदन तालुक्यातले आडगावचे हे सुशिक्षित-सुसंस्कृत गाववाले निघतात. त्यांच्या संवादातून सुरू होते मराठवाड्याची ओळख अन् मिळतो आठवणींना उजळा. प्रत्येकाला आपलं गाव म्हणजे सुवर्णाची लंकाच वाटते. त्या गावात जमलेल्यांची नाळ पक्की जुळलेली. अनेक घटना, प्रसंग, प्रवास याचा पेटारा त्यातून अलगद उलगडत जातो. गावाला असलेला भूगोल-इतिहास, कथा, सत्यघटना एकेक करून साकार होतात. वैयक्तिक जीवनातल्या प्रवासातून उभा गावच जणू जागा होतो. त्यातून वैशिष्ट्यपूर्ण, इरसाल व्यक्तिरेखा, त्यांची वृत्ती-प्रवृत्ती ही यातील आत्मकथनातून दिसते. बदलत चाललेल्या गावाचे दोन चेहरे हे प्रसंगी थक्कही करून सोडतात.
बैलांच्या शर्यतीचा असलेला पारंपारिक भव्य शंकरपट शर्यतींची जबरदस्त चुरस; कौटुंबिक, धार्मिक चित्रपटांचे आकर्षक असलेले टुरिंग टॉकीज; बसस्टँडपासून सुरू झालेला काळी-पिवळीतला टॅक्सी प्रवास; ऑर्केस्ट्रा, तमाशा, लावणी, बाई… यातली गावची धम्माल जत्रा, पंगतीतलं भोजन, आणि नाटक असलेला हनुमान मंदिरातील वार्षिक उत्सव आणि गावचा वाडा, घर यातले हृदयस्पर्शी प्रसंग, हे सारं काही या गोष्टीच्या ओघात रंगमंचावर आकाराला येतं. आणि एक गाव आणि त्याभोवतीचं जागरण फेर धरू लागतं.
प्रदीप आडगावकर यांचा मूळचा हा एकपात्री प्रयोग. त्याचे अनेक प्रयोग यापूर्वी झालेत. त्याचा मूळ बाज हा गप्पांचा, निवेदनाचा. त्याला दोनअंकी व्यावसायिक नाटकांची झालर ही कल्पक रंगधर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिली. यातील प्रमुख भूमिका आणि मूळ निवेदन खुद्द प्रदीप आडगावकर यांचेच असल्याने हे नाटक शंभर नंबरी अस्सल वाटते. आत्मनिवेदनात्मक लेखनात वेग आहे आणि सादरीकरणातील संहितेत प्रत्येक प्रसंगात नाट्य गच्च भरले आहे. मराठवाड्यातील भाषा, शब्द, उच्चार यामुळे या रसिकांना आडगावातच असल्याचा भास होत राहतो. अनेक कालबाह्य होत चाललेल्या शब्दांचे अर्थही स्पष्ट केल्याने बोलीभाषेतल्या ताकदीचे दर्शन होते. मराठवाड्याचा ‘तडका’ आणि सादरीकरणाचा ‘ठसका’ यातली ही सफरच!
संहिता पुनर्लेखनापासून ते दिग्दर्शनापर्यंत, नेपथ्यापासून प्रकाशयोजनेपर्यंत या नाट्याचे सबकुछ पुरुषोतम बेर्डे आहेत. त्याचाही ‘एक हाती’ प्रभाव हा सादरीकरणावर पडलाय. ‘टुरटूर’, ‘अलवरा डाकू’ ‘मुंबई-मुंबई’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘गांधी विरुद्ध सावरकर’, ‘चिरीमिरी’, ‘अमेरिकन अल्बम’ अशा एकापेक्षा एक वळणावरल्या नाटकांनी त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नवनवीन सादरीकरणासाठी शैली दिल्यात. ‘हट के’ आणि प्रवाहाविरुद्ध करण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. तो याही आत्मकथनपर आविष्कारातून पकड घेतो. एखादा कोलाज एकत्र करून त्याची मजबुतीने बांधणी केल्याचे दिसते. वर्तमानातील चर्चेतून भूतकाळ उभा करण्याचे कौशल्य विलक्षणच आहे.
कलाकारांची तयारीची टीम ही आणखीन एक जमेची बाजू. कारण पंचवीसएक कलाकार, वादक यांचा ग्रुप इथे ‘आडगावकर’ बनलाय. ऑडिशन घेऊन ही निवडप्रक्रिया करण्यात आलीय, परिणामी अस्सल रंगकर्मींची ताकदीची ‘टीम’ तयार झालीय. मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागातील अनेक विद्यार्थी यात आहेत. यात कुणीही ‘नाववाला’ कलाकार नाही, हे नोंद घेण्याजोगं. ‘उत्स्फूर्ततेतील क्षमता’ हा निकष निवडीच्या वेळी प्रामुख्याने बघितला गेला म्हणून नाटक परिणामकारक होते. एकेका कलाकाराने अनेक वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत रंग भरलेत. त्यात कुठेही जराही नवखेपणा नाही. त्यामुळे लवचिकता तसेच सहजपणा एकूणच नजरेत भरतो.
प्रमुख भूमिकेत सूत्रधार आणि खुद्द प्रदीप बाळूशेठच असल्याने प्रदीप आडगावकरांनी नाटक सहजतेने पेलले आहे. त्यात कृत्रिमता जराही नाही. विशाल राऊत, संतोष पाटील हे दोघे गॉगलधारी चोर जुळेभाऊ वाटतात. चंद्रशेखर भागवत यांचा जहुरभाई आणि सिद्दीकभाई शोभून दिसतो. गोविंद मरशीवणीकर (सोंगाड्या), अविनाश कांबळे (भजन गायक, वादक), श्रुती गिरम (आई), ऋता साळुंके व प्रतिभा गायकवाड (मुलगी व नर्तकी), वृषाली वाडकर (रडकी बाई), सुकृत देव (दारुडा), संदेश अहिरे (पहेलवान दादा), मयुर जाधव (वादक), कान्हा तिवारी (आमीर खान) या सार्यांना या नाटकाच्या निमित्ताने ‘बेर्डे स्कूल’चे रंगधडे मिळाले आहेत. नाच, गाणं, अभिनय, वादन या सार्या कला अवगत असलेली ही चांगली ‘टीम’ यात आहे. अभिनयाची सर्वांची जशी स्पर्धाच रंगते. अभिनयात फार्स, विनोद, लोकनाट्य याचं सुरेख मिश्रण दिसते.
‘नाचत यावे गौरीजना हो, तुजवीण माझा रंग सुना’ या गणाने सुरू झालेले नाट्य ‘आनंदाचा कंद हरी देवकीनंदन पाहिला’ या भैरवीने संपते. पट्ठे बापूराव यांचा गण, ज्ञानोबा उत्पात यांची लावणी प्रा. गणेश चंदनशिवे यांची छक्कड, प्रमोदिनी जेहुरकर हिचा अभंग याचे अप्रतिम सादरीकरण होते. ‘माझी आई’, ‘काळी पिवळी’, ‘वाट त्या गावाची’ ही प्रदीप आडगांवकर यांचे गीते ताल धरायला भाग पाडतात. प्रदीपजींच्या शब्दातला कवी हा कायम जागा आहे. वग-भजन, भैरवी, भारुड कीर्तन, लावणीसह तबला, पेटी, ढोलकी, हलगी, घुंगरू या तालवाद्यांनीही चांगली वातावरणनिर्मिती केलीय. रंगमंचावरच मध्यभागी वाद्यवृंद बैठक आहे. त्याचाही एक ‘लाइव्ह’ परिणाम होत राहतो.
काळीपिवळी गाडी; टुरिंग टॉकीज, शंकरपट, गावची जत्रा, मंदिर, हे सारं काही प्रतीकात्मक नेपथ्यातून आकाराला येते. विशेषतः काळी पिवळीतला प्रवास भन्नाटच. नेपथ्यरचना पूरक असून नेटकी आहे. वेशभूषा, प्रकाशयोजना, संगीत या बाजूही ‘बेर्डे टच’! केवळ प्रयोगापुरते किंवा सादरीकरणाइतकेच हे नाट्य लक्षवेधी ठरत नाही, तर नाटकाच्या जाहिरातींनीही धम्माल उडविली आहे. ‘जाहिरात एजन्सी’चा पुरेपूर अनुभव गाठीशी असल्याने एकेक जाहिरात रसिकांना नाट्यगृहापर्यंत खेचून आणण्यास कारणीभूत ठरते. याच्या जाहिरातींच्या कल्पकतेवर स्वतंत्रपणे भाष्य करता येईल, एवढी विविधता त्यात आहे. बर्याच दिवसांनंतर अशा प्रकारच्या जाहिरातींच्या मालिका या आकाराला आल्यात. त्या जाहिरात अभ्यासकांना विचार करायला लावणार्या आहेत. अर्थात नावीन्यपूर्ण जाहिराती हा तर बेर्डे यांच्या नाटकापूर्वीचा ‘प्रयोग’च असतो. हे नाट्यरसिकांना पुरेपूर ठाऊक आहेच.
‘टुरटुर’मध्ये सुरू झालेला बसप्रवास, नंतर ‘जाऊ बाई जोरात’मधल्या मंत्र्यांच्या बायकांचा बसप्रवास हे दोन प्रवास वेगवान झालेत. त्यातही नाचगाण्यांचा वर्षाव झाला होता आणि आता ‘मुक्काम पोस्ट आडगाव’मध्येही काळी पिवळीतला प्रवासच आहे. जो मराठी नाट्यप्रवाहातील बदलत्या आविष्काराचा ‘बस स्टॉप’ ठरतोय. प्रवास अटळ आहे. त्याखेरीज नाट्य रंगणार नाही, हेच खरे!
या निर्मितीबदल ‘सबकुछ’ बेर्डे म्हणतात, ‘गाव नुसतं नाव नसतं. त्यालाही एक इतिहास असतो. भूगोल असतो. तिथल्या मातीत फक्त सुगंध नसतो. त्यात गाणी असतात. नृत्य असते. संगीत असतं. साहित्य असतं. माया असते… आणि गर्भारपणातून काही नवं निर्माण करण्याची शक्ती असते!’ याची पुरेपूर प्रचिती या नाटकातून येते.
महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, भूमिपुत्र यांची कथानके आजवर रंगभूमीवर जरूर आलीत. पण ‘हसत-खेळत गावाकडे चला!’ हा संदेश यात खुबीने दिलाय. जो महत्वाचा ठरतो. त्यात नव्या दृष्टीने बघण्याची वेळ आज आलीय. हाही ‘डोस’ यात आहे. राजकुमार तांगडे या शेतकरी नाटककाराने ‘शेतकरी रंगभूमी’ सुरू केली होती. एक अभिनव कल्पना त्यातून मांडली गेली. वर्धा जवळ हरीश इथापे यांनीही मध्यंतरी ‘अॅग्रो थिएटर’च्या माध्यमातून शेती, उत्पादने, कुटुंबातील समस्या, हरवत चाललेलं गावपणं याला वाचा फोडली होती. आज व्यावसायिक रंगभूमीच्या दालनात एका शेतकर्याच्या स्वगतातून जो आठवणींचा पेटारा उघडला गेलाय तो नोंद घेण्याजोगा. आणि त्यातल्या इरसाल व्यक्ती तसेच एकेक वल्ली भेटतात. त्यातून रसिकांनाही आपल्या गावाची आठवण ही नक्कीच करून देतील.
सळसळत्या उत्साहात तुर्रेदार फेटा बांधून गावच्या स्टेजवर जेव्हा अस्सल ग्रामीण पोवाडा रंगतो, तेव्हा ‘मोगलाईवर केली मात, मराठवाडा आमचा प्रांत, शिवबाचा भगवा इथे फडफडतो!’ या पोवाड्याला मिळणारी उत्स्फूर्त दाद खूप काही सांगून जाते. ‘आला शिमग्याचा गं सण; दारी आला गं साजण, रंगात शब्द भिजवून, अन् करते दंग दंग दंग, आणि खेळू म्हणे रंग रंग रंग!’ ही लावणी मस्त रंगते. वन्समोअरची दाद मिळविते. मराठमोळे सण, उत्सव, आवडीनिवडी यावर प्रकाश पडतो. गाणं आणि नृत्य बहारदारच!
महाराष्ट्रातल्या एका गाववाल्याने शिक्षणाच्या जोरावर स्पर्धेच्या दुनियेत सन्मानाने विजय मिळविला. जगभरात ‘व्हीआयपी’ म्हणून भटकंती केली. आत्मविश्वास आणि मेहनतीच्या ताकदीने उभ जग कवेत घेतले. हे भाग्य दुर्लक्षित समजल्या जाणार्या आडगावच्या एका शेतकर्याच्या नशिबी आलंय. तरीही तो गावाच्या मातीशी प्रामाणिक आहे. जीवनाच्या उत्तरार्धात श्रद्धेने पुन्हा एकदा गावाकडे पोहचलाय. नव्या पिढीच्या नशिबी असेच भाग्य उजळू शकेल. ही ऊर्जा या निर्मितीतून मिळतेय हे काही कमी नाही. याचे अधिकाधिक प्रयोग उभ्या राज्यभरात व्हावेत, ही अपेक्षा. रंजन आणि अंजनाचा हा रंगलेला रांगडा आविष्कार प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा!
मुक्काम पोस्ट आडगाव
आत्मनिवेदन लेखन : प्रदीप आडगावकर
संहिता, दिग्दर्शन, नेपथ्य : पुरुषोत्तम बेर्डे
रंगभूषा : उदय तागडी
कपडेपट : कल्पेश कान्हेरे
निर्मिती सूत्रधार : जगदीश शिगवण, प्रणीत बोडके
निर्मिती : स्नेहा प्रदीप / अकॅडमी ऑफ सिनेमा अँड थिएटर / अष्टविनायक