(अस्सल ग्राम्य पॅनलचा दावा करणार्या `भान जायेल पॅनल’चं संसर्ग कार्यालय. कोपर्यात घोळतरकर, झगडेमार वगैरे प्रभृतींच्या प्रतिमा, तर प्रवेश द्वारासमोरल्या भिंतीवर उंच आणि भव्य असा हातातल्या परशुने पायाखालचा विव्हळणारा मोर मारण्याच्या पावित्र्यातला श्रीमंत हुकूमचंदाचा शिकारी मुद्रेतील फोटो. सध्या तिथे निवडणुकीप्रित्यर्थ आयोजित बुचप्रमुखांची नियोजन बैठक कम मेळावा. बैठकीला सरडे, करडे नि भरडे व इतर बुचप्रमुख तर बुचके हे निरीक्षक म्हणून उपस्थित होतात. बुचके व्यासपीठावर येताच त्यांची नजर तिथल्या हुकूमचंदांच्या तसबिरीकडे जाते.)
बुचके : (फोटोकडे बघत) दामू! दामू!! (पलीकडल्या दारातून एकजण आत येतो.) अरे, हा फोटो कुठून मागवलाय?
दामू : (खालमानेनं) सायेब, नाय सांगता यायचं!
बुचके : नाही सांगता यायचं म्हणजे? कोणे तो आणणारा? तो तर माहीत असेलच ना?
दामू : जी! आपणच मागल्या हुकूमचंद भेटीत आणण्यास लावला होता… पण तो आणला कोणी? ते मात्र माहीत नाही!
बुचके : (सारवासारव करत) बरं! बरं!! पण साफसफाई कोण करतं इथली?
दामू : जी सायेब! सकाळी झाडलोट करायला बाई येतीय! तीच करते सगळं!
बुचके : तिला ताबडतोबीनं हाकला!
दामू : जी सायेब! पण तिला कुणीच हाकलू शकत नाही सायेब!
बुचके : (शंकेने) पण का?
दामू : बाईसायेबांनीच धाडलंय तिला इथं!
बुचके : (पटकन सावरून घेत)असू दे! असू दे! (हुकूमचंदांच्या तसबिरीकडे बोट दाखवत) पण निदान हुकूमचंदांच्या नाकावर लागलेलं काळं तर काढायला लावायचं?
दामू : (सुटकेचा निःश्वास टाकत मोकळेपणाने) ते होय? ते वर्जिनल आहे.
बुचके : (प्रश्नार्थक चेहर्याने) ओरिजनल कसं असेल?
दामू : (उत्साहाने) आता त्यांना सवयीच आहे की! येगयेगळ्या ठिकाणी जाऊन कधी तोंड तर कधी नाक काळं करून घेयच्या!
बुचके : अरे काही काय बोलतोस?
दामू : अहो म्हणजे चेहरा रंगवून फिरत्या ना ते? कधी तुरे लावून कधी टोप्या घालून! तसलाच फोटो आहे हा! फक्त इथं ओरिज्नल नाक काळं करून शिकार करत्याय ब्वॉ ते!
बुचके : ते का असेना! पण बाजारात जाऊन एखादी फेअर क्रीम घेऊन ती लाव त्या नाकाला! पण गोरं कर नाक! नाही तर मी तोंड दाखवायच्या आणि तू नाक दाखवायच्या लायकीचे राहणार नाही! काय समजलास?
दामू : (लगबगीने जाताना) हो! हो!
सरडे : (इतक्या वेळ केवळ खुर्चीवर शांतपणे दामू आणि बुचकेचं संभाषण शांतपणे बघितल्यावर करडे आणि भरडेकडं बघत) थोडक्यात चारित्र्यावरचे डाग क्षम्य पण शरीरावरले डाग खपवून घेतले जाणार नाही! अश्या बाणेदार वृत्तीचे आपले हुकूमचंद…!(करडे आणि सरडे दोन्ही मान डोलावतात.)
करडे : पण आपल्या पॅनलचं नाव भान जायेल असं का? विकासासाठी म्हणजेच चौफेर प्रगतीसाठी भान हरपलेलं पॅनल ह्या अर्थानेच लिहायचं होतं तर हरपणे हेच क्रियापद योग्य आहे की?
भरडे : तुम्हाला कुणी `भान जायेल’ म्हणून पुकारलंय का कधी?
करडे : नाही! कधीच नाही!
सरडे : मग तुम्हाला नाही कळणार पॅनल! तुम्ही ग्रामीण मराठीचा अभ्यास करा आधी! काय? (करडे केवळ मूकपणे समर्थन देतात.)
बुचके : (छोटेखानी मंचावरून) सरडे, करडे आणि भरडे, तुम्ही इकडं लक्ष द्या! आणि इतर सर्व बुचप्रमुख!! आपण इथं आज निवडणूकपूर्व प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी आलोय! बरोबर ना? (सगळे मोठ्याने `हो!’ म्हणतात!) तर आपल्याला आपल्या भागातले प्रश्न काय आहेत नि लोकांच्या हुकूमचंदांकडून अपेक्षा काय आहेत, याबद्दल माहिती घेऊन व त्यावर आश्वासित केलेल्या विकासकामांची माहिती देववून आपल्या टार्गेट वोटरकडून मतदान करून घ्यायची जबाबदारी त्या त्या बुचप्रमुखाची राहील!
बुचप्रमुख `क’ : (अनाहूतपणे) अय देवा! असं बी र्हातं का?
बुचके : (बोलणं पुढे चालू ठेवत) त्यात ब्वॉ सगळ्यांना… म्हणजे विरोधकांना प्रश्न पडलाय का आपण हे बुचप्रमुख असं काय पद देतोय म्हणून! पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे प्रचाराच्या कालावधीत सुरा, ज्याला तुम्ही वा सामान्य विरोधक मद्य म्हणतात, ती मोठ्या प्रमाणात वाटली जाते… दिली जाते… रिचविली जाते. तर आपण त्यालाच टार्गेट प्रत्येक बुचामागे एक याप्रमाणे एक बुचप्रमुख लावून प्रचार करणारेऽऽऽ (टाळ्या वाजतात.) हे जगात सगळ्यात इनोव्हेटिव्ह सुचलंय आपल्या हुकूमचंदांना! (दीर्घ श्वास घेतो, पण कुणीही टाळ्या वाजवत नाही. न राहवून स्वतःच खुणेनं टाळी वाजवतो, एकदोन जण पाठोपाठ मरगळल्याप्रमाणे टाळ्या वाजवतात.) तर सर्वांनी आपल्या भागातल्या हुकूमचंदांच्या प्रचारातल्या समस्या सांगा. म्हणजे कुठं विकासकामे केली नाही किंवा काही तक्रारी बाकी आहे ब्वॉ!
सरडे : (डोक्यावरली टोपी गुडघ्यावर ठेवत) ते फक्त त्यांना म्हणा, पुढल्या वेळी लग्नात जाल तर बुके नीट घेऊन जा म्हणावं!
बुचके : आता बुकेचं काय झालं?
सरडे : (करडेकडं बघत) नाही मागल्या वेळी त्या डगळेच्या पोराचं लग्न होतं पहाय, तिथं त्यांनी बुके नेलेला!
करडे : हा आता लग्न म्हंटल्यावर नेतात ब्वॉ काहीजण बुके! सत्कार केल्याटाइप नवरा-नवरीला शुभेच्छा द्यायला! त्याच्यात काय झालं?
सरडे : अरे त्याच्यावं लिहेल होतं `*#%# अमर रहे!’ असं! आता सांग जिंदगीची सोप्नं पाहणार्या पोरांना असल्या शुभेच्छा दिल्यावर ते मतं देतील का?
भरडे : (कान टवकारत) बुकेचा मॅटर आहे का?
सरडे : तर?
भरडे : (खुर्चीचं तोंड सरडेकडं वळवत) मागं मारणेच्या म्हातार्याच्या गुढघ्याचं ऑपरेशन झालं, तेव्हा पण असलंच!
करडे : (उत्सुकतेने) असलं काय नेमकं?
भरडे : एक बुके नेलेला दवाखान्यात. त्याच्यावर लिहिलेलं काहीतरी ब्वॉ, `असा क्षण वारंवार येवो.’ म्हणून! आता ह्या वयात त्या म्हातार्यानं घडोघडी तो गुडघा का फोडून घ्यायचा?
बुचके : आता झालं असंल, चुकून! नाहीतर बुके उलटे-पालटे गेले असतील पण लोकांच्या समस्या म्हणल्या का, हेच येतं का? दुसरं काही नाही का?
सरडे : हां आता, एकदा बुच उघडलं का, बाटलीवानी माणसं बी मोकळी होतात. मग बोलतात भाबडी आमच्यासारख्या बुचप्रमुखांच्या जवळ! आता आम्ही बी त्यांचं ऐकून तुम्हालाच सांगतोय ना? आपली मतं कुठं कमी पडताय? हे कळलं म्हणजे लोकांची नाराजी दूर करून डॅमेज कंट्रोल करता येईल ना?
बुचके : हां ते कळालं! पण त्यांच्या अपेक्षा नाहीत का काही? आपण मतं देणार तर अमुक कामं करा म्हणून?
करडे : (मोठ्याने) काय अपेक्षा ठेवायच्या लोकांनी? मागल्या वेळी हुकूमचंदांनी भोळ्याला सांगितलं तुझं पोर कामाला लावतो, आणि नंतर ते डबल ग्रॅज्युएट पोर ठेवलं हॉटेलवर वॉचमन म्हणून. ज्यानं कॉलेजात पोरींना कधी शिट्ट्या मारल्या नाही ते पोर आता गाड्यांना शिट्ट्या मारत उभंय रस्त्यावर!
बुचके : बघा! हुकूमचंदांनी दिली का नाही नोकरी? शब्दाला फार पक्के आहे ते!
भरडे : कायचे पक्के? आता मागल्या येळी त्या खालच्या गल्लीतून काही जणांनी त्यांच्या जातीच्या संताच्या मंदिर बांधायला ग्रामपंचायतची एकरभर जागा आणि देणग्या जमा करून द्यायची बोली केली होती!
बुचके : देणग्या द्यायला सांगू ब्वॉ लोकांना! पण त्या जमिनीवर एक कॉम्प्लेक्स उभा राहतोय, तिथं मी काय बोलू?
भरडे : हे बघा, हे सायेबांनी नाही केलं तर त्या गल्लीचे पोरं करतील, मग म्हणू नका!
बुचके : आवो, भरडे! पण त्या पोरांना म्हणा, त्यांच्या टेनिस बॉलच्या क्रिकेट मॅच साहेबच घेतात ना?
भरडे : हा पण यंदा वर्गण्या स्थानिक टिमाकडून कमी घ्या म्हणा!
बुचके : एवढंच आहे ना? आणखी कोणाच्या काही मागण्या? काही अडलेली कामं?
सरडे : (अचानक काही आठवल्यागत) एक करा ब्वॉ! ते आमच्या आळीतल्या म्हातार्याची मागणी आहे…
बुचके : चला, निदान म्हातार्याला तरी विकासकामांची गरज वाटतीय तर…
सरडे : आवो, पुरं ऐका तर खरं!
बुचके : काय? बोला की?
सरडे : त्यांचं म्हणणं आहे, ती टिव्हीत नाही दिसती का? त्या डान्सर पोरीचा लावणीचा प्रोग्राम गावात ठेवावा अशी विनंती आहे त्यांची!
बुचके : (हसत) त्यांना म्हणा मतं द्या! मग हुकूमचंदांचाबी तेवढाच कलागुण दाखवायचा बाकी आहे तर त्यांना सांगून घेऊन टाकू कारेक्रम!
बुचप्रमुख `क’ : (निराशेने) चला येतो मी!
बुचके : अहो, चहापान करून जा की? आणि तुमच्या भागातल्या लोकांच्या काही समस्या नाहीत का?
बुचप्रमुख `क’ : मी काही तुमचा बुचप्रमुख नाही. मी सहज इथून जाताना काय चालुय इथं म्हणून डोकवायला आलो, पण पाहिलं त्यावरून डोकं भणाणलं.
बुचके : कश्याने?
बुचप्रमुख `क’ : हेच! पंच्याहत्तर वर्षे झाली देशाला पण पब्लिकला मतदान कुठल्या मुद्द्यावर करायचं हे कळत नसंल तर पब्लिक अजून झापडबंद आहे वा नशेत आहे वा येड्याचं पांघरूण घेऊन आहे असं समजावं! अजून बी वेळ गेली नाही! त्यांना आताच शक्य तेवढ्या मोठ्यानं माझ्यासारख्यानं सांगायला हवं, येणारं मतदान संविधान, महागाई, बेरोजगारी, गरीब-श्रीमंतीची वाढणारी दरी, स्त्री अत्याचार, दरडोई वाढणारं कर्ज, वेशीवर आलेला शत्रू, भित्रे, भ्रष्ट नेतृत्व, बिघडलेला धार्मिक-सामाजिक सलोखा, सरकारी संस्थांचे झालेले खंडणीखोर टोळीकरण यावर करणार नसू तर देश अराजकतेच्या दिशेने जाईल. आणि हे होऊ द्यायचं नसेल तर लोकजागृती हाच मार्ग आहे! आणि तेच करायला जातोय मी!