चित्रपटातला पोलीस कमिशनर हा ज्या व्यक्तिमत्वाचा असतो, त्याचे प्रतिबिंब बहुदा इफ्तेखारच्या पर्सनॅलिटीमध्ये होते. इफ्तेखार यांनी चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस कमिशनरच्या भूमिका इतक्या वेळा केल्या की मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवरील हवालदार किंवा विमानतळावर ड्युटी करणारे खरे पोलीस त्यांना खरोखरचा पोलीस कमिशनर समजून अनेकदा सॅल्यूट करीत.
– – –
भारतीय भाषेतील कोणत्याही चित्रपटात कोणत्याही संघर्षमय प्रसंगात सर्वात शेवटी प्रवेश करणारे महत्वाचे पात्र म्हणजे ‘पोलीस इन्स्पेक्टर’… अर्थात मुख्य भूमिका इन्स्पेक्टरची नसेल तर!! मग तो चित्रपट कोणत्याही भाषेतील असो. चित्रपटसृष्टीतला असा क्वचितच एखादा मुख्य अभिनेता असेल ज्याला या व्यक्तिरेखेचा मोह पडला नसेल. प्रत्यक्षातील आपली पोलीस यंत्रणा बर्याच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने लिप्त होत चालली असताना चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टर मात्र सच्चा आणि अत्याचाराच्या विरोधी तुटून पडणारा दाखवला जात असे. (आता हा ट्रेंड बदलत आहे) हा एक विरोधाभास आहे. हल्ली अनेक चांगल्या गोष्टी अपवाद या सदराखाली मोडत आहेत ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. पण हे खरे आहे की आम्हाला चित्रपटातील मुख्य नायकाचे पोलीस इन्स्पेक्टर खूप भावतात. कारण हे गरीबांना हमखास न्याय मिळवून देणारे असतात. वेळेप्रसंगी एकट्याने १०-१५ गुंडाशी झुंज देतात. आम्ही भारतीय प्रेक्षक बर्यापैकी आशावादी असतो. बहुतेक चित्रपटातील कथानक आमच्या स्वप्नांचा आरसा असतो. मात्र हा आरसा काळोखात लुप्त होतो. चित्रपट मात्र काळोखातच अधिक स्पष्टपणे दिसत असतात. अर्थात प्रत्यक्षातील पोलीस इन्स्पेक्टर आणि चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टर यात बर्यापैकी फरक असतो. कदाचित म्हणूनच आम्हा प्रेक्षकांना पडद्यावरचे पोलीस अधिक भावतात.
सय्यदाना इफ्तेखार अहमद शरीफ असं लांबलचक नाव असलेल्या जालंधरच्या या तरुणाला गाण्याचं आणि चित्रकलेचं भयंकर वेड. मॅट्रिक परीक्षा पास होताच याने थेट लखनौ कला महाविद्यालय गाठले आणि चित्रकलेचे पद्धतशीर शिक्षण घ्यायला सुरुवात केली. गाण्याचंही अपार वेड. त्या काळात जसे सर्वच तरुण गायक सैगलच्या प्रेमात असायचे तसा हाही सैगलच्या प्रेमात होता. सैगलच्या वेडामुळे असेल कदाचित, पण त्या काळचे बहुतेक नायक स्वत:चे गाणे स्वत:च म्हणायचे. २० वर्षाचा असताना एकदा हा तेव्हाच्या कलकत्त्याला गेला. कारण काय तर तेथे कमल दासगुप्ता नावाच्या संगीतकारानं एक गाण्याची ऑडिशन ठेवली होती. विशेष म्हणजे हा पठ्ठा त्या ऑडिशनमध्ये पास झाला. कमल दासगुप्ता त्यावेळी एचएमव्ही या ग्रामोफोन कंपनीत काम करत असत. ते याच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले आणि त्यांनी एम. पी. प्रॉडक्शन नावाच्या चित्रपट कंपनीकडे याची शिफारस केली; पण गायक म्हणून नव्हे, तर अभिनेता म्हणून. त्या कंपनीत हे महाशय जेव्हा गेले तेव्हा तेथे एस. डी. बर्मन हेसुद्धा दोन गायकांची गाण्याची टेस्ट घेत होते. त्यांच्याशी भेटून व आपली स्क्रीन टेस्ट आणि दोन गाणी रेकॉर्ड करून मग ते कानपूरला आपल्या कुटुंबात परतले.
चित्रपटसृष्टीत अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांना जे व्हायचं होतं ते न होता त्यांना वेगळीच ओळख मिळाली. मुकेश यांनाही नायक व्हायचे होते ते गायक झाले. गुरुदत्तलाही खरा रस दिग्दर्शनातच होता. नायकात नाही. तर सुभाष घईही नायक होण्याचे स्वप्न घेऊनच इथे आले व मोठे शोमन झाले. सय्यदाना इफ्तेखार अहमद शरीफलाही गायकीतच काहीतरी करायचं होतं आणि सुरुवातही तशीच झाली होती. काही महिन्यानंतर त्यांच्या दोन गाण्याची रेकॉर्ड बाजारात आली. तेव्हा एका तबकडीवर पाठपोट दोनच गाणी रेकॉर्ड करत असत. या गाण्यामुळे त्यांच्या नातेवाईक व समाजात ते बर्यापैकी प्रसिद्ध झाले. तोपर्यंत आपण स्क्रीन टेस्ट दिली होती, याचा त्यांना विसर पडला होता. सहा महिन्यानंतर कलकत्त्याहून निरोप आला की ‘तुम्ही स्क्रीन टेस्टमध्ये पास झाला आहात. तुम्हाला चित्रपटात भूमिका मिळाली आहे. लगेच निघून या.’ सय्यदाना इफ्तेखार अहमद शरीफ मग कलकत्त्याला पोहचले आणि तीन वर्षांत त्यांनी चार चित्रपटात भूमिका केल्या. हे चित्रपट रिलीजही झाले. नंतर चित्रपटसृष्टी या अभिनेत्याला ‘इफ्तेखार’ याच नावाने ओळखायला लागली.
चित्रपटातील एखादे चरित्र हेच त्याचे वैयक्तिक चरित्र आहे असं फार क्वचितच या चित्रपटसृष्टीत घडतं. इफ्तेखार आणि जगदीश राज हे दोन अभिनेते याला अपवाद ठरले. इफ्तेखार यांनी चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस कमिशनरच्या भूमिका इतक्या वेळा केल्या की मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवरील हवालदार किंवा विमानतळावर ड्युटी करणारे खरे पोलीस त्यांना खरोखरचा पोलीस कमिशनर समजून अनेकदा सॅल्यूट करीत. त्यांच्या व्यक्तिमत्वात ती छाप होती. प्रत्यक्षातल्या पोलीस कमिशनरचा थेट जनतेशी कमीच संबंध येत असे. किमान ६० ते ८० पर्यंतच्या दशकात तरी असं होतं. त्यामुळे चित्रपटातला पोलीस कमिशनर हा ज्या व्यक्तिमत्वाचा असतो, त्याचे प्रतिबिंब बहुदा इफ्तेखारच्या पर्सनॅलिटीमध्ये होते आणि नंतर तर अशा भूमिका करताना त्यांचे व्यक्तिमत्वच तसे बनले. निर्माते व दिग्दर्शकांची अशा भूमिकेसाठी पहिली पसंती इफ्तेखार हेच असत.
कलकत्त्याला जे चार चित्रपट त्यांनी केले होते ते होते ‘तकरार’, ‘घर’, ‘राजलक्ष्मी’ व ‘तू और मैं’. या चारही चित्रपटांत ते मुख्य नायक होते. १९४४चे ते वर्ष होते. या चित्रपटांनंतर बराच काळ त्यांना संघर्ष करावा लागला. त्यात फाळणीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. कारण त्यांचे बरेच नातेवाईक व त्यांच्या कुटुंबातील भाऊही पाकिस्तानात गेले. कलकत्त्यातही दंगली सुरू झाल्यामुळे मग ते मुंबईला आले. कारण मुंबईच फक्त त्यांना आता रोजीरोटी देऊ शकणार होती.
मुंबईत आल्यावर त्यांना त्यांच्या संगीताच्या वेडामुळेच काम मिळू शकले. १९५०मध्ये त्यांना मुंबईत संगीतकार अनिल विश्वास आणि अशोक कुमार यांच्या मदतीमुळे ‘मुकद्दर’ नावाच्या चित्रपटात त्यांना सेंकड लीड मिळाला आणि चित्रपटसृष्टीत खरोखरच त्यांचे मुकद्दर फळफळले. राज कपूरच्या ‘श्री ४२०’ आणि ‘अब दिल्ली दूर नहीं’ व ‘पिंजरे के पंछी’ या चित्रपटांतून सर्वप्रथम त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिका केल्या. मात्र राजेश खन्नाच्या ‘इत्तेफाक’ या चित्रपटात त्यांच्या शरीरावर जो हा युनिफॉर्म चढला तो नंतर त्वचेसारखाच त्यांना चिकटला. १९७० ते ८० या दशकात मुंबईचे खरे पोलीस कमिशनर कुणी का असेनात, पण सगळ्यांना हेच पोलीस कमिशनर वाटत असत. भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्यांना विनाकारण टाईप्ड व्हावे लागले. हा खरं तर कुठल्याही अभिनेत्याच्या कलाक्षमतेवर अन्यायच असतो. निर्माते जेव्हा प्रेक्षकशरण होतात, तेव्हा मग अनेक अभिनेते चौकटीत बंदिस्त होतात. तसे बघितले तर इफ्तेखार यांनी इतरही ज्या भूमिका केल्या, त्या व्यक्तिरेखेत कठोरतेच्या छटा होत्या. मग ती भूमिका जज, डॉक्टर, वकील, ठाकूर, प्राचार्य, आर्मी ऑफिसर अशा जरी असल्या तरी त्यात हळवेपणा कमीच असे. ‘शोले’मधील त्यांची जया भादुरीच्या वडिलांची छोटीशी भूमिका मात्र खूपच भाव खाऊन गेली. ‘जंजीर’मधला त्यांचा कमिशनरही थोडा वेगळा वाटतो. ‘बंदिनी’, ‘सावन भादो’, ‘खेल खेल में’ व ‘एजंट विनोद’ या चार चित्रपटातील त्यांची निगेटिव्ह भूमिका होती. ‘दिवार’मधला भ्रष्ट कारखानदार मुल्कराज डावर मात्र निगेटिव्ह असूनही सहानुभूती मिळवून गेला. त्यांच्या उत्कृष्ट भूमिकांपैकी ही एक भूमिका. अशीच त्यांची भूमिका ‘डॉन’ या चित्रपटातही होती.
चरित्र अभिनेत्याची एक गोष्ट मात्र चांगली असते. त्यांना चित्रपटात कायम काम मिळत राहतं. नायक, नायिका वा खलनायक बदलले तरी यांना मात्र ते नको म्हणेपर्यंत भूमिका मिळत राहतात. त्यामुळे इफ्तेखार यांनी त्यांच्या चित्रपटप्रवासात ४०० चित्रपटांतून काम केले. विशेष म्हणजे त्यांनी ‘बॉम्बे टॉकीज’ (१९७०) व ‘सिटी ऑफ जॉय’ (१९९२) या दोन इंग्रजी चित्रपटांतूनही काम केले. शिवाय १९६३मध्ये ‘माया’ नावाच्या अमेरिकन मालिकेतही भूमिका केली. मी इफ्तेखार यांना एखादा गरीब शेतकरी, मजूर वा विनोदी भूमिकेत बघितल्याचे आठवत नाही आणि अशा भूमिकांसाठी त्यांना कोणी विचारले असण्याची शक्यताही कमीच आहे. ते बहुतांश चित्रपटात जरी कमिशनर वा पोलीस इन्स्पेक्टर असले तरी त्यांचं चित्रपटातलं कुटुंब क्वचितच बघायला मिळालं. त्यामुळे अशी व्यक्ती घरात नेमकी कशी रिअॅक्ट होत असेल हे प्रेक्षकांना कधी समजू शकले नाही.
अशा प्रकारच्या भूमिकेत युनिफॉर्म हा खूप महत्वाची भूमिका निभावत असतो. अर्धे काम हा युनिफॉर्मच करतो. मात्र हाच युनिफॉर्म नायकाच्या अंगावर चढतो तेव्हा मात्र त्याचे आयाम बदललेले असतात.
फार पूर्वी माझ्या वाचनात असे आले होते की त्यांचा ‘फाइव्ह पास्ट फाइव्ह’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नव्हता. कारण यात गांधीजींची हत्या केंद्रस्थानी होती. या चित्रपटात त्यांनी गांधीजींची भूमिका केली होती. खरोखर असा चित्रपट तयार झाला होता काय माहीत नाही, पण त्यांच्या चेहर्याचा सूक्ष्म अभ्यास केला तर त्यांना ही भूमिका कदाचित सूट झाली असती… अर्थात हे माझे व्यक्तिगत मत आहे. आणि जर हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर कदाचित या भूमिकेमुळे ते नक्कीच चर्चेतही आले असते… असो. शेवटी सत्ताधारी आपापल्या इतिहासाची काळजी घेत असतात.
इफ्तेखार यांनी कलकत्त्यातील हॅना जोसेफ नावाच्या ज्यू स्त्रीशी लग्न केले होते. लग्नानंतर हॅना ही रेहाना अहमद झाली. या दांपत्त्याला दोन मुली झाल्या. सादिया खान आणि सलमा जैन. यापैकी सादिया खान अभिनेत्री आहे. इफ्तेखार यांच्या मृत्यूनंतर १८ वर्षांनी रेहाना अहमद यांचा मृत्यू झाला. इफ्तेखार यांची एक बहीणही प्रसिद्ध अभिनेत्री होती. तजोर सुलताना हे त्यांचे नाव. मात्र पडद्यावरचे त्यांचे नाव होते वीणा. तुम्हाला किशोर कुमारचा ‘चलती का नाम गाडी’ आठवत असेल तर त्यातील अशोक कुमारची ती प्रेयसी आहे. १९६३मधील ‘ताज महल’ या चित्रपटात वीणाने मलिका-ए-आलम नूरजहाँची भूमिका केली आहे. या भूमिकेसाठी वीणाला उत्कृष्ट सहाय्यक कलावंताचा पुरस्कारही मिळाला.
चित्रपटसृष्टीमध्ये पार पूर्वीपासून अनेक ट्रेंड सेट होत आले. इफ्तेखार साहब यातील एक महत्त्वाची कडी होते. मानवी डोळे आणि कॅमेर्याचे डोळे यात एक महत्वाचा फरक म्हणजे कॅमेर्याचे प्रत्येक चित्र एका चौकटीत बंदिस्त असते. आपण जेव्हा समोरासमोर संवाद साधत असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीची एकच बाजू दिसत असते. मात्र कॅमेरा काही सेकंदातच अनेक बाजू दाखवू शकतो. इफ्तेखार साहब सगळ्याच बाजूंनी पोलीस कमिशनर वा पोलीस इन्स्पेक्टर दिसत. तसे तर त्यांनी मिलिट्री ऑफिसर, न्यायाधीश, वकील, डॉक्टर अशाही भूमिका केल्या. त्यांचे व्यक्तिमत्व अशा पात्रात शोभून दिसे. ते चित्रपटात सिव्हिल ड्रेसमध्ये असले तर हे नक्की पोलीस अधिकारीच असणार असा अदमास प्रेक्षक लावत असत. त्यांच्या नेमक्या याच छबीचा वापर करून ‘खेल खेल में’ या चित्रपटात त्यांना चक्क मुख्य खलनायक बनवण्यात आले. या चित्रपटात शेवटपर्यंत प्रेक्षकांना ते इन्स्पेक्टर वाटतील अशीच योजना केली होती. मात्र शेवटी ते मुख्य खलनायक निघताच प्रेक्षकांचे अंदाज साफ कोसळून पडतात. मला वाटतं हा त्यांचा असा एकमेव चित्रपट असावा.
चित्रपटसृष्टीत अनेक योगायोग घडत आले आहेत. मुकेश यांना नायक म्हणून करीअर करायचे होते ते गायक झाले. आशा पारेख यांना डॉक्टर व्हायचे होते त्या अभिनेत्री झाल्या. दिलीपकुमारचा तर चागंला फळांचा व्यवसाय होता, ते अभिनयाचे बादशाहा झाले.
डॉ. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे, डॉ. जब्बार पटेल ही अशीच उदाहरणे आहेत. खरे तर इफ्तेखार साहेबांना गायक व्हायचं होतं, पण चित्रपटसृष्टीनं त्यांना नेमके विरुद्ध दिशेला नेलं. गायक व्हायचं तर सूर आणि गळ्याचा नैसर्गिक आवाज याचा ताळमेळ बसवावा लागतो. पण चित्रपटसृष्टीनं ‘सुरा’ऐवजी त्यांना ‘सूट’ बहाल केला आणि इफ्तेखार ‘उस्ताद’ऐवजी कमिशनर झाले.