ग्रहस्थिती : गुरू, हर्षल, मेष राशीत, बुध, राहू, नेपच्युन मीन राशीमध्ये, मंगळ, प्लुटो मकर राशीमध्ये, रवि, शुक्र, शनि कुंभ राशीमध्ये, केतू, कन्या राशीमध्ये. विशेष दिवस : ६ एप्रिल शनि प्रदोष, ७ एप्रिल अमावस्या, आरंभ रात्री ३.३१ वा., ८ एप्रिल अमावस्या. समाप्ती रात्री ११.५१ वा., ९ एप्रिल गुढीपाडवा, १० एप्रिल श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन, ११ एप्रिल रमजान ईद, १२ एप्रिल विनायकी चतुर्थी.
मेष : विद्यार्थ्यांना यशदायक काळ आहे. नोकरीत कामाचा ताण येईल, बाहेरगावी जावे लागू शकते. प्रकृतीची काळजी घ्या. उन्हाळा सुरू झाला आहे, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. नववर्षाची सुरुवात चांगली होईल, मनासारख्या घटना घडतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. मित्रमंडळी, नातेवाईक मदत करतील. व्यवसायात मनावर ताबा ठेवा. सबुरीने घ्या. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्या, जपून बोला.
वृषभ : कामाच्या ठिकाणी अधिक श्रम करा, चांगले यश मिळेल. नववर्षाच्या मुहूर्तावर चांगली बातमी मिळेल. नवीन वास्तू घेण्याचा विचार मार्गी लागेल. आर्थिक नियोजनाचा फायदा होईल. मुलांकडे लक्ष द्या. युवकांना नव्या कल्पना आर्थिकदृष्ट्या फायद्याच्या ठरतील. नव्या व्यावसायिकांना यश मिळेल. नव्या ऑर्डर मिळतील, पण त्यात त्रासही होऊ शकतो, काळजीपूर्वक काम करा. जुन्या ओळखींमधून लाभ होईल. नियोजनपूर्वक गुंतवणूक लाभदायी ठरेल.
मिथुन : मनातल्या विचारांना वाट करून देताना काळजी घ्या, वाद टाळा. नोकरी-व्यवसायात सकारात्मक विचारांनी पुढे चला. फायदा होईल. दाम्पत्यजीवनात किरकोळ वाद वाढवू नका. सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळेल. व्यवसायात नियोजनपूर्वक पुढे जा. निर्णय घेताना घाई नको. बहिणीचे सहकार्य मिळेल. घरात छोट्या समारंभाच्या निमित्ताने गाठीभेटी होतील. संशोधकांना यश मिळवून देणारा काळ राहणार आहे.
कर्क : मित्रमंडळींबरोबर मौजमजेत दिवस जातील. नोकरीत कामाचे कौतुक होईल, वरिष्ठ खूष होतील आणि चांगली गिफ्ट देतील. घरात शब्द जपूनच वापरा, चुकून वादाचे प्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अचानक धनलाभाचे योग आहेत. सरकारी कामे लांबणीवर पडतील. मुलांच्या हातून चांगली कामगिरी घडेल, घरातील वातावरण चांगले राहील. बांधकाम क्षेत्रात उत्कर्षाचा काळ आहे. मित्रांबरोबर जेव्हढ्यास तेवढे ठेवा. ध्यानधारणा मन प्रसन्न ठेवेल. नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल. कलाकारांसाठी चांगला काळ. शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल.
सिंह : कामाच्या ठिकाणी ताण घेऊ नका. कोणाला आश्वासन देऊ नका. त्रास होईल. संमिश्र घटनांचा अनुभव येईल. अडकलेले काम नवीन ओळखीतून पुढे सरकेल. मुलांच्या उच्चशिक्षणाचा मार्ग सहज मोकळा होईल. विदेशातील प्रोजेक्ट मार्गी लागतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. शुभकार्याच्या निमित्ताने नातेवाईक, जुने मित्र यांच्या गाठीभेटी होतील. सामाजिक जीवनात चांगले अनुभव येतील. रस्त्यावर वाद उद्भवतील, पोलीस चौकीची पायरी चढावी लागू शकते. काळजी घ्या. खेळाडू, कलाकार, वकील यांच्यासाठी चांगला काळ आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या : नव्या वर्षाच्या सुरुवातीला चांगली बातमी कानावर पडेल. नोकरीत खूप काम करावे लागेल. त्याचा लाभ होईल. कुटुंबासोबत सहलीला जाल. कुटुंबासाठी भरपूर वेळ खर्च कराल. महागड्या वस्तूची खरेदी होईल. अचानक जुने येणे वसूल झाल्यामुळे खिसा भरलेला राहील. पैसे कसेही खर्च करू नका. नवीन गुंतवणूक कराल. व्यावसायिकांसाठी उत्तम काळ. मित्रमंडळींमध्ये कमी बोला अधिक काम करा. व्यावसायिकांना मन:स्ताप होईल. पत्रकार, खेळाडू, लेखकांना यश मिळवून देणारा काळ. तरुणांना नव्या नोकरीची संधी येईल.
तूळ : तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. मेडिकल, शिल्पकला, चित्रकार, लेखक यांना नव्या संधी चालून येतील. विवाहेच्छुंच्या लग्नाची बोलणी मार्गी लागतील. राजकारणात मनासारखे पद मिळेल. घरात कटकटी होतील. काळजी घ्या. प्रेमप्रकरणात जपून राहा. कोर्टकचेरीची कामे विलंबाने होतील. जुना आजार डोके वर काढेल, त्याकडे दुर्लक्ष करू नका. पोटाची काळजी घ्या. नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढ मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात यश मिळेल.
वृश्चिक : कामाचा ताण वाढवल्यास आरोग्यावर परिणाम होईल. विचार पटले नाहीत तर शांत बसा. मन:स्वास्थ्य खराब होईल. अनोळखी व्यक्तींवर विश्वास टाकू नका. पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होतील. मन शांत ठेवा आणि ध्यानधारणेत वेळ घालवा. नोकरीत मनासारख्या घटना घडणार नसल्यामुळे मन भरकटू देऊ नका. व्यावसायिकांना चांगला लाभ मिळेल. भागीदारी व्यवसायात कटकटीचे प्रसंग घडतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. सोशल मिडीयावर वावरताना काळजी घ्या. उगाच नसते दुखणे मागे लागेल.
धनु : कल्पनाशक्तीतून व्यवसायाची संकल्पना सुचेल. अनपेक्षित लाभ होतील. नवीन वास्तू घेण्याच्या विचारांना गती मिळेल. व्यवसायातून चांगली उलाढाल होईल, चार पैसे शिल्लक पडतील. नोकरीत घाई करून निर्णय घेऊ नका. घरात आनंदवर्धक घटना घडतील. व्यावसायिकांना आत्मपरीक्षण करावे लागेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी, वैवाहिक जीवन उत्तम राहील. सरकारी कामे नियमात राहूनच पूर्ण करा. घरात बाहेर वागताना बोलताना सकारात्मकता ठेवा, यश मिळेल.
मकर : मोठे आर्थिक व्यवहार करणे तूर्तास पुढे ढकला. नातेवाईकांबरोबर वाद विकोपाला जाईल. शेअर, सट्टा, लॉटरीमधून चांगला लाभ मिळेल. नोकरीत लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा. व्यवसायात व्यवहार करताना काळजी घ्या. कुठेही सही करू नका, फसाल. नव्या वर्षाच्या सुरुवातीला मनासारख्या घटना घडतील. खुशीचे वातावरण राहील. तरुणांना उच्चशिक्षणाच्या संधी चालून येतील. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. नव्या नोकरीच्या प्रयत्नांत नक्की यश मिळेल, योग्य विचार करून निर्णय घ्या. बंधू वर्गाला मदत करावी लागेल.
कुंभ : व्यवसायात नवी दिशा मिळेल. वेगळ्या कामातून स्वप्नपूर्तीचा आनंद मिळेल. नोकरीत यशदायक काळ अनुभवाल. चुकीच्या कामांना थारा देऊ नका. उधारीने पैसे देण्याचे टाळा. संमिश्र स्वरूपाचे अनुभव येतील. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. शेतकर्यांसाठी चांगला काळ. कलाकार, अभियंत्यांना चांगले अनुभव येतील. कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर पडतील. खेळाडूंकडून चमकदार कामगिरी होईल. उन्हाळ्यापासून काळजी घ्या, आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. घरासाठी भरपूर वेळ खर्च होणार आहे.
मीन : मन मानेल तसे चालणे सोडावे लागेल, तरच यश मिळेल. विदेशात नोकरीनिमित्ताने जाण्याच्या प्रयत्नांत यश मिळेल. कोणताही निर्णय घेताना उतावळेपणा नको. आनंदावर विरजण पडेल. सामाजिक क्षेत्रात चांगला काळ राहील. उल्लेखनीय काम पूर्ण होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात आर्थिक बाजू कमकुवत होईल. योग्य पद्धतीने नियोजन केले तर त्याचा फार त्रास होणार नाही. मिष्टान्न भोजनाचा योग आहे. कामानिमित्ताने अचानक बाहेरगावी जावे लागू शकते. प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या. मामा-मावशी यांच्यासाठी वेळ खर्च होणार आहे.