बाळासाहेबांनी हे मुखपृष्ठ चित्र रेखाटलं तेव्हा मुंबईत, राज्यात, देशात काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि परप्रांतातून मुंबईत पोट भरायला लोंढे येत होते. भूमिपुत्र असलेला मूळ मराठी माणूस त्या गर्दीत हरवत चालला होता. त्याला तत्कालीन सत्ताधीशांची फूस होतीच. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करून मराठी माणसाचा स्वाभिमान जागवला आणि विधानभवनावर शिवरायांचा जरीपटका फडकावण्याचा पराक्रमही करून दाखवला. मात्र, बाळासाहेबांच्या पश्चात, त्यांचंच बोट धरून आणि त्यांच्याच खांद्यावर बसून मोठ्या झालेल्या कमळीने काँग्रेसपेक्षा वाईट अवस्था करून टाकली आहे मुंबईची आणि महाराष्ट्राची. भाजपच्या भोंदुत्वाच्या नादी लागलेल्या मराठी माणसाला निष्प्रभ करून मुंबईचं महत्त्वच कमी करून टाकण्याचा आसुरी डाव गुजरातच्या बनियांनी रचला आहे. सुरतेच्या लुटीचा बदला ते मुंबई खच्ची करून घेत आहेत. मराठी माणूस शिवजयंतीला अजून फाफडा, ढोकळा, जिलेबी खाऊन गरबा खेळायला लागलेला नाही, हेच नशीब म्हणायचे. मुंबई महापालिकेतली शिवसेनेची सत्ता संपवून, तिथे प्रशासक आणि अमंगल पालकमंत्री बसवून मुंबईची पद्धतशीर लूट सुरू आहे आणि मराठी माणूस कोणता झेंडा घेऊ हाती या संभ्रमात निपचित पडला आहे… तो ताटाखालचं मांजर बनला नसेल, अजून वाघच असेल, तरच त्याला डिवचता येईल… नाहीतर तो म्याँव म्याँव तरी मराठीत करेल का, याबद्दल शंकाच आहे बाळासाहेब!