महाराष्ट्रात असताना चतुर्थी, एकादश्या, झालेच तर वेगवेगळे वार असे बरेच उपास लोकांना करताना मी बघितलं होते. आषाढी-कार्तिकी एकादशी आणि महाशिवरात्रीचा उपास तर न करणारे लोक फार कमी बघितले होते मी. पंजाबात मात्र असे भरमसाठ उपास करताना मी फारसे कुणाला बघितले नाही. सरसकट सगळ्या चतुर्थ्या न करता फक्त करवा चौथ, संकट चौथ अशा वर्षातून २-४ चतुर्थ्यांना बायका उपास करतात. काहीजणांना किमान वर्षभर सगळ्या एकादश्या करून मग त्याचे साग्रसंगीत उद्यापन करताना बघितले आहे. याशिवाय ‘होई’चा उपास, श्रावणातल्या ‘तीज’चा उपास असतो. श्रावणी सोमवार करणारे पण असतात थोडे लोक. याशिवाय महत्वाचे उपास म्हणजे नवरात्रातले. चैत्र आणि शरद या दोन्ही नवरात्रात खूप जण उपास करतात.
माझ्या लहानपणीच्या उपासाच्या आणि एकूणच सणांच्या आठवणी खाद्यपदार्थांशी निगडित आहेत. आमच्या घरी आई-बाबा कधी उपास करत नसत. पण माझ्या एक आज्जी मात्र भरपूर उपास करायच्या. घरी कोणी उपास केले नसले तरी आषाढी-कार्तिकीला आणि शिवरात्रीला आमच्या घरी उपवासाच्या पदार्थांचा भरगच्च बेत असायचा. उपासाचे पदार्थ म्हटलं की साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, भगर-आमटी, उपासाचे थालपीठ हे आणि असे इतर कितीतरी पदार्थ मला आठवतात. त्या तुलनेने पंजाब्यांमध्ये उपासाच्या पदार्थांची जरा वानवाच आहे.
एकतर यांचे बरेच उपास निर्जला असतात करवा चौथसारखे. दिवसभर काहीच न खाता पिता रात्री किंवा दुसर्या दिवशी जेवण करायचे. अशा उपासांसाठी उपासाचे वेगळे पदार्थ नसतातच. नवरात्रात मात्र सप्तमीपर्यंत उपास करून अष्टमीला कंचक (कुमारिका) पुजतात. या काळात सगळीकडे उपासाचे पदार्थ खाल्ले जातात. दिल्लीत नवरात्रात उपासाची म्हणून स्पेशल थाली मिळते बर्याच ठिकाणी. इथल्या व्रत स्पेशल थालीमध्ये पनीर टिक्का, आलू की सब्जी, अरवी की सब्जी, पनीर की सब्जी, कुट्टू के आटी की पुरी, सलाद, साबुदाणा खीर किंवा मखाने की खीर, सामक के चावल (भगर), आलू-साबुदाणा टिक्की असे पदार्थ असतात.
दिल्लीतले पंजाबी व्रत का खाना म्हणून बरंच काय काय खातात. मी व्रत स्पेशल म्हणून पालक घालून कुट्टूचे पकोडे खाल्लेत शेजारणीकडून. फणसाची कांदा-लसूण, हळदविरहित टॉमॅटो घातलेली भाजी पण खाल्लीये. दिल्लीत अगदीच नवी असताना रेडिओवर एकदा उपासाला खायच्या पदार्थांची यादी ऐकली होती. त्यात बटाटा, भोपळा, दुधी, दोडके, टॉमॅटो, फणस, पालक, अरवी, शलगम आणि चक्क वांगी पण सांगितली होती.
नवरात्रातल्या उपासाला कोण कोणते पदार्थ चालतात किंवा कोणते पदार्थ चालत नाहीत याचे नियम घरोघरी बदलतात. काहीजणांकडे नवरात्रीमध्ये फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, फळं, ड्रायप्रâूट इतकेच पदार्थ खाल्ले जातात. तर काही ठिकाणी आपल्याकडे खाल्ले जाणारे उपासाचे पदार्थ खातात. बर्याच ठिकाणी साबुदाणा, भगर, बटाटा, रताळे, राजगिरा, भोपळा या आपल्याकडे खाल्ल्या जाणार्या उपासाच्या पदार्थांशिवाय दुधी भोपळा, पालक, टॉमॅटो आणि साध्या नेहमीच्या मिठाऐवजी शेंदेमीठ घालून केलेले पदार्थ खाल्ले जातात. काही घरांमध्ये उपास न करता नवरात्र म्हणून फक्त कांदा-लसूण आणि मांसाहारविरहित पदार्थ खातात या दिवसात.
आमच्या घरी गावाकडे सासूबाई, कधी एखादी जाऊ नवरात्रात उपास करतात. आमच्या घरी मी साबुदाण्याची खीर, व्रत के आलू आणि सियोल म्हणजे आपला राजगिरा असे २-३ पदार्थच नेहमी हौसेने सगळ्यांना उपासाला खाताना बघितलंय. हल्ली साबुदाणा खिचडी आणि वडा आता तिकडे पण सगळ्यांना आवडायला लागला आहे. पण ते कधीतरी बदल म्हणून खातात. खूप हौस असेल तर मखान्याची खीर करतात कधीतरी. पूर्ण नवरात्रात उपास करायचे असतील तर मखाने भाजून, शेंदेमीठ घालून त्यात शेंगदाणे आणि थोडे तळलेले/ भाजलेले ड्रायफ्रूट घालून संध्याकाळच्या भुकेसाठी कोरडा खाऊ करतात.
हल्ली पारंपारिक उपासाच्या पदार्थांशिवाय बरेचजण नवीन वेगवेगळे पदार्थ पण करून बघतात. अशावेळी नेहमीची धान्ये टाळून त्याऐवजी शिंगाडा, राजगिरा, सामक (भगर) यांचे पीठ वापरून पुर्या/ पराठे करतात. टॉमॅटो हे फळ आहे असे मानून बरेचजण भाज्या करताना टॉमॅटोचा वापर करतात. बटाटा, पनीर, अरवी/अळुकडी, भोपळा या भाज्या अद्रक आणि टॉमॅटो वापरून हळदविरहित ग्रेव्हीमध्ये करतात काही ठिकाणी. शिंगाड्याच्या पिठाचे बटाटे, पनीर, पालक घालून पकौडे करतात. ताकाला बेसनाऐवजी शिंगाड्याचे किंवा राजगिर्याचे पीठ लावून कढी बनवून कढी पकौडे + सामक के चावल (भगर) असे नवे पदार्थ हल्ली केले जातात.
अर्थात इतके उपवासाचे पदार्थ उपलब्ध असूनही बटाट्यांचे महत्व काही नवरात्रात कमी होत नाही. ‘नवरात्री का व्रत’ हे शब्द ऐकल्यावर कोणत्याही पंजाबी व्यक्तीला सगळ्यात आधी बटाटाच आठवत असेल. दिल्लीत नवरात्राच्या सात दिवसाच्या उपासात घरटी किमान ८-१० किलो बटाटे सहज खाल्ले जात असतील. मी सासरी अगदी २-३ जणांचा उपास असला तरी सकाळीच ४-५ किलो बटाटे उकडून ठेवताना बघितले आहे.
माझ्या सासूबाई बनवत असलेले व्रत के आलू घरी सगळ्यांनच खूप आवडतात. उपास नसला तरी एखादी वाटी भरून हे आलू आम्ही पण सहज खातो. यासोबत आमच्या घरी मिठी आणि नमकीन सियोल (राजगिर्याच्या लाह्या) बनवतात.
व्रत के आलू
साहित्य : उकडलेले बटाटे, जिरे, लवंगा, दालचिनी, ओवा, मिरे, तिखट, फोडणीसाठी तूप, किसमिस, चवीप्रमाणे मीठ आणि हवी असल्यास चिमूटभर साखर.
कृती : बटाटे जरा जास्त मऊसर उकडून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यावेत. तिखट आणि ओवा सोडून इतर मसाल्याचे पदार्थ तव्यावर थोडे गरम करून ओबडधोबड वाटून घ्यावे. कढईमध्ये फोडणीसाठी थोडे जास्त तूप घ्यावे आणि त्यात जिरे, थोडे मिरे आणि एखादी लवंग घालून फोडणी करावी आणि त्यात ताजा केलेला गरम मसाला टाकावा. लगेचच बटाट्याच्या फोडी, तिखट, ओवा, मीठ, किसमिस घालून व्यवस्थित मिक्स करावे. यात हवी असल्यास चिमूटभर साखर घालावी. भाजी अगदी व्यवस्थित हलवावी. हलवतानाच चमच्याने थोडे बटाटे मॅश करावेत. नंतर कढईत भाजीवर घट्ट बसेल, अजिबात वाफ जाणार नाही असं झाकण ठेवावं. आम्ही कढईच्या आत घट्ट बसेल अशी ताटली ठेवतो झाकायला. २-४ मिनिटांनी कढईतून चर्रऽऽऽ असा आवाज येईल. आवाज जास्त येवून भाजी करपते की काय वाटलं की झाकण काढून परत ५-७ मिनिटे भाजी व्यवस्थित परतावी. भाजी व्यवस्थित खरपूस झाल्यासारखी वाटल्यावर गॅस बंद करावा.
उपास नसेल किंवा चालत असेल तर व्रत के आलू बनवताना सासूबाई तुपाऐवजी सरसो का तेल वापरतात आणि अशावेळी फोडणीत थोडे चुरडलेले धणे पण घालतात. बदल म्हणून कधी कधी यात थोडी भिजवलेली मुगाची आणि चण्याची डाळ आणि कढिपत्ता घालतात. बाकी पद्धत आणि मसाले तसेच. या आलूंची खरी मज्जा त्यांना भरपूर परतल्यामुळे जो खरपूसपणा (सासूबाईंच्या भाषेत आलू करारे होने चाहिये) येतो त्यात आहे.
मिठी सियोल / सियुल (राजगिर्याच्या लाह्यांची खीर)
साहित्य : एक लिटर दूध, अंदाजे दीड-दोन वाट्या राजगिर्याच्या लाह्या, २-३ चमचे खसखस, वाटीभर काजू-बदाम, मगज, किसमिस, साखर, थोडे तूप, विलायची पूड.
कृती : खसखस भिजवून वाटून घ्यावी. मोठ्या पातेल्यात दूध मंद आचेवर थोडावेळ आटवत ठेवावे. खूप आटवायची गरज नाही. काजू बदाम अर्धबोबडे/ ओबडधोबड वाटून किंवा तुकडे करून घ्यावे. एखाद्या छोट्या कढईत थोड्या मगज आणि इतर ड्रायफ्रूट परतून घ्यावे. आटवत ठेवलेल्या दुधात हे ड्रायफ्रूट आणि थोडे तूप घालावे. त्यातच वाटलेली खसखस आणि राजगिर्याच्या लाह्या घालाव्यात. चवीप्रमाणे साखर घालावी. थोडी विलायची पूड घालून एक उकळी आणावी.
याशिवाय सोबत नमकिन सियोल/ सियुल म्हणजे दह्यातल्या/ ताकातल्या राजगिर्याच्या लाह्या किंवा राजगिर्याच्या लाह्यांचा रायता पण करतात. यासाठी दह्याचे घट्टसर ताक करून त्यात जिरे आणि मिर्याची पूड, हिरवी मिरची, कोथिंबीर व पुदिना यांचे वाटप, चवीप्रमाणे शेंदेमीठ, साखर आणि राजगिर्याच्या लाह्या घालायच्या.